Saturday, March 9, 2013


माणसाने ‘जमिनीवर येण्यासाठी’...!


आधुनिक जगात प्रश्नांची झटपट उत्तरे शोधण्याच्या नादात आम्ही जमिनीला विसरलो म्हणजे आईलाच विसरलो आहोत, याची आठवण सांगोला येथे झालेल्या पहिल्या राज्य भूमी परिषदेने करून दिली आहे. प्रफुल्ल कदम या तरुणाने राज्याच्या एका कोपऱ्यात घेतलेल्या या परिषदेला म्हणूनच महत्व आहे.




आपल्याकडचा काळा किंवा गोरा पैसा गुंतविण्यासाठी दुसरे सर्व मार्ग खुंटले तेव्हा जगभरातील माणसे जमिनीला शरण गेली आणि तो पैसा जमिनीत गुंतविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे आज सर्वात जास्त चर्चा होते ती जमिनींच्या किंमतीची. एका विशिष्ट जमिनीची किती किंमत आहे, हे आज बाजारभावाचा विचार करून आपण सांगू शकतो, मात्र त्याच जमिनीची किमंत भविष्यात किती असू शकेल, हे कोणीच सांगू शकत नाही. कोठे धरणाचे काम सुरु झाले म्हणून, कोठे रस्त्याचे काम सुरु झाले किंवा रस्ता होणार अशी नुसती खबर लागली म्हणून, किंवा पुढे सरकार विकत घेणार म्हणून, किंवा ती अचानक गावाजवळ आली म्हणून...असा काहीतरी बदल होतो आणि जमिनींच्या किंमतींचा अविश्वसनीय असा चढउतार सुरु होतो.
जगाशी तुलना करायची तर भारताकडे आज सातव्या क्रमांकाची जमीन आहे आणि दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे. याचाच अर्थ जमीन कमी आहे. आपल्याकडे जमीन कमी आहे, हे देशात पसरलेल्या माळरानांकडे पाहिले की खरे वाटत नाही, मात्र ती वस्तुस्थिती आहे. ज्या जमिनीवर सर्व सजीव सृष्टी फुलली आहे, त्या जमिनीकडे आपले किती लक्ष आहे, असा विचार जरी मनात आला तरी आपण जमिनीवर किती अन्याय करतो आहोत, हे जाणवल्याशिवाय राहत नाही. नेमक्या याच जाणिवेतून सांगोल्याचे (जि. सोलापूर) तरुण कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांनी पहिली राज्य भूमी परिषद गेल्या आठवड्यात सांगोल्यात घेतली. जमिनीकडे पाहण्याच्या आजच्या दृष्टीकोनात किती बदल होण्याची गरज आहे, ही दिशा या परिषदेने दिली.
विजेच्या टंचाईने अस्वस्थ झालेल्या प्रफुल्ल कदम यांनी चार वर्षांपूर्वी वेड्या बाभळीच्या लाकडापासून वीज तयार करण्याचा प्रकल्प केला होता, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. शेतकरी कामगार पक्षाशी जवळीक असलेला हा कार्यकर्ता ग्रामीण चळवळीचे आपण प्रवर्तक आहोत, असे अभिमानाने सांगतो. महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेवर अशासकीय सल्लागार असलेल्या प्रफुल्ल कदम यांनी ही परिषद घेवून एक धाडस तर केलेच पण सर्वांत महत्वाचे म्हणजे आधुनिक जगात प्रश्नांची झटपट उत्तरे शोधण्याच्या नादात आम्ही जमिनीला विसरलो म्हणजे आईलाच विसरलो आहोत, याची आठवण करून दिली आहे. राज्याच्या एका कोपऱ्यात झालेल्या या परिषदेला म्हणूनच महत्व आहे.
परिषदा तर अनेक होतात, मात्र त्या विषयाचा पाठपुरावा केला जात नाही. या परिषदेचे असे होऊ नये, म्हणून परिषदेची फलनिष्पती काय, याविषयी प्रफुल्ल कदम यांच्याशी बोलताना फार महत्वाचे मुद्दे समोर आले आणि त्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता जाणवली. त्यांनी सांगितलेल्या पुढील गोष्टी मला फार महत्वाच्या वाटतात. १. देशात जमीन सुधारणांना वेग देण्याची गरज आहे. २. जमीन साक्षरतेसाठी काम करण्याची गरज आहे. ३. जमीन खरेदी – विक्रीत प्रचंड फसवणूक सुरु आहे. ती थांबविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याची गरज आहे. ४. नदी नाल्यांच्या प्रवाहांवर प्रचंड अतिक्रमण होत असल्याने जमिनीची तहान भागत नाही आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ५. शिक्षण हा परिवर्तनाचा महत्वाचा भाग असल्याने जमीन व्यवस्थापन महाविद्यालय सुरु करण्याची गरज आहे. ६. जमीन हा केवळ भूमिहीनांचा, शेतकऱ्यांचा किंवा अशा विशिष्ठ समूहाचा आहे, असा विचार न करता तो आपल्या सर्वांचा प्रश्न आहे, असाच सर्वांगीण विचार नियोजनात झाला पाहिजे. ७. सजीव सृष्टी निर्माण करणाऱ्या जमिनीकडे अतिशय संवेदनशीलतेने पाहिले गेले तरच ती आपले पालनपोषण करेल. नाहीतर त्याचे परिणाम मानवाला भोगावे लागतील. ८. जमिनीचा सार्वजनिक कारणासाठी वापर करावयाचा असल्यासच सरकारने जमीन हस्तांतरात भाग घ्यावा, नसता खासगी उद्योगांना जमीन उपलब्ध करून देण्याच्या फंदात सरकारने पडू नये. ९. भारतात घरांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे, त्यामुळे जेथे पडित जमीन आहे, तेथे सोयी निर्माण करून तिचा योग्य वापर करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज आहे. १०. १९६६ साली कायद्यात दुरुस्ती करून खासगी मालकीवरील झाडे त्या मालकाचीच संपती असल्याचे मान्य करण्यात आले, मात्र त्यामुळे झाडांची संख्या वेगाने कमी होते आहे, या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याची गरज आहे.
प्रफुल्ल कदम यांचा हा प्रयत्न ही आधुनिक काळात जमिनीच्या प्रश्नांकडे पाहण्याची सुरवात ठरेल, असे वाटते. परिषदेत झालेल्या मंथनावर आधारित ‘भूमीचे प्रश्न’ नावाची एक पुस्तिका प्रसिद्ध करण्याचे त्यांनी ठरविले आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून माणूस पुन्हा ‘जमिनीवर येण्याची’ प्रक्रिया सुरु होईल, अशी आशा करू यात.

मानवाचे मूळ जमिनीत असावे...
मानवाला सर्वात मोठी धोक्याची गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे जमिनीपासून वेगळे केले जाणे. ज्याप्रमाणे प्रत्येक वृक्षाचे मूळ जमिनीत असते तसाच प्रत्येक मनुष्याचा संबंध जमिनीशी असलाच पाहिजे. मनुष्याला जमिनीपासून वेगळे करणे हे वृक्षाला जमिनीपासून वेगळे करण्यासारखेच आहे. आम्ही वर्तमानपत्रात वाचतो की अमेरिकेत दर दहा मनुष्यात एक मनुष्य मानसिक आजाराने पिडीत आहे. याचे कारण तेथे मनुष्य जमिनीपासून वेगळा केला जात आहे. माझा असा विचार आहे की, मनुष्याचे जीवन जितके पूर्ण होईल तितका तो सुखी होईल. भूमीसेवा पूर्ण जीवनाचे एक अनिवार्य अंग आहे. शेतीमुळे मोकळी हवा व सूर्यप्रकाश मिळतो. त्याने आरोग्यलाभ होतो. शेतीमुळे मानसिक आनंद मिळतो. जितक्या लोकांना पूर्ण जीवनाची संधी मिळेल, तितकी समाजात शांती व समाधान नांदेल. म्हणून प्रत्येकाला कमीत कमी एक चतुर्थांश एकर तरी जमीन मिळेल, अशी गावाची रचना करायला हवी.
विनोबा भावे.
(राज्य भूमी परिषदेच्या पत्रिकेत समाविष्ट केलेले विनोबांजींचे चिंतन)

No comments:

Post a Comment