Thursday, September 2, 2010

हे खरे की ते खरे ?

एका दैनिकाची नव्याने सुरू झालेली पुरवणी अशात वाचनात आली. पुरवणीचा विषय पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर असला तरी या पुरवणीत विशिष्ट भागातील बांधकामविषयक घडामोडींवरच भर देण्यात आला होता. पुणे, पिंपरी-चिंचवडचा कसा वेगाने विकास होतो आहे, हे वर्णन सध्या वेगवेगळया पद्धतीने केले जाते आहे आणि वेगाने होणारी बांधकामे यालाच विकास असे नाव दिले जाते आहे, याचे सखेद आश्चर्य वाटते. ही संपादकीय मजकूराची पुरवणी होती, हे नमूद केले पाहिजे. केवळ जाहिराती मिळण्यासाठी हल्ली स्वतंत्र पुरवण्या काढल्या जातात, त्याप्रकारची ही पुरवणी नव्हती. या पुरवणीतील मुख्य म्हणजे पहिल्या पानावरील लेख वाचून धक्का बसला. संपादकीय मजकुराची निवड या पद्धतीने होउ लागली तर वाचकांनी त्यावर विश्वास का ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित होतो.
या लेखातील काही उल्लेख कसे शिताफीने करण्यात आले होते, हे लक्षात येण्यासाठी काही उदाहरणे दिली पाहिजेत. ‘...... या भागात राहायला येणार्‍यांची संख्या कमालीची वाढली आहे.’, ‘ या सर्व सेवासुविधांमुळे ...... हे नवीन आकर्षक ठिकाण झालेले असून नव्याने पुण्यात येणार्‍यांकडून या भागाला प्राधान्य दिले जात आहे.’, ‘ पाणी, रस्ते आणि वीज याचा तुटवडा आता राहिलेला नाही. रस्ते चकाचक झाले असून आता पाण्याचाही तोटा नाही.’ ‘ हा रस्ता चौपदरी केल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे.’ ‘विशेष म्हणजे.... महापालिका पायाभूत सुविधा पुरविण्यात आघाडीवर आहे.’, ‘ सेवासुविधांच्याबाबतीत कोठेही कमतरता नसल्याने नवे पुणेकर होणार्‍या लोकांकडून या भागात राहायला येणार्‍यांची संख्या वाढली आहे.’, ‘ हा परिसर आता अलिशान इमारतींनी सजला आहे.’, ‘ गेल्या काही वर्षांत .... या भागाचा कायापालट झालेला दिसतो.’
ही वाक्ये उदाहरणादाखल दिली आहेत. त्यातील काही विधाने बातमीदार असलेल्या लेखकाची आहेत तर काही बांधकाम व्यावसायिकांची आहेत. पण मजकूराची सरमिसळ अशी करण्यात आली आहे की ती नेमकी कोणाची आहे, हे परि्च्छेदाच्या अखेरपर्यंत गेल्याशिवाय लक्षातच येत नाही. पुणे, पिंपरी-चिंचवड्च्या ज्या नव्या भागांचा उल्लेख लेखात करण्यात आला आहे, त्या भागातील अलिशान इमारती आणि सेवासुविधांची छायाचित्रे त्यात वापरलेली आहेत. विशेष म्हणजे या पुरवणीत प्रामुख्याने लेखात नमूद केलेल्या भागातीलच जाहिराती आहेत. त्याही बांधकाम व्यावसायिकांच्या आहेत. त्याचा पुढचा भाग अधिक आक्षेपार्ह आहे. तो म्हणजे ज्या बांधकाम व्यावसायिकांच्या जाहिराती आहेत, त्याच चार जणांच्या मतांना लेखात स्थान देण्यात आले आहे. जाहिरातींसाठीची पुरवणी म्हणूनच ती प्रसिद्ध झाली असती तर हे सर्व एकवेळ समजण्यासारखे होते, मात्र संपादकीय मजकूराची पुरवणी असताना मजकूराचा आणि जाहिरातींचा असा थेट संबंध जोडण्यात आला आहे ! शिवाय जाहिरातीच्या आकारानुसार बांधकाम व्यावसायिकांच्या प्रतिक्रियांना प्राधान्य देण्यात आले आहे !
असा मजकूर पाहिल्यावर काही प्रश्न मनात येतात, ते असेः वस्तुस्थिती वाचकांपर्यत पोचविण्याच्या कर्तव्यामध्ये या प्रकारच्या मजकूराने कसूर केली नाही का ?, इतर वेळी सेवासुविधांच्याच्या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात येते मग त्यात कमतरता राहिलेली नाही, असे विधान दुटप्पीपणाचे नाही काय ?, संपादकीय मजकूराचा आणि जाहिरातींचा असा थेट संबंध जोडणे ही वाचकांची फसवणूक नाही काय ?
छापील शब्दांवर लोकांचा आजही विश्वास आहे, असे म्हटले जाते, आणि ते खरेही आहे. पण या पद्धतीची फसवणुक होत राहिली तर तो वेगाने कमी होत जाईल. ज्याने आपले आर्थिक हितसंबंध जपले त्याच्या नावाचा जयजयकार हे राजकारणात आपण नेहमी पाहतो. आता हा मिंधेपणा माध्यमांमध्ये दिसायला लागला आहे. आपल्या मालाची, सेवेची जाहिरात करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यामुळे त्याविषयी आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्यासाठी फक्त जाहिरातींना वाहिलेल्या पुरवण्या काढल्या जातात. या पुरवणीतला मजकूर जाहिरातदारांना पूरक असतो. माध्यमांची ही गरज आता सर्वांनीच मान्य केली आहे. मात्र या प्रकारच्या संपादकीय पुरवण्यांमध्ये अशी सरमिसळ करणे, ही वाचकांची घोर फसवणूकच आहे.
नागरिकांचा संभ्रम दूर करण्याचे काम माध्यमांनी केले पाहिजे, मात्र अशा मजकुराद्वारे तो संभ्रम वाढविला जातो आहे. माध्यमांचा कारभार व्यवसाय म्हणून चालला आहे, याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही, मात्र ज्यावेळी वाचक, श्रोता आणि दर्शक याच्या फसवणुकीत माध्यमेच सहभागी व्हायला लागली तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा ?
यमाजी बाळाजी मालकर / ymalkar@gmail.com