Saturday, February 27, 2010

मरणाचे स्मरण देणारे दिवस..

महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांतील घटनांवरून मला संत एकनाथांच्या चरित्रातील एक गोष्ट आठवली. त्या गोष्टीचे नाव आहे ‘ मरणाचे स्मरण असावे ’ एका गृहस्थाने एकनाथांना विचारले, ‘ महाराज, आपले जीवन किती साधे, किती निष्पाप, आमचे तसे का नाही? तुम्ही कधी रागावत नाही. भांडत नाही. किती शांत-पवित्र प्रेमळ तुम्ही! ‘ नाथ म्हणाले, ‘ माझी गोष्ट तूर्त राहू दे. तुझ्याविषयी मला एक गोष्ट कळाली आहे. तुझे आजपासून सात दिवसांनी मरण आहे.’ नाथांनी सांगितलेली गोष्ट खोटी कोण मानणार? सात दिवसांनी मरण ! फक्त १६८ च तास बाकी. अरेरे.. ! तो मनुष्य घाईने घरी गेला. निरवानिरवीच्या गोष्टी बोलू लागला. तो आजारी पडला. सहा दिवस गेले. सातव्या दिवशी नाथ त्याच्याजवळ गेले. नाथांनी विचारले, ‘कसे काय?’ तो म्हणाला, ‘जातो आता’ नाथांनी विचारले, ‘ या सहा दिवसांत किती पाप केले? पापाचे किती विचार मनात आले?’ तो म्हणाला, ‘ नाथ, पापाचा विचार करावयास वेळच मिळाला नाही. सारखे डोळ्यासमोर मरणच दिसत होते.’ नाथ म्हणाले, ‘ आमचे जीवन निष्पाप का य्सते, याचे उत्तर आता तुला मिळाले.’ मरणाचा वाघोबा सदैव समोर उभा असला म्हणजे पाप करावयास कसे सुचेल? पाप करावयासही निश्चिंतता लागते. मरण समोर दिसत असेल तर कोणत्या हिंमतीवर मनुष्य पाप करेल? ‘ गोष्ट येथे संपली.

ही गोष्ट आठवण्याचे कारण असे की आधुनिक काळात विज्ञानाने माणसास जे स्थैर्य दिले आहे, त्यामुळे माणूस मरणाचे भान विसरला आहे की काय, असे वाटायला लागले आहे. तरी बरे, विज्ञानाने इतकी प्रगती करूनही आपले मरण कोठे आणि कधी ठरले
आहे, हे माणूस आजही अजिबात सांगू शकत नाही. निसर्गाने जन्म-मृत्यूचे नियंत्रण आपल्याच हातात ठेवले आहे, ते आपल्या हातात घेण्याचे प्रयत्न माणूस करतो आहे, मात्र अद्याप तरी त्यात त्याला यश मिळालेले नाही. ते मिळण्याची शक्यताही नाही.

पुण्यात जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला. त्यात तरूणांची संख्या अधिक आहे. हा स्फोट अतिरेक्यांनी घडवून आणला, त्यांना पकडले पाहिजे, कडक शिक्षा केली पाहिजे, यात कुणाचे दुमत असण्याचे काही कारण नाही. यानिमित्ताने मला मरणाच्या स्मरणाकडेच आपले लक्ष वेधायचे आहे. स्फोटातील मृतांपैकी अंकिक धर हा मुंबईत नोकरी करणारा तरूण. मूळ कलकत्त्याचा. त्याला नोकरीत बढती मिळाली म्हणून पार्टी देण्यासाठी पुण्यात आला होता. त्याची बहिण आनंदी आणि मैत्रिण शिल्पा गोयंका त्याच्यासोबत होती. ह्या दोघीही स्फोटात मृत्यूमुखी पडल्या. दुसरा एक मृत तरूण – शंकर नथू पानसरे हा पुण्याचा रिक्षाचालक आहे. रिक्षात बसलेले प्रवासी खरेदी करण्यासाठी बेकरीत गेले होते आणि शंकर वाट पाहात थांबला होता. आणखी एक मृत आहे- इराणचा विद्यार्थी सईद काझी अब्दुल खानी. तो दोनच महिन्यांपुर्वी पुण्यात आला होता. मृतांत एक बंगळूरची तरूणी- पी. सुंदरी आहे. ती शिल्पाची मैत्रिण होती. मुंबईच्या कांदिवलीची विनिता गडानी ही या घटनेतील आणखी एक बळी. नादिया मॅक्रेन ही तरूणी तर थेट इटलीची आणि गोकूळ परिहार नेपाळी हा तरूण नेपाळचा होता. जर्मन बेकरी प्रसिध्द आहे आणि त्यामुळेच आपले यश साजरे करण्यासाठी ही मंडळी तेथे गेली होती. काही आनंदाचे क्षण वाटून घेतानाच मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला.

ही सर्व मंडळी त्या दुर्देवी दिवसाच्या एक दोन आधी जेथून निघाली असतील तेव्हा पुण्यात साजरे करावयाच्या आणि त्यानंतरच्या भविष्यातील अनेक आनंदांची आखणी त्यांनी केली असेल. ते सर्वच आनंद अतीव दुःखात रूपांतरित झाले. जगाच्या कानाकोप-यातून आलेल्या माणसांना असे एका ठिकाणी मृत्यूला सामोरे जावे लागले. असे होण्याची ही जगातील पहिलीच घटना नव्हे. दररोज अशा घटना घडत आहेत. सर्व क्षेत्रातील विकासातून माणसाने एक निश्चिंतता आणली, असे आम्ही म्हणायला लागलो होतो, तेवढयात निसर्गाने हे अस्थर्य जगभर निर्माण केले. कालपर्यंत शांत समजल्या जाणा-या पुण्यात फिरताना आता हे अस्थर्य सोबत घेउन फिरावे लागणार आहे.

माणसाने अनेक सुखसोयी निर्माण केल्या आणि आपले आयुष्यमान वाढविले. मात्र त्यातून पाप करण्यासाठीची निश्चिंतताही मिळविली. याचा अर्थ असा की जगात सध्या काही लोक काहीच काम करत नाहीत. त्यांनी संपत्तीचा प्रचंड साठा करून ठेवला आहे.त्यामुळे मानवी जीवन म्हणून त्यांनी जे करायला हवे, त्याएवजी त्यांचे लक्ष पाप करण्याकडे जाते, ज्यातून अन्याय, विनाशाची निर्मीती होते. त्यातून मानवी व्यवहार भ्रष्ट होतात. मानसिक रूग्णांची संख्या वाढत जाते. त्यालाच आम्ही दहशतवादी, नक्षलवादी, युध्दखोर, साठेबाज, गुंड- तस्कर अशी नावे देतो, आणि भलत्याच शस्त्रांनी त्यांच्याशी लढत बसतो. आजार एक आणि औषध भलतेच , असे हे होते आहे काय, हे तपासले पाहिजे.

पुण्याची बॉम्बस्फोटाची घटना घडल्यानंतर मुंबईतल्या प्रतिक्रियेसारखीच प्रतिक्रिया उमटली. लोकांनी निषेध सभा घेतल्या. मेणबत्त्या लावून मृतांना श्रध्दांजली वाहिली. लोकांनी काय दक्षता घ्यायला हवी, या स्वरूपाची आवाहने करण्यात आली . रेडिओवर सारखे सांगितले जात होते की आजूबाजूला लक्ष ठेवा. ही प्रतिक्रिया पाहिल्यावर मला नेहमीच प्रश्न पडतो की, महानगरांमध्ये आपल्या आयुष्याची गती आपण दररोज वाढवत चाललो आहोत. कोणालाच कोणाकडे पाहायला वेळ नाही, असे मान्य करतो आहोत. मग अशी एक घटना घडली म्हणून खरोखरच आम्ही ‘आजूबाजूला ’पाहणार आहोत काय? खरे सांगायचे म्हणजे आपण आपल्या ‘शेजारी,’ ‘आजूबजूला’ पाहणे केव्हाच सोडले, म्हणून तर हे प्रश्न निर्माण झाले आहेत. ते ख-या अर्थाने सोडवायचे असतील तर पाप करण्यासाठीच्या निश्चिंततेचा त्याग करावा लागेल. नकारात्मक विचार म्हणून नव्हे, पण खरोखरच मरण दररोज समोर दिसायला हवे.आपण जणू अमरत्व घेवून जन्माला आलो आहोत, या भावनेने सत्ता- संपत्तीच्या जोरावर जो मुजोरपणा वाढला आहे, त्यातून पाप करण्याचे धाडस जन्म घेते. मानवी समाजात सर्व प्रकारच्या अतिरेकात संकट नेहमीच दबा धरून बसलेले असतात, सर्व प्रकारची विसंगती ही विश्वाच्या नियमाविरूध्दच असते, असे जे म्हणतात, ते अशा वेळी खरे वाटते. जगासमोर नव्याने उभ्या ठाकलेल्या या संकटांचा तसा विचार आपण करणार आहोत काय? .

Monday, February 15, 2010

भाषिक राजकारण ही तर संधी....

अकरा ते बारा कोटी लोक जी भाषा बोलतात, जी भाषा त्यामुळे जगातील आठ हजार भाषांमध्ये १५व्या क्रमांकाची भाषा आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जी जगातील एक उत्कृष्ट भाषा असल्याचे सिध्द झाले आहे, त्या मराठी भाषेवरून महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आहे, त्याचे मी प्रथम स्वागत करतो. स्वागत यासाठी की त्यामुळे का होईना या भाषेचा विचार समाजात सुरू होईल आणि या मंथनातून भाषाविकासाचे मार्ग मोकळे होतील, अशी आशा मी बाळगून आहे. मराठी समाजातील बहुतांश तथाकथित तज्ञ, लेखक, कवी, श्रीमंत, नवश्रीमंतांना मराठीविषयी जे प्रेम आहे, ते किती बेगडी आहे, हे वेळोवेळी सिध्द झाले आहे. एकतर राजकारण्यांनी सर्व निर्णय आपल्या हातात घेतले आहेत. त्यामुळे त्यांनाच एकमेकांसमोर उभे करून मराठी भाषेविषयीचे राजकारण पेटवून मराठी भाषेचे हित साधून घ्यावे, असे आता वाटू लागले आहे.

राजकारण्यांना भाषेविषयी खरे प्रेम नाही, त्यांना फक्त त्या विषयाचे राजकारण करावयाचे आहे, हे मलाही मान्य आहे. पण ज्या राजकारणाने सर्व समाजाच्या नाड्या आवळल्या, सर्व निर्णय प्रक्रिया आपल्या हातात ठेवली आहे, त्यातील म्होरक्यांच्या पुढाकाराशिवाय मराठी भाषेचा विषय पुढे जाउ शकत नाही, हेही मान्य करावे लागते. तो जर राजकारण्यांच्या हस्तक्षेपाशिवाय, पाठिंब्याशिवाय पुढे जावू शकत असता तर मग आतापर्यंत तो का गेला नाही, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. तात्पर्य भाषेच्या राजकारणाचे या कारणासाठी तरी स्वागत केले पाहिजे.

ज्या राज्याची निर्मितीच मुळी भाषावार प्रांतरचनेनुसार झाली आहे, त्या महाराष्ट्रात मराठीची किती अवहेलना होते आहे, याचा पाढा वाचण्याची ही जागा नाही. मात्र अवहेलना झाली आणि आजही ती होते आहे, याविषयी कोणाचे दुमत नाही. ही अवहेलना होत असताना मराठी समाजीतील जाणती माणसे नेमके काय करत होती, त्यांनी काही केले असेल तर त्यांच्या प्रयत्नांना यश का आले नाही, या प्रश्नांची उत्तरे आज मिळत नाहीत. आणि तरीही उत्तर शोधायचे तर असे म्हणता येईल की प्रयत्न करणा-यांनी केले मात्र राजकीय धुरीणांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. म्हणजे पुन्हा फिरून राजकीय वर्तुळातच यावे लागते. त्यांच्यावरच विसंबून राहावे लागते. मग त्यांनीच भाषेचे राजकारण सुरू केले तर त्याला दिशा देवून भाषाविकासाचा मार्ग मोकळा का करू नये? म्हणून भाषिक राजकारणाचे मी स्वागत करतो.

भाषा व्यवहारातून संस्कृती एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जाते, मानसिक- सामाजिक एकोपा निर्माण होतो, मानवी व्यवहारात सहजता येते, शिक्षणात सुलभता येते आणि व्यक्त होण्याचे मार्ग ख-या अर्थाने खुले होतात. या सर्व अंगांनी सध्या मराठी समाजाची कोंडी झाली आहे. ( केवळ ) उदरनिर्वाहाचे प्रश्न मराठी सोडवू शकत नसल्याने आम्ही आमचे जगणेच विकायला तयार झालो आहोत. नोकरी- व्यवसायाचे प्रश्न इंग्रजी सोडविते, म्हणून सर्व मानवी व्यवहारांसाठी समाजाने तिच्यापुढे शरणागती पत्करली आहे, हे मात्र चांगले झालेले नाही. यातून मराठी भाषेच्या वाट्याला प्रचंड अवहेलना आली आहे. त्यासंबंधीची खदखद मराठी मनांमध्ये दडली आहे, आणि म्हणूनच तो आज राजकारणाचा विषय झाला आहे, हे समजून घेतले पाहिजे. या देशात लोकशाही नसती तर भाषेचे राजकारण होण्याचीही ‘संधी’ आपल्याला मिळाली नसती. ती यानिमित्ताने मिळते आहे. आता ही संधी आपण कशी घेतो , यावरच बरेच काही अवलंबून आहे.

आधुनिक काळाने मराठी भाषेसमोर काही प्रश्न उभे केले आहेत. त्यातील काही कळीचे प्रश्न संगणकाच्या वाढत्या वापराशी संबंधित आहेत. संगणकात जी भाषा सहजतेने वावरू शकेल, त्या भाषेचा वापर अधिकाधिक होणार आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत तंत्रज्ञानाची कुरघोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. समाजातील खरे बदल हे विज्ञान, तंत्र आणि यंत्रातले असतात, हे मानवी इतिहासाने सिध्दच केले आहे. भाषेचाही त्याला अपवाद नाही. याचा अर्थ भाषेविषयीचे हे तंत्र स्विकारावे लागणार आहे. ते तंत्र काय आहे आणि त्यासाठी नेमके काय करावे लागेल, याविषयीचे संशोधन ‘शोध मराठीचा’ या संस्थेने केले आहे. ते समजून घेवून त्याचा अवलंब करण्यासाठीचा दबावगट तयार केला तर राजकारणाने आयत्याच दिलेल्या संधीचे सोने करता येईल, असे मला वाटते.

ब्रिटनमध्ये जेव्हा फ्रेंच भाषेचे प्राबल्य वाढत चालेले होते , त्यावेळी ब्रिटिशांनी कायदे करून, सक्ती करून इंग्रजी भाषा जगवली आणि वाढविली, हा इतिहास आहे. मग जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, कॅनडा, स्वीडन अशा प्रगत देशांपेक्षा जास्त संख्या मराठी भाषिकांची असूनही तिचा जीवनाच्या सर्व क्षेत्रातील स्वीकार जड का व्हावा, असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तरही आपल्याला माहीत आहे. भाषेविषयीचा दुटप्पीपणा अभिजनवर्गाने सोडण्याची तसेच स्वतःची ओळख विसरून चांगले जगता येत नाही, हे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. आपणच आपल्याला दररोज अपमानीत करत आहोत, हेही लक्षात घेतले पाहिजे. संस्कृतीच्या परिघात भाषेचे महत्व निर्विवाद आहे. त्यामुळे संस्कृतीचे जतन भाषेशिवाय होउ शतक नाही. संस्कृतीच्या गप्पा मारणा-यांनी म्हणूनच भाषाविकासाकडे लक्ष दिले पाहिजे.

जगाच्या व्यासपीठावर मराठी माणूस विविध क्षेत्रात झेंडा फडकावतो आहे, याचा सर्वांना अभिमान आहे, मात्र त्यासाठी तो स्वतःची संस्कृती आणि बाजारपेठ विकत असेल तर अशा झेंड्यांची आम्हाला लाज वाटते. मराठी भाषेची सध्याची स्थिती पाहता या झेड्यांचा अभिनान बाळगण्याचे काही कारण नाही, कारण त्या झेंड्यानी या समाजाशी असलेली नाळ जणू तोडून टाकली आहे. जो बहुजन मराठी समाज आज मराठी भाषेच्या परिघात जगतो आहे, त्याला भाषिक राजकारणाशिवाय दुसरा आधार नाही. असे राजकारण होउ नये, असे ज्यांना वाटते, त्यांनी या भाषेच्या पालनपोषणाची जबाबदारी घेण्याचे धाडस दाखवावे. मराठी भाषा किती समृध्द आणि शास्त्रीय आहे, याची सिध्दता ‘शोध मराठीचा’ या संशोधनातून झाली आहे. जगातील अनेक भाषांशी ती किती चांगल्या पध्दतीने जोडली जावू शकते, हेही या संशोधनाने सिद्ध केले आहे. आता मराठी अभिजनवर्गाने आणि राजकारण्यांनी याविषयीचे ढोंग बाजूला ठेवून मायमराठीशी प्रामाणिक राहण्याचीच खरी गरज आहे.

Wednesday, February 10, 2010

‘गरीब’ दिसला नाहीत तरी चालेल, पण...

एकविसाव्या शतकातील वेगवान जागतिकरणामुळे गरीब आणि श्रीमंत देश असा फरक आता राहिला नाही. जगभरातील गरीब आणि श्रीमंत असा भेद मात्र निर्माण झाला आहे, असे म्हटले जाते , त्याची या पध्दतीने आणि इतक्या लवकर प्रचिती येईल, असे वाटले नव्हते. ऑस्ट्रेलियामधील भारतीय विद्यार्थ्यांवर होणा-या हल्ल्यांचा विषय सध्या चर्चेत आहे. तेथील एक पोलिस अधिकारी सीमन ओव्हरलँड यांनी भारतीय विद्यार्थ्यांना ‘गरीब दिसण्याचा’ सल्ला दिला आहे. ‘तुम्हाला शक्य असेल तेवढे गरीब दिसा, म्हणजे चोरीच्या कारणासाठी होणारे हल्ले कमी होतील, असे त्यांचे म्हणणे आहे. एक देश म्हणून त्यांचा आम्ही निषेध नोंदवत असलो आणि ती भूमिका एक देश म्हणून बरोबर असली तरी सध्याच्या सामाजिक परिस्थितीत ही घटना फार बोलकी आहे. सीमन यांच्या सल्ल्याकडे पुर्ण दुर्लक्ष करावे, असे कोणी म्हणणार नाही. आम्हाला वाटेल तसे राहण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय श्रीमंत समूहातून आलीच आहे. भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांच्या घटनांवरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे भारतासारख्या गरीब देशातील श्रीमंत विद्यार्थ्यांचे छानछौकी राहणीमान ऑस्ट्रेलियासारख्या श्रीमंत देशातील गरीबांना सहन होत नाही.हे हल्ले वर्णभेदी असल्याचा दावा भारताकडून केला जात असला तरी ऑस्ट्रेलियात राहणा-या भारतीयांनाही तसे वाटत नाही. ऑस्ट्रेलियामध्येही इतर देशांप्रमाणे दारिद्र्य वाढले आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढली , असे त्यांच्यापैकी बहुतेकांचे मत आहे. ऑस्ट्रेलियाचा विषय आपण येथे सोडून देवू. त्याचा मतितार्थ लक्षात ठेवून आपली आजची सामाजिक परिस्थिती काय आहे, याचा मात्र निश्चित विचार केला पाहिजे.

परवा एका मित्राने मला एसएमएस केला. हल्ली या प्रकारचे संदेश बरेच काही सांगून जातात कारण ते वर्तमानाविषयी चपखल भाष्य करत असतात. तो एसएमएस असा आहेः
एका श्रीमंत मुलीला शाळेत एकदा गरीब कुटुंबाविषयी निबंध लिहीण्यास सांगण्यात आले. निबंधात तिने लिहीलेः एक गरीब कुटुंब होते. वडिल गरीब. आई गरीब. मुले गरीब.घरात चार नोकर होते, तेही गरीब. कार जुनी झालेली सफारी होती. तिचा गरीब चालक तशाच गाडीतून मुलांना शाळेत सोडत होता. मुलांकडे मोबाईलचे जुने मॉडेल्स होते. मुले तीनदाच चिकन खावू शकत.घरात चारच जुने ए.सी. होते. सारे कुटुंब मोठ्या मुश्कीलीने ऐश करत होते. पुन्हा मतितार्थ लक्षात घेवू यात. गरीब आणि श्रीमंतांमध्ये इतकी दरी पडली आहे की गरीबी म्हणजे काय, हे श्रीमंतांना आणि श्रीमंती कोणत्या थराला जावू शकते हे गरीबांना कळेनासे झाले आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा श्रीमंतीचे प्रदर्शन मांडले जाते, त्या त्या वेळी ते गरीबांना सहन होत नाही. ते व्यक्त होत नसले तरी त्याविषयीचा राग, असुया ही त्यांच्या मनात साहजिकच निर्माण होते. त्यातून गुन्हेगारी जन्म घेते. गुन्हेगारीचे ते एकमेव कारण आहे, असे मी म्हणणार नाही, मात्र एक प्रमुख कारण आहे , एवढे निश्चित.

काही मोजक्या लोकांना चैनीत लोळायला मिळावे म्हणून हजारो, लाखो लोकांनी किड्यामुंग्यासारखे जगावे, हेच मुळात अनैतिक आहे. या अनैतिकतेकडे दुर्लक्ष केले तर त्याचे काही ‘अनैतिक’ परिणाम होतात. त्यांना मात्र आम्ही गुन्हेगार ठरवितो.लोकशाहीत श्रीमंत होण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे. तो कोणी नाकारण्याचे कारण नाही, मात्र त्यांचे ओंगळवाणे प्रदर्शन निषेधार्ह आहे. आज आपल्या समाजात या प्रदर्शनाची जणू स्पर्धाच लागली आहे. काही पार्ट्या, लग्नसमारंभ, काही सांस्कृतिक कार्यक्रमांतील उधळपट्टी आणि काही श्रीमंतांचा समाजातील वावर किळसवाणा वाटायला लागला आहे. गरीब माणसांपासून हा वर्ग इतका लांब चालला आहे की आपल्या आजूबाजूला जगणारीही माणसेच आहेत, याचेही भान त्यांना राहिलेले नाही. त्यांचे प्रश्नही त्यांना कळेनासे झाले आहेत. एक समाज म्हणून आम्ही एकमेकांशी जोडलेले असू तर आमची सुखदुःख परस्परांना भिडायला हवीत. आम्ही परस्परांवरील अवलिंबत्व मान्य करून त्या त्या भूमिकेचा आदर करायला हवा. किमान त्याचा योग्य मोबदला त्याला द्यायला हवा. मात्र त्याविषयीची संवेदनाच काही मुजोर श्रीमंत हरवून बसले आहेत.

’मनुष्याचे गुण हे समाजनिर्मित आहेत, त्या गुणांचे श्रेय त्याला नसून विशेष परिस्थितीला आहे. त्या गुणांची ऐट मनुष्याला नको’ असे साने गुरूजींनी एका ठिकाणी म्हटले आहे.स्वकर्तृत्वाचा टेंभा मिरवणा-या श्रीमंतांना हे पटणार नाही, मात्र ते खरे आहे. प्रत्येक माणसाला ख-या अर्थाने समाजच घडवत असतो. त्यामुळे समाजातल्या विसंगतीचा आणि माझा काही संबंध नाही, असे कोणी म्हणू शकत नाही. आजचे काही श्रींमत टिकोजीराव मात्र आपण त्या गावचेच नाहीत, असे भासविण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजीतील या विसंगतीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आमच्या समाजात शेतकरी आणि आता तर विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. लाखो मुले अद्याप शाळेतच जाउ शकत नाहीत. बेरोजगारी वाढतेच आहे. शरीरकष्टाला कवडीमोल किंमत दिली जाते आहे. कमी प्रतीची मानली जातात अशी कामे करणा-या माणसांची क्षणोक्षणी अवहेलना केली जाते आहे. या विसंगतीची ज्यांना लाज वाटते ती श्रीमंत माणसे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यात बहुतांश वेळा कर्तव्याऐवजी समाजसेवेचा तोरा असतो. म्हणजे समाजात राहण्याचे सर्व फायदे आपण घ्यायचे, मात्र त्याचे उत्तरदायित्व मान्य करावयाचे नाही, अशी ही भावना असते.

काही श्रीमंतांना संपत्तीच्या आधारे उपभोग घ्यायचे आहेत. चैन करायची आहे. आपण असे म्हणू यात की त्यांना चांगले आयुष्य जगायचे आहे. कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. पण त्याला मर्यादा हवी. आणि ही मर्यादा आपण आपली ठरवायची असते. या उपभोगाला ओंगळवाणे रूप येवू नये, एवढेच म्हणणे आहे. म्हणजे येथे आपले प्राधान्यक्रम बदलण्याची गरज आहे. आमच्या देशातील श्रीमंतांनी तेवढे सुजाण व्हावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. प्रश्न ऑस्ट्रेलियातील हल्ल्यांचा असो की मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून बळी घेणा-या श्रीमंत तरूणीचा... हे प्रश्न सामाजिक विसंगतीकडे होणा-या वाढत्या दुर्लक्षामुळे निर्माण होत आहेत, याचे भान मात्र आलेच पाहिजे.

Wednesday, February 3, 2010

कशासाठी ?...हातांसाठी...

मला काम द्या, एखाद्या किसानाचे, माळ्याचे ज्यामुळे माझा अभिमान वाढेल खडकाळ जमिनीला नंदनवन बनविण्याचे अखंड अथक परिश्रम करून, फक्त एवढेच म्हणा,
अत्यंत चिकाटीने
तू तुझे काम केलेस........

प्राच्य विद्येचे अभ्यासक,भाषाशास्त्रविषयक सिध्दांताचे बीज रोवणारे सर विल्यम जोन्स यांच्या या ओळींची आठवण आज होण्याचे कारणच तसे आहे. अठराव्या शतकात होउन गेलेल्या जोन्स यांनी हातांना कामाची मागणी केली होती, आज अमेरिकेतला अत्याधुनिक आणि भारतातला आधुनिक समाज एकविसाव्या शतकात पुन्हा कामाचीच मागणी करतो आहे. अमेरिकेचे बराक ओबामा असोत, महाराष्ट्राचे अशोक चव्हाण,राज ठाकरे असोत किंवा टिंबक टू देशाचे कोणी प्रमुख असोत... लोकांच्या हाताला काम देणे , हीच आज त्यांच्यापुढील चिंता आहे. परप्रांतीयांची घुसखोरी, भाषेची अस्मिता,भुमिपुत्रांना न्याय, आउटसोर्सिंग.. अशी नावे काहीही द्या... हे सर्व शब्द वेगळे वाटत असले तरी ते लोकांच्या हातांना काम मागत आहेत.

मुंबईतील टॅक्सीचालकांना मराठी आलेच पाहिजे, असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला की नाही ,हे आता सांगता येणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी दुस-याच दिवशी शब्दांची कसरत करून त्याचा इन्कार केला आहे. तर शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यावरून त्याच्याशी भाषेची अस्मिता जोडली आहे. बाकींच्यांनी हात पोळतील म्हणून गप्प राहणे पसंत केले आहे. आता असे नवेनवे मुद्दे समोर येत आहेत. कारण मुळ मुद्दयाला हात लावण्याची कोणाची हिमंत नाही.मुळ मुद्दा आहे हातांना काम मिळण्याचा आणि त्याविषयी क्रांतिकारी बदलांना सामोरे जाण्याचा. जगाच्या विकासाची दिशा हल्ली अमेरिकेकडे तोंड करून ठरविण्यात येते, त्या अमेरिकेतही अध्यक्ष बराक ओबामा यांना पहिला अर्थसंकल्प मांडतांना ‘भुमिपुत्रां’च्या हातांना काम देण्यास प्राधान्य द्यावे लागले. जागतिकरण असेच चालू ठेवले तर ते अमेरिकेच्या हिताचे नाही, असे बराक ओबामांनी विरोधी बाकांवर बसून म्हटले होते, पण आता खरोखरच जागतिकरणाचे चाक उलटे फिरवण्याची वेळ अमेरिकेवर आली आहे. तात्पर्य अमेरिकाच आपली आदर्श असली तरी लोकांच्या हातांना काम देणारा विकास हाच खरा विकास मानला पाहिजे.

महाराष्ट्रात किती उद्योग येत आहेत, दरडोई उत्पन्न किती वाढले आहे, नागरीकरण किती वेगाने होते आहे, किती उड्डाणपुल उभारले जात आहेत, वीजवापर किती वाढला आहे.. हे सर्व जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच रोजगारसंधी किती वाढल्या, हेही महत्वाचे आहे. विकासाच्या पाश्चिमात्य निकषांमुळे संपत्तीत झालेल्या वाढीलाच आपण विकास म्हणायला लागलो आहोत. त्या संपत्तीमध्ये आमच्या कोट्यवधी बांधवांचे मन आणि हात गुंतत नसतील तर त्याला विकास म्हणता येणार नाही.मन आणि हात गुंतले नाहीत म्हणून अस्मितेचे मुद्दे महत्वाचे ठरू लागले आहेत.

रोजगारासंबंधीचे फार वेगळे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसते आहे. ग्रामीण भागामध्ये शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. कारण शहरात चांगली मजुरी मिळत असल्याने ते शहरांकडे येत आहेत. शहरात मध्यम स्वरूपाची कामे करायला चांगली माणसे मिळत नाहीत कारण त्यांना तुलनेने चांगला मोबदला मिळत नाही. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोजगार वाढतो आहे , पण ती कौशल्ये असणारे उमेदवार नाहीत, कारण त्याप्रकारचे शिक्षण महाग झाले आहे. ज्यांनी ती मिळवली ती माणसे इतका पैसा मिळवत आहेत की इतरांना आपल्या जगण्याची लाज वाटावी. संपत्ती आणि रोजगाराची निर्मिती होते आहे मात्र ती ‘भुमिपुत्रां’ च्या वाट्याला येत नाही. कारण त्यांची भाषा, त्यांची कौशल्ये जीवनाचा अर्थव्यवहार पुर्ण करण्यास समर्थ नाहीत.याचा अर्थ अस्मितेचा मुद्दा करायचाच असेल तर तो आपल्या भाषेत अर्थव्यवहार होतील, असा करावा लागेल. रोजगार देणारी कौशल्ये भुमिपुत्रांना द्यावी लागतील.

‘जग एक झाले आहे’ असे आपण म्हणतो , त्याची अशी विचित्र प्रचिती सध्या येवू लागली आहे. महाराष्ट्रासारख्या... विकसनशील राज्याचे प्रश्न आणि ‘अतिप्रगत’ अमेरिकेचे प्रश्न सारखेच. त्यांनाही हातांना काम हवे आहे आणि आम्हालाही। तेथेही भुमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आणि येथेही। तेथेही सरकारला हस्तक्षेप करावा लागला आणि येथेही। याचे प्रमुख कारण असे आहे की भांडवलशाहीने जगात प्रचंड संपत्ती निर्माण केली आहे मात्र जगातील बहुजन भांडवलदारांच्या नफेखोरीचे केवळ साधन झाला आहे. ना त्याच्या वाट्याला रसरशीत जीवन आले ना सर्वांच्या हातांना काम मिळाले। महाराष्ट्राची आकडेवारी सांगते की ते एक ‘श्रीमंत’ राज्य आहे... पण मग त्या ‘श्रीमंती’मध्ये आमची भाषा, आमची संस्कृती बसत नाही। मग ही कसली आली आहे ‘श्रीमंती’?
‘मानवी समाजात सर्व प्रकारच्या अतिरेकात संकट नेहमीच दबा धरून बसलेले असते’ असे म्हणतात. तसे काहीसे आमच्या समाजाचे होते आहे. भाषा, संस्कृतीच्या आक्रमणाने १२ कोटींच्या या समाजाला दुबळे करून सोडले आहे. एकजूट करून या आक्रमणाविरूध्द लढण्याची त्याची क्षमता क्षीण होत चालली आहे. एकमेकांविषयीची संवेदना व्यवहारवादाशीच जवळीक साधायला लागली आहे. मग अधिकाधिकांच्या हातांना काम मिळाले पाहिजे , हा मुद्दा महत्वाचा न ठरता नफेखोरी महत्वाची ठरते. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधींनी हा इशारा देवून ठेवला आहे. त्यांनी नेहमीच हातांना काम हा प्राधान्यक्रम महत्वाचा मानला. शिक्षणातही त्यांनी ‘जीवन शिक्षणाचा’च आग्रह धरला. त्यात मातृभाषेला महत्व देण्यास सांगितले. त्या ‘जीवनशिक्षणा’पासून आपण दूरदूर पळत राहिलो आणि आता पुन्हा त्याच चौकात येवून पोहचलो. जेथे जगभर जीवनशिक्षण आणि पर्यायाने हातांसाठी कामाची मागणी होत आहे....या मुळ विषयाला आपण जोपर्यंत प्रामाणिकपणे हात घालत नाही तोपर्यंत अगतिकता अपरिहार्य आहे आणि त्यामुळेच अस्वस्थताही। ही अस्वस्थता नेते बोलून दाखवताहेत त्यापेक्षा कितीतरी पट बहुजनांमध्ये आहे, हे वेळीच लक्षात घ्यावे लागेल.