Sunday, December 6, 2015

झुबेरबर्ग, तुझे खूप आभार...




फेसबुकचा संस्थापक आणि जगातील अतिश्रीमंत तरुण मार्क झुबेरबर्ग याने आपली कन्या मॅक्सला उद्देश्यून एक पत्र लिहिले आणि ४५ अब्ज डॉलर लोककल्याणासाठी देऊन टाकले. या पत्रात त्याने उद्याच्या सुंदर जगाची हाक तर दिलीच पण एक बाप म्हणून आपल्या भावना व्यक्त करून समानतेवर आधारित जगाची नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे...


फेसबुकचा संस्थापक मार्क झुबेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रीसिला चानने आपली मुलगी मॅक्सच्या जन्माच्या आनंदात लोककल्याणासाठी ४५ अब्ज डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत दोन लाख ७० हजार कोटी रुपये दान केले आहेत! या ३१ वर्षांच्या तरुणाने एवढी प्रचंड संपत्ती दान केली यावर अजून विश्वास बसत नाही. डॉलर समोर आले की आम्ही त्याचे रुपयांत रुपांतर करणारी माणसं. तसे रुपांतर करायचे तर आमच्या देशात वर्षाला जेवढा इन्कम टॅक्स जमा होतो त्यापेक्षा जास्त किंवा ११ कोटीच्या आपल्या महाराष्ट्रावर जेव्हढे कर्ज आहे, त्यापेक्षा थोडे कमी, एवढे हे पैसे आहेत! लोककल्याणासाठी भरभरून पैसा देणाऱ्या अमेरिकन समाजात पैसा देण्याचे कौतुक आपल्याएवढे असण्याचे कारण नाही. उद्याचा दिवस अधिक चांगला उगवला पाहिजे, असे मानणारा आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणारा समाज तो. झुबेरबर्गच्या देणगीचे वैशिष्ट असे की त्याने तरुण वयात देणगी दिली आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्याने आपली लाडकी मुलगी मॅक्सला जे पत्र लिहिले आहे, ते पत्र. जगाकडे नवीन पिढी कसे पाहते आहे, त्याचा हे पत्र म्हणजे एक आश्वासक आवाज आहे. त्याच्यासाठी झुबेरबर्ग, आम्ही तुझे खूप खूप आभारी आहोत.

मानवतावाद, आरोग्य आणि समानतेसाठी हा पैसा वापरला जाणार आहे, असे तू जाहीर केले आहेस. तुझा समाज आम्ही भांडवलशाही समाज म्हणून ओळखतो, तरीही तू या शब्दांचा इतक्या ठामपणे उल्लेख केला आहेस! तुझ्याच फेसबुक नावाच्या व्यासपीठावर १४४ कोटी लोक आज बोलू लागले आहेत, त्यामुळे जगाच्या व्यापकतेचा आणि मानवाच्या सुखदु:खाचा त्याच व्यासपीठावर उच्चार केलास. विशेषत: मानवी जगण्यातील आईवडील होण्याचा आनंद आणि काळजी या जैविक म्हणून ज्या गोष्टी आहेत, त्या तू सामान्य माणसासारख्या व्यक्त केल्या, हे आपल्याला आवडलं. नाहीतर त्यातही भेद असला पाहिजे, असे मानणारे काही कमी नाहीत. या मानवी जगण्यात जात, धर्म, देश प्रदेशांचे कोणतेही भेद नाहीत, याची तू जाणीव करून दिलीस, हे फार चांगलं झालं. ज्याच्याकडे पैसा आहे, त्याचे लोक मन लावून ऐकतात, त्यामुळे तू ही बाजू घेतलीस, याबद्दल तुझे आभार मानलेच पाहिजेत.

तुझी पत्नी प्रीसिला चान असं म्हणाली आहे की तू काम खूप करतोस, आणि ते तू सिध्दही केलं आहेस. हॉरवर्ड विद्यापीठाचे कम्युनिकेशन जोडताना ही फेसबुकची कल्पना तुला सुचली. सारं जग आपण यातून जोडू शकतो, असा विचार फायद्यासाठीही येण, हे मोठेपणच आहे. पण गेल्या १० – १२ वर्षात तू ज्या पद्धतीने वावरतो आहेस, कार्पोरेट जगाचे कोड झुगारतो आहेस, कधी टी शर्ट, जीनचा स्वीकार करून, कधी बाप म्हणून रजा घेऊन तर कधी कामाला मानवी चेहरा कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करून. अमेरिकेतील कामाची संस्कृती आम्ही जाणून आहोत, जिच्यात माणसाला ‘ह्युमन रिसोर्स’ म्हणतात आणि तो रिसोर्स पिळून घेतला जातो. तू त्याविषयी काही वेगळे बोलण्याचा प्रयत्न करतो आहेस, त्याचे जे परिणाम होतील, त्याबद्दलही तुझे आभार.

ज्याला अत्याधुनिक जग म्हणतात, त्या आजच्या जगात आपल्या सर्वांची प्रकृती बिघडत चालली आहे आणि एक सर्वव्यापी अस्वस्थता भरून राहिली आहे, असं तू या पत्रात म्हटलं आहे. हे फेसबुकचा संस्थापक आणि जगातला एक अतिश्रीमंत माणूस बोलत नाही, हा मॅक्स या गोड चिमुरडीचा बाप बोलतो आहे. असा बाप ज्याला माहीत आहे की आपल्या मुलीला एक ना एक दिवस स्वत:च्या पंखांनीच या जगात विहार करायचा आहे. जेव्हा ती वेळ येईल, त्यावेळी आजूबाजूचं जग सुंदर आणि संवेदनशील असावे लागेल. तसं ते व्हावं, असे सर्वांनाच वाटतच असते. पण एक बाप म्हणून त्यासाठी मी काहीतरी केले पाहिजे, याची जाणीव आजच्या बापांच्या पिढीला करून दिलीस, त्याबद्दल विशेष आभार.
दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या म्हणून तुझे भारतावर एक व्यावसायिक म्हणून प्रेम असणे साहजिकच आहे. जग खुले झाले आहे आणि त्याचा तू फायदा घेतो आहेस. पण तू जेव्हा संभ्रमात होतास तेव्हा याच भूमीवर फिरून तू तुझा संभ्रम दूर करून घेतलास, असेही तू म्हटले आहे. ते बरोबरच आहे. तत्वज्ञानाची एक प्रचंड ताकद या भूमीत अगदी पूर्वीपासून आहे. अमर्याद काळ आणि आकाशाची सतत आठवण ठेवून या समाजाने जगण्यातील ‘निरर्थक’तेकडे जगाचे लक्ष वेधले आहे. पण याचा अलीकडे आम्हालाच विसर पडला असे वाटू लागले असताना चक्क पश्चिमेकडून तुझ्यासारख्या एका तंत्रज्ञाने त्याची हाक द्यावी, याच्याइतका आनंद तो कोठला! आता खरे जग एक झाले आहे, तत्वज्ञानाच्या गोष्टी तू करतो आहेस आणि त्याच्या प्रसारासाठी तुझ्या फेसबुकचा वापर आम्ही करतो आहे..! असेच झाले पाहिजे, असे किती थोर माणसे म्हणून गेली. ते होऊ शकते, याचे आश्वासन तू दिलेस, त्याबद्दलही आभार.

इंटरनेटने जग जोडलं गेलं, जग अतिवेगवान झालं, तंत्रज्ञानाने सर्व काही बदलून गेलं. आता जगात काही भव्यदिव्य घडवून आणण्याच्या गोष्टी होतात, तेव्हा तंत्रज्ञानाचा आधी विचार होतो. साधनांचा विचार केला जातो. ही जी भौतिक मुबलकता आहे, ती मात्र अजूनही सर्वत्र सारखी नाही. जगात एक मोठेच असंतुलन तयार झाले आहे. हे असंतुलन हीच संधी मानणारे जग आजूबाजूला असताना तू समानतेचा जाहीरपणे पुरस्कार करतो आहेस, एवढेच नव्हे तर काटकसर आणि पुर्नवापराची गरज व्यक्त करतो आहेस! तंत्रज्ञानाची गाडी कितीही वेगाने पळविली तरी त्याचे इंजिन तत्त्वज्ञानच असले पाहिजे, असे तंत्रज्ञानाच्या जीवावर अतिश्रीमंत माणूस म्हणतो, याचे महत्व अधोरेखित केलेस, त्याबद्दल तर आभार मानलेच पाहिजे.

मॅक्स घरात आल्याने एक अवर्णनीय आनंद तुला झाला आहे आणि तो तू लिहिलेल्या पत्रात दिसतोच आहे. त्या आनंदात तू ४५ अब्ज डॉलर चांगल्या, सुंदर जगासाठी देऊन टाकले आहेस. तो आनंद आता द्विगुणित होणार आहे, कारण त्या आनंदाची नाळ तू सुंदर अशा उद्याच्या जगाशी जोडली आहेस. तू या प्रसंगाने जगाकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागलास, ती दृष्टी आम्हा सगळ्यांना मिळो...!



जन धन – बदलासाठीचे ‘बँकमनी’ इंजिन !






जनधन या राष्ट्रीय योजनेला सुरु होऊन नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. प्रत्येक भारतीय नागरिकाला आर्थिक स्वातंत्र्य देण्याची क्षमता असलेल्या या योजनेमुळे देशात एक क्रांतिकारी बदल होतो आहे. समृद्ध आणि आधुनिक समाजाच्या वाटचालीतील या अपरिहार्य बदलाविषयी...



बहुचर्चित प्रधानमंत्री जन धन योजनेची सुरवात होऊन गेल्या २८ ऑगस्टला एक वर्ष पूर्ण झाले. बँकिंगच्या माध्यमातून ज्या ३० ते ४० टक्के नागरिकांनी गेले ६८ वर्षे आर्थिक फायदे करून घेतले, ते फायदे एक भारतीय नागरिक या नात्याने सर्व नागरिकांना मिळाले पाहिजेत आणि त्या माध्यमातून देशातील रोखीचे व्यवहार म्हणजे काळा पैसाही कमी झाला पाहिजे, असा या योजनेचा उद्देश्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना १५ ऑगस्ट २०१४ रोजी म्हणजे स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देश्यून केलेल्या भाषणात जाहीर केली होती. त्यावेळी या योजनेत साडेसात कोटी कुटुंबांतील किमान दोघांपर्यंत म्हणजे १५ कोटी बँक खाती काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. वर्षभरात १८ कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी बँकेत खाती उघडली असून त्यांच्या खात्यात २५ हजार कोटी रुपये जमा आहेत! कमीतकमी काळात इतके प्रचंड नागरिक बँकिंगशी जोडण्याचा जागतिक विक्रम या योजनेने केला आहे. जनधनचे महत्व अजूनही अनेकांच्या लक्षात आले नसल्याने त्याविषयी देशात आणखी चर्चा घडवून आणण्याची गरज आहे.

जन धन जेव्हा जाहीर झाली, त्यावेळी माध्यमात काहीनी केलेली चर्चा त्यांचे आर्थिक समावेशकतेविषयीचे अज्ञान समोर आणणारी ठरली. एका नामांकित खासगी वाहिनीने सरकारला निधी कमी पडत असल्याने गरीबांचा पैसा बाहेर काढण्यासाठी ही योजना आणली असल्याचा दावा केला होता. ज्यांच्याकडे पैसेच नाहीत ते बँकेत कशाला व्यवहार करतील, अशी काहींना शंका होती. ‘झिरो बॅलन्स’ असलेली खाती किती दिवस दम धरतील आणि त्यातून काय साध्य होईल, अशी चिंता काहींनी व्यक्त केली होती. बँका हे आव्हान कसे पेलू शकतील, असा रास्त प्रश्नही काहींनी उपस्थित केला होता. या सर्व टीकाकारांची एकच अडचण होती, ती म्हणजे गरीब माणसाला देशाच्या अर्थरचनेशी कसे जोडून घ्यायचे, याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते. आपण घर, वाहन, वस्तू घेताना आपली आर्थिक पत बँकेत तयार झाल्याने बँकेकडून आपल्याला कर्ज मिळते, तशी पत सर्वांची का तयार होऊ नये आणि त्यांनी कमी व्याजदराचा फायदा का घेऊ नये, या प्रश्नालाही त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते. अर्थात ज्यांना याचे महत्व पटले, त्या १८ कोटी सामान्य भारतीय माणसांनी रांगा लावून २५ हजार कोटी रुपये जमा करून पत वाढविण्यासाठी आम्ही आतूर झालो आहोत, हे दाखवून दिले.

मुद्दा असा आहे की देशात आज ३० कोटीचा म्हणजे एका अमेरिकाइतका मध्यमवर्ग आहे. मात्र हा सर्व वर्ग बँकेशी जोडला गेल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला, हे आपण विसरून जातो. या सर्वांनी बँकेत पत सिद्ध करूनच आपली घरे विकत घेतली, वहाने घेतली, आपल्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज काढली, परदेश प्रवास केला. शिवाय चलनवाढीवर मात करणारी गुंतवणुकीची साधने (शेअर बाजार, म्युचुअल फंड, रोखे खरेदी, पीपीएफ, जमीनखरेदी) वापरली आणि आपल्याला काही प्रमाणात आर्थिक स्वातंत्र्य मिळवून घेतले. याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या पुढे जाण्याचा मार्ग बँकिंगच्या रस्त्याने जातो, हे आपल्याला मान्य करावे लागते. ही संधी सर्वांना मिळाली पाहिजे, असे म्हणण्याने कोणाचे पोट दुखण्याचे काही कारण नाही. पण सर्व राष्ट्रीय योजनांकडे राजकीय नजरेने पाहून त्याला बदनाम करण्याचा रोग आपल्याला लागला आहे. जनधन बाबत तो धोका निर्माण झाला होता, पण आता तो अपरिहार्य प्रवास बहुतेकांनी मान्य केला आहे.

भारतीयांचा पैसा सोन्यात आणि मोठ्या रकमेच्या रोख व्यवहारात सडत पडला नाही तर त्यात काय ताकद आहे, हेही जनधनमुळे समोर आले. जनधन खात्यात आज जमा असलेला २५ हजार कोटी रुपये एरवी बँकेत आला नसता तर तो सरकारला सार्वजनिक कामांसाठी उपलब्धच झाला नसता. तरी, १८ कोटींपैकी अजून फक्त ६० टक्केच लोकांनी खाते वापरण्यास सुरवात केली आहे. पुढील टप्प्यात खातेदार आणि त्यांचा बँकेतील पैसाही वाढणार आहे. त्यामुळे देशातील ‘बँकमनी’ वाढून व्याजदर कमी होण्यास त्याची मदत होणार आहे तसेच जे आज गरीब आहेत, त्यातील अनेक जण उद्या मध्यमवर्गात येणार आहेत. त्यांच्या उत्पन्नाची नोंद बँकेमुळे होणार असल्याने तो देशाचा स्वाभिमानी करदाता होणार आहे. जीडीपीच्या केवळ १७ टक्के कर असेलल्या आपल्या देशाच्या विकासातील हा एक अपरिहार्य टप्पा आहे आणि आपण ज्या जगाकडे विकसित जग म्हणून पाहतो, ते सर्व याच मार्गाने गेले आहेत, हे समजून घेतले पाहिजे. केवळ किचकट करव्यवस्थेमुळे कर चुकविण्याची मानसिकता देशात तयार झाली असून त्याकडे सरकारने लक्ष केंद्रित केले तर आजचे हे लाजीरवाणे प्रमाण वेगाने सुधारणार आहे.

भारतासारख्या खंडप्राय देशात एवढा मोठा बदल घडवून आणताना त्यात अनेक त्रुटी राहतात, हा नेहमीचा अनुभव आहे. जनधन योजनेतही काही त्रुटी राहिल्या होत्या, पण त्यात नंतर सुधारणा करण्यात आल्या. उदा. कोणती कागदपत्रे लागतात, याविषयी काही संभ्रम होता, ५००० रुपयांची उचल सर्वाना मिळेल, असा समज तयार झाला होता. बँकांना वाढलेले काम न झेपल्याने नाराजी तयार झाली होती, पण एका अत्यावश्यक अशा राष्ट्रीय योजनेतील त्रुटी ठळक करण्यापेक्षा तिचा व्यापक उद्देश्य समजून मोठेपणा नागरिकांनी दाखविल्यामुळे एवढे मोठे उद्दिष्ट देश म्हणून आपण साध्य करू शकलो. बँकात वाढणारी स्पर्धा आणि स्वच्छ पैशांचे वाढते महत्व लक्षात आले की या सर्व त्रुटी दूर होण्यास वेळ लागणार नाही. आज सव्वा लाख बँकशाखा देशात आहेत, त्यात एका पोस्ट बँकेने दीड लाख शाखांची भर पडणार आहे!

सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या काळ्या पैशाने देशाचे अतोनात नुकसान केले आहे, त्याचे स्वच्छ पैशांत रुपांतर करायचे असल्यास ‘बँकमनी’ चे प्रमाण वाढविणे, ही त्याची पूर्वअट आहे. जेव्हा बँकिंगची अधिकाधिक नागरिकांना सवय होईल, तेव्हाच बँकिग व्यवहाराची लाट देशात निर्माण होईल. अमेरिकेत ६० च्या दशकात काळा पैसा, भ्रष्टाचार आणि संघटीत गुन्हेगारी माजली होती, तेव्हा त्याच्या मूळाशी रोखीचे व्यवहार आणि ते शक्य करणाऱ्या उच्च मूल्याच्या नोटा आहेत, हे राज्यकर्त्यांच्या लक्षात आले आणि तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी एक अध्यादेश काढून १०० डॉलरपेक्षा मोठ्या नोटा (५००, १०००, ५०००, १००००) व्यवहारातून बाद केल्या. त्यानंतर अमेरिकेतील अर्थव्यवस्थेने बँकमनीच्या मदतीने मोठा बदल घडवून आणला. तो बदल घडवून आणण्याची ताकद बँकमनीमध्ये आहे. आधुनिक जगात व्यवस्थेने वृत्ती घडू लागली आहे, हा जगाचा अनुभव लक्षात घेता आपणही जनधनकडे सर्वांना न्याय्य मार्गाने (सबसिडी, पेन्शन, पतसंवर्धन - कर्ज, विमा, गुंतवणूक) संपत्ती पोचविण्याचा महामार्ग म्हणून पाहिले पाहिजे.

बँकांच्या कामकाजाविषयी आणि त्यांच्या नफेखोरीविषयी ज्यांचे आक्षेप आहेत, त्यांच्यासाठी काही गोष्टी सांगितल्याच पाहिजे. एकतर भारतात राष्ट्रीयीकृत बँकांचा दबदबा आहे. शिवाय भारतीय बँकिंग व्यवस्था चांगली आणि स्थिर असल्याचे प्रमाणपत्र अलीकडेच जगाने दिले आहे. पतसंवर्धनाचे बँकांशिवाय दुसरे साधन सध्या अस्तित्वात नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वच्छ व्यवहार आणि त्या माध्यमातून स्वच्छ समाज निर्माण करण्याचे ते एक प्रभावी साधन आहे. ते सर्वांना वापरण्यास मिळाले तर जनधन ही खरोखरच आर्थिक स्वातंत्र्याची सुरवात ठरेल, याविषयी शंका असण्याचे कारण नाही.