Wednesday, February 10, 2010

‘गरीब’ दिसला नाहीत तरी चालेल, पण...

एकविसाव्या शतकातील वेगवान जागतिकरणामुळे गरीब आणि श्रीमंत देश असा फरक आता राहिला नाही. जगभरातील गरीब आणि श्रीमंत असा भेद मात्र निर्माण झाला आहे, असे म्हटले जाते , त्याची या पध्दतीने आणि इतक्या लवकर प्रचिती येईल, असे वाटले नव्हते. ऑस्ट्रेलियामधील भारतीय विद्यार्थ्यांवर होणा-या हल्ल्यांचा विषय सध्या चर्चेत आहे. तेथील एक पोलिस अधिकारी सीमन ओव्हरलँड यांनी भारतीय विद्यार्थ्यांना ‘गरीब दिसण्याचा’ सल्ला दिला आहे. ‘तुम्हाला शक्य असेल तेवढे गरीब दिसा, म्हणजे चोरीच्या कारणासाठी होणारे हल्ले कमी होतील, असे त्यांचे म्हणणे आहे. एक देश म्हणून त्यांचा आम्ही निषेध नोंदवत असलो आणि ती भूमिका एक देश म्हणून बरोबर असली तरी सध्याच्या सामाजिक परिस्थितीत ही घटना फार बोलकी आहे. सीमन यांच्या सल्ल्याकडे पुर्ण दुर्लक्ष करावे, असे कोणी म्हणणार नाही. आम्हाला वाटेल तसे राहण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय श्रीमंत समूहातून आलीच आहे. भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांच्या घटनांवरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे भारतासारख्या गरीब देशातील श्रीमंत विद्यार्थ्यांचे छानछौकी राहणीमान ऑस्ट्रेलियासारख्या श्रीमंत देशातील गरीबांना सहन होत नाही.हे हल्ले वर्णभेदी असल्याचा दावा भारताकडून केला जात असला तरी ऑस्ट्रेलियात राहणा-या भारतीयांनाही तसे वाटत नाही. ऑस्ट्रेलियामध्येही इतर देशांप्रमाणे दारिद्र्य वाढले आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढली , असे त्यांच्यापैकी बहुतेकांचे मत आहे. ऑस्ट्रेलियाचा विषय आपण येथे सोडून देवू. त्याचा मतितार्थ लक्षात ठेवून आपली आजची सामाजिक परिस्थिती काय आहे, याचा मात्र निश्चित विचार केला पाहिजे.

परवा एका मित्राने मला एसएमएस केला. हल्ली या प्रकारचे संदेश बरेच काही सांगून जातात कारण ते वर्तमानाविषयी चपखल भाष्य करत असतात. तो एसएमएस असा आहेः
एका श्रीमंत मुलीला शाळेत एकदा गरीब कुटुंबाविषयी निबंध लिहीण्यास सांगण्यात आले. निबंधात तिने लिहीलेः एक गरीब कुटुंब होते. वडिल गरीब. आई गरीब. मुले गरीब.घरात चार नोकर होते, तेही गरीब. कार जुनी झालेली सफारी होती. तिचा गरीब चालक तशाच गाडीतून मुलांना शाळेत सोडत होता. मुलांकडे मोबाईलचे जुने मॉडेल्स होते. मुले तीनदाच चिकन खावू शकत.घरात चारच जुने ए.सी. होते. सारे कुटुंब मोठ्या मुश्कीलीने ऐश करत होते. पुन्हा मतितार्थ लक्षात घेवू यात. गरीब आणि श्रीमंतांमध्ये इतकी दरी पडली आहे की गरीबी म्हणजे काय, हे श्रीमंतांना आणि श्रीमंती कोणत्या थराला जावू शकते हे गरीबांना कळेनासे झाले आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा श्रीमंतीचे प्रदर्शन मांडले जाते, त्या त्या वेळी ते गरीबांना सहन होत नाही. ते व्यक्त होत नसले तरी त्याविषयीचा राग, असुया ही त्यांच्या मनात साहजिकच निर्माण होते. त्यातून गुन्हेगारी जन्म घेते. गुन्हेगारीचे ते एकमेव कारण आहे, असे मी म्हणणार नाही, मात्र एक प्रमुख कारण आहे , एवढे निश्चित.

काही मोजक्या लोकांना चैनीत लोळायला मिळावे म्हणून हजारो, लाखो लोकांनी किड्यामुंग्यासारखे जगावे, हेच मुळात अनैतिक आहे. या अनैतिकतेकडे दुर्लक्ष केले तर त्याचे काही ‘अनैतिक’ परिणाम होतात. त्यांना मात्र आम्ही गुन्हेगार ठरवितो.लोकशाहीत श्रीमंत होण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे. तो कोणी नाकारण्याचे कारण नाही, मात्र त्यांचे ओंगळवाणे प्रदर्शन निषेधार्ह आहे. आज आपल्या समाजात या प्रदर्शनाची जणू स्पर्धाच लागली आहे. काही पार्ट्या, लग्नसमारंभ, काही सांस्कृतिक कार्यक्रमांतील उधळपट्टी आणि काही श्रीमंतांचा समाजातील वावर किळसवाणा वाटायला लागला आहे. गरीब माणसांपासून हा वर्ग इतका लांब चालला आहे की आपल्या आजूबाजूला जगणारीही माणसेच आहेत, याचेही भान त्यांना राहिलेले नाही. त्यांचे प्रश्नही त्यांना कळेनासे झाले आहेत. एक समाज म्हणून आम्ही एकमेकांशी जोडलेले असू तर आमची सुखदुःख परस्परांना भिडायला हवीत. आम्ही परस्परांवरील अवलिंबत्व मान्य करून त्या त्या भूमिकेचा आदर करायला हवा. किमान त्याचा योग्य मोबदला त्याला द्यायला हवा. मात्र त्याविषयीची संवेदनाच काही मुजोर श्रीमंत हरवून बसले आहेत.

’मनुष्याचे गुण हे समाजनिर्मित आहेत, त्या गुणांचे श्रेय त्याला नसून विशेष परिस्थितीला आहे. त्या गुणांची ऐट मनुष्याला नको’ असे साने गुरूजींनी एका ठिकाणी म्हटले आहे.स्वकर्तृत्वाचा टेंभा मिरवणा-या श्रीमंतांना हे पटणार नाही, मात्र ते खरे आहे. प्रत्येक माणसाला ख-या अर्थाने समाजच घडवत असतो. त्यामुळे समाजातल्या विसंगतीचा आणि माझा काही संबंध नाही, असे कोणी म्हणू शकत नाही. आजचे काही श्रींमत टिकोजीराव मात्र आपण त्या गावचेच नाहीत, असे भासविण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजीतील या विसंगतीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आमच्या समाजात शेतकरी आणि आता तर विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. लाखो मुले अद्याप शाळेतच जाउ शकत नाहीत. बेरोजगारी वाढतेच आहे. शरीरकष्टाला कवडीमोल किंमत दिली जाते आहे. कमी प्रतीची मानली जातात अशी कामे करणा-या माणसांची क्षणोक्षणी अवहेलना केली जाते आहे. या विसंगतीची ज्यांना लाज वाटते ती श्रीमंत माणसे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यात बहुतांश वेळा कर्तव्याऐवजी समाजसेवेचा तोरा असतो. म्हणजे समाजात राहण्याचे सर्व फायदे आपण घ्यायचे, मात्र त्याचे उत्तरदायित्व मान्य करावयाचे नाही, अशी ही भावना असते.

काही श्रीमंतांना संपत्तीच्या आधारे उपभोग घ्यायचे आहेत. चैन करायची आहे. आपण असे म्हणू यात की त्यांना चांगले आयुष्य जगायचे आहे. कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. पण त्याला मर्यादा हवी. आणि ही मर्यादा आपण आपली ठरवायची असते. या उपभोगाला ओंगळवाणे रूप येवू नये, एवढेच म्हणणे आहे. म्हणजे येथे आपले प्राधान्यक्रम बदलण्याची गरज आहे. आमच्या देशातील श्रीमंतांनी तेवढे सुजाण व्हावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. प्रश्न ऑस्ट्रेलियातील हल्ल्यांचा असो की मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून बळी घेणा-या श्रीमंत तरूणीचा... हे प्रश्न सामाजिक विसंगतीकडे होणा-या वाढत्या दुर्लक्षामुळे निर्माण होत आहेत, याचे भान मात्र आलेच पाहिजे.