Sunday, October 19, 2014

थांबवा ही आत्मवंचना !



माणसाची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न विकसित देश करत आहेत आणि आपण मात्र त्यांच्या खूपच मागे आहोत, हे कितपत खरे आहे? मग आपण जो भारतीय संस्कृती आणि भारतीय जीवनशैलीच्या थोरपणाचा घोष करतो तो कितपत बरोबर आहे?, या प्रश्नांच्या उत्तरात आपण जो आत्मवंचनेचा रोग लावून घेतला आहे, त्याचे निदान व्यवस्थेच्याच अंगाने केले पाहिजे. त्या खडतर प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा...

जर्मनीत २००० मध्ये पाहिलेला तो प्रसंग गेली १४ वर्षे मी भारावून गेल्यासारखा सांगत होतो. जर्मनीतील एका स्टेशनवर तो मी पाहिला होता. प्रसंग अगदी साधा होता. स्टेशनवर येण्याजाण्यासाठी आणि गाडीत बसण्यासाठी लिफ्ट सारख्या ये जा करीत होत्या. मला त्याचेच मोठेच अप्रुफ वाटले होते. तेथील नागरिकाला विचारले की रेल्वे स्टेशनवर लिफ्ट कशासाठी? उत्तर मिळाले होते की स्टेशनवर सर्वच प्रकारचे प्रवासी येतात. त्यात काही रुग्ण असतात, वृद्ध असतात, बाळ पोटात आणि कडेवर असलेल्या स्त्रिया असतात आणि अपंगही असतात. त्यांना चढउताराचा त्रास होऊ नये, म्हणून ही व्यवस्था केली आहे. धडधाकट माणसांच्या स्पर्धेत प्रवास करायचा तर अशा त्या त्या वेळी दुबळ्या बनलेल्या आपल्यातल्याच माणसांना त्रास होऊ नये, म्हणून ही व्यवस्था केली आहे. एवढेच नाही तर रेल्वेच्या डब्यात दाराशेजारील जागाही त्यांच्यासाठी राखीव असल्याची माहिती मिळाली. युरोप- अमेरिका आणि इतर विकसित देशात जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या प्रत्येकाला या घटनांचा भारतीय परिस्थीतीशी तुलना करण्याचा जसा मोह होतो, तसाच मला झाला आणि माझ्यासमोर आपल्या देशातली बसस्थानके, रेल्वेस्टेशन आणि अशी सर्व सार्वजनिक ठिकाणे समोर आली. मी पाहिले की बस-रेल्वेत जागा मिळविण्यासाठी एकाच आकांताने लोक धडपडत आहेत. त्यात जो दुबळा आहे, तो मागे फेकला जातो आहे. अपंग, स्त्रिया, वृद्ध आणि लहान मुलांना माघार घ्यावी लागते आहे. धडधाकट माणसांशी स्पर्धेत त्यांची प्रचंड दमछाक होते आहे आणि सरकारी, सार्वजनिक व्यवस्था खूप कमी पडते आहे. अशा दुबळ्या माणसांची जबाबदारी ना घरातील माणसे घेऊ शकतात ना व्यवस्था. मग त्यात ती माणसे गरीब असतील तर त्यांचे हाल विचारूच नका.

आपण ज्यांना विकसित देश म्हणतो, त्या देशातील व्यवस्थेने माणसाची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला आहे, असे वर्णन त्यावेळच्या एका लेखात केले होते. अर्थात, गेल्या १४ वर्षांत भारतात त्यातले काही बदल दिसायला लागले आहेत. शहर बसमध्ये एक बाजू महिलांसाठी राखीव झाली आहे. एसटीत, मेट्रोत अपंगासाठी राखीव, अशी बाकडी दिसू लागली आहेत. जर्मनीत पाहिलेली ती स्टेशनवरील लिफ्ट भारतातील प्रमुख शहरांतील स्टेशनांवर दिसू लागली आहे. आपल्यासोबत जगणाऱ्या आणि त्यांचा काही दोष नसताना दुबळ्या बनलेल्या आपल्याच बांधवांशी आपण अधिक संवेदनशीलतेने व्यवहार केले पाहिजेत, असे आता सर्वांनाच वाटू लागले आहे आणि त्यामुळेच हे बदल फार वेगाने होत आहेत. मात्र अजूनही त्याला पाहिजे तेवढी गती मिळालेली नाही, हेही लक्षात येते आहे.

मुद्दा असा आहे की माणसाची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न विकसित देश करत आहेत आणि आपण मात्र त्यांच्या खूपच मागे आहोत, हे कितपत खरे आहे? मग आपण जो भारतीय संस्कृती आणि भारतीय जीवनशैलीच्या थोरपणाचा घोष करतो तो कितपत बरोबर आहे? असे काही विचार मनात असतानाच आपल्या देशात राक्षसी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली, सरकारला धारेवर धरणारी, जगाने दखल घ्यावी अशी, मोठमोठी आंदोलने झाली आणि माणुसकीला काळीमा लावणाऱ्या अनेक घटना घडल्या तेव्हा देश त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरला. एक जनलोकपालासाठीचे आंदोलन झाले. दुसरे स्वीस बँकेतील पैसा भारतात आणण्यासाठीचे झाले. तिसरे राजकीय व्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठीचे झाले आणि चौथे दिल्लीतील अमानुष बलात्काराच्या निषेधार्थ झाले. ही अशी आंदोलने होती, ज्यात सारा देश ढवळून निघाला. त्याचे स्वरूप पाहून वाटले, आता सर्व देश बदलून जाईल. पण तसे काही झाले नाही. सरकार बदलले खरे, पण मुळातून काही बदलले नाही. मग पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला, तो असा की नेमका कोणता बदल भारतातील सकारात्मक बदलाला गती देईल? भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीचा थोरपणा प्रस्थापित करेल? असे काय आहे की जे विकसित देशांत आहे आणि जगाला तत्वज्ञान शिकविणाऱ्या भारतात नाही?

जे विकसित जगात आहे आणि भारतात नाही, याचा शोध घेतल्यावर लक्षात आले की इंधन, सोने आणि आधुनिक तंत्रज्ञान सोडले तर फार काही सापडत नाही! निसर्गाने तर भारताच्या पारड्यात एक माप जास्तच टाकले आहे. म्हणूनच जगात दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे पोट हा देश भरतो आहे. जगाला संपत्ती म्हणून मान्य असलेले सोने सर्वात जास्त बाळगणारा जगातला हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. (तेही आयात करून) आजच्या सर्व विसंगतींमध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून मिरतो आहे. सर्व निर्मितीच्या मुळाशी असलेला सूर्यप्रकाश तर येथे मुबलक आहेच पण जमीन, समुद्र, बर्फ, खाणी, वने, पर्वत, पीकपाणी... असे तुम्ही काहीही घ्या, या देशात सर्व काही मुबलक आहे. अगदी अर्थाच्या भाषेत बोलायचे तर जीडीपी नवव्या क्रमाकांचा आहे, अर्थव्यवस्था दोन ट्रीलीयन डॉलरच्या घरात पोचली आहे. अर्थाला गती देणारी क्रयशक्ती मोजली तर जगात सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाची क्रयशक्ती आहे.
पण इतके सर्व असूनही आज भारतीय माणूस स्वाभिमानाने जगू शकत नाही. बहुतेकांच्या वाट्याला लाचारीचे जिणे आले आहे. असे आपल्याच वाट्याला का, या प्रश्नाचा तो शोध घेतो तेव्हा त्याला विकसित देशातील भौतिक समृद्धी दिसते. तेथील शिस्त, स्वच्छता, आणि चकाकी पाहून तो भारावून जातो. परदेशात जाऊन येणारी मंडळी त्यात भर घालते. पण हे सर्व करताना तो आज फार मोठी चूक करतो आहे. ती चूक अशी आहे की त्याने आत्मवंचनेचा रोगच स्वत:ला लावून घेतला आहे. आपल्यासोबत जगणारे नागरिक भ्रष्ट आहेत, कामचुकार आहेत, नालायक आहेत, असे तो म्हणायला लागला आहे. एकप्रकारे भारतीय वंशात जन्मलेली माणसे कशी कमी दर्जाची आहे, हे सिद्ध केले जाते आहे. त्याच्या लक्षातच येत नाही की आपण स्वतःलाच बदनाम करतो आहोत. ही बदनामी आता इतक्या टोकाला गेली आहे की जे भारतीय आहे ते वाईट आणि पाश्चिमात्य आहे, ते चांगले, असेच तो मानायला लागला आहे. जणू सर्व कमी कुवतीची माणसे या देशात जन्माला घातली गेली आहेत. हे पाप खरे तर आमच्यातल्या काही शहाण्यांचे आणि तज्ञांचे आहे. त्यांनी आपले हित साध्य करून समाजाला नकारात्मक मानसिकतेत लोटले आहे. पाश्चिमात्य किती चांगले आहेत, हे सांगण्यासाठी भारतीय म्हणून आपण किती वाईट आहोत, हे सांगण्याची खरे तर गरज नसते आणि तशी तुलना करायची तर ती सर्वच अंगांनी केली पाहिजे. पण आज होते काय आहे पाहा. जो येतो तो भारतीय माणसाला दोष देऊन मोकळा होतो. आत्मवंचेनेच्या या रोगाचा फैलाव कोठेतरी रोखला पाहिजे, असे वाटले म्हणून या दिवाळी अंकात त्याच विषयाची चर्चा केली आहे.

‘भारतीय म्हणून आम्ही नेमके कोठे कमी पडतो’, असा या अंकाचा विषय आहे. तो फार महत्वाचा वाटला कारण एकतर आत्मवंचनेचा हा रोग रोखलाच पाहिजे. दुसरे म्हणजे तो कशामुळे पसरतो आहे, हे लक्षात आणून देता यावे. हा शोध घेताना एक महत्वाची बाब लक्षात येते, ती म्हणजे भारतीय माणसाच्या वृत्तीवर आज व्यवस्था राज्य करते आहे. त्याला पुरेशी संधी नाही, त्याला समाधानाने जगता येत नाही, याचे कारण व्यवस्था त्याला तसे जगू देत नाही. दोषी तो नाही तर व्यवस्था आहे. खरे म्हणजे काम करण्याची त्याची तयारी आहे, त्याला प्रामाणिक आणि स्वाभिमानी आयुष्य जगायचे आहे, मात्र व्यवस्थेने त्याला असे काही बांधून टाकले आहे की ती तोंड दाबून बुक्क्यांचा मार देते आहे. आणि ही व्यवस्था तयार झाली आहे ती आजच्या अशुद्ध, दुषित आर्थिक व्यवहारातून आणि त्यातून वाढलेल्या असुरक्षिततून. पैशांचे व्यवहार शुद्ध झाल्याशिवाय काही बदलू शकत नाही. ते शुद्ध झाले की व्यवस्था शुद्ध होईल आणि ती शुद्ध झाली की भारतीय माणसाचे आयुष्यही आमुलाग्र बदलून जाईल, मग प्रचंड उर्जा असलेला, ‘जगा आणि जगू द्या’, म्हणणारा आणि अतिशय संवेदनशील असा अस्सल भारतीय माणूस पुढे येईल. त्यातून स्वाभिमानी, समाधानी आणि आनंदी देश उभा राहील.

त्यासाठीचा हा प्रवास कठीण आणि दूरचा आहे, मात्र तो खरा-सच्चा आहे. खरे म्हणजे त्याशिवाय पर्यायच नाही. भारतीय समाज अजूनही मानसिक गुलामगिरीतून बाहेर आला नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला सरकारी व्यवस्था बळकट करावी लागेल. सार्वजनिक व्यवस्थेत सुरक्षितता निर्माण करावी लागेल. परस्परांवरील विश्वास वाढीस लावावा लागेल. आपल्याच देशातील दुसऱ्या समूहाला बदनाम करून तात्पुरते समाधान शोधण्याचा मोह बाजूला ठेवावा लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या अशुद्ध, दुषित पैशांच्या व्यवहारातून ही अव्यवस्था माजली आहे, तिला प्रश्न विचारण्याचा संकल्प करावा लागेल. ‘अर्थपूर्ण’ च्या गेल्या चार वर्षांच्या प्रवासाकडे पाहिले तर तेच काम त्याने केले आहे. वाचून बरे वाटले पाहिजे, तसे अस्वस्थही वाटले पाहिजे, असाच हा प्रवास राहिला आहे. या अस्वस्थतेचे आव्हान, असे शब्दांत मांडणे तर अवघड आहेच, पण त्याच्यासह जगणेही मोठे कठीण आहे. पण भारतीय माणसाची, भारतीयत्वाची प्रतिष्ठा पुन्हा मिळविण्यासाठी ते पेललेच पाहिजे. ‘अर्थपूर्ण’ च्या लेखकांनी या प्रवासात मोठीच साथ दिली आहे. हा वेगळा विषय मांडतानाही त्यांनी या दृष्टीकोनाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न आपल्याला आवडेल अशी खात्री तर आहेच, पण हा खडतर प्रवास एक भारतीय नागरिक म्हणून आपण पुढे घेऊन जाल, अशी अपेक्षाही आहे.

दिवाळीचा तत्कालिक आनंद असा सर्व भारतीयांच्या आयुष्यात सदासर्वकाळ व्यापून राहावा, अशी प्रार्थना करू यात.

(अर्थपूर्ण दिवाळी १४ मधील भूमिका)