Friday, September 24, 2010

‘सेंद्रीय’ जगण्याला हवे समूहाचे बळ

परवा मेलबॉक्समध्ये एक कविता येवून पडली. सध्या गणोशोत्सव चालू असल्यामुळे त्यासंबंधीच्या शुभेच्छांची आणि गणपतीच्या चित्रांची देवघेव वेबजगतात जोर्‍यात सुरु आहे. पण एकदम कविता पाहिल्यावर तो मेल मी वाचायला घेतला. एका कन्येने ‘बाप्पा’ नावाची ही कविता केली होती. दीपा नावाची कन्या सध्या कॅनडात राहाते, असे तिच्या नावानंतर लिहीलेल्या देशाच्या नावावरुन लक्षात आले. तिने तेथून पाठविलेली कविता माझ्या मित्राने मला मेल केली होती. कॅनडात राहाणारी भारतीय बाई देवाकडे नेमके काय मागते, याचे कुतूहल निर्माण झाले म्हणून ती कविता मी वाचली.

कवितेच्या सुरवातीच्या भागात पृथ्वीच्या सथ्याच्या परिस्थितीविषयीची टिप्पणी होती. या परिस्थितीत गणपती पृथ्वीवर आला तर त्याला कशाकशाचा सामना करावा लागेल, याचे वर्णन होते. शेवटच्या भागात देवाकडे तिने जे मागितले होते, ते वाचून मी अवाक् झालो. खरं म्हणजे तिच्याच शब्दात ते आधी आपण जाणून घेऊ. त्या कवितेची शेवटची आठ कडवी अशी होतीः

मी हसले उगाच, म्हटलं, देशील जे मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं
पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं
सोडून जाता येणार नाही असं एक बंधन हवं
हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव
प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्‍यात थोडासा शिरकाव
देशील आणून परत माझी हरवलेली नाती
नेशील मला परत जिथे आहे माझी माती
इंग्राजळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं
आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं
कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गजर
भांडणारा असला तरी चालेल, पण हवा शेजार
यंत्रवत होत चाललेल्या मानवाला आयुष्याचं
देशील का रे देवा माझ्या पदरात एवढं दान?
‘तथास्तु’ म्हणाला आणि सोंडेमागून हसला.
सारं हाताबाहेर गेलय पोरी ‘सुखी राहा’ म्हणाला

नागरीकरणाच्या रेट्यात आणि अत्याधुनिक काळात ज्या गोष्टींपासून आपण खूप लांब निघून आलो आहोत, त्याच गोष्टी आता आम्हाला हव्या आहेत तर! दीपाचं हे मागणं प्रतिकात्मक मानलं तर सध्या आपण कोठे आहोत पाहा... पारिजातकाचं अंगण ज्या आमच्या गावात कधी आम्ही पाहिलं होत, ते आम्हाला हवं आहे, कारण त्या परिसरामध्ये सुखासमाधानाचा दरवळ आहे, असं आम्ही गृहीत धरलं होतं. पण मोजकी घरं सोडली तर तो दरवळ तेथे नव्हताच मुळी ! म्हणून तर आम्ही त्याचा त्याग करून असुया, द्वेषाचे वास घेत घेत शहरं शहरं फिरतो आहोत. आणि आता आम्हाला पुन्हा तेच हवय ? व्यवहाराचा इतका अतिरेक आम्ही केला आहे की आपण आपल्यासारख्याच हाडामांसांच्या, मनाच्या माणसाशी व्यवहार करतो आहोत, याचाच आम्हाला विसर पडला आहे. ज्यांच्या वाट्याला माणूसपणाची सुखदुःख येत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही काय करत आहोत?

संस्कृतीविषयीचं मागणंही असं प्रत्येकाच्या मनातलं आहे. मात्र तेथूनही आपण इतके दूर आलो आहोत की संस्कृती मागे दिसेनाशी झाली आहे. पुढे जाणं ज्याला आम्ही म्हणत होतो आणि ते जाण्यासाठी जणू निकराची कुस्ती लागली होती, त्यावेळी मागे वळून पाहायलाही कोणाला वेळ नव्हता. एवढंच नव्हे तर त्या तथाकथित संस्कृतीचे पाश सोडून देणं हीच तर पुढे जाण्याची खूण होती ! आमची बदललेली भाषा, प्रदेश, देश हेही संस्कृतीच्या उरावरच उभे आहेत. पोटभरू समाजाला त्याचा संस्कृतीचा त्याग करावाच लागेल, असं जग सांगत होत. आणि खरं सांगायचं तर त्या संस्कृतीने तरी सगळ्यांना कोठे कवेत घेतलं होतं ?


ढोल - ताशांचा गजर आणि शेजार हवा, यात तो कर्कश असला आणि भांडणारा असला तरी चालेल, असे म्हटले आहे. सामूहिक अविष्काराची आणि सहवासाची ही भूक ही अगदी मूलभूत आहे. कलासंगीताच्या अविष्काराचा माणूस नेहमीच भूकेला राहिलेला आहे, मात्र अत्याधुनिक काळात लाखो लोकांच्या आयुष्यात या अविष्कारालाच ‘स्पेस’ राहिलेली नाही. शेजाराचेही तसेच आहे. शेजारापणात आमच्या रम्य आठवणींचा साठा आहे. मात्र ते शेजारपण आमच्या आयुष्यातून जणू हद्दपार झाले आहे. आमच्या धावत्या दिनक्रमात शेजार्‍याचा रांगेतला क्रमांक सारखा मागे- मागे जातो आहे. भांडायलासुद्धा वेळ लागतोच की!

पुढे यंत्रवत होणार्‍या माणसाला थोडं ‘सेंद्रीय’ आयुष्य मिळावं, असं दान मागितलं आहे. आता हे ‘सेंद्रीय’ आयुष्य आणायचं कोठून ? कारणं काही असोत, ‘हायब्रीड’ होण्याशिवाय पर्याय नाही, असं जो तो म्हणायला लागला आहे. ‘सेंद्रीय’राहण्याने का कुणाचं पोट भरतं?, काळ बदलला आता ‘हायब्रीड’ झालंच पाहिजे, अशी प्रचंड चढाओढ सुरु आहे. यंत्राचा वापर करणार्‍याकडे जगातलं शहाणपण आणि सत्ता- संपत्तीचे वाटे जमा होताहेत. या परिस्थितीत ‘सेंद्रीय’ जगण्याची हिंमत कोण करु धजेल?

अखेरीस बाप्पाने आशीर्वाद दिला खरा, मात्र सारं हाताबाहेर गेल्याची हतबलता देवाने व्यक्त केली आहे ! देवही हतबल झाला, असं कवीला म्हणायचं आहे. म्हणजे हे काही चांगलं लक्षण नाही. कॅनडातल्या एका कन्येच्या भावना , केवळ एक कविता म्हणून दुर्लक्ष करता येईल. मात्र मूळ प्रश्नांचं काय करायचं , हा विचार तर केलाच पाहिजे.

मला असं वाटतं , ते तुम्हाला पटतं का बघा. खूप वर्षांपुर्वी बाबा आमटेंनी ‘ सर्वांना आनंदाच्या कवेत घेईल, असा एक सण होऊ दे’ अशी प्रार्थना केली होती. ती प्रार्थना त्यांनी देवाकडे केली असली तरी ती आपल्या सर्वांसमोरही विचारासाठी ठेवली आहे. जगातल्या ज्यांना ज्यांना म्हणून माणूसपणाच्या सुखदुःखात जगायचे आहे, त्यांना बाबांनी केलेले ते आवाहन आहे. माणसाच्या आयुष्यातला अर्थच शोषून घेणारा रस्ता हाच जणू जगण्याचा हमरस्ताच असल्याचे बिंबवले जाते आहे, ही सक्ती एकटादुकटा ‘सेंद्रीय’ माणूस नाकारू शकत नाही. त्यासाठी समूहाचे बळ हवे. या समूहाचा आकार वाढ्ला पाहिजे आणि त्याची शक्तीही वाढली पाहिजे. एक लाट आली आणि ‘हायब्रीड’ जगण्यालाच मानवी जीवन म्हणण्याची सक्ती तिने केली. पोटापाण्याच्या प्रश्नात अडकलेली माणसं लाटेत वाहून गेली. आता ‘सेंद्रीय’ जीवन जगण्याची लाट निर्माण करण्याची वेळ आली आहे.

‘हिंदू’ कादंबरीतला नायक म्हणतो, ‘ एवढया अब्ज अब्ज खर्व खर्व निखर्व वर्षांच्या अवकाशात आपलं आयुष्य दिसतसुद्धा नाही, अदृश्य जीवाणूसारखं. तरी आपण कशाकरता ह्या एवढ्याशा आयुष्यात अमानुष गोष्टी करत असतो?’ याचं भान आलं की अर्थपूर्ण जगण्याची वेगळी व्याख्या करावी लागत नाही.