Tuesday, August 17, 2010

केवळ युनिकोड नव्हे, ‘मराठी युनिकोड’

मराठी फॉण्टच्या आणि की-बोर्डच्या गदारोळात आणखी फॉण्ट्स आणि की-बोर्डची गरज आहे काय, याचे उत्तर ‘नाही’ असेच असायला हवे. मात्र जगातल्या पंधराव्या क्रमांकाच्या आणि एका उत्कृष्ट भाषेच्या वाटयाला जी अवहेलना आली आहे, ते पाहता ती गरज आहे, असेच म्हटले पाहिजे. संगणकात मराठी भाषा वापरातील सर्व अडथळे दूर झाले पाहिजेत, ती सोप्या पद्धतीने वापरता आली पाहिजे, मराठी भाषेचे स्वत्व अबादित ठेवून ती जगाशी जोडली गेली पाहिजे, संगणकात वापरताना ती कोठेही कमी पडता कामा नये आणि हे स्वीकारण्यासाठी मराठीजनांना मोठा आर्थिक भुर्दंड पडायला नको, या चार गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत, याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. हे चारही निकष पुर्ण करणारा फॉण्ट आणि कीबोर्ड आपल्याला हवा आहे. मराठी भाषेच्या व्यवहारातील आणि पर्यायाने संगणकातील वापरावर ज्या मर्यादा आल्या आहेत, त्याची कारणे म्हणजे या गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. सरकार, मराठी भाषाविकासाचे निर्णय घेणारे धुरीण आणि ती वापरणारे मराठीजन यांची स्थिती एक हत्ती आणि सहा अंधांसारखी झाली आहे. कोणाला व्याकरण कळते तर संगणक कळत नाही, संगणक कळतो तर भाषा कळत नाही आणि ज्यांना वापर करायचा ते वेगवेगळे प्रयोग करून परेशान झाले आहेत. या प्रवासात मराठी भाषेचे न भरून येणारे नुकसान होते आहे.

आता प्रश्न असा आहे की या अडथळयांवर मात करणारा काही मार्ग आहे का ? हो , आहे आणि मराठी समाज आणि सरकारने त्याचा शक्य तितक्या लवकर अवलंब केला पाहिजे. ‘शोध मराठीचा’ या संशोधनाने अलिकडेच शोधून काढलेला ‘मराठी युनिकोड’ (केवळ युनिकोड नव्हे ) हा त्यावरचा मार्ग निश्चितपणे ठरू शकतो.
वर ज्या चार निकषांचा उल्लेख केला, ते चारही निकष ‘मराठी युनिकोड’ने पुर्ण केले आहेत. त्यामुळे तो महाराष्ट्र सरकार, मराठी विकासासाठी काम करणार्‍या सरकारी अनुदानित संस्था, शाळा- महाविद्यालये आणि सर्वच मराठीजनांनी स्वीकारण्याची गरज आहे. मराठी भाषेला यापुढे संगणकात वावरावेच लागणार आहे आणि त्यासाठी हे निकष पुर्ण करणारे फॉण्ट आणि की-बोर्ड स्वीकारावेच लागणार आहेत, हे या विषयातील तज्ञांनी समजून घेतले तर मराठी भाषेसमोरची आव्हाने पेलणे सोपे होणार आहे.

‘मराठी युनिकोड’ हे चार निकष कसे पुर्ण करतो, हे आता आपण पाहू. संगणकात मराठी भाषा वापरातील सर्व अडथळे दूर झाले पाहिजेत, हा पहिला निकष आहे. मायक्रोसॉफ्ट्ने युनिकोड दिला, याचा अर्थ संगणकात मराठीसारखी भारतीय भाषा वापरण्यातील अडथळे त्यांनी त्यांच्या दृष्टीने दूर केले. याचा अर्थ त्यांनी काही भारतीय भाषांची मोट घातली आणि त्याला युनिकोड नाव दिले. त्यांनी तंत्र म्हणून जे अडथळे दूर केले , त्याबद्द्ल त्यांचे आभार मानून ‘मराठी युनिकोड’ पुढे जातो. ( मायक्रोसॉफ्ट्चा युनिकोड महाराष्ट्रात विकल्या जाणार्‍या प्रत्येक संगणकात ‘ऑन’ असलाच पाहिजे, इतका साधा नियम करायला मात्र आमच्या महाराष्ट्र सरकारला आणि मराठीच्या नावाने गळे काढणार्‍यांना वेळ नाही!)

मराठी सोप्या पद्धतीने संगणकात वापरता आली पाहिजे, हा दुसरा निकष आहे. मराठी लेखन ‘बाराखडी’ या सुत्रातून सहजतेने शिकता येते, हे लक्षात घेवून स्वर आणि व्यंजनांना की-बोर्डवर स्थान देण्यात आले आहे. संगणक इंग्रजांनी बनविले आणि त्यांनी ‘क्‍वेर्टी’ कीबोर्ड आपल्याला दिला. त्याचा वापर करून तो 90 टक्के फोनेटिक करण्यात आला आहे. तो इतका सोपा आहे की मराठी टाईप न करणारा माणूसही सहजपणे टाईप करायला लागतो. जोडाक्षरे टाईप करायला अवघड वाटतात, ती जोडाक्षरेही खूपच सोपी करण्यात आली आहेत.

मराठी भाषेचे स्वत्व अबादित ठेवून ती जगाशी जोडली गेली पाहिजे, हा तिसरा निकष आहे. सध्या मराठी अक्षरे टाईप करताना सतत तडजोडी करा किंवा मराठीची मोडतोड करा अशी जणू सक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे भाषेचे नुकसान होते, हे लक्षात घेतले पाहिजे.‘मराठी युनिकोड’ मध्ये 100 टक्के मराठी टाईप करता येते. दुसर्‍या भाषेच्या कुबडया त्यासाठी घ्याव्या लागत नाहीत. तरीही ती जगाशी जोडली जाते कारण इंग्रजी की-बोर्ड आणि मराठी याचा सुवर्णमध्य त्यात साधण्यात आला आहे. इंग्रजी बोलता न आले तर शाळांमध्ये मुलांना चटके देणार्‍या लाचार मनोवृत्तीच्या समाजात हा सुवर्णमध्य अपरिहार्यच म्हणावा लागेल.

संगणकात वापरताना मराठी भाषा कोठेही कमी पडता कामा नये, हा तिसरा निकष आहे. ‘मराठी युनिकोड’ मध्ये फाईल, फोल्डर यांना मराठीत नावे देणे शक्य होते, तसेच ईमेल. वेबवर आणि इंग्रजी भाषा वापरली जाते अशा सर्व ठिकाणी मराठी वापरता येते. थोडक्यात संगणकात मराठी वापराचे दालन 100 टक्के खुले होते.

‘मराठी युनिकोड’ चे सूत्र स्वीकारण्यासाठी मराठीजनांना मोठा आर्थिक भुर्दंड पडायला नको, हा चौथा निकष आहे. आता हे सूत्र 100 ते 200 रूपयांना उपलब्ध आहे. सरकारने पुढाकार घेतला तर ते मराठीजनांना मोफतही उपलब्ध करता येवू शकते. मराठी भाषा विकासासाठी हा पुढाकार अत्यंत आवश्यक आहे. आतापर्यंत सरकारने या कारणी कोटयवधी रूपये खर्च केल्याचे सांगण्यात येते. हा प्रश्न मुळातूनच संपविण्याची संधी ‘मराठी युनिकोड’ च्या माध्यमातून आली आहे.

भाषाविकासाची गाडी संगणकाचे इंजीन लावल्याशिवाय आता पुढे जावू शकत नाही. मराठीच्या संगणकातील वापरात एकसूत्रता आणण्यासाठी तरूणवर्ग आसुसला आहे. इंग्रजी वापरणारा वर्ग वेगाने वाढत चालला असून त्याला सोप्या पद्धतीने मराठी वापरायची आहे, तर संगणकक्रांतीला मुकलेल्या आधीच्या पिढीलाही संगणक वापरायचा आहे. इंग्रजी आणि मराठीत शिक्षण घेणार्‍या मुलांना आता संगणकाच्या मदतीने मराठी शिकायची आहे. परदेशातील मराठी मुलांनाही मराठी सोपेपणातून आत्मसात करायची आहे. या सर्वांसाठी ‘मराठी युनिकोड’ शिवाय पर्याय नाही.
प्रश्न आहे हा विषय समजून घेण्याचा आणि शक्य तितक्या लवकर त्याची अमलबजावणी करण्याचा !
( अधिक माहितीसाठी www.shodhamarathicha.com /www.soppimarathi.com )

यमाजी मालकर ymalkar@gmail.com