Thursday, January 26, 2012

'श्रीमंत' युरोपला ठेच, उर्वरित जग शहाणे ?


प्रत्येक देशाचे जनजीवन वेगळे दिसत असले तरी आर्थिक व्यवहारांनी जगातील हे भेद मागे सारायला आणि एकच पद्धती स्वीकारण्याच्या दिशेने मार्गक्रमण करायला भाग पाडले आहे. पुढच्याच ठेच मागचा शहाणा या न्यायाने युरोपला पहिली ठेच लागली, आता उर्वरित जगालाही असाच विचार करावा लागणार आहे. आर्थिक व्यवहार कर हा त्या मार्गातील महत्वाचा टप्पा ठरणार आहे.

एकेकाळी जगावर राज्य करणार्‍या आणि आधुनिक जगाला वळण देणार्‍या युरोपमध्ये सध्या एकच धावपळ सुरू आहे. आर्थिक पेचप्रसंगाने या खंडातील अनेक देश ग्रासले असून त्याच्यावर कशी मात करायची, यावर परिषदांवर परिषदा होत आहेत. मात्र नेमके काय करावे, हे सुचत नसल्याने आणि सुचलेच काही तर त्यावर सर्वांचे एकमत होत नसल्यामुळे युरोपची गाडी जागीच अडली आहे. गेल्या काही वर्षांत जग इतके जवळ आले आहे की युरोपीय देश हा पेच कसा सोडवतात, याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. औद्योगिकीकरणाद्वारे विकासात आघाडी घेतलेल्या या खंडातील स्पेन, ब्रिटन, पोर्तुगलसारख्या देशांनी जगातील अनेक देशांशी व्यापार वाढवून आणि त्याआधारे राज्य करून समृद्धी मिळविली. मात्र याच प्रक्रियेचा एक अपरिहार्य भाग म्हणून व्यापाराचे पारडे चीन, भारतासारख्या देशांकडे झुकले आणि युरोपातील अर्थसत्ता मात्र आकड्यांच्या खेळात समाधान मानायला लागल्या. उर्वरित जगाला ही चलाखी कळतच नव्हती, तोपर्यंत हा खेळ एकतर्फी चालला मात्र आता या खेळावर देश चालू शकत नाही, याची जाणीव युरोपला झाली आहे.

आता एकत्रित विकास हाच आर्थिक पेचप्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग असा एक अहवाल उद्या म्हणजे 23 जानेवारी रोजी युरोझोनच्या 17 सदस्य देशांसमोर टाकला जाईल. फ्रान्सचे अर्थमंत्री फ्रॅनकोईस बॅरोन हे ही जबाबदारी पार पाडतील. त्यानंतर युरोपीय समूहाची 30 जानेवारी आणि 1, 2 मार्चला महत्वाची परिषद होईल. आर्थिक व्यवस्थापन हाच व्यवस्था सुधारण्याचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे युरोपने मान्य केले त्यालाही आता एक तप पूर्ण झाले. 1 जानेवारी 1999 रोजी युरोपीय समुदायातील 17 देशांनी (युरोझोन) युरो हे एकच चलन स्वीकारले होते. मात्र केवळ चलन एक करून थांबता येणार नाही, हे युरोझोनला समजले आणि कंपनी कर, उर्जा कर आणि आर्थिक व्यवहार कर असे कर सर्व देशांमध्ये सारखे असले पाहिजे, असा विचार सुरू झाला. फ्रान्स आणि जर्मनीने यात पुढाकार घेतला असून एकेकाळी जगावर सत्ता गाजविणारा ब्रिटन मात्र त्या प्रस्तावाला विरोध करतो आहे. ब्रिटनने जगावर सत्ता गाजवून समृद्धी तर मिळविली पण जागतिक आर्थिक केंद्र म्हणून लंडन शहराला प्रस्थापित केले. लंडनचे हे स्थान नव्या व्यवस्थेने हिरावून घेतले जाईल, अशी भीती ब्रिटनला वाटते आहे. असा एकतर्फी स्वार्थाचा विचार करण्याचे दिवस संपले असून आता एकत्रित विकास का मान्य केला पाहिजे, हे या अहवालात समजून सांगण्यात आले आहे.

सध्याचा जागतिक आर्थिक पेच काय आहे, हे आपल्याला या चर्चेत समजून घेतले पाहिजे. गेल्या काही वर्षांत जग दोन भागात विभागले गेले आहे. ते दोन भाग आहेत- श्रीमंत आणि गरीब देशांमधील अतिश्रीमंत लोक आणि श्रीमंत तसेच गरीब देशातील अतिगरीब लोक. श्रीमंत देशात कमालीचे दारिद्रय आहे आणि गरीब देशांमध्ये प्रचंड श्रीमंती आहे, हे आता लपून राहिलेले नाही. (आजच्या भारताकडे पाहिल्यावर त्याचा वेगळा खुलासा करण्याची गरज नाही.) हा पेच असा आहे की जगातल्या अतिश्रीमंतांची संख्या वाढ्त चालली आहे, तर दुसरीकडे सरकारे म्हणजे सरकारचे अर्थसंकल्प त्या तुलनेत कितीतरी गरीब ठरू लागले आहेत. हे पटण्यासाठी आपण एक उदाहरण घेवू. पुणे शहराची लोकसंख्या 30 लाख आहे आणि पुणे महापालिकेचे बजेट कसेबसे 3000 कोटी रूपये आहे. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला (सार्वजनिक सेवासुविधांना) किती पैसा उपलब्ध होतो, ते पाहा. पण पुण्यापासून जवळ असलेल्या मुंबईत आमच्यातला एक उद्योगपती 5000 कोटीचे घर स्वतःसाठी बांधतो. अशी विसंगती तुम्हाला जगभर ठिकठिकाणी पाहायला मिळेल. युरोपमधील पेच हाच आहे. सरकार कर्जबाजारी झाली आहेत, मात्र त्याच देशातील अतिश्रीमंतांची श्रीमंती वाढ्तेच आहे. ही परिस्थिती बदलंण्यासाठी सरकारे प्रयत्न करत आहेत कारण आता त्यांना सामाजिक उद्रेकाची भीती सतावते आहे.

फ्रान्स आणि जर्मनी हे युरोपातील दोन प्रमुख देश सर्व युरोझोनमध्ये ट्रन्झॅक्शन टॅक्स लागू करावा, यासाठी आग्रही आहेत. आर्थिक व्यवहारच इतके प्रचंड आहेत की त्याद्वारे सरकारला महसूल मिळेल आणि सरकारांचा कर्जबाजारीपणा कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. सरकारने सामाजिक सेवासुविधांवर खर्च केलाच नाहीतर बेरोजगारी वाढ्ते, याचा अनुभव युरोपने घेतला असून सध्या तर तेथे बेरोजगारीचे प्रमाण 10 टक्के इतके प्रचंड आहे. निवृत्ताना देण्यात येणार्‍या सुविधांमध्ये कपात करण्याची नामुष्की आली आहे. दर 500 किलोमीटरला सीमा बदलतात, इतके युरोपातील काही देश लहान आहेत. अशा देशांनी काहीही ठरविले तरी इतरांच्या मदतीशिवाय ते जगू शकत नाहीत. त्यातच जागतिकीकरणाने देशांतील फरक काढून टाकायला सुरवात केली आहे. देशाच्या महसुलाचा डोलारा ज्या करपद्धतीवर अवलंबून आहे, ती एकमेकांपासून खूप वेगळी ठेवणे आता अशक्य आहे. थोडक्यात एकट्याने पुढे जाण्याला मर्यादा आहेत. असा एक टप्पा आला तेव्हा 17 देशांनी एक चलन स्वीकारले आता करपद्धती समान करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक देशाचे जनजीवन वेगळे दिसत असले तरी आर्थिक व्यवहारांनी जगातील हे भेद मागे सारायला आणि एकच पद्धती स्वीकारण्याच्या दिशेने मार्गक्रमण करायला भाग पाडले आहे. पुढच्याच ठेच मागचा शहाणा या न्यायाने युरोपला पहिली ठेच लागली, आता उर्वरित जगालाही असाच विचार करावा लागणार आहे. आर्थिक व्यवहार कर हा त्या मार्गातील महत्वाचा टप्पा ठरणार आहे.

Tuesday, January 17, 2012

ओळख, आर्थिक पत देणारा महत्वाकांक्षी प्रकल्प


झारखंड राज्यात आज एका कोपर्यात सुरू असलेला आधार कार्ड आणि बँकींगवर आधारित महत्वाकांक्षी प्रकल्प उद्या सर्वसामान्य भारतीयांना ओळख, आर्थिक पत तर देईलच, मात्र 121 कोटी लोकसंख्या आणि प्रचंड वैविध्य असलेल्या या महाकाय देशाला पारदर्शी, निरपेक्ष व्यवस्था निर्माण करण्याची ताकद देणारा ठरणार आहे.

काळ्या पैशाच्या निर्मितीने देशाची अर्थव्यवस्था नासते आणि काळा पैसा निर्माण करण्याचे पाप हे वाढत चाललेले रोखीचे व्यवहार करतात, हे जगभर मान्य करण्यात आले आहे. त्यामुळेच ब्रिटन- अमेरिकेसारखे देश रोखरहित (कॅशलेस) व्यवहारांकडे निघाले आहे. आगामी दोन वर्षात कॅशलेस इकॉनॉमी म्हणून जगात आघाडी घेण्याची तयारी ब्रिटन करते आहे. या आघाडीवर भारत नेमका कोठे आहे, हे जाणून घेतल्यावर भारतासमोरील प्रश्न आज जटिल का झाले आहेत, हे लक्षात येते. मोठया किंमतीच्या नोटांचे चलनातील व्यस्त म्हणजे अधिक प्रमाण, बँकीगसुविधेचा अभाव, करप्रणालीतील दोष आणि त्यामुळे वाढलेला काळा पैसा या वरवर तांत्रिक वाटणार्या प्रश्नांनी भारतीयांच्या गळ्याला फास लावला आहे. हा फास काढण्याचा काही मार्गच नाही काय ?

आज 45 टक्केच भारतीयांपर्यंत पोचलेले बँकींग सर्वांपर्यंत कसे पोहचेल, अशी चिंता सरकार करते आहे, कारण त्याशिवाय देशाच्या विकासाची फळे सर्व थरांपर्यंत पोहचत नाहीत. आधार किंवा युआयडीएआय कार्डचा वापर करून बँक सर्वसमावेशकता शक्य आहे काय, असा प्रयत्न सरकार करीत असून हे या महाकाय आणि 40 टक्के लोक निरक्षर असलेल्या देशात कसे करायचे, याचा अंदाज येण्यासाठी झारखंड राज्यात एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तो यशस्वी झाला तर आपल्या देशात एक क्रांतीकारी बदल नजीकच्या भविष्यकाळात पाहायला मिळणार आहे.

भ्रष्टाचाराच्या किडीशिवाय सामाजिक सेवा आणि पत वाढण्यासाठी बँकींग खालच्या थरापर्यंत पोचविणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. भारत सरकार सामाजिक योजनांवर तीन लाख कोटी रुपये इतका प्रचंड निधी एका वर्षात खर्च करते. मात्र ज्यांच्यासाठी हा निधी खर्च केला जातो, त्यांच्यापर्यंत तो पोहचतच नाही. याचे कारण त्या निधीचे जेथे रोखीकरण होते, तेथे त्या पैशांना पाय फुटतात. पैशाच्या प्रवासातील भ्रष्टाचाराच्या या वाटा बंद होउ शकतात काय आणि खेडुतांना यानिमित्ताने बँकांशी जोडता येईल काय, हे या प्रकल्पात तपासण्यात येणार आहे. शिवाय देशाला निरपेक्ष, पारदर्शी व्यवस्थेकडे नेण्यात आधार कार्डची उपयोगिताही या प्रकल्पाने सिद्ध होणार आहे.

युआयडीएआय आणि झारखंड ग्रामीण विकास खात्याने एकत्र येवून हा प्रकल्प हाती घेतला आहे. यात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (NREGS) काम करणार्या सर्वांना आधार कार्ड देण्यात येईल. त्यांचे बँकेत खातेही काढण्यात येईल. आधार कार्डचा नंबर त्याच्या त्याच्या बँक खात्याशी जोडला जाईल. जेव्हा स्थानिक प्रशासन त्यांची मजुरी देण्याचा आदेश जारी करेल, तेव्हा ही रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजे थेट त्या त्या मजुराच्या बँक खात्यात जमा होईल. मजुरांना आपले पैसे आपल्या गावातच बँकेतून काढता यावेत यासाठी प्रत्येक गावात एका सामायिक सेवा केंद्राची स्थापना करण्यात येईल. आधार कार्ड वापरताना बोटांच्या ठशांवर ओळख निश्चित होणार असल्यामुळे एकाच्या नावावरील रक्कम दुसरा कोणी घेवू शकणार नाही शिवाय बनावट नावे वापरून जो पैसा हडप केला जातो, तेही शक्य होणार नाही. एरवी 10 टप्प्यांची ही प्रक्रिया आधार आणि बँकींगमुळे चारच टप्प्यात पूर्ण होणार आहे. झारखंडमधील 12 तालुके या प्रकल्पसाठी निवडण्यात आले असून पावणेदोन लाख लोकांना त्याचा लाभ होणार आहे.

गरजू लोकांना रोजगाराची हमी देण्याच्या सरकारच्या या योजनेमध्ये सध्या किती अडचणी आहेत पाहा. योजनेचा पसारा मोठा असल्याने काम देणे आणि त्याचा मोबदला पोचविणे ही एक संथ प्रक्रिया आहे. योजनेच्या प्रत्येक टप्प्यावर लाचखोरीची कीड लागलेली आहे. बनावट नावे वापरून पैसा हडप केला जातो, काम देताना आणि मजुरी देताना लाच घेतली जाते आणि कधी कधी तर मजुरी मिळण्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागते. याचा अर्थ आमच्या देशातल्या गरजू मजुरालाही लाचखोरीचा सामना करावा लागतो. म्हणूनच झारखंडमधील हा प्रकल्प अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. सामाजिक कल्याणावर खर्च होणारा निधी खर्या लाभधारकांपर्यंत पोहचणे, त्याची आर्थिक पत निर्माण करून त्याला स्वाभीमानाने जगण्याचे बळ देणे, रोखीच्या व्यवहारामुळे होणारी लाचखोरी रोखणे आणि ओळखीच्या माध्यमातून देशाच्या मूळ प्रवाहाशी जोडणे तसेच आधार कार्डच्या वापराविषयी जे प्रश्न विचारले जात आहेत, त्यांना उत्तर देणे शक्य होणार आहे.

झारखंड राज्यात आज एका कोपर्यात सुरू असलेला आधार कार्ड आणि बँकींगवर आधारित हा प्रकल्प उद्या सर्वसामान्य भारतीयांना ओळख, आर्थिक पत तर देईलच, मात्र 121 कोटी लोकसंख्या आणि प्रचंड वैविध्य असलेल्या या महाकाय देशाला पारदर्शी, निरपेक्ष व्यवस्था निर्माण करण्याची ताकद देणारा ठरणार आहे.

अमेरिकेलाही तेच करावे लागले होते...

1960 च्या दशकात अमेरिकेमध्ये संघटित गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराने गंभीर रूप धारण केले होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तत्कालिन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी एका अध्यादेशाद्वारे 14 जुलै 1969 रोजी 100 डॉलरपेक्षा जास्त मूल्याच्या सर्व नोटा व्यवहारातून बाद केल्या. तोपर्यंत अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये 500, 1000, 5000 आणि 10,000 डॉलरपर्यंतच्या नोटा वापरात होत्या. रोखीचे व्यवहार रोखणार्या एका तांत्रिक दुरुस्तीमुळे अमेरिकन प्रशासनास संघटित गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविता आले. हे सर्व बँकिंग वाढल्यामुळे शक्य झाले. आज अमेरिकेत 95 टक्के लोक बँकींग करतात तर भारतात हे प्रमाण आज केवळ 45 टक्के आहे.

Sunday, January 8, 2012

‘आळशी’ गुंतवणूकदारांचे दिवस


कोणीतरी पैसे गमावल्याशिवाय कोणालातरी लाभ होत नाही, असे म्हटले जाते आणि ते खरेच आहे. पैसे गमावणारी ही मंडळी म्हणजेच आळशी गुंतवणूकदार. मात्र त्यांनी जागे व्हावे, असे सध्या बरेच काही घड्ते आहे. साध्या बचत खात्यावर एरवी केवळ 4 टक्के व्याज मिळते, मात्र हे व्याज वाढवून देण्याची स्पर्धा बँकांमध्ये लागली आहे. ही स्पर्धा बँका आताच का करताहेत, हे समजून घेतले पाहिजे.

आर्थिक व्यवहारात प्रवेश करणे सोपे मात्र त्यातून बाहेर पडणे अवघड असते, असे म्हणतात, ते अगदी खरे आहे. कोणी सांगतो म्हणून आपण म्युच्युएल फंडात गुंतवणूक करतो, कधी एसआयपी काढतो, कधी पीपीएफचे अकौंट काढतो, तर कधी शेअर बाजारात डोकावण्याचा प्रयत्न करतो. गुंतवणुकीचे अनेक मार्ग असे अनेकांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून अनुसरलेले असतात. आपल्या पैशांमध्ये वाढ व्हावी, असे सर्वांनाच वाटत असते, मात्र वाढ होण्यासाठीचे टायमिंग सर्वांना साधतेच असे नाही. म्हणजे आपण गुंतवणूक केली की म्युच्युवल फंडाची एनएव्ही खाली यायला लागतात, शेअरबाजार सारखा खाली खाली यायला लागतो, पीपीएफचा व्याजदर कमी करण्याच्या हालचाली सुरु होतात आणि गुंतवणुकीच्या झाडाला पैसे लागण्याचा नाद सोडून दिला जातो. मग अनेक जण आपल्या बँकेतल्या बचत खात्याच्या गुंतवणुकीवरच समाधान मानतात. भारतासारख्या 30 टक्के इतकी बचत करणार्‍या नागरिकांमध्ये बहुतेकांची गुंतवणुकीची व्याख्या आजही बचत खाते किंवा फारतर मुदत ठेव योजनेच्या पलिकडे गेलेली नाही. या गुंतवणूकदारांना आळशी गुंतवणूकदार म्हणतात.

कोणीतरी पैसे गमावल्याशिवाय कोणालातरी लाभ होत नाही, असेही म्हटले जाते आणि ते खरेच आहे. पैसे गमावणारी ही मंडळी म्हणजेच हे आळशी गुंतवणूकदार. मात्र या गुंतवणुकदारांनी जागे व्हावे, असे सध्या बरेच काही घड्ते आहे. साध्या बचत खात्यावर केवळ 4 टक्के व्याज मिळत असते, आणि इतर सर्व गुंतवणुकीच्या मार्गांनी किमान 7 ते 15 टक्के परतावा मिळत असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात तो तेवढा मिळतोच असे नाही. अर्थात ज्यांना टायमिंग साधता येते त्यांच्या परताव्याला सीमा नसते. तर, रिझर्व बँकेने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी गेले दोन वर्षे बँकदर बदलण्याचा धडाका लावला आहे. उद्योग जगताची या मार्गाविषयी तक्रार असली तरी अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थितीत तुलनेने भारत स्थिर राहिला, हे मान्यच केले पाहिजे. महागाई दराचे चढे आकडे येत होते तेव्हा सर्वच चिंतेत होते, मात्र अगदी अलिकडे ते आकडेही बरे यायला लागले आहेत. त्यामुळे रिझर्व बँक बँकदर खाली आणून अधिक भांडवल उपलब्ध करून देईल, असे बोलले जावू लागले आहे. पण असे काही होण्याआधीच या आळशी गुंतवणूकदारांनी जागे होण्याची गरज आहे.

रिझर्व बँकेने अलिकडेच बचत खात्यावरील व्याजदर ठरविण्याचा अधिकार त्या त्या बँकेवर सोपविल्यामुळे ग्राहकांना अधिक व्याजदर देण्याची स्पर्धा बँकामध्ये सुरू झाली आहे. बँकांकडे असलेल्या भांडवलामध्ये बचत खात्यातील रक्कम हा एक प्रमुख मार्ग असल्यामुळे बचत खातेदार वाढविण्यासाठी बँका विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत. कोटक महिंद्र आणि इंडसंड बँकेने एक लाखाच्या वर शिल्लक ठेवणार्‍यांना 6 टक्के व्याज देण्याचे तर यस बँकेने सरसकट 7 टक्के व्याज देण्याचे जाहीर केले आहे. रत्नाकर या बँकेनेही 5.5 टक्के व्याज देण्याचे जाहीर केले आहे. अधिक व्याज देणारे गुंतवणूकीचे इतर मार्ग ज्यांच्यापर्यंत पोहचलेच नाही, अशा ग्रामीण भागातील बहुतांश खातेदार हे बचत खात्यात आपली पुंजी गुंतवणूक म्हणूनच जमा करत असतात, त्यांना या स्पर्धेचा लाभ होणार आहे.

बचत खात्यावर ग्राहक जो पैसा ठेवतात, तो बँकांसाठी किती महत्वाचा असतो पाहा. एचडीएफसी आणि स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या मोठ्या बँकांमध्ये बचत खात्यातील ठेवींचे प्रमाण (सीएएसए) अनुक्रमे 49.1 आणि 48 टक्के इतके आहे, तर यस बँक आणि कोटक महिंद्रामध्ये ते 10.9 आणि 27 टक्के आहे. बँकासाठी हा पैसा म्हणजे सर्वात स्वस्त भांडवल असते. बँकाची तब्बल 22 टक्के गरज त्यातूनच भागविली जाते. त्यामुळे ज्या बॅकांमध्ये बचत खात्यांचे प्रणाम अधिक त्यांना आतापर्यंत 4 टक्क्यांनी हे भांडवल वापरता येत होते, आता मात्र ग्राहकांना अधिक व्याज देण्याच्या स्पर्धेमुळे बँकांचे हे हक्काचे भांडवल महाग होणार आहे. बचत खात्यांची संख्या अधिक असणे, हे काही बँका ओझे मानायला लागल्या होत्या, मात्र इतर मार्गांनी मिळणारे भांडवल महाग झाल्याने बचत खातेदारांना महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच आमच्या बँकेत खाते उघडा, अशी मोहीम बँकांनी हाती घेतली आहे.

बचत खातेदार वाढविण्याच्या स्पर्धेत आणखी एक गुपित दडले आहे, ते म्हणजे गुंतविणुकीचे पुढील म्हणजे डीमॅट खाते, म्युच्युएल फंड खरेदी, एसआयपी, सोने खरेदीसारखे जे मार्ग आहेत, त्यासंबंधीच्या योजना बँकांनी राबविण्यास सुरवात केली आहे. याचा अर्थ साधा बचतदार जेव्हा मोठा गुंतवणूकदार होईल, तेव्हा तो आपल्याच खात्यामार्फत गुंतवणूक करेल आणि त्याद्वारे त्याच्या खात्यावरील उलाढाल वाढेल, अशी बँकांना आशा आहे. शिवाय एटीएम, डेबिट कार्ड, मोबाईल बँकींग, इंटरनेट बँकींगमुळे खातेदारांना सेवा देण्याचा खर्च पुढील काळात कमी होत जाणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांची संख्या न वाढविता खातेदार वाढविणे बँकांना शक्य होणार आहे.

या बदलात एक धोका आहे, तो म्हणजे बँका ठेवींच्या प्रमाणात कर्ज देवू शकल्या नाहीत तर बँकेला नफा होण्याऐवजी तोटयाला सामोरे जाण्याची वेळ येवू शकते. कारण ठेवींवरील व्याज वाढले की कर्ज महाग होणे अपरिहार्य आहे. आधीच महाग झालेली कर्जे घ्यायला लोक घाबरत आहेत. त्या परिस्थितीत बचत खात्यावर अधिक व्याज देण्याच्या या स्पर्धेला बँका कशा सामोर्‍या जाणार, हा प्रश्नच आहे. अर्थात सामान्य म्हणजे आळशी खातेदारांनी तूर्तास अधिक परताव्याच्या गुंतवणुकीची जोखीम घेण्याऐवजी आपली जास्तीत जास्त रक्कम आपल्या बचत खात्यावर किंवा बँकठेवींमध्ये ठेवून निश्चिंत होण्याचे हेच दिवस आहेत.

Sunday, January 1, 2012

कोणाला का झाली आहे जगाच्या अंताची घाई ?


कलियुगच म्हणत असाल तर ते बुडणार नाही, ते बदलणार आहे. काळ आणि अवकाशाला अंत नाही, ते अनंत आहेत, त्याला आपण कसे मोजणार? पण मोजायचेच तर ते बुडण्यासाठी का? बदलण्यासाठी मोजू यात. ते पाहा...त्या बदलाच्या दिशेने 2012 निघाले आहे.

एक भविष्यवाणी सांगते की, 2012 साल जगाचा शेवट करण्यासाठी उगवले आहे. याच 12 महिन्यात किंवा 366 दिवसांत जग बुडणार आहे. म्हातारी माणसे आताआता पर्यंत म्हणताहेत की कलियुगात काहीही होवू शकते आणि त्याला अध्यात्मिक गुरुही साथ देतात की कलियुगाची सगळी वर्ष संपली नसली तरी पाप फार झाले आणि अंत जवळ आला आहे. जग बुडणार म्हणजे नेमके काय होणार? जलप्रलय होणार, ब्रम्हांड फुटणार, महायुद्ध होणार की धरणी फुटणार, हे मात्र कोणी सांगू शकत नाही. जगाचा अंत जवळ आला आहे, याविषयी मात्र सर्वांचे एकमत आहे.

पिण्याच्या पाण्याहून महायुद्ध होणार आहे. लोकसंख्येचा विस्फोट होणार आहे. सूर्याच्या लाव्हयाने सजीवसृष्टी भाजून निघणार आहे. हिमवादळांनी होत्याचे नव्हते होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकतर वादळी पाऊस कोसळणार आहे किंवा तो एकदमच थांबणार आहे. जगाचा अंत करू शकणार्‍या अशा कित्येक कल्पना. कोणी म्हणतात याला शास्रीय आधार आहे. पण मग हवामानाचे अंदाज का खरे ठरत नाहीत आणि धरणीकंपाची चाहूलही का लागत नाही?

एकेकाळी हिरवा शालू पांघरलेली धरती आज ओडखी बोडखी दिसते म्हणतात. बर्फांचे थर कोठे वाढत आणि कोठे आटत चालले. सुनामी, वादळांची वारंवारता वाढत चालली. कोठे कोठे तर पाऊस थांबतच नाही आणि कोठे तर गेले काही वर्षे पडतच नाही. कोठे समुद्र अतिक्रमण करून किनारे आपल्या ताब्यात घेतो आहे. कोठे जमिनीतून दररोज आवाज येतात. कोठे जमिनीला अचानक भलीमोठी, भीतीदायक भेग पडते. कोठे जमिनीच्या पोटात पाण्याचेच ऍसिड होते आणि कोठे तर ऍसिडचाच पाऊस पडतो. जगाच्या अंताच्या पाउलखुणा यालाच तर म्हणत नसतील आणि म्हणूनच अंतराळातील पृथ्वीचा शोध घेण्याचे काम मानवाने आरंभिले नसेल?

शिकारच मिळाली नाही म्हणून बिबटे जसे आताच्या मनुष्यवस्तीत घुसतात, शहरात नव्याने झालेल्या वसाहतीत सुरवातीला बरेच दिवस साप निघतात, माणसाने बुजविलेल्या नदी आणि ओढ्याचा प्रवाह जसा त्याच शेकडो वर्षांच्या वाटेने जाण्याचा हट्ट धरतो आणि विध्वंस घडवितो. महामार्गावरील पाडलेल्या महाकाय झाडावरची पक्ष्यांची शाळा काही दिवस भरतेच भरते... तसाच तर नसेल हा जगाला अंताकडे घेवून जाणारा उन, वारा, पर्वत, पाऊस, समुद्र आणि मातीचा प्रवास?

मिलनानंतरच्या काही दिवसात हृदयापासून सजीव जन्माची सुरवात होते, म्हणतात. म्हणजे तोच त्याचा जन्माचा क्षण. जो कोणीच सांगू शकत नाही. मग काही कोटी पेशी जन्म घेतात आणि गर्भात एक सोहळा साजरा होतो. एका उदरातून दुसर्‍या उदराचे भरण होते आणि काही काळ दोन जीव एका जीवासारखे जगतात. डोळे, नाक, कान, हातपाय, पोट, केस, तोंड, लिंग....आणि लाल रक्त ... सगळं काही जशास तसे आणि जेथल्या तेथे. फरक फक्त मनाचा. पण तो कधी प्रवेश करत असेल, या किल्ल्यात?

मग सुरू होतात मनाचे खेळ. रडण्याचे, हसण्याचे, हट्टाचे, राग-लोभाचे. नाव देण्याचे आणि नाव कमावण्याचे. आनंद आणि दुःखाच्या व्याख्या शोधण्याचे. कोण पुढे पळतो याचे. यंत्र-तंत्र-मंत्रांचे. रंग-गंध-बंधांचे. सत्ता संपत्तीचे. अधिकाराचे. माझे-तुझे, कुटुंबाचे, गावाचे, देशाचे, खंडाचे आणि जगाचे. काळ मोजण्याचे, गती वाढविण्याचे. सीमा आखण्याचे. जसा मनाने प्रवेश केला, तसाच ते त्यागही करणार हे ठरलेलेच असते. पण हा खेळ खेळल्याशिवाय संपतो कोठे?

कोणी म्हणतो, हे सर्वांसाठी आहे. सर्वांनी म्हणजे ज्याला जेवढे पाहिजे तेवढे त्याने वापरावे. कोणी म्हणतो, जो जिंकला त्याने वापरावे, जो हरला त्याने जेवढे मिळाले, तेवढेच आपले म्हणावे. कोणी म्हणतो, मी ठरविणार ते कसे आणि किती वापरावे. कोणी म्हणतो वारश्यांसाठी, कुटुंबासाठी, देशासाठी ठेवावे. कोणी म्हणतो, या खेळानेच विचका केला. संघर्ष पेटतात. मातीतले मातीत एकरुप होण्यासाठीचे एकएक मार्ग म्हणून तर हा खेळ खेळला जात नसेल?

जग बुडणार हे माहीत असताना मग कोट्यवधी गर्भांमध्ये नवनिर्मितीचे अंकुर का फुलताहेत? सजीव पेशींची वीण अव्याहत का सुरू आहे? मानवनिर्मित सर्वोच्च टॉवरमध्ये आणि जंगलात जेथे अजून मानवाची पावलेही पडली नाहीत, तेथेही नव्या जीवांचा जगात पदार्पण करण्याचा क्रम तर थांबलेला नाही! एवढेच काय पण आपल्या वारसाने याच मातीत जगून आपल्या वारसाला जन्म द्यावा, हे स्वप्न पाहणे तरी कोणी सोडले आहे?, आणि का सोडावे?

हे पाहा, आता या.., या.., आणि याही क्षणाला कोट्यवधी जीवांनी गर्भात प्रवेश केला. या क्षणाला तेवढ्याच मनांनी खेळ खेळण्याचा मनोदय जाहीर करून त्या जीवाला नाव दिले. आणि त्याच क्षणाला जवळपास अगणित पेशींनी आपला नवनिर्माणाचा यज्ञ आरंभिला आहे. तेवढेच जीव गर्भातून बाहेर येण्याची वाट पाहात आहेत, तर तेवढ्याच जणांनी या जगात नुकतेच पाऊल ठेवले आहे. तेवढ्याच जणांनी जगायला नुकतीच सुरवात केली आहे. मग कोणाला का झाली आहे जगाच्या अंताची घाई?

कलियुगच म्हणत असाल तर ते बुडणार नाही, ते बदलणार आहे. काळ आणि अवकाशाला अंत नाही, ते अनंत आहेत, त्याला आपण कसे मोजणार? पण मोजायचेच तर ते बुडण्यासाठी का? बदलण्यासाठी मोजू यात. ते पाहा...त्या बदलाच्या दिशेने 2012 निघाले आहे.