Sunday, March 9, 2014

धनदांडग्यांचा बँडबाजा



क्रिकेट, चित्रपट आणि राजकारणात काळ्या पैशांची डबकी साचली आहेत. त्या डबक्यांचे म्होरके आज सुब्रतो राय यांच्यासारखे अब्जाधीश आहेत. खेळ कोणताही असो, बँडबाजा मात्र सुब्रतो राय यांचाच. त्यावर आपल्याला फुकट नाचायला मिळते, असे समजूत करून घेणाऱ्या भारतीय नागरिकाने आता तरी सावध झालेच पाहिजे!


पैसा किती मोठा आणि खोटा होऊ शकतो, तो कसा ओरबाडला जाऊ शकतो, त्याच्या मुबलकतेमुळे कशी मुजोरी माजू शकते आणि त्याच्या अभावाने लाचार प्रजा कशी तयार होते, पैशाला पैसा किती घट्ट जोडला जातो आहे आणि तो कसा सिनेमातील नंगेनाच, क्रिकेटमधील चीअरगर्ल्स आणि राजकारणाच्या भ्रष्ट डबक्यात तुंबला, सडला आहे, हे सर्व अतिशय बटबटीतपणे आज देशासमोर आले, हे फार चांगले झाले. नव्या जगात वाढत चाललेली ही विकृती जो सर्वसामान्य नागरिक जाणून घेईल, तो यापुढे स्वत:ला दोष देणार नाही. तो व्यवस्थेने लादलेली लाचारी फेकून देण्याच्या प्रयत्न करेल. सहारा ग्रुपचे ‘सहाराश्री’ सुब्रतो राय यांनी काही गुन्हा केल्याचे अजून सिद्ध झालेले नाही. त्यांनी तूर्तास फक्त न्यायालयाचा अवमान केला आहे आणि त्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या दोन कंपन्यांनी २४ हजार कोटी रुपये नेमके कोणाकडून जमा केले आणि ते परत द्यायची वेळ आली तेव्हा त्यातील २० हजार कोटी रुपये आपल्या चार हजार सातशे शाखांकरवी रोखीत परत केले, हे काय गौडबंगाल आहे, हे तर अजून समोर यायचेच आहे. एवढे मात्र नक्की की, सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बलात्कार करून सर्व पुरावे नष्ट केले जाऊ शकतात, हे ते आणि त्यांच्यासारखे हजारो धनदांडगे कोट्यवधी भारतीय नागरिकांच्या उरावर बसून दररोज सिद्ध करत आहेत. प्रश्न आहे, त्याचे काय करायचे?

जो उद्योगसमूह किती लाख कोटी रुपयांचा आहे, याचा अंदाजही आज आपण करू शकत नाही, जेथे ११ लाख लोक काम करतात, ज्यांच्याकडे हजारो एकर जमीन पडलेली आहे, ज्याच्या तालावर आपल्या समाजासमोर हिरो असलेले जगातील महान क्रिकेटर नाचतात, आपल्या भावविश्वावर स्वार झालेले सिनेअभिनेते आणि अभिनेत्री ज्यांना शरण जातात आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही जेथे पाणी भरते, त्या उद्योगाविषयी आपण बोलतो आहोत. त्यामुळे दडपण तर येणारच. कारण हे सर्व म्हणजे एका सामान्य माणसाला बुलडोझर उचलून दाखव, असे सांगून वाकुल्या दाखविण्यासारखे आहे.

आज सुब्रतो राय यांच्या मुजोरीचा जेवढा राग येतो, तेवढाच राग भारतीय नागरिकाचा यायला लागला आहे. कारण त्यानेच तो क्रिकेट नावाचा हुकमी पैसा कमावण्याचा खेळ डोक्यावर घेतला आहे. त्या खेळात आता खरेतर खेळ काही राहिलेला नाही. ती एक सर्कस झाली आहे. काही जणांची पैसा छापण्याची टाकसाळ झाली आहे. सट्टेबाजी झाली आहे. भारतीय समाजाला गुंगी देणारी ती भांग आहे. ती प्या.. आणि पडून राहा. त्या खेळातले छोटे मोठेपण हे सुद्धा नफेखोरीच्या व्यवहाराचे अंग झाले आहे. नाहीतर इतक्या कमी काळात त्यांच्या संपत्तीचे असे अशुद्ध डबके तयार झाले नसते. सर्वसामान्य माणूस यापुढे क्रिकेटचा उदोउदो करील तेव्हा त्याला या डबक्यात आपण भर घालत आहोत, याचे भान ठेवावे लागणार आहे. राग क्रिकेटवर निघतो कारण आज त्यांनी नागरिकांना फसविण्यासाठी त्याचा वापर केला आहे. नाहीतर निखळ खेळाला कोण कशाला अशी दुषणे देईल? आपण तूर्तास लक्षात इतके तर ठेवू यात की सुब्रतो रायसारखे धनदांडगे या काळ्या पैशांच्या डबक्यावर मोठे झाले आहेत.

जी गोष्ट क्रिकेटची तीच बहुतांश निव्वळ धंदेवाईक चित्रपटांची. तेही काळ्या पैशांच्या डबक्यावर तयार केले जातात. त्यासाठी अशीच माणसे भांडवल पुरवितात. सुब्रतो राय यांच्याकडे तर म्हणे चित्रपट कलाकारांचा राबता असतो. त्यांनी उभ्या केलेल्या अॅम्बेव्हॅलीसारख्या शहरांत ते राहतात. तेथे नियमित पार्ट्या होतात. कोट्यावधीची उधळण होते. तेथे तर सामान्य माणसाला प्रवेशच नाही. पण त्याला त्याची उत्सुकता केवढी! मग त्याचे टीव्ही शो होतात आणि भुकेली माणसे ते सर्व अधाशासारखी पाहत बसतात. व्यवस्थेने बाहेर इतके नाडले आहे की काही करण्यासारखे राहिलेले नाही, मग आपल्या हिरोंनी केलेल्या पराक्रमानाच आम्ही आमचे पराक्रम म्हणायला सुरवात करतो. तेच आमच्या आयुष्यातील आदर्श व्हायला लागतात. या हिरोइझममागे आपल्याला दररोज नडणाऱ्या काळ्या पैशांची गटारगंगा वाहते आहे, याचे भान राहिलेले नाही.

जसे क्रिकेट आणि सिनेमे तसेच राजकारण. आपल्या आयुष्याच्या सुखदुखाला जे कारण आहे, ते राजकारण. त्याशिवाय समाज चालू शकत नाही. मात्र तेही आज अशुद्ध भांडवलावर पोसले गेले आहे. त्याच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांचे आकडे कळले तरी डोळे पांढरे होतात. किडूकमिडूक जमा करून संसार उभा करणाऱ्या माणसाला ते आकडे कळतही नाहीत. मात्र ते आकडेच आपले आयुष्य नासवते आहे, हे आता समजून घ्यायची वेळ आली आहे. आता निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्या रणधुमाळीत सुब्रतो रायसारख्या धनदांडग्याचा बँड असतोच. आपण म्हणतो, की आपल्याला फुकट नाचायला काय जाते? पण अशा फुकटेपणानेच सारा समाज लाचार झाला आहे. भारतातील राजकारण आज नागरिकांच्या उरावर नाचते आहे आणि भारतीय नागरिकांवर कण्हत कुथत जगण्याची वेळ आली आहे. खरे म्हणजे गुलामी, संरजामशाही, राजेशाही आणि मग सध्याची लोकशाही – हा प्रवास काही सहजासहजी आणि अशा लाचार जनतेच्या फौजा वाढविण्यासाठी झालेला नाही. मात्र करणार काय? लोकशाही आली म्हणून काही आमची मानसिकता बदलली नाही.

एक मान्यच केले पाहिजे. आपल्याला आपला उद्धार करणारा मसीहा हवा आहे. तो कधी आपल्याला चेंडू फळीचा खेळ खेळणाऱ्या महान खेळाडूमध्ये दिसतो. तो याच काळ्या पैशाच्या डबक्याचा स्वीकार करत असतो. कधी तो आपल्याला सच्च्या जगण्यापेक्षा पडद्यावर सर्व अन्यायी व्यवस्थेला धूळ चारणाऱ्या हिरोमध्ये दिसतो. मग त्याच्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार होतो, पण तोही काळ्या पैशांच्या डबक्यात लोळतच ‘लार्जर दॅन लाईफ’ होत असतो. आणि शेवटी आपल्या दैनदिन जगण्यावर परिणाम करणारा राजकीय नेता. तो तर आज काळ्या पैशांतच जन्मतो, मोठा होतो आणि त्यातच मरतो. इतका तो काळ्या अर्थव्यवस्थेशी एकरूप झाला आहे.
आपल्याला या व्यवस्थेने इतके लाचार केले, याचे फार वाईट वाटते ना? मग अर्थरचनेतील काळे-पांढरे समजून घ्यावे लागेल. जे भव्य आहे, आकर्षक आहे, ते फसवे तर नाही ना, हे तपासून घेण्याची सबुरी अंगी बाणावी लागेल. अब्जाधीश सुब्रतो राय यांच्या अटकेच्या निमित्ताने भारतीय नागरिकाने हा एकच संकल्प केला तरी त्याला भाग्यविधाते शोधण्याची गरज पडणार नाही.

No comments:

Post a Comment