Sunday, November 3, 2013

जागतिकीकरण आणि सामाजिक परिवर्तनाची ‘सांगड’
समाजात सकारात्मक परिवर्तन व्हावे, यासाठी सुजाण कार्यकर्ते, नेते नेहमीच प्रयत्नशील असतात. मात्र जागतिकीकरणाच्या रेट्यात परिवर्तनाचे संदर्भ बदलून गेले आहेत. त्या बदलाची दिशा काय असावी, याचा शोध ‘सांगड’ या व्यासपीठावर घेतला जातो आहे. अशा सहाव्या ‘सांगड’ संमेलनात पुढे आलेले काही दिशादर्शक मुद्दे...

सध्याची विकासाची प्रक्रिया नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे, तीत सर्वसामान्य माणसाचे स्थान काय आहे आणि यासंबंधी विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना सध्या काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नंदू माधव यांनी तीन वर्षांपूर्वी ‘सांगड’ नावाचे व्यासपीठ सुरु केले. आतापर्यंत मुंबई, पुणे, जळगाव, मिरज आणि कोकणात चिपळूण येथे ‘सांगड’ तर्फे कार्यकर्त्यांचे संमेलन घेण्यात आले. गेल्या १९ आणि २० ऑक्टोबरला असे सहावे संमेलन लातूर येथे झाले. माझा परिवर्तनाचा लढा, जागतिकरणामुळे लढ्याचे बदलते स्वरूप आणि आपण सर्व दाभोलकर या विषयांवर संमेलनात चर्चा झाली. गंगाधर पटणे, डॉ. सुधीर देशमुख, संदिपान बडगिरे, अनिकेत आमटे, मुक्ता दाभोलकर, संतोष गर्जे, असीम सरोदे, देविदास तुळजापूरकर, धनाजी गुरव, तृप्ती डिग्गीकर, अनुपमा परदेशी, कृष्णात कोरे, सुधीर अनवले यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. जागतिकीकरणाच्या विषयावर बोलण्यासाठी आणि सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी ‘सांगड’ ला उपस्थित होतो. गेल्या काही वर्षांतील वेगवान बदलांत सामाजिक काम करणारे कार्यकर्ते कसे लढत आहेत आणि त्यांच्यात संवादाची किती गरज आहे, हेच ‘सांगड’ च्या व्यासपीठावर पाहायला मिळाले. तसेच नव्या परिस्थितीत सामाजिक समतेसाठी लढणारा कार्यकर्ता अनेक विषयांत गोंधळून गेला आहे, हेही लक्षात आले.

सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, असे सर्वच विचारांचे नेते म्हणतात. मात्र समता म्हणजे काय, यावरच एकमत होत नाही. त्याचाच परिणाम म्हणजे ज्या सामाजिक न्यायासाठी हा प्रवास वर्षानुवर्षे चालला आहे, तो न्याय अतिशय मंद पाउलांनी समाजात उतरतो. या गतीविषयी आज कोणीच समाधानी नाही. ती गती वाढविण्यासाठी समाजात सुजाण माणसे सतत प्रयत्नशील असतात. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळ ही त्यातीलच एक. ‘शांतता, लोकशाही आणि समाज परिवर्तन यावर ज्यांचा विश्वास आहे, त्या संघटना आणि कार्यकर्त्यांना आम्ही ‘सांगड’ ला निमंत्रित करतो, पुष्पाताई भावे, धनाजी गुरव, उल्का महाजन, प्रतिभा शिंदे आणि असीम सरोदे हे मित्र याकामी मला मदत करतात’ असे नंदू माधव यांनी सांगितले. विदर्भात बहुतेक हेमलकसा येथे आणि मग राज्य पातळीवरील एक संमेलन पुण्यात किंवा नगर येथे घेऊन सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्याचा प्राधान्यक्रम काय असावा, यावर मंथन केले जाणार आहे’, असे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, असा उल्लेख नेहमीच केला जातो आणि त्याला संदर्भ असतो तो महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचार आणि आचाराचा. पुढे त्यांचा आदर्श समोर ठेवून गेल्या दोन शतकात महाराष्ट्रात मोठे सामाजिक काम झाले. मात्र जागतिकीकरणानंतर म्हणजे गेल्या तीन दशकात भारतीय समाज बदलून गेला. मध्यमवर्ग ३० कोटींवर गेला. पैशीकरणाने समाज ढवळून निघाला. तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. पुरोगामित्व कशाला म्हणायचे, याचेही संदर्भ बदलले. अर्थकारणाने सर्वांचीच कोंडी केली. त्यामुळे (पारंपरिक) परिवर्तनवादी चळवळही थोडी मागे पडली. कारण महाराष्ट्र आज इतर भारतापेक्षा किती आणि कसा वेगळा आहे, हे आज आपण सांगूच शकत नाही. समाजाचे एकप्रकारे सपाटीकरण होते आहे. जात, धर्म ही जी जाचक ठरू लागलेली वैविध्ये होती, तिच्यासाठी भारतीय समाजाला सपाटीकरण हवेच आहे, मात्र टोकाचा व्यवहारवाद १२० कोटींच्या भावनिक समाजाला कितपत झेपेल, हे सांगणे अवघड आहे. या पार्श्वभूमीवर ‘सांगड’रुपी संवादाची गरज समाजात आहे, त्यामुळे हा पुढाकार स्वागतार्ह आहे. मात्र या मंथनातून जे प्रश्न पुढे येत आहेत, ते मोठे आव्हान असणार आहे.

सामाजिक चळवळ आणि परिवर्तन ही निरंतर चालणारी बाब आहे. त्यामुळे तिला बंदिस्त करण्याचे काही कारण नाही. मात्र आज ते करू पाहणारे कार्यकर्ते काय विचार करत आहेत, हेही तेवढेच महत्वाचे आहे. त्या चर्चेत जे मुद्दे पुढे आले त्यातील प्रमुख मुद्दे असे – १. जागतिकीकरणाच्या बसमध्ये आपण सर्वच जण बसलो आहोत, ते आपल्या इच्छेनुसार नसून आपल्याला दुसरा मार्ग नसल्याने बसावे लागले आहे. २. जीवन सुसह्य करणाऱ्या साधनांच्या टंचाईमुळे समाज सतत अस्वस्थ राहतो आहे, याची दखल आपण कशी घेणार आहोत? ३. जीवन जगण्याचा संघर्ष सर्वांसाठीच तीव्र झाला आहे, त्यामुळे दैनंदिन शर्यतीचे नियम बदलले आहेत. ४. सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगभर जे होते आहे, त्याची दखल घेणे अपरिहार्य आहे. ५. कोणत्याही बदलात मध्यमवर्ग महत्वाची भूमिका बजावत असतो. ३० कोटींवर गेलेल्या या वर्गाला बरोबर घेण्यासाठी काय करावे लागेल? ६. समाजवाद, साम्यवाद असे जे अनेक वाद आहेत, त्यात न पडता सकारात्मक बदलाची भूमिका घेणाऱ्या तरुणांना कसे सामावून घेतले जाणार आहे? ७. तंत्रज्ञानाने समाज बदलून टाकण्याचा जो झपाटा लावला आहे, त्याला चळवळ कशी सामोरी जाणार आहे? ८. समाज परिवर्तनाचे राजकारण हे राजकारणात न जाता कसे करता येईल? ९. बहुतांश प्रश्नांचे मूळ हे शुद्ध भांडवलाच्या दुष्काळात दडले आहे. मग त्याविषयी आपण का बोलत नाही? १०. लोकशाही सुदृढ झाल्याशिवाय सरकार सक्षम होणार नाही आणि सरकार सक्षम झाल्याशिवाय नव्या व्यवस्थेवर समाजाचा विश्वास प्रस्थापित होणार नाही. मग त्यादिशेने जाण्याचा कोणता मार्ग आपण सांगू शकतो?
दोन दिवसांत झालेल्या साऱ्याच चर्चेची दखल येथे जागेअभावी घेता येणार नाही, मात्र हे काही कळीचे मुद्दे सामाजिक काम करणाऱ्या सर्वांना दिशादर्शक ठरावेत.