Friday, April 23, 2010

जखमेवर मीठ चोळणा-या ‘सर्कशी’

भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या तसेच आर्थिक असमानतेचे टोक गाठलेल्या देशासाठी अर्थक्रांती ही नवी संकल्पना सुचवूनही आता एक दशक उलटून गेले. औरंगाबादचे एक उद्दोजक श्री. अनिल बोकील यांनी ही संकल्पना मांडली आहे. म्हटले तर ती अतिशय साधी आहे. सध्या सर्व नागरिक प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष ३३ प्रकारचे कर भरतात, त्याएवजी दोनच प्रकारचे कर भरतील. त्यातला एक सीमाशुल्क आणि दुसरा ‘व्यवहार कर’. साधारण २००० किंवा ५००० रूपयांवरील रोखीचे व्यवहार होणार नाहीत, असा कायदा करण्यात येईल. एक हजार आणि पाचशेसारख्या मोठ्या नोटांची व्यवहारात मग गरज राहणार नाही, त्यामुळे त्या रद्द करण्यात येतील. थोडक्यात बँकेमार्फत आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येईल. व्यवहारकराद्वारे जमा होणा-या निधीचे वाटप केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात येईल, अशी ही संकल्पना आहे. आपल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यापासून अनेक उच्चपदस्थांनी या संकल्पनेची वाहवा करून झाली, मात्र प्रत्यक्षात त्यासंदर्भात ठोस काही होताना दिसत नाही. या संकल्पनेची आठवण या महिन्यात फार तीव्रतेने झाली.

त्याचे एक प्रमुख कारण आयपीएल नावाची सर्कस. या सर्कशीवर भारतवाशी १५ हजार कोटी रूपये उधळतो, या प्रकारची जी भयानक आकडेवारी समोर आली आहे आणि त्यानंतर प्राप्तिकर खात्याचे जे छापासत्र सुरू आहे, ते होय. घरी खायला दाणे नसलेल्या माणसाने नशा करून झिंगण्यासारखे हे आहे. संपत्ती- पैशाचा हा जो उतमात चालला आहे, ते व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावामुळे आपण रोखू तर शकत नाही, मात्र ज्या भ्रस्ट व्यवस्थेने हे घबाड त्यांच्या हातात दिले आहे, ती व्यवस्था तर दुरूस्त करू शकतो. त्या दुरूस्तीचा तर्कसंगत मार्ग शोधायचा झाल्यास आपल्याला अर्थक्रांती संकल्पनेची आठवण ठेवावीच लागते.

श्री. अनिल बोकील यांनी दिलेले एक चांगले उदाहरण मला आठवते. त्यांच्या मोलकरणीने आगाउ पैसे मागितल्यावर त्यांनी दोन वेळा हातउसणे पैसे दिले आणि तिस-या वेळी मात्र तिचा पगार बँकेतून करायला सुरूवात केली. दोन वर्षांनंतर जेव्हा तिला मोठ्या कर्जाची गरज पडली तेव्हा ते तिला जामिनदार राहिले शिवाय बँकेतून पगार केल्यामुळे तिची पत तयार झाली आणि त्या प्रमाणात बँकेने तिला कर्ज मंजूर केले. बँकव्यवहार वाढल्यामुळे एका सामान्य नागरिकाच्या आयुष्यात झालेला हा क्रांतिकारी बदल ठरला. सांगण्याचा मुद्दा हा की १२० कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाला अशा बदलांची गरज


आहे. ते होत नाहीत म्हणून आयपीएल आणि त्यासारख्या शेकडो सर्कशी सामान्य माणसाच्या जखमेवर दररोज मीठ चोळत आहेत.

सरकारने अनेक उपाय योजूनही नक्षलवादी चळवळीला मिळणारा स्थानिक नागरिकांचा पाठिंबा कमी होताना दिसत नाही, यातच सर्व काही आले. नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या भागात कवडीमोल जीवन जगणा-या नागरिकांना हा देश आणि ही व्यवस्था आपली वाटेनाशी झाली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात असे कोणाला वाटले असते तर ते समजण्यासारखे होते. मात्र ६० वर्षांनी लाखो लोकांच्या मनात तीच भावना राहते, याच्या कारणांचा विचार करावाच लागणार आहे. जेव्हा एक व्यवस्था म्हणून काही नवी रचना करावी लागेल, त्यावेळी अर्थक्रांतीची संकल्पना मान्यच करावी लागते. वाईट याचे वाटते की इकडे आयपीएलसारख्या सर्कशी आणि दुसरीकडे व्यवस्थेने नाकारलेल्यांची संख्या वाढतेच आहे.

ही दरी दैनंदिन व्यवहारात कशी काम करते आहे, याचे एक उदाहरण येथे दिले पाहिजे. आपण शहरातला एखादा गजबजलेला रस्ता नजरेसमोर आणू यात. आपल्याला असे दिसते की भारीतली भारी कार, बस, रिक्षा, दुचाकी, सायकल, हातगाडी आणि पादचारी त्याच रस्यावरून जात असतात. साहजिकच प्रत्येकाची गती वेगळी आहे. प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगळा आहे. थोडक्यात एकाच रस्यावरून २०-२५ प्रकारची वाहने चालली आहेत आणि आपल्याला त्या रस्त्यावर शिस्तबध्द वाहतूक हवी आहे... मग ती आणण्यासाठी त्यातले जे गरीब आहेत त्यांना त्या रस्त्याबाहेर काढण्याचा मार्ग आपण निवडला आहे. ज्याच्याकडे अतिशय मर्यादित साधने आहेत, त्यांना या शिस्तीचा जाच होतो आहे, पण त्याच्याशी सरकारला काही देणेघेणे नाही. मग तो नियम तोडायला लागतो, त्यालाच आपण बेशिस्त म्हणतो. पण ज्यांनी आर्थिक शिस्त तोडली आहे, त्यांनी ती तोडल्याबद्दल शिक्षा होतेच, असे नाही. आयपीएलच्या बोलींचे आकडे पाहिल्यावर ही विसंगती कोणाच्याही लक्षात येईल. कमी काळात इतका प्रचंड पैसा कोणाकडे कसा येउ शकतो, यासाठी संशोधनाची गरज नाही.

चांगले जगणे आणि हौसमौज सर्वांनाच हवी आहे, त्यात बाधा आणण्याची कोणाची इच्छा नाही आणि तसे ते बरोबरही नाही. मात्र एका देशाचे नागरिक म्हणून नाते निर्माण व्हायचे असेल तर प्रत्यक्ष नवनिर्मिती करणा-यांच्या वाट्याला येत असलेली अवहेलना रोखायलाच हवी.शेतीत धान्य पिकविणारा शेतकरी, शरीरकष्टाची कामे करणारा मजूर यांच्या वाट्याला आज जे जिणे आले आहे, त्याकडे पाहता ही चांगली व्यवस्था आहे, असे
म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही. कोट्यवधी रूपयांची माया जमविणा-या बहुतेकांनी ती किती भ्रष्ट मार्गांनी जमविलेली असते, हे एखाद्या प्रकरणाने जगासमोर येते. त्यामुळेच आयपीएलकडे त्या नजरेने पाहिले जाते आहे, हे आश्चर्य नव्हे.


जगात गरीब देश आणि श्रीमंत देश असा भेद आता राहिला नाही, आता गरीब देशातले श्रीमंत आणि श्रीमंत देशातील श्रीमंत एकीकडे आणि गरीब देशातले गरीब आणि श्रीमंत देशातले गरीब – अशी जगाची फाळणी झाली आहे, असे जे म्हटले जाते, त्याचीच प्रचिती येवू लागली आहे. ही दरी कमी करण्याची जबाबदारी अर्थातच पहिल्या जगाची आहे. कारण त्यांना चांगले जगायचे असेल तर इतरांनाही जगू देण्याचे औदार्य त्यांना अंगी बाणावेच लागेल. नाहीतर जवान स्फोटांमध्ये मरत आहेत, स्टेडियमच्या शेजारी स्फोटके सापडत आहेत आणि रस्त्यावरील अपघातांची संख्या वाढत चालली आहे, ही सर्व परिस्थिती या वाढत्या दरीनेच निर्माण केली आहे. ती आटोक्यात न आणल्यास सर्वांनाच जीव वाचवत वाचवत जगावे लागणार आहे.

यमाजी मालकर , ymalkar@gmail.com