Tuesday, April 26, 2011

स्वाभिमानी ‘बँकमनी’




पैशाच्या व्यवहारांनीच आयुष्याला घेरले असेल तर त्याविषयी बोललेच पाहिजे. सध्या होते आहे काय की सर्वांचे लक्ष पैसा मिळविणे, तो गुंतविणे, त्याचे संपत्तीत रूपांतर करणे याकडे आहे. मात्र त्याविषयी आपण दबत दबत बोलतो. ज्याला आर्थिक व्यवस्थापनाचे महत्व कळले आहे, तो ते करून मोकळा होतो आणि त्याची जशी आर्थिक पत तयार होते, तशी ती समाजातही तयार होते. पैसा कमावणे हा काही मोठेपणाचा एकमेव निकष नाही, मात्र आपली सर्वप्रकारची पत समाजाने पैशाशी जोडायला सुरवात केली आहे, हे आज नाकारता येत नाही. जागतिकरणात समाज एवढा बदलून गेला आहे की तो पैशाची भाषा बोलायला आणि समजायला लागला आहे. त्यामुळे पैशाचा विचार करणे, त्याचे व्यवस्थापन करणे याला आजच्या काळात पर्याय नाही. आणि आणखी पुढे जावून सांगायचे तर हा बदल आम्ही चांगल्या पद्धतीने न स्वीकारल्यामुळेच आजचे व्यवस्थेतील गोंधळ धुमाकूळ घालत आहेत. ते व्यवस्थेतील गोंधळ आहेत याचा अर्थ ते आमचे कुटुंब, आमच्या भावभावना, आमचे व्यवहार, आमचे आरोग्य आणि एकंदरच आमच्या भूत-वर्तमान-भविष्यातील सुखदुःखाशी दररोज भिडत आहेत. त्याची दखल आता आपण घेतलीच पाहिजे, हे सर्व विचारी माणसांच्या लक्षात येवू लागले आहे.
मुद्दा असा आहे की आमच्या देशात जो गोंधळ सध्या माजला आहे, त्याचे खरे कारण काळ्या पैशाच्या राक्षसालाच आम्ही खायला घालतो आहोत, हे आहे. गेल्या 63 वर्षांत तो इतका धष्टपुष्ट झाला आहे की आता त्याला रोखणे सर्वांनाच अशक्यप्राय वाटायला लागले आहे. पैशाचा अभाव असलेले आणि प्रचंड पैसा बाळगणारी असे दोन्ही प्रकारचे भारतीय सध्या चिंतीत आहेत. अधाश्यासारखे नको तितके खाल्ल्यावर जसे पोट दुखायला लागते, तसे आता पैसा असणार्‍यांचेही पोट दुखायला लागले आहे आणि ज्यांना दोनवेळचे अन्नही धड मिळत नाही, ती माणसे आपल्यापासून तुटत चालली आहेत.
सर्वांची झोप उडविणारा काळा पैसा कमी करायचे म्हणजे काय करायचे, यासाठी आपल्या अर्थव्यवस्थेचे एकदा एक मोठे ऑपरेशन करावे लागेल, हे ‘अर्थक्रांती’ गेली 12 वर्षे सांगतेच आहे आणि आता ते अधिकाधिक नागरिकांना पटू लागले आहे. अर्थक्रांतीच्या पाच प्रस्तावांनी भारावून जावून याशिवाय आपल्या देशासमोर पर्याय नाही, याविषयी दुमत नाही, हेही बहुतांश नागरिक मान्य करतात. पण मग हे कोण करणार , असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर आहे... अर्थक्रांतीच्या दिशेने निघण्याचा पहिला मार्ग आहे- देशात ब्लॅकमनीऐवजी बँकमनी वाढविण्याचा. हा जो लबाडीचा ‘ल’ आमच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवहारांमध्ये घुसला आहे, त्याला दूर करायचे आहे. हा बदल 120 कोटी भारतीयांचे आयुष्य बदलून टाकणार आहे. पैसा हे व्यवहार करण्याचे साधन म्हणून वापरण्याऐवजी आम्ही तो संपत्तीसारखा दडवून ठेवायला लागलो आहोत. सोप्या शब्दात सांगायचे तर आमच्या देशात बँकेचे व्यवहार वाढले पाहिजे. ते व्यवहार करणार्‍यांची संख्या वाढली पाहिजे. असे मी का म्हणतो आहे, हे पुढे दिलेल्या बोलक्या आकडेवारीवरून स्पष्ट होईल.
आकडेवारी असे सांगते की सुमारे 65 टक्के भारतीयांना अजून बँकव्यवहार करण्याची तर 85 टक्क्यांना पत किंवा कर्ज सुविधा उपलब्ध नाही. आमच्या देशात 6000 हजार खेडी आहेत, त्यातील निम्म्या खेड्यांमध्ये अजूनही व्यापारी बँका नाहीत. बँकांचे राष्ट्रीयीकरण 1969 मध्ये झाले, त्यावेळी 8,700 बँकशाखा देशात होत्या त्या गेल्या 41 वर्षांत 85,300 वर पोहचल्या, मात्र त्यातील 32,000 च शाखा ग्रामीण भागात आहेत. आणखी धक्कादायक आकडेवारी म्हणजे प्रत्येक 13,900 म्हणजे सुमारे 1400 लोकसंख्येमागे एक शाखा असे हे प्रमाण पडते. बँकासंबंधीची अशी आकडेवारी या अंकात तुम्हाला पाहायला मिळेलच. आज बँकींग करायचे म्हटले तरी किती अडचणी आहेत, आणि या का आहेत्‍, याच आपल्याला कल्पना यावी. ज्या अमेरिकी आणि पाश्चिमात्य देशांमधील व्यवस्था आम्ही आदर्श मानतो, त्या सर्व समाजांमध्ये 100 टक्के बँकींगच्या दिशेने प्रवास सुरू आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे.
एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे स्वातंत्र्याच्या 63 वर्षांनंतर आम्हाला भारतीय नागरिक या नात्याने देशात पांढरा पैसा वाढवायचा आहे. कमी व्याजदरात उद्योगव्यवसायासाठी कर्ज हवे आहे. आम्हाला पारदर्शक व्यवहार हवे आहेत. भ्रष्ट्राचाराची कीड काढून आम्हाला टाकायची आहे. आम्हाला जात, धर्म, पंथ , वर्ण , भाषा , राज्य या भेदापलिकडे जावून मानवी प्रतिष्ठा देणारे आयुष्य जगायचे आहे आणि तेवढेच महत्वाचे म्हणजे आम्ही ज्यांच्यावर अतिशय प्रेम करतो , त्या आमच्या पुढील पिढ्यांसाठी चांगले जग निर्माण करणारी व्यवस्था द्यायची आहे. हे जे आज स्वप्न वाटते, ते प्रत्यक्षात येण्यासाठीचा पहिला आणि अपरिहार्य टप्पा आहे....बँकमनी वाढणे म्हणजेच अर्थक्रांती होण्यासाठी बळ उभे करणे. ते करायचे म्हणजे काय , हे तुम्हाला ‘अर्थपूर्ण’च्या पानापानांवर वाचायला मिळेल.
हा प्रवास आपण सर्वजण एकत्र येवून करू यात.