Thursday, June 10, 2010

मार्केटिंगचे ‘फिरंगी फटके’

बाजारात सध्या अनेक लढाया सुरू आहेत. या लढाया काय थराला जावू शकतात, याचे एकएक नमुने पाहायला मिळत आहेत. भारतात सध्या मोबाईल फोनची चलती असून ती ‘कॅश’ करण्यासाठी किमान डझनभर कंपन्या एकमेकींशी स्पर्धा करत आहेत. मोबाईल ही या दशकात जणू जीवनावश्यक वस्तू झाली आहे. आगामी काही वर्षांत तिचा महागाई निर्देशांकांच्या निकषांमध्ये समावेश झाला तर आश्चर्य वाटायला नको, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळेच मोबाईल सेवेच्या मार्केटिंगवाले एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत.

मार्केटिंगच्या या कुरघोडीमध्ये नैतिकतेचे भान कसे हरवत जाते, हे जाहिरातींमध्ये आपण दररोज पाहात आहोत. असेच एक ताजे उदाहरण समोर आले असून आता या स्पर्धेत कोणीच मागे राहायला तयार नाही आणि कोणालाच त्याच्या परिणामांशी काही देणेघेणे राहिलेले नाही, हेच त्यातून उघड झाले आहे. गेल्या काही दिवसांत मोबाईल सेवा पुरविणार्‍या कंपन्यांनी ग्राहकांवर एसएसएमचा मारा चालविला आहे. या एसएसएमद्वारे अश्लील संदेश पाठवून पैसा कमावणे आणि सेवेची ‘लोकप्रियता’ वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सरकारी बीएसएनएल कंपनीही या स्पर्धेत उतरली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे सरकारी कंपन्यांनी मार्केटिंग करताना नैतिकता सोडू नये, अशी अपेक्षा आहे. ती अपेक्षा बर्‍यापैकी पाळली जात होती. मात्र त्यांना खाजगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यास भाग पाडण्यात आले आणि खाजगी कंपन्या ज्या प्रकारचे मार्केटिंग करतात, त्या प्रकारचे मार्केटिंग करण्याची एकप्रकारची मुभा देण्यात आली.

माणूस, संस्था, संघटना आणि कंपन्यांमध्ये मार्केटिंग हा परवलीचा शब्द झाला आहे. ते करताना तुम्ही समाजाच्या भल्याचा, प्रामाणिकपणाचा विचार करता की नाही, हा विचार गौण ठरायला लागला. व्यवहारात प्रत्येक ‘निर्मात्या’ला दुकान मांडून बसावे लागते, हे मान्यच करावे लागते. मात्र जेव्हा तो व्यवहार इतरांच्या नुकसानावर, दुसर्‍याच्या फसवणुकीवर बेतला जातो, तेव्हा मात्र त्याचा निषेध करणे अपरिहार्य ठरते.

बीएसएनएल आणि आयडिया या मोबाईल कंपन्यांनी पाठविलेल्या एसएसएमचा समोर आलेला मुद्दा या प्रकारच्या मार्केटिंगशी संबंधित आहे. बीएसएनएलने ग्राहकांना एसएसएमद्वारे पाठविलेल्या लिंक उघडल्यानंतर महिलांची अर्धनग्न छायाचित्रे दिसतात, असे लक्षात आले. या सगळया प्रकाराला कंपनीने ‘फिरंगी फटका’ असे नाव दिले आहे ! या ‘फटक्यांची’ अनिमेशन दरमहा 30 रूपयांना दिले जात आहेत. आयडिया या मोबाईल कंपनीनेही याच प्रकारचे एसएसएम पाठविले आहेत.

मार्कैटिंगचा आणखी एक धक्कादायक प्रकार यानिमित्ताने समोर आला. अश्लील एसएसएमवरून पुण्यात वाद उभा राहिल्यानंतर आयडिया सेल्युलर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजत मुखर्जी यांनी जो खुलासा केला आहे, तो पाहिल्यावर त्याचे गांभीर्य लक्षात येईल. त्यांचा खुलासा शब्दशः असा- ‘अश्लील एसएसएम आयडिया सेल्युलरने पाठविलेला नाही. सर्व मोबाईल कंपन्यांना विपणन सेवा पुरविणार्‍या बंगरूळूरमधील एका कंत्राटदाराने तो पाठविला आहे. त्याबाबत पोलिस चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी विनंती कंपनीतर्फै पोलिसांना करण्यात आली आहे.’ याचा अर्थ असा होतो की आपल्या कंपनीच्या नावावर गेलेल्या एसएसएमची जबाबदारी आता ही आणि इतर कोणतीच कंपनी घेणार नाही ! सेवेचे असे तुकडे तुकडे पाडले की जाब कोणाला विचारायचा हे कोणालाच कळत नाही. आणि हा विषय मागे पडतो. काही दिवसांनी पुन्हा पुर्वीसारखेच सर्व सुरू होते. विमा आणि बँकांनीही याच प्रकारची नीती अवलंबली आहे. माल विकताना पायघड्या आणि सेवेचा मुद्दा आला की सेवेपेक्षा करामतींवर भर असा जणू प्रघातच पडतो आहे.

मार्केटिंगच्या शिक्षणात नेमके काय सांगितले जाते, ते शोधले पाहिजे. मात्र त्या शिक्षणात अलिकडच्या काळात नैतिकता गुंडाळून ठेवा आणि माल खपवा अशा मंत्राचा बोलबाला होताना दिसतो आहे, असेच म्हणावे लागेल. आपले उत्पादन चांगले आहे, हे कंपन्याना एकतर पुरेसे वाटत नाही किंवा त्यांची भूक एवढी वाढली आहे की हाव सुटत नाही. चांगले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी नाना क्लृप्त्या कराव्या लागतात, हे पुर्वापार चालत आले आहे. त्याविषयी तक्रार असण्याचे कारण नाही आणि तसा अधिकारही कोणाला नाही. मात्र ज्यावेळी प्रलोभनाच्या सीमारेषा ओलांड्ल्या जातात, त्यावेळी त्याची दखल घ्यायलाच हवी. विशेषतः ज्यामुळे समाजस्वास्थच बिघडण्याची शक्यता आहे, त्याविषयी सरकार आणि समाजधुरीणांनी बोललेच पाहिजे. ते तसे बोलण्याचे , त्यासंबंधीचा निर्णय घेणे टाळले जाते आहे की काय, हेही तपासण्याची वेळ आली आहे.

मार्केटिंगचे टोक गाठून समाजाला आणि विशेषतः गरीबांना कसे वेठीस धरले जाते, याचे अमेरिकन समाजातील एक उदाहरण अतिशय बोलके आहे. अमेरिकेत ज्यावेळी घरे विकली जात नव्ह्ती त्यावेळी बँका आणि वित्तसंस्थांनी ग्राहकांना अनेक प्रलोभने दाखवून घरे घ्यायला लावली . लाखो लोकांनी घरे घेतली, मात्र त्यांना खर्चाची तोंडमिळवणी करता येईना . कर्जे थकली. ती इतकी थकली की घरांची जप्ती मोहिम हाती घेण्यात आली. जप्त केलेल्या घरांची संख्या प्रचंड वाढली आणि घरांच्या किमंती कोसळल्या. या अनैतिक व्यवहारातून जागतिक मंदीने जन्म घेतला. अमेरिकन समाजासोबतच सारे जग मंदीत होरपळून निघाले. मार्केटिंगच्या अतिरेकामुळे जागतिक समाजच अडचणीत आला. ही केवळ आर्थिक होरपळ होती, असे आपल्याला म्हणता येत नाही. अशा आर्थिक संकटांमध्ये समाजावर सामाजिक, सांस्कृतिक परिणाम होतात. मार्केटिंग करणार्‍याने त्याचे काम चोख बजावले, आता त्याच्या परिणामांशी आम्हाला काही देणेघेणे नाही, ही किती चुकीची भूमिका आहे, हे म्हणूनच समजून घेतले पाहिजे.

बीएसएनएल आणि आयडिया या मोबाईल कंपन्यांनी पाठविलेल्या अश्लील एसएसएम किंवा लिंकचा विचार या संदर्भाने केल्यावर त्याचे गांभीर्य लक्षात यावे. आमच्या मार्केटिंगचा समाजावर आणि विशेषतः मुलांवर काय परिणाम होतो, याच्याशी आमचे देणेघेणे नाही , असे म्हणणार्‍यांची संख्या वाढत गेली की सगळा समाजच अशा विकृतींनी पोखरून निघतो. त्या विकृतींचा त्रास तर होतो मात्र ती थांबविण्यासाठी स्पर्धेला लगाम लावणे नको वाटते, हे समाजाच्या निकोप वाढीचा विचार करता चांगले लक्षण नव्हे.

यमाजी मालकर ymalkar@gmail.com