Friday, April 5, 2013

प्रवास सुखाचा व्हावा म्हणून....
गुंतवणुकीचे नियम माणसांनीच तयार केले आहेत आणि माणसांसाठीच तयार केले आहेत. मात्र आपल्याला लक्षात येईल की ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या न्यायाने आणि अनेक ठिकाणी तर दुसऱ्यांच्या खिशात हात घालण्याची एक चलाखी म्हणूनही ते केले गेले आहेत. त्यामुळे त्यात ताण वाढले आहेत. नाहीतर नियोजनात ताण का वाढावेत ? हे ताण कमी व्हावेत आणि आपणास महामार्गाचे नियम समजण्यास सोपे व्हावेत, म्हणजे आपला प्रवास सुखकर व्हावा, असा प्रयत्न यावेळी ‘अर्थपूर्ण’ ने केला आहे.

एक स्पष्ट केले पाहिजे की मानवी जीवनात आरोग्य, शिक्षण, कुटुंब आणि मित्रांच्या नात्यांना जेवढे महत्व आहे, तेवढे कशालाच नाही. आरोग्य चांगले ठेवणे आणि त्याचे संवर्धन करणे हे आपल्या मनावर आणि दिनक्रमावर अवलंबून असते, याविषयी कोणाचे दुमत नाही. मात्र वरवर सोपी वाटणारी बाब सध्याच्या आधुनिक आयुष्यात दूरदूर पळताना दिसते आहे. माणसाने दिवसातील काही विशिष्ट वेळ शरीरासाठी द्यावा, अशी रचना निसर्गानेच केली आहे. मात्र त्या वेळांत करिअरची सतत घुसखोरी सुरु आहे. त्याचा परिणाम असा झाला की आरोग्य ही एक नैसर्गिक गोष्ट न राहता ती आधुनिक काळात कृत्रिम गोष्ट होत चालली आहे. ज्या मानसिक आरोग्यावर हा सर्व डोलारा उभा आहे, त्याविषयी तर काही सर्वमान्य शब्दांपर्यंत पोहचणे आज तरी अशक्य वाटावे, अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीने एक बदल असा केला आहे, आपल्याला ‘सामान्य’ माणूस म्हणून चांगले जीवन जगण्याची संधी आली असताना ‘असामान्य’ जीवनाच्या मागे पळणाऱ्या माणसांची संख्या सतत वाढतच चालली आहे.
शिक्षण हा तर सध्याच्या जगात प्रगतीचा पासवर्ड झाला आहे. शिक्षणाने माणसाला चांगले आणि वाईट नेमके कशाला म्हणायचे हे ओळखण्यासाठीची सतसतविवेकबुद्धी दिली पाहिजे, असे म्हटले जाते मात्र आजच्या शिक्षणाची व्याख्या आपण सर्वच जण जाणतो. या शिक्षणात परीक्षा पास होण्याला महत्व असून एकूणच संधी कमी असल्याने हुशारीचा तो निकष आता आपण सर्वांनीच स्वीकारला आहे. एवढेच नव्हे तर त्या निकषावर इतरांना कमी लेखून आपणच जगण्यास कसे लायक आहोत, अशी मुजोरीही अनेकांनी आत्मसात केली आहे. शिक्षणात एक गोष्ट फार महत्वाची आहे, ती अशी की माणसाचे सार्वजनिक जीवन वैयक्तिक जीवनासारखेच अधिकाधिक समृद्ध होत गेले पाहिजे आणि उच्च शिक्षण घेणाऱ्यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे. आज मात्र तसे होताना दिसत नाही. होते असे की उच्च शिक्षण याचा अर्थ अधिक कमाईचे शिक्षण याला समाजाने मान्यता देऊन टाकल्याने शिक्षणाचे मूळ उद्देश्यच मागे पडले आहेत.
कुटुंबाचे म्हणजे कौटुंबिक नात्यांचे महत्व मानवी आयुष्यात किती आहे, याविषयी अधिक चर्चा करण्याची खरे म्हणजे काही गरज नाही. आपल्या अस्तित्वापासून आपल्या सर्व सुखदुःखात सोबत असणारे कुटुंब सोडून कोणी माणूस सुखी झाल्याची उदाहरणे नाहीत. माणसांत म्हणजे समाजात जगतानाची ओळख तर कुटुंब मिळवून देतेच, पण तो ज्या परिसरात आणि मुशीत जगायला शिकतो, तो परिसर आणि मुशीही कुटुंबच घडवत असते. ज्यांना या मर्यादा वाटतात, ते त्या ओलांडून पुढे जातात, पण अशी माणसे बोटावर मोजण्याइतकीच असतात. त्यातही त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्याकडे पाहिले तर ती कुटुंबाच्या कुशीत विसावताना दिसतात. बहुतांश माणसांचे आयुष्य आपल्या कुटुंबाभोवती फिरत असते, हेच खरे.
जेवढे कुटुंब महत्वाचे आहे, तेवढेच मित्रांचे नाते महत्वाचे आहे. कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे, हे जे माणसाचे अपरिहार्य सामाजीकीकरण आहे त्यात मित्र हा त्याचे बोट धरणारा आणि त्याचे समाधान करणारा पहिला घटक आहे. माणूस कामाच्या ठिकाणीही रमतो, मात्र त्याला सतत आस असते ती आपले भूत, वर्तमान आणि भविष्य मैत्राकडे व्यक्त करण्याची. ती आजही काही तहानभुकेसारखी गरज मानली जात नसली तरी ते मित्रांशी व्यक्त होणे थांबले तर अन्न गोड लागत नाही, याचा अनुभव कधी ना कधी येतोच.
आरोग्य, शिक्षण, कुटुंब आणि मित्रांच्या या नात्यांमध्ये पैशाचा संबंध कोठे आला, असा प्रश्न आपल्या मनात आलाच असणार. आणि आलाच पाहिजे. कारण आपले जे एक सुंदर जैविक जगणे आहे, त्याला पैसा नावाच्या कृत्रिम साधनाने असे घट्ट बांधले आहे की जैविक जगण्यासाठी त्याचा विचार अपरिहार्य झाला आहे. ही अपरिहार्यता इतक्या टोकाला गेली आहे की जणू माणसाच्या नैसर्गिक जगण्यापेक्षा ते अधिक महत्वाचे ठरते आहे. त्यामुळेच मग ते कमावणे आले, त्याची हेतूपूर्वक देवाणघेवाण आली. त्याचा साठा आला. त्याच्याशी जोडलेली प्रतिष्ठा आणि सुखदु:खे आली. माणसाच्या आयुष्यात त्याच्या नियोजनाला आजच महत्व आले आहे, असे नाही, मात्र आज त्याच्याशिवाय जगणे अवघड झाले, हे अमान्य करता येणार नाही. वेळच्या वेळी गुंतवणूक करणे, तिचे नियोजन करणे आणि त्यावर आपले आयुष्य उभे करणे... हाच जणू जगण्याचा महामार्ग होऊ घातला आहे. आणि महामार्गावर तुम्ही गेलात की तुम्हालाही महामार्गाचे नियम लागू होतात, तसे आज आपण जागतिकीकरणाच्या महामार्गावरील नियमांनी जगत आहोत. मी माझा वेग कमी करील, मी माझा वेग वाढवीन, असे आपण म्हणू शकतो, मात्र तसे आपण करू शकत नाही, याची आपल्याला जाण आहे.
गुंतवणुकीचे नियम माणसांनीच तयार केले आहेत आणि माणसांसाठीच तयार केले आहेत. मात्र आपल्याला लक्षात येईल की ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या न्यायाने आणि अनेक ठिकाणी तर दुसऱ्यांच्या खिशात हात घालण्याची एक चलाखी म्हणूनही ते केले गेले आहेत. त्यामुळे त्यात ताण वाढले आहेत. नाहीतर नियोजनात ताण का वाढावेत ? हे ताण कमी व्हावेत आणि आपणास महामार्गाचे नियम समजण्यास सोपे व्हावेत, म्हणजे आपला प्रवास सुखकर व्हावा, असा प्रयत्न यावेळी ‘अर्थपूर्ण’ ने केला आहे. आपल्याला तो आवडेल, अशी खात्री आहे.