Sunday, January 1, 2012

कोणाला का झाली आहे जगाच्या अंताची घाई ?


कलियुगच म्हणत असाल तर ते बुडणार नाही, ते बदलणार आहे. काळ आणि अवकाशाला अंत नाही, ते अनंत आहेत, त्याला आपण कसे मोजणार? पण मोजायचेच तर ते बुडण्यासाठी का? बदलण्यासाठी मोजू यात. ते पाहा...त्या बदलाच्या दिशेने 2012 निघाले आहे.

एक भविष्यवाणी सांगते की, 2012 साल जगाचा शेवट करण्यासाठी उगवले आहे. याच 12 महिन्यात किंवा 366 दिवसांत जग बुडणार आहे. म्हातारी माणसे आताआता पर्यंत म्हणताहेत की कलियुगात काहीही होवू शकते आणि त्याला अध्यात्मिक गुरुही साथ देतात की कलियुगाची सगळी वर्ष संपली नसली तरी पाप फार झाले आणि अंत जवळ आला आहे. जग बुडणार म्हणजे नेमके काय होणार? जलप्रलय होणार, ब्रम्हांड फुटणार, महायुद्ध होणार की धरणी फुटणार, हे मात्र कोणी सांगू शकत नाही. जगाचा अंत जवळ आला आहे, याविषयी मात्र सर्वांचे एकमत आहे.

पिण्याच्या पाण्याहून महायुद्ध होणार आहे. लोकसंख्येचा विस्फोट होणार आहे. सूर्याच्या लाव्हयाने सजीवसृष्टी भाजून निघणार आहे. हिमवादळांनी होत्याचे नव्हते होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकतर वादळी पाऊस कोसळणार आहे किंवा तो एकदमच थांबणार आहे. जगाचा अंत करू शकणार्‍या अशा कित्येक कल्पना. कोणी म्हणतात याला शास्रीय आधार आहे. पण मग हवामानाचे अंदाज का खरे ठरत नाहीत आणि धरणीकंपाची चाहूलही का लागत नाही?

एकेकाळी हिरवा शालू पांघरलेली धरती आज ओडखी बोडखी दिसते म्हणतात. बर्फांचे थर कोठे वाढत आणि कोठे आटत चालले. सुनामी, वादळांची वारंवारता वाढत चालली. कोठे कोठे तर पाऊस थांबतच नाही आणि कोठे तर गेले काही वर्षे पडतच नाही. कोठे समुद्र अतिक्रमण करून किनारे आपल्या ताब्यात घेतो आहे. कोठे जमिनीतून दररोज आवाज येतात. कोठे जमिनीला अचानक भलीमोठी, भीतीदायक भेग पडते. कोठे जमिनीच्या पोटात पाण्याचेच ऍसिड होते आणि कोठे तर ऍसिडचाच पाऊस पडतो. जगाच्या अंताच्या पाउलखुणा यालाच तर म्हणत नसतील आणि म्हणूनच अंतराळातील पृथ्वीचा शोध घेण्याचे काम मानवाने आरंभिले नसेल?

शिकारच मिळाली नाही म्हणून बिबटे जसे आताच्या मनुष्यवस्तीत घुसतात, शहरात नव्याने झालेल्या वसाहतीत सुरवातीला बरेच दिवस साप निघतात, माणसाने बुजविलेल्या नदी आणि ओढ्याचा प्रवाह जसा त्याच शेकडो वर्षांच्या वाटेने जाण्याचा हट्ट धरतो आणि विध्वंस घडवितो. महामार्गावरील पाडलेल्या महाकाय झाडावरची पक्ष्यांची शाळा काही दिवस भरतेच भरते... तसाच तर नसेल हा जगाला अंताकडे घेवून जाणारा उन, वारा, पर्वत, पाऊस, समुद्र आणि मातीचा प्रवास?

मिलनानंतरच्या काही दिवसात हृदयापासून सजीव जन्माची सुरवात होते, म्हणतात. म्हणजे तोच त्याचा जन्माचा क्षण. जो कोणीच सांगू शकत नाही. मग काही कोटी पेशी जन्म घेतात आणि गर्भात एक सोहळा साजरा होतो. एका उदरातून दुसर्‍या उदराचे भरण होते आणि काही काळ दोन जीव एका जीवासारखे जगतात. डोळे, नाक, कान, हातपाय, पोट, केस, तोंड, लिंग....आणि लाल रक्त ... सगळं काही जशास तसे आणि जेथल्या तेथे. फरक फक्त मनाचा. पण तो कधी प्रवेश करत असेल, या किल्ल्यात?

मग सुरू होतात मनाचे खेळ. रडण्याचे, हसण्याचे, हट्टाचे, राग-लोभाचे. नाव देण्याचे आणि नाव कमावण्याचे. आनंद आणि दुःखाच्या व्याख्या शोधण्याचे. कोण पुढे पळतो याचे. यंत्र-तंत्र-मंत्रांचे. रंग-गंध-बंधांचे. सत्ता संपत्तीचे. अधिकाराचे. माझे-तुझे, कुटुंबाचे, गावाचे, देशाचे, खंडाचे आणि जगाचे. काळ मोजण्याचे, गती वाढविण्याचे. सीमा आखण्याचे. जसा मनाने प्रवेश केला, तसाच ते त्यागही करणार हे ठरलेलेच असते. पण हा खेळ खेळल्याशिवाय संपतो कोठे?

कोणी म्हणतो, हे सर्वांसाठी आहे. सर्वांनी म्हणजे ज्याला जेवढे पाहिजे तेवढे त्याने वापरावे. कोणी म्हणतो, जो जिंकला त्याने वापरावे, जो हरला त्याने जेवढे मिळाले, तेवढेच आपले म्हणावे. कोणी म्हणतो, मी ठरविणार ते कसे आणि किती वापरावे. कोणी म्हणतो वारश्यांसाठी, कुटुंबासाठी, देशासाठी ठेवावे. कोणी म्हणतो, या खेळानेच विचका केला. संघर्ष पेटतात. मातीतले मातीत एकरुप होण्यासाठीचे एकएक मार्ग म्हणून तर हा खेळ खेळला जात नसेल?

जग बुडणार हे माहीत असताना मग कोट्यवधी गर्भांमध्ये नवनिर्मितीचे अंकुर का फुलताहेत? सजीव पेशींची वीण अव्याहत का सुरू आहे? मानवनिर्मित सर्वोच्च टॉवरमध्ये आणि जंगलात जेथे अजून मानवाची पावलेही पडली नाहीत, तेथेही नव्या जीवांचा जगात पदार्पण करण्याचा क्रम तर थांबलेला नाही! एवढेच काय पण आपल्या वारसाने याच मातीत जगून आपल्या वारसाला जन्म द्यावा, हे स्वप्न पाहणे तरी कोणी सोडले आहे?, आणि का सोडावे?

हे पाहा, आता या.., या.., आणि याही क्षणाला कोट्यवधी जीवांनी गर्भात प्रवेश केला. या क्षणाला तेवढ्याच मनांनी खेळ खेळण्याचा मनोदय जाहीर करून त्या जीवाला नाव दिले. आणि त्याच क्षणाला जवळपास अगणित पेशींनी आपला नवनिर्माणाचा यज्ञ आरंभिला आहे. तेवढेच जीव गर्भातून बाहेर येण्याची वाट पाहात आहेत, तर तेवढ्याच जणांनी या जगात नुकतेच पाऊल ठेवले आहे. तेवढ्याच जणांनी जगायला नुकतीच सुरवात केली आहे. मग कोणाला का झाली आहे जगाच्या अंताची घाई?

कलियुगच म्हणत असाल तर ते बुडणार नाही, ते बदलणार आहे. काळ आणि अवकाशाला अंत नाही, ते अनंत आहेत, त्याला आपण कसे मोजणार? पण मोजायचेच तर ते बुडण्यासाठी का? बदलण्यासाठी मोजू यात. ते पाहा...त्या बदलाच्या दिशेने 2012 निघाले आहे.

No comments:

Post a Comment