Saturday, April 20, 2013

सोने खरेदी - बुडत्या बोटीत बसा आणि शिरापुरी खा !



सुवर्णभूमी भारताला शुद्ध भांडवलाची एवढी चणचण का भासावी ? ज्या देशात बचतीचा दर ३० टक्क्यापेक्षा अधिक आहे, त्या देशात कंपन्यांना भांडवलउभारणीसाठी कुतरओढ का करावी लागावी ?, त्या देशात सार्वजनिक सेवासुविधांचा दुष्काळ का पडावा? या आणि अशा अनेक प्रश्नांचे एक उत्तर असे आहे की आपण बुडत्या बोटीत (संकटात असलेली अर्थव्यवस्था) बसलो आहोत, याचे भान येण्याऐवजी त्या बोटीत आपल्याला शिरापुरी (सोने खरेदीसारखे तात्कालिक लाभ) खायला मिळते, यातच आम्ही खुश आहोत !


आपल्या देशवासियांसमोर सध्या एकच प्रश्न महत्वाचा आहे आणि तो म्हणजे सोन्याच्या किंमती आणखी कमी होणार की वाढणार ? कमी होणार असल्यास किती आणि सोन्याची खरेदी कधी करायची ? जणू जगबुडी जवळ आली, अशा वेगाने गेले दोन वर्षे सोने महाग होत गेले. याचा साधा सरळ अर्थ असा की सरकार आणि चलनावरील जनतेचा विश्वास कमी होत गेला आणि सोने खरेदी वाढत गेली. जग जेव्हा जेव्हा अस्थिर झाले तेव्हा तेव्हा सोन्याचे भाव वाढले आहेत. सर्वांना हवा असणारा हा धातू मंगलप्रसंगी वापरला जात असला तरी त्याची चढी किमंत ही अशी जगाच्या वाईटावर टपलेली आहे. जग स्थिर असले की सोन्याचे भाव कमी होतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. अर्थात हा अगदीच ठोकताळा आहे.
आता सोने उतरले म्हणजे जगाची आर्थिक शिस्त सुधारली किंवा आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली, असे आपण म्हणू शकतो. कारण अमेरिकेतील शेअर बाजार वाढला तेव्हापासून सोन्याची चमक फिकी पडू लागली होती. ती इतकी फिकी पडेल, असा अंदाज मात्र कोणीच केला नव्हता. एखाददुसऱ्या वित्तीय संस्थेने भाव पडतील असा अंदाज व्यक्त केला होता, मात्र हल्ली अशा अंदाजांना आता तसा काही अर्थ राहिलेला नाही. कारण जगाने नागरिकशास्त्र आणि अनेक शास्त्र जशी पुस्तकांत गुंडाळून ठेवली आहेत, तसेच अर्थशास्त्रही पुस्तकात गुंडाळून ठेवले आहे. आपल्या गुंतवणुकीचे पुढे काय होणार, यासाठी अर्थशास्त्राचा एकेकाळी आधार घेतला जात होता, मात्र गुंतवणूक आणि सट्टेबाजी यातला फरक अतिलोभी जगाने काढून टाकला असून सर्वांना सट्टा खेळण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे भाव कमी होत आहेत म्हणून ज्यांना सोने खरेदी करावयाचे आहे, त्यांनी आपण सट्टा खेळत आहोत, याची जाणीव ठेवली पाहिजे.
खरे तर भारतीयांना तसा काही फार फरक पडू नये. कारण ते सोने घेणार दागिन्यांसाठी. त्यातील फारच कमी लोक ते गुंतवणूक म्हणून घेतात आणि गुंतवणूक म्हणून जे घेतात, त्यांची ते विकण्याची सहसा हिंमत होत नाही. म्हणूनच जगातील ११ ते १३ टक्के सोने असलेला हा देश जगात एक गरीब देश म्हणून ओळखला जातो. आमच्या देशातील नागरिक घाम गाळतात, त्याचे रुपये करतात आणि ५५ रुपयाला एक डॉलर असे परकीय चलन विकत घेऊन त्याचे सोने विकत घेतात. म्हणूनच देशाच्या आयातीत अत्यावश्यक तेलानंतर छानशौकी सोन्याचा नंबर लागतो! ज्या देशाची निर्यात आयतीपेक्षा अधिक त्याचे आर्थिक आरोग्य चांगले, असे मानले जाते. मात्र आमच्या वाट्याला ते भाग्य कधी येत नाही. आम्ही परेशान आहोत की आमच्या देशाची तूट कमी कशी होईल ? ती कमी होत नाही म्हणून निर्यातीला सवलती दिल्या जातात आणि देशाच्या तिजोरीत डॉलरचा साठा कसा वाढेल, याची चिंता सरकारला करावी लागते. कारण तो पुरेसा नसेल तर जागतिक आर्थिक संस्था आमचे रेटिंग कमी करतात आणि डॉलरचा ओघ कमी होतो. या दुष्टचक्राला आपण खतपाणी घालतो आहोत, हे सोने खरेदी करताना आपल्या गावीही नसते. अर्थात आपल्या आर्थिक विवंचना दूर न झालेल्यांनी देशाच्या प्रश्नांची काळजी का करावी, हाही मुद्दा आहेच म्हणा.
तरीही एक गोष्ट लक्षात घ्यावीच लागणार आहे. सुवर्णभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देशात हल्ली वर्षाला दोन टनापेक्षा अधिक सोने उत्पादन होत नाही. (आम्ही गेल्या तीन दिवसांत १५ टन सोने खरेदी केले) खरेतर पूर्वीही कधी होत नव्हते. म्हणूनच पूर्वीही वस्तूंच्या बदल्यात सोन्याची आयात केली जात होती. त्यासाठी डॉलर मोजण्याची तेव्हा गरज नव्हती. आता म्हणजे गेल्या काही वर्षात भारत दरवर्षी ८०० ते ९०० टन सोने आयात करतो. आतापर्यंतचे सोने मोजले तर आपल्याकडे १८ ते २० हजार टन सोन्याचा म्हणजे जगात सर्वाधिक साठा आहे, असे ‘गोल्ड वर्ल्ड कौन्सिल’ सांगते. ते खरेच आहे. गेल्या आठ दिवसांपासून भारतात सुरु असलेली सोने खरेदी पाहिल्यावरही त्याचे प्रमाण लक्षात येते. दुकानातील साखर, रॉकेल संपावे तसे सराफांकडील सोने संपले होते ! सायप्रस आणि युरोपातील देश आपले आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी सोन्याचे साठे विकण्याचा विचार करत आहेत. पण सुवर्णभूमी भारताच्या दृष्टीने त्या बातम्याही निष्प्रभ ठरल्या आणि सोने हळूहळू पुन्हा चढू लागले.
मुद्दा असा आहे की इतके प्रचंड सोने बाळगणाऱ्या भारताची आर्थिक स्थिती आज नाजूक का झाली आहे?, त्याच्या अर्थमंत्र्यांना बाहेरील देशांमध्ये दौरे करून भांडवलाची भिक का मागावी लागते आहे?, सुवर्णभूमी भारताला शुद्ध भांडवलाची एवढी चणचण का भासावी ? ज्या देशात बचतीचा दर ३० टक्क्यापेक्षा अधिक आहे, त्या देशात कंपन्यांना भांडवलउभारणीसाठी कुतरओढ का करावी लागावी ?, त्या देशात सार्वजनिक सेवासुविधांचा दुष्काळ का पडावा? या आणि अशा अनेक प्रश्नांचे एक उत्तर असे आहे की आपण बुडत्या बोटीत (संकटात असलेली अर्थव्यवस्था) बसलो आहोत, याचे भान येण्याऐवजी त्या बोटीत आपल्याला शिरापुरी (सोने खरेदीसारखे तात्कालिक लाभ) खायला मिळते, यातच आम्ही खुश आहोत !




सोन्याची शिरापुरी
- देशात १८ हजार टनापेक्षा अधिक सोने साठा (जगातील ११ टक्के, किंमत अंदाजे ५० लाख कोटी रुपये)
- भारतीय भांडवली बाजाराच्या ७१ टक्के, तर एकूण जीडीपीच्या ६६ टक्के (ऑगस्ट २०११)
- बचतीची टक्केवारी ३० म्हणजे चांगली, मात्र त्यातील १० टक्के निरोपयोगी सोन्यात
- भाव उतरल्यावर तीन दिवसांत भारतीयांनी नेहमीपेक्षा दुप्पट म्हणजे १५ टन सोने खरेदी केले.
- सोन्याचे भाव २२ टक्के पडल्याने भारतीयांचे झालेले नुकसान १४ लाख कोटी रुपये.


Tuesday, April 16, 2013

मारू मोकाट सुटलेल्या मुजोरीला लाथ



पण आता आम्हाला आणि सर्वांनाच कळले आहे ... दिवे चालू बंद करणारे, पाणी अडविणारे आणि सोडणारे, बांधणारे आणि तोडणारे, खरीदणारे आणि विकणारे आपणच आहात. आपणास ‘एम टॉनिक’ चा माज चढला आहे. म्हणूनच आता त्या तुम्ही लादलेल्या आमच्यातल्या लाचारीला आणि मोकाट सुटलेल्या तुमच्यातल्या मुजोरीला आम्ही लाथ मारणार आहोत...!

आपण महान आहात. आपला जन्म आम्ही साजरा करू शकलो नाही, करंट्या माणसांना काय कळणार की या भूतलावर आणखी एक मसीहा उगवला आहे. आपल्या थोरपणाची सर्व चिन्हे पाळण्यात दिसू लागली होती म्हणूनच आपण बालवाडीत, शाळा, कॉलेजात सेनापती झालात. करंट्या माणसांनी मग आपली चूक मान्य केली आणि आपल्या जन्मदिनी उत्सव साजरे करायला सुरवात केली. तेव्हापासून आपल्याच कृपेने करंट्या माणसांच्या पोटात दोन गोड घास जायला लागले.....
आपल्या पायाला लागलेली माती आम्ही आमच्या मस्तकी लावू लागलो आणि आपलाच झेंडा फडकावत ठेवू लागलो. त्यामुळेच तर आपण आम्हाला आपल्या कळपात सामील करून घेतलत, मग डोक्यावर टोप्या आल्या आणि कधी कधी खांद्यावर शालही. आमचे, आमच्या कुटुंबीयांचे, आमच्या नातेवाईकांचे जिणे सुखी झाले. म्हणजे आम्हाला रेशनवर धान्य, साखर, तेल आणि गावात सलाम मिळू लागले. आणि म्हणून तर करंट्या माणसांच्या घरादारांना रंग चढू लागले ....
मुलाला बालवाडीत प्रवेश मिळत नव्हता तेव्हा, बायकोची बदली होत नव्हती तेव्हा, सोसायटीचे कर्ज मिळत नव्हते तेव्हा, सरकारी पास मिळत नव्हता तेव्हा आणि मुलामुलींना पोटापाण्याला लावायचे होते तेव्हाही... आपण नुसत्या फोनवर ‘नाही.. नाही’ हा नन्नाचा पाढा ‘हो हो’ चा करून टाकलात. आम्ही तर आश्चर्याने आपल्याकडे नुसते पाहतच राहिलो. थक्क झालो. आम्ही तेव्हा आपले खरे मोठेपण जाणले होते... आणि आम्ही किती पामराचा जन्म जगतो आहोत, याची त्याच वेळी जाणीव झाली होती. असे किती प्रसंग विसरलो आम्ही करंटे... पण म्हणूनच तर करंट्या माणसांच्या घरांवर आज गुढ्या उभ्या राहिल्या ....
भाईबंदांनी आणि जातभाईनी निवडणुकीत खोडा घातला तेव्हा, गावाच्या मारामारीत पोलिसांनी आम्हास हिसका दाखविला तेव्हा, त्या मास्तरडयाने आमच्याविरुद्ध तक्रार केली तेव्हा आणि बँकेची जप्ती आली तेव्हाही आपणच आमची लाज राखली. आपल्या थोरपणाची अनुभूती यापेक्षा वेगळी ती काय असू शकते ? जगण्याला आम्ही जणू नालायक आहोत असेच जणू वाटायला लागले होते.. मात्र आपले ते भारदस्त शब्द कानावर पडले आणि धन्य झालो आम्ही. तेव्हापासून तर करंट्या माणसांच्या आयुष्यात ही पालवी फुटली ...
आपल्या कृपेनेच चारीधाम तीर्थयात्रा घडल्या, आमच्या घरासमोरील नाल्या वाहायला लागल्या, रस्त्यात खडी पडली, अतिक्रमण यादीतून आमच्या भिंतीचे नाव वगळले गेले, फुटपाथाच्या नव्या फरश्या आमच्या ओट्याला लागल्या आणि निवडणुकीच्या ऐन फडात आपण नोटांची गाठोडी दाखविली तेव्हा तर आमची बोबडीच वळली...अन आणखी एकदा खात्री पटली की आपण महानच आहात. आणि आम्ही लहानच आहोत. आपणच आहात ज्यांनी आम्हाला एक वेगळी ओळख दिली. आपल्यासारख्या महान माणसाच्या लहरीवर जगणारा लहान लाचार माणूस.. नाही म्हटले तरी मनाला टोचले.. बोचले.. पण आम्हाला माहीत होते, करंट्या माणसांच्या मंडपातील पताका म्हणजे झिरमिऱ्या आपणच तर पाठविल्या आहेत...
आम्ही मानत होतो की आमच्या कर्तुत्वावर आम्ही संसार उभा केला. पण सराईत जादुगाराने जादू करावी तसे आपल्या इशाऱ्यावर आमचे अवयव हलू लागले, तोंड भडाभड बोलू लागले, आपण म्हणाल तसेच चेहरे चढू लागले, हसू आणि आसू .., शिट्या आणि टाळ्या.. याच्याही वेळा आपणच ठरविल्या होत्या, हे लक्षात आले तेव्हा सर्व फडफड संपली आणि आम्ही पुन्हा शरण आलो. सपशेल शरण. ‘एवढेच ना... सारे ठीक होईल’ या आपल्या आश्वस्त आवाजाने आम्ही पुन्हा नव्याने जगायला सुरवात केली.. अवघड होते स्वीकारणे ... पण करंट्या माणसांच्या मनाचा ठाव घेणारे सर्व अड्डे तर आपल्याच कृपेने उजाळले आहेत...
सर्व मानवी जीवनाचा आधार असलेली माती आणि उन, वारा, पाऊसपाणी... अंत नसलेले आकाश आणि वेळ... निखळ जगण्यासाठी काडीकाडी जमा करताना निथळणारा घाम... हे आम्ही जाणतोच, कारण ते नैसर्गिक आहे. कच्च्याबच्च्यांना वाढविताना अपरिहार्य झालेली कसरत आणि मानवी प्रतिष्ठेसाठीचा अव्याहत सुरु असलेला आक्रोश...तोही आम्ही व्यवहार म्हणून स्वीकारला आहे.
पण आता आम्हाला आणि सर्वांनाच कळले आहे ... दिवे चालू बंद करणारे, पाणी अडविणारे आणि सोडणारे, बांधणारे आणि तोडणारे, खरीदणारे आणि विकणारे आपणच आहात. आपणास ‘एम टॉनिक’ चा माज चढला आहे. म्हणूनच आता त्या तुम्ही लादलेल्या आमच्यातल्या लाचारीला आणि मोकाट सुटलेल्या तुमच्यातल्या मुजोरीला आम्ही लाथ मारणार आहोत...!

Friday, April 5, 2013

एलबीटी - महापालिका आणि सरकार आपले शत्रू नव्हेत !



पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्तेबांधणी, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या सर्व गरजांना आयुष्यात अतिशय महत्व आहे. त्या सर्व गरजांची व्यवस्था आज सरकारी यंत्रणा करवसुलीतून होणाऱ्या उत्पन्नामुळे करू शकतात. सरकारच्या बाजूने त्यात अनेक त्रुटी आहेत, हे कोणी नाकबूल करणार नाही, मात्र त्यावर बोट ठेवताना प्रशासन हेच जणू आपले शत्रू आहे, अशी भाषा वापरली जाते, ती बदलण्याची गरज आहे.



गोवा आपल्याला पर्यटनस्थळ म्हणून माहीत आहे. गोव्याचा समुद्रकिनारा, शेकडो वर्षांचे चर्च, तेथील पोर्तुगीज आणि कोकणी संस्कृती आणि स्वस्त असलेले मद्यपान... ही वैशिष्टे पर्यटकांना आकर्षित करून घेतात. सध्या तर तेथे मिळणारे पेट्रोल देशात सर्वात स्वस्त आहे, कारण राज्य सरकारांतर्फे पेट्रोल – डीझेल विक्रीवर जो कर घेतला जातो, त्यातील राज्य सरकारच्या कराच्या वाट्यावर गोवा सरकारने पाणी सोडले आहे. मद्यपानावर तेथे कर नसल्यामुळे ते स्वस्त आहे आणि ते तेथील पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे, म्हणून मुद्दाम स्वस्त ठेवण्यात आले आहे. म्हणजे इतर राज्यांना मद्यापासून जो प्रचंड कर मिळतो, तो गोव्यात मिळत नाही, मात्र भारतीय आणि विदेशी पर्यटक तेथे मोठ्या प्रमाणावर येतात आणि भरपूर खर्च करतात, त्या माध्यमातून सरकारच्या महसुलात भर पडते. पर्यटक मद्यावरील कर देत नसले तरी वाहतूक, हॉटेल, जीवनावश्यक वस्तूंवर अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कर देतच असतात. अखेर कोणतेही सरकार असो की महापालिका असो, महसूल अर्थात करवसुलीवरच त्याचा गाडा चाललेला असतो.
जगभरातील सरकारे करवसुलीवरच चालली आहेत. एकविसाव्या शतकात जगभर यापेक्षा काही वेगळी पद्धत निर्माण झाली असती, तर ती आपल्या सर्वांनाच आवडली असती, मात्र अद्याप तरी तसा काही शोध लागलेला नाही. अर्थात आदर्श करपद्धतीविषयीचे मंथन जगभर सुरु आहे. सध्याच्या पद्धतीत कर कमी गोळा होतो, ही जगभरची ओरड असून त्यामुळे सरकारी खर्चाला कात्री लागून त्या त्या ठिकाणचे सार्वजनिक आयुष्य कमी प्रतीचे होत गेल्याची उदाहरणे आहेत. ते किती कमी प्रतीचे होत जाऊ शकते, हे पाहायचे असेल तर दुर्दैवाने भारत (आणि त्याचे शेजारी देश) त्याचे एक आदर्श उदाहरण आहे.
सरकार आपल्याकडून किती कर वसूल करते आणि तो कशा पद्धतीने वसूल करते, याचा आणि आपल्या आयुष्याच्या दर्जाचा किती संबंध आहे, हे कळण्यासाठी करांसंबंधीची चर्चा समाजात वेळोवेळी झालीच पाहिजे. त्यामुळे लोकल बॉडी टॅक्स म्हणजे ‘एलबीटी’ वरून पुणे, नाशिक, नागपूर आणि इतर शहरांत गेले काही दिवस जे वातावरण ढवळून निघाले आहे, ते योग्यच झाले. आधी जकात नावाचा कर सर्व व्यापारी देत होते, अर्थात असा कोणताही कर अखेरीस त्या वस्तूचा वापर करणारे ग्राहकच देत असतात. ती जकात रद्द व्हावी म्हणून गेल्या ६० वर्षांत अनेक आंदोलने झाली आणि एका एका शहरातून ती हद्दपार होते आहे. मात्र महापालिकांच्या उत्पन्नात जकातीचा वाटा किमान ४० टक्के राहिला आहे. ते उत्पन्न इतर कशातून तरी मिळाले तरच हा गाडा चालू शकतो. त्यामुळेच ‘एलबीटी’चा जन्म झाला आणि औरंगाबाद, नगर, जळगाव, सोलापूरसारख्या महापालिकांनी त्याची वसुलीही सुरु केली आहे. ती किमान वर्षभर सुरळीत असून काही ठिकाणी तर जकातीपेक्षा अधिक उत्पन्न मिळते आहे , मात्र जकातीसारखा त्रास जाणवत नाही, असा त्या त्या ठिकाणचा अनुभव आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘एलबीटी’च नको, अशी भूमिका आता काही व्यापारी संघटनांनी घेतली आहे, ती अनुचित आहे.
कर नको, असे आपल्याला का वाटते, त्याची सरकारमधील भ्रष्टाचारासारखी हजार कारणे आहेत आणि ती बरोबरच आहेत. मात्र सरकार किंवा महापालिका प्रशासन हे जणू आपले शत्रूच आहे, अशा प्रकारे या विषयाकडे पाहिले जाते आहे, ते तातडीने बदलण्याची गरज आहे. एकतर करपद्धतीविषयी बोलायचे तर ती मुळातूनच बदलली पाहिजे, असा आग्रह धरला पाहिजे. भारतीय नागरिक जे ३२ प्रकारचे कर भरतात, ते त्याच्याकडून सोप्या पद्धतीने वसूल केले पाहिजेत. सरकार चालविण्यासाठी जो पैसा लागतो, तो पैसा कमीत कमी प्रकारच्या करांतून आणि आदर्श तत्वानुसार (सोबतची चौकट पहा) वसूल होऊ शकतो, हे ठसविण्याची गरज आहे. याचाच दुसरा अर्थ असा की नागरिकांचे आयुष्य भरडून काढणाऱ्या व्यवस्था बदलाविषयीही बोलले गेले पाहिजे. ते न बोलता आपल्याला जेवढे गैरसोयीचे आहे, तेवढ्याच मुद्यावर जणू आभाळ कोसळले, असे बोलले जाते आणि तसे बोलताना महापालिका, राज्य किंवा केंद्र सरकार हे आपले शत्रू आहे, अशी मांडणी केली जाते, ती थांबविण्याची गरज आहे.
पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्तेबांधणी, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या सर्व गरजांना आयुष्यात अतिशय महत्व आहे. त्या सर्व गरजांची व्यवस्था आज सरकारी यंत्रणा करवसुलीतून होणाऱ्या उत्पन्नामुळे करू शकतात. सरकारच्या बाजूने त्यात अनेक त्रुटी आहेत, हे कोणी नाकबूल करणार नाही, मात्र त्यावर बोट ठेवताना प्रशासन हेच जणू आपले शत्रू आहे, अशी भाषा वापरली जाते, ती बदलण्याची गरज आहे. हे प्रशासन चालविणारी जी माणसे असतात, ती आपल्यातीलच कोणीतरी असतात आणि त्यांना हवे असलेले उत्पन्न त्यांना मिळाले नाही तर ते आभाळातून पडणार नाही, याचे भान ठेवावेच लागेल.


अशी असावी आदर्श करप्रणाली
जगाला आज एका आदर्श करप्रणालीची गरज आहे. आदर्श करप्रणालीमध्ये समता (Equity), उत्पादकता (Productivity), सोपेपणा (Simplicity), लवचिकता (Elasticity), निश्चितता (Certainty) आणि किफायतशीरपणा (Economy) या तत्त्वांची काळजी घेतलेली असावीच लागते. मात्र या तत्वांचा अभाव असलेल्या करपद्धतीमुळेच सध्याचा गोंधळ माजला आहे. आद्य अर्थतज्ञ कौटिल्य यांनी आदर्श करपद्धती कशी असावी, हे फार सुंदर उदाहरण देऊन सांगितले आहे. ते म्हणतात, ‘ फुलपाखरे फुलांवर बसून जसे आणि जेवढे परागकण जमा करतात, तसा सरकारने कर जमा केला पाहिजे. म्हणजे पराग तर मिळालेच पाहिजे पण फुलांना इजाही होता कामा नये.’
अधिक माहितीसाठी पहा www.arthakranti.org and www.arthapurna.org

प्रवास सुखाचा व्हावा म्हणून....




गुंतवणुकीचे नियम माणसांनीच तयार केले आहेत आणि माणसांसाठीच तयार केले आहेत. मात्र आपल्याला लक्षात येईल की ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या न्यायाने आणि अनेक ठिकाणी तर दुसऱ्यांच्या खिशात हात घालण्याची एक चलाखी म्हणूनही ते केले गेले आहेत. त्यामुळे त्यात ताण वाढले आहेत. नाहीतर नियोजनात ताण का वाढावेत ? हे ताण कमी व्हावेत आणि आपणास महामार्गाचे नियम समजण्यास सोपे व्हावेत, म्हणजे आपला प्रवास सुखकर व्हावा, असा प्रयत्न यावेळी ‘अर्थपूर्ण’ ने केला आहे.

एक स्पष्ट केले पाहिजे की मानवी जीवनात आरोग्य, शिक्षण, कुटुंब आणि मित्रांच्या नात्यांना जेवढे महत्व आहे, तेवढे कशालाच नाही. आरोग्य चांगले ठेवणे आणि त्याचे संवर्धन करणे हे आपल्या मनावर आणि दिनक्रमावर अवलंबून असते, याविषयी कोणाचे दुमत नाही. मात्र वरवर सोपी वाटणारी बाब सध्याच्या आधुनिक आयुष्यात दूरदूर पळताना दिसते आहे. माणसाने दिवसातील काही विशिष्ट वेळ शरीरासाठी द्यावा, अशी रचना निसर्गानेच केली आहे. मात्र त्या वेळांत करिअरची सतत घुसखोरी सुरु आहे. त्याचा परिणाम असा झाला की आरोग्य ही एक नैसर्गिक गोष्ट न राहता ती आधुनिक काळात कृत्रिम गोष्ट होत चालली आहे. ज्या मानसिक आरोग्यावर हा सर्व डोलारा उभा आहे, त्याविषयी तर काही सर्वमान्य शब्दांपर्यंत पोहचणे आज तरी अशक्य वाटावे, अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीने एक बदल असा केला आहे, आपल्याला ‘सामान्य’ माणूस म्हणून चांगले जीवन जगण्याची संधी आली असताना ‘असामान्य’ जीवनाच्या मागे पळणाऱ्या माणसांची संख्या सतत वाढतच चालली आहे.
शिक्षण हा तर सध्याच्या जगात प्रगतीचा पासवर्ड झाला आहे. शिक्षणाने माणसाला चांगले आणि वाईट नेमके कशाला म्हणायचे हे ओळखण्यासाठीची सतसतविवेकबुद्धी दिली पाहिजे, असे म्हटले जाते मात्र आजच्या शिक्षणाची व्याख्या आपण सर्वच जण जाणतो. या शिक्षणात परीक्षा पास होण्याला महत्व असून एकूणच संधी कमी असल्याने हुशारीचा तो निकष आता आपण सर्वांनीच स्वीकारला आहे. एवढेच नव्हे तर त्या निकषावर इतरांना कमी लेखून आपणच जगण्यास कसे लायक आहोत, अशी मुजोरीही अनेकांनी आत्मसात केली आहे. शिक्षणात एक गोष्ट फार महत्वाची आहे, ती अशी की माणसाचे सार्वजनिक जीवन वैयक्तिक जीवनासारखेच अधिकाधिक समृद्ध होत गेले पाहिजे आणि उच्च शिक्षण घेणाऱ्यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे. आज मात्र तसे होताना दिसत नाही. होते असे की उच्च शिक्षण याचा अर्थ अधिक कमाईचे शिक्षण याला समाजाने मान्यता देऊन टाकल्याने शिक्षणाचे मूळ उद्देश्यच मागे पडले आहेत.
कुटुंबाचे म्हणजे कौटुंबिक नात्यांचे महत्व मानवी आयुष्यात किती आहे, याविषयी अधिक चर्चा करण्याची खरे म्हणजे काही गरज नाही. आपल्या अस्तित्वापासून आपल्या सर्व सुखदुःखात सोबत असणारे कुटुंब सोडून कोणी माणूस सुखी झाल्याची उदाहरणे नाहीत. माणसांत म्हणजे समाजात जगतानाची ओळख तर कुटुंब मिळवून देतेच, पण तो ज्या परिसरात आणि मुशीत जगायला शिकतो, तो परिसर आणि मुशीही कुटुंबच घडवत असते. ज्यांना या मर्यादा वाटतात, ते त्या ओलांडून पुढे जातात, पण अशी माणसे बोटावर मोजण्याइतकीच असतात. त्यातही त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्याकडे पाहिले तर ती कुटुंबाच्या कुशीत विसावताना दिसतात. बहुतांश माणसांचे आयुष्य आपल्या कुटुंबाभोवती फिरत असते, हेच खरे.
जेवढे कुटुंब महत्वाचे आहे, तेवढेच मित्रांचे नाते महत्वाचे आहे. कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे, हे जे माणसाचे अपरिहार्य सामाजीकीकरण आहे त्यात मित्र हा त्याचे बोट धरणारा आणि त्याचे समाधान करणारा पहिला घटक आहे. माणूस कामाच्या ठिकाणीही रमतो, मात्र त्याला सतत आस असते ती आपले भूत, वर्तमान आणि भविष्य मैत्राकडे व्यक्त करण्याची. ती आजही काही तहानभुकेसारखी गरज मानली जात नसली तरी ते मित्रांशी व्यक्त होणे थांबले तर अन्न गोड लागत नाही, याचा अनुभव कधी ना कधी येतोच.
आरोग्य, शिक्षण, कुटुंब आणि मित्रांच्या या नात्यांमध्ये पैशाचा संबंध कोठे आला, असा प्रश्न आपल्या मनात आलाच असणार. आणि आलाच पाहिजे. कारण आपले जे एक सुंदर जैविक जगणे आहे, त्याला पैसा नावाच्या कृत्रिम साधनाने असे घट्ट बांधले आहे की जैविक जगण्यासाठी त्याचा विचार अपरिहार्य झाला आहे. ही अपरिहार्यता इतक्या टोकाला गेली आहे की जणू माणसाच्या नैसर्गिक जगण्यापेक्षा ते अधिक महत्वाचे ठरते आहे. त्यामुळेच मग ते कमावणे आले, त्याची हेतूपूर्वक देवाणघेवाण आली. त्याचा साठा आला. त्याच्याशी जोडलेली प्रतिष्ठा आणि सुखदु:खे आली. माणसाच्या आयुष्यात त्याच्या नियोजनाला आजच महत्व आले आहे, असे नाही, मात्र आज त्याच्याशिवाय जगणे अवघड झाले, हे अमान्य करता येणार नाही. वेळच्या वेळी गुंतवणूक करणे, तिचे नियोजन करणे आणि त्यावर आपले आयुष्य उभे करणे... हाच जणू जगण्याचा महामार्ग होऊ घातला आहे. आणि महामार्गावर तुम्ही गेलात की तुम्हालाही महामार्गाचे नियम लागू होतात, तसे आज आपण जागतिकीकरणाच्या महामार्गावरील नियमांनी जगत आहोत. मी माझा वेग कमी करील, मी माझा वेग वाढवीन, असे आपण म्हणू शकतो, मात्र तसे आपण करू शकत नाही, याची आपल्याला जाण आहे.
गुंतवणुकीचे नियम माणसांनीच तयार केले आहेत आणि माणसांसाठीच तयार केले आहेत. मात्र आपल्याला लक्षात येईल की ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या न्यायाने आणि अनेक ठिकाणी तर दुसऱ्यांच्या खिशात हात घालण्याची एक चलाखी म्हणूनही ते केले गेले आहेत. त्यामुळे त्यात ताण वाढले आहेत. नाहीतर नियोजनात ताण का वाढावेत ? हे ताण कमी व्हावेत आणि आपणास महामार्गाचे नियम समजण्यास सोपे व्हावेत, म्हणजे आपला प्रवास सुखकर व्हावा, असा प्रयत्न यावेळी ‘अर्थपूर्ण’ ने केला आहे. आपल्याला तो आवडेल, अशी खात्री आहे.