Tuesday, October 29, 2013

सर्वकल्याणार्थ अर्थभानही सृष्टी केवळ माणसांची नाही, ती पृथ्वीतलावरील सर्वांची आहे, याविषयी दुमत होऊ शकत नाही. मात्र स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या माणसाला अजून सर्व मानवजातीला आनंदाच्या कवेत घेणारी व्यवस्था उभी करता आलेली नाही. ती समन्यायी, पारदर्शी, निरपेक्ष व्यवस्थाच पृथ्वीतलाचे भविष्य घडवील. दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा सण आहे, म्हणजे सर्वांचे कल्याण चिंतणारा सण आहे. सर्वांच्या कल्याणाचा मार्ग आता अर्थभानाच्या मार्गाने जातो. ते अर्थभान या वर्षाने दिले आहे.

एखादा दीर्घ प्रवास संपता संपू नये आणि अचानक त्याचा समारोप जवळ आला, असे सांगणारी अशी एक ओळखीची खुण दिसावी. रात्रीचा दाटलेला अंधार खूप प्रतिक्षेनंतर विरळ व्हावा आणि पहाट फाकावी. हरवलेली महत्वाची वस्तू आता सापडत नाही, म्हणून शोधाचा नाद सोडून देता देताच ती वस्तू हाती लागावी. दाहक उन्हात तहान लागली असताना सर्व मृगजळाच्या मागे धावून अतिशीण झाला असताना निळ्याशार पाण्याने भरलेला तलाव दृष्टीपथात पडावा. माणसांच्या प्रदीर्घ वादाविवादाने कोणताच तोडगा समोर येत नाही, यामुळे जीव मेटाकुटीला आला असतानाच सर्वांना आपले हित कळावे आणि त्यांनी एकमताच्या दिशेने विचार सुरु करावा. असे आणि यासारखे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, तसे ते राष्ट्र म्हणून जगणाऱ्या समूहांच्याही वाट्याला येतात, असा सुखद अनुभव २०१३ ची दिवाळी देते आहे. मित्रांनो, म्हणून ही दिवाळी खूप काही वेगळे घेऊन आली आहे.
दिवाळीचा सण गोड करायचा म्हणून गोडधोड खायचे, नवे कपडे घ्यायचे, लक्ष्मीच्या कृपेची प्रार्थना करायची आणि आला दिवस गोड मानायाचा, असे दिवस ‘काढत’ असताना आणि बाहेरच्या जगात अंधारच दाटून आला, असेच वाटत असताना पहाट झाल्याचा भास व्हावा, असे काय घडले, असे अनेकांना वाटेल. आणि ते बरोबरच आहे. मात्र गेले वर्षभर आपल्या आयुष्यात, कुटुंबात, गावात, राज्यात, देशात आणि जगात जे वेगळे घडते आहे, त्याची आठवण आज येथे करून देणार आहे. हे जे घडते आहे, ते सुरवातीस नकारात्मक वाटू शकते, जगाला संकटात टाकण्यासाठीच त्याचा जन्म झाला, असेही वाटू शकते. मात्र ते तसे नाही. जगात गेले वर्षभर जे घडते आहे, ते काहीतरी वेगळे आहे. जगाच्या उद्याच्या भविष्याला कलाटणी देण्याची ताकद या बदलात आहे.

हे वर्ष कशासाठी लक्षात राहील, हे आधी आपण पाहू म्हणजे मी असे का म्हणतो, हे लक्षात येईल. हे वर्ष शुभ आहे की अशुभ अशा चर्चेने सुरु झालेल्या २०१३ वर्षात आपण काय काय अनुभवत आहोत, ते पहा. जग मंदीत सापडले आणि या मंदीची तुलना १९३० च्या मंदीशी केली गेली. पण त्याचवेळी जग सुसाट वेगाने धावण्यास सज्ज होत असल्याच्या हाका मध्येच ऐकू यायला लागल्या. जगाचे आणि आपल्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या जनक्षोभानंतर सगळे काही बदलून जाणार, असे वाटत असतानाच येथे तर काहीच बदलत नाही, अशी निराशा पदरी घेऊन लोक आपापल्या कामाला लागले. आपला वाटा मागणाऱ्या तरुणांना जगाने अतिरेकी आणि नक्षलवादी अशी नावे दिली खरी, मात्र त्यांचा वाटा दिला नाही म्हणून हे घडते आहे, असे याच वर्षात उघडपणे बोलले गेले. आर्थिक महासत्ता मानल्या गेलेल्या अमेरिकेत एकमताअभावी सरकार ठप्प याच वर्षात झाले आणि त्याच्या भल्याबुऱ्या परिणामांची चर्चाही झाली. मॉस्कोच्या विमानतळावर १ हजार ६७५ अब्ज रुपये (युरो चलनात) पडून असलेल्या घटनेला सहा वर्षे पूर्ण झाली आणि जगातला रोखीच्या व्यवहाराचा कर्करोग किती भयानक स्तराला पोचला, याचे गांभीर्य लक्षात आले. दुष्काळाने भूमी आणि माणसं होरपळून निघाली असतानाच अशी काही बरसात झाली की अनेक वर्षांत असा पाऊस पडला नाही, असे म्हणण्याची वेळ आली. निवडणुका हा जणू आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याचा एकमेव मार्ग आहे, असे मानून दीड वर्ष आधीच निवडणुकीची नको इतकी चर्चा सुरु झाली. सोन्याच्या आयातीचा देशाला एवढा मोठा फटका बसला की देशाच्या अर्थकारणावर बोलताना सोन्याचा हिशोब टाळता येत नाही, हे लक्षात आले. आयात निर्यात व्यापारातील तूट वाढली आणि परकीय चलनाचा साठा घटल्याने रुपयाने एक मोठा हिंदोळा घेतला, ज्यात कोट्यवधी लोकांना आपला जीव मुठीत धरून सावरावा लागला. खरे तर माणसाच्या जगण्याच्या शर्यतीत अडथळा ठरावे, असेच हे सगळे. एक तर मान्य केलेच पाहिजे, की ‘अर्था’ची जेवढी चर्चा यावर्षी झाली, तेवढी कदाचित यापूर्वी कधीच झाली नसेल!

हे तर वर्षानुवर्षे असेच सुरु आहे, मग नेमके वेगळे काय घडले यावर्षी? वेगळे एवढेच पण फार महत्वाचे घडले ते म्हणजे निसर्ग साथ देतो आहे, शेती पिकते आहे, अन्नधान्य मुबलक आहे आणि पैसाही प्रचंड आहे, याची जाणीव तर झालीच पण आपल्या सुखदु:खामध्ये पैसा फार महत्वाची भूमिका बजावतो आहे. तो राजकारण, समाजकारणावर स्वार झाला आहे. त्यामुळे त्याला समजून घ्यावे लागेल आणि सर्वांना समान संधी आणि मानवी प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मानवनिर्मित या पैशाच्या व्यवस्थेला आव्हान द्यावे लागेल, याची जाणीव यावर्षी वाढली. जगाची आणि जीवनातल्या यशापशायाची चर्चा आर्थिक नफ्यातोट्यात मोजली जावी, यासारखे दुर्दैव ते काय ? पण या जगाचे व्यवहार विचारसरणी, जात-धर्म, वर्ग आणि जिंदाबाद मुर्दाबादच्या पलीकडे जाऊन आपण समजून घेतले पाहिजेत आणि त्या व्यवहारांत जे विष पेरले गेले आहे, ते काढण्यासाठी एका समुद्रमंथनात आपण भाग घेतला पाहिजे, असे मनामनांत रुजते आहे. एखाद्या बी ने जमिनीत गाडून घेतल्यावर एका क्षणी प्रचंड ताकदीने सूर्यकिरणांच्या दिशेने झेप घ्यावी, असे मंथन जगात सुरु झाले, याअर्थाने ही दिवाळी वेगळी आहे! ही सृष्टी केवळ माणसांची नाही, ती पृथ्वीतलावरील सर्वांची आहे, याविषयी दुमत होऊ शकत नाही. मात्र स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या माणसाला अजून सर्व मानवजातीला आनंदाच्या कवेत घेणारी व्यवस्था उभी करता आलेली नाही. ती समन्यायी, पारदर्शी, निरपेक्ष व्यवस्थाच पृथ्वीतलाचे भविष्य घडवील, हे भान या वर्तमानाने दिले, ही अतिशय आनंददायी गोष्ट घडली आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, म्हणजे सर्वांचे कल्याण चिंतणारा सण आहे. सर्वांच्या कल्याणाचा मार्ग आता अर्थभानाच्या मार्गाने जातो. ते अर्थभान या वर्षाने दिले आहे.

अशा निर्जीव पैशाची आणि त्यावर उभ्या असलेल्या मानवी जीवनाच्या महाप्रचंड कॅनव्हासची कितीही चर्चा केली जाऊ शकते, मात्र ती करणे एका दमात शक्य नाही. ‘अर्थपूर्ण’ चा पुढील प्रवास त्यासाठीच तर आहे. आपल्या आयुष्याला भिडणाऱ्या त्यातील प्रमुख मुद्द्यांची चर्चा ‘अर्थपूर्ण’ च्या या अंकात मान्यवर लेखकांनी केली आहे. जग ज्या नव्या व्यवस्थेचा शोध घेते आहे, त्याविषयीचे आकलन वाढण्यास ही अर्थपूर्ण चर्चा प्रत्येक वाचकाच्या मनात साठून राहील, याची मला खात्री आहे. ही अर्थपूर्ण चर्चा ताकदीने घडवून आणणारे आमचे सर्व लेखक, ती सर्व आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी हातभार लावणारे जाहिरातदार, वितरक, नवी व्यवस्था लवकर उभी राहावी, यासाठी आपापल्या परीने लढणारे अर्थक्रांती चळवळीतील कार्यकर्ते, अर्थपूर्ण अधिकाधिक वाचकांपर्यंत जावा यासाठी येणाऱ्या व्यवहारिक अडचणी समजून घेऊन स्वत: हून मदतीला येणारे हितचिंतक, हे काम नाही, भविष्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला ते करावेच लागणार आहे, आणि आपण ते करत आहोत, अशा समाधानाने आणि अभिमानाने त्यात सहभागी झालेले सहकारी आणि हा सर्व संवाद पूर्ण करणारे वाचक – या सर्वांना दिवाळीच्या अर्थपूर्ण शुभेच्छा !

अर्थपूर्ण दिवाळी २०१३ ची भूमिका...