Monday, February 15, 2010

भाषिक राजकारण ही तर संधी....

अकरा ते बारा कोटी लोक जी भाषा बोलतात, जी भाषा त्यामुळे जगातील आठ हजार भाषांमध्ये १५व्या क्रमांकाची भाषा आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जी जगातील एक उत्कृष्ट भाषा असल्याचे सिध्द झाले आहे, त्या मराठी भाषेवरून महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आहे, त्याचे मी प्रथम स्वागत करतो. स्वागत यासाठी की त्यामुळे का होईना या भाषेचा विचार समाजात सुरू होईल आणि या मंथनातून भाषाविकासाचे मार्ग मोकळे होतील, अशी आशा मी बाळगून आहे. मराठी समाजातील बहुतांश तथाकथित तज्ञ, लेखक, कवी, श्रीमंत, नवश्रीमंतांना मराठीविषयी जे प्रेम आहे, ते किती बेगडी आहे, हे वेळोवेळी सिध्द झाले आहे. एकतर राजकारण्यांनी सर्व निर्णय आपल्या हातात घेतले आहेत. त्यामुळे त्यांनाच एकमेकांसमोर उभे करून मराठी भाषेविषयीचे राजकारण पेटवून मराठी भाषेचे हित साधून घ्यावे, असे आता वाटू लागले आहे.

राजकारण्यांना भाषेविषयी खरे प्रेम नाही, त्यांना फक्त त्या विषयाचे राजकारण करावयाचे आहे, हे मलाही मान्य आहे. पण ज्या राजकारणाने सर्व समाजाच्या नाड्या आवळल्या, सर्व निर्णय प्रक्रिया आपल्या हातात ठेवली आहे, त्यातील म्होरक्यांच्या पुढाकाराशिवाय मराठी भाषेचा विषय पुढे जाउ शकत नाही, हेही मान्य करावे लागते. तो जर राजकारण्यांच्या हस्तक्षेपाशिवाय, पाठिंब्याशिवाय पुढे जावू शकत असता तर मग आतापर्यंत तो का गेला नाही, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. तात्पर्य भाषेच्या राजकारणाचे या कारणासाठी तरी स्वागत केले पाहिजे.

ज्या राज्याची निर्मितीच मुळी भाषावार प्रांतरचनेनुसार झाली आहे, त्या महाराष्ट्रात मराठीची किती अवहेलना होते आहे, याचा पाढा वाचण्याची ही जागा नाही. मात्र अवहेलना झाली आणि आजही ती होते आहे, याविषयी कोणाचे दुमत नाही. ही अवहेलना होत असताना मराठी समाजीतील जाणती माणसे नेमके काय करत होती, त्यांनी काही केले असेल तर त्यांच्या प्रयत्नांना यश का आले नाही, या प्रश्नांची उत्तरे आज मिळत नाहीत. आणि तरीही उत्तर शोधायचे तर असे म्हणता येईल की प्रयत्न करणा-यांनी केले मात्र राजकीय धुरीणांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. म्हणजे पुन्हा फिरून राजकीय वर्तुळातच यावे लागते. त्यांच्यावरच विसंबून राहावे लागते. मग त्यांनीच भाषेचे राजकारण सुरू केले तर त्याला दिशा देवून भाषाविकासाचा मार्ग मोकळा का करू नये? म्हणून भाषिक राजकारणाचे मी स्वागत करतो.

भाषा व्यवहारातून संस्कृती एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जाते, मानसिक- सामाजिक एकोपा निर्माण होतो, मानवी व्यवहारात सहजता येते, शिक्षणात सुलभता येते आणि व्यक्त होण्याचे मार्ग ख-या अर्थाने खुले होतात. या सर्व अंगांनी सध्या मराठी समाजाची कोंडी झाली आहे. ( केवळ ) उदरनिर्वाहाचे प्रश्न मराठी सोडवू शकत नसल्याने आम्ही आमचे जगणेच विकायला तयार झालो आहोत. नोकरी- व्यवसायाचे प्रश्न इंग्रजी सोडविते, म्हणून सर्व मानवी व्यवहारांसाठी समाजाने तिच्यापुढे शरणागती पत्करली आहे, हे मात्र चांगले झालेले नाही. यातून मराठी भाषेच्या वाट्याला प्रचंड अवहेलना आली आहे. त्यासंबंधीची खदखद मराठी मनांमध्ये दडली आहे, आणि म्हणूनच तो आज राजकारणाचा विषय झाला आहे, हे समजून घेतले पाहिजे. या देशात लोकशाही नसती तर भाषेचे राजकारण होण्याचीही ‘संधी’ आपल्याला मिळाली नसती. ती यानिमित्ताने मिळते आहे. आता ही संधी आपण कशी घेतो , यावरच बरेच काही अवलंबून आहे.

आधुनिक काळाने मराठी भाषेसमोर काही प्रश्न उभे केले आहेत. त्यातील काही कळीचे प्रश्न संगणकाच्या वाढत्या वापराशी संबंधित आहेत. संगणकात जी भाषा सहजतेने वावरू शकेल, त्या भाषेचा वापर अधिकाधिक होणार आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत तंत्रज्ञानाची कुरघोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. समाजातील खरे बदल हे विज्ञान, तंत्र आणि यंत्रातले असतात, हे मानवी इतिहासाने सिध्दच केले आहे. भाषेचाही त्याला अपवाद नाही. याचा अर्थ भाषेविषयीचे हे तंत्र स्विकारावे लागणार आहे. ते तंत्र काय आहे आणि त्यासाठी नेमके काय करावे लागेल, याविषयीचे संशोधन ‘शोध मराठीचा’ या संस्थेने केले आहे. ते समजून घेवून त्याचा अवलंब करण्यासाठीचा दबावगट तयार केला तर राजकारणाने आयत्याच दिलेल्या संधीचे सोने करता येईल, असे मला वाटते.

ब्रिटनमध्ये जेव्हा फ्रेंच भाषेचे प्राबल्य वाढत चालेले होते , त्यावेळी ब्रिटिशांनी कायदे करून, सक्ती करून इंग्रजी भाषा जगवली आणि वाढविली, हा इतिहास आहे. मग जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, कॅनडा, स्वीडन अशा प्रगत देशांपेक्षा जास्त संख्या मराठी भाषिकांची असूनही तिचा जीवनाच्या सर्व क्षेत्रातील स्वीकार जड का व्हावा, असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तरही आपल्याला माहीत आहे. भाषेविषयीचा दुटप्पीपणा अभिजनवर्गाने सोडण्याची तसेच स्वतःची ओळख विसरून चांगले जगता येत नाही, हे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. आपणच आपल्याला दररोज अपमानीत करत आहोत, हेही लक्षात घेतले पाहिजे. संस्कृतीच्या परिघात भाषेचे महत्व निर्विवाद आहे. त्यामुळे संस्कृतीचे जतन भाषेशिवाय होउ शतक नाही. संस्कृतीच्या गप्पा मारणा-यांनी म्हणूनच भाषाविकासाकडे लक्ष दिले पाहिजे.

जगाच्या व्यासपीठावर मराठी माणूस विविध क्षेत्रात झेंडा फडकावतो आहे, याचा सर्वांना अभिमान आहे, मात्र त्यासाठी तो स्वतःची संस्कृती आणि बाजारपेठ विकत असेल तर अशा झेंड्यांची आम्हाला लाज वाटते. मराठी भाषेची सध्याची स्थिती पाहता या झेड्यांचा अभिनान बाळगण्याचे काही कारण नाही, कारण त्या झेंड्यानी या समाजाशी असलेली नाळ जणू तोडून टाकली आहे. जो बहुजन मराठी समाज आज मराठी भाषेच्या परिघात जगतो आहे, त्याला भाषिक राजकारणाशिवाय दुसरा आधार नाही. असे राजकारण होउ नये, असे ज्यांना वाटते, त्यांनी या भाषेच्या पालनपोषणाची जबाबदारी घेण्याचे धाडस दाखवावे. मराठी भाषा किती समृध्द आणि शास्त्रीय आहे, याची सिध्दता ‘शोध मराठीचा’ या संशोधनातून झाली आहे. जगातील अनेक भाषांशी ती किती चांगल्या पध्दतीने जोडली जावू शकते, हेही या संशोधनाने सिद्ध केले आहे. आता मराठी अभिजनवर्गाने आणि राजकारण्यांनी याविषयीचे ढोंग बाजूला ठेवून मायमराठीशी प्रामाणिक राहण्याचीच खरी गरज आहे.