Friday, September 24, 2010

‘सेंद्रीय’ जगण्याला हवे समूहाचे बळ

परवा मेलबॉक्समध्ये एक कविता येवून पडली. सध्या गणोशोत्सव चालू असल्यामुळे त्यासंबंधीच्या शुभेच्छांची आणि गणपतीच्या चित्रांची देवघेव वेबजगतात जोर्‍यात सुरु आहे. पण एकदम कविता पाहिल्यावर तो मेल मी वाचायला घेतला. एका कन्येने ‘बाप्पा’ नावाची ही कविता केली होती. दीपा नावाची कन्या सध्या कॅनडात राहाते, असे तिच्या नावानंतर लिहीलेल्या देशाच्या नावावरुन लक्षात आले. तिने तेथून पाठविलेली कविता माझ्या मित्राने मला मेल केली होती. कॅनडात राहाणारी भारतीय बाई देवाकडे नेमके काय मागते, याचे कुतूहल निर्माण झाले म्हणून ती कविता मी वाचली.

कवितेच्या सुरवातीच्या भागात पृथ्वीच्या सथ्याच्या परिस्थितीविषयीची टिप्पणी होती. या परिस्थितीत गणपती पृथ्वीवर आला तर त्याला कशाकशाचा सामना करावा लागेल, याचे वर्णन होते. शेवटच्या भागात देवाकडे तिने जे मागितले होते, ते वाचून मी अवाक् झालो. खरं म्हणजे तिच्याच शब्दात ते आधी आपण जाणून घेऊ. त्या कवितेची शेवटची आठ कडवी अशी होतीः

मी हसले उगाच, म्हटलं, देशील जे मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं
पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं
सोडून जाता येणार नाही असं एक बंधन हवं
हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव
प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्‍यात थोडासा शिरकाव
देशील आणून परत माझी हरवलेली नाती
नेशील मला परत जिथे आहे माझी माती
इंग्राजळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं
आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं
कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गजर
भांडणारा असला तरी चालेल, पण हवा शेजार
यंत्रवत होत चाललेल्या मानवाला आयुष्याचं
देशील का रे देवा माझ्या पदरात एवढं दान?
‘तथास्तु’ म्हणाला आणि सोंडेमागून हसला.
सारं हाताबाहेर गेलय पोरी ‘सुखी राहा’ म्हणाला

नागरीकरणाच्या रेट्यात आणि अत्याधुनिक काळात ज्या गोष्टींपासून आपण खूप लांब निघून आलो आहोत, त्याच गोष्टी आता आम्हाला हव्या आहेत तर! दीपाचं हे मागणं प्रतिकात्मक मानलं तर सध्या आपण कोठे आहोत पाहा... पारिजातकाचं अंगण ज्या आमच्या गावात कधी आम्ही पाहिलं होत, ते आम्हाला हवं आहे, कारण त्या परिसरामध्ये सुखासमाधानाचा दरवळ आहे, असं आम्ही गृहीत धरलं होतं. पण मोजकी घरं सोडली तर तो दरवळ तेथे नव्हताच मुळी ! म्हणून तर आम्ही त्याचा त्याग करून असुया, द्वेषाचे वास घेत घेत शहरं शहरं फिरतो आहोत. आणि आता आम्हाला पुन्हा तेच हवय ? व्यवहाराचा इतका अतिरेक आम्ही केला आहे की आपण आपल्यासारख्याच हाडामांसांच्या, मनाच्या माणसाशी व्यवहार करतो आहोत, याचाच आम्हाला विसर पडला आहे. ज्यांच्या वाट्याला माणूसपणाची सुखदुःख येत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही काय करत आहोत?

संस्कृतीविषयीचं मागणंही असं प्रत्येकाच्या मनातलं आहे. मात्र तेथूनही आपण इतके दूर आलो आहोत की संस्कृती मागे दिसेनाशी झाली आहे. पुढे जाणं ज्याला आम्ही म्हणत होतो आणि ते जाण्यासाठी जणू निकराची कुस्ती लागली होती, त्यावेळी मागे वळून पाहायलाही कोणाला वेळ नव्हता. एवढंच नव्हे तर त्या तथाकथित संस्कृतीचे पाश सोडून देणं हीच तर पुढे जाण्याची खूण होती ! आमची बदललेली भाषा, प्रदेश, देश हेही संस्कृतीच्या उरावरच उभे आहेत. पोटभरू समाजाला त्याचा संस्कृतीचा त्याग करावाच लागेल, असं जग सांगत होत. आणि खरं सांगायचं तर त्या संस्कृतीने तरी सगळ्यांना कोठे कवेत घेतलं होतं ?


ढोल - ताशांचा गजर आणि शेजार हवा, यात तो कर्कश असला आणि भांडणारा असला तरी चालेल, असे म्हटले आहे. सामूहिक अविष्काराची आणि सहवासाची ही भूक ही अगदी मूलभूत आहे. कलासंगीताच्या अविष्काराचा माणूस नेहमीच भूकेला राहिलेला आहे, मात्र अत्याधुनिक काळात लाखो लोकांच्या आयुष्यात या अविष्कारालाच ‘स्पेस’ राहिलेली नाही. शेजाराचेही तसेच आहे. शेजारापणात आमच्या रम्य आठवणींचा साठा आहे. मात्र ते शेजारपण आमच्या आयुष्यातून जणू हद्दपार झाले आहे. आमच्या धावत्या दिनक्रमात शेजार्‍याचा रांगेतला क्रमांक सारखा मागे- मागे जातो आहे. भांडायलासुद्धा वेळ लागतोच की!

पुढे यंत्रवत होणार्‍या माणसाला थोडं ‘सेंद्रीय’ आयुष्य मिळावं, असं दान मागितलं आहे. आता हे ‘सेंद्रीय’ आयुष्य आणायचं कोठून ? कारणं काही असोत, ‘हायब्रीड’ होण्याशिवाय पर्याय नाही, असं जो तो म्हणायला लागला आहे. ‘सेंद्रीय’राहण्याने का कुणाचं पोट भरतं?, काळ बदलला आता ‘हायब्रीड’ झालंच पाहिजे, अशी प्रचंड चढाओढ सुरु आहे. यंत्राचा वापर करणार्‍याकडे जगातलं शहाणपण आणि सत्ता- संपत्तीचे वाटे जमा होताहेत. या परिस्थितीत ‘सेंद्रीय’ जगण्याची हिंमत कोण करु धजेल?

अखेरीस बाप्पाने आशीर्वाद दिला खरा, मात्र सारं हाताबाहेर गेल्याची हतबलता देवाने व्यक्त केली आहे ! देवही हतबल झाला, असं कवीला म्हणायचं आहे. म्हणजे हे काही चांगलं लक्षण नाही. कॅनडातल्या एका कन्येच्या भावना , केवळ एक कविता म्हणून दुर्लक्ष करता येईल. मात्र मूळ प्रश्नांचं काय करायचं , हा विचार तर केलाच पाहिजे.

मला असं वाटतं , ते तुम्हाला पटतं का बघा. खूप वर्षांपुर्वी बाबा आमटेंनी ‘ सर्वांना आनंदाच्या कवेत घेईल, असा एक सण होऊ दे’ अशी प्रार्थना केली होती. ती प्रार्थना त्यांनी देवाकडे केली असली तरी ती आपल्या सर्वांसमोरही विचारासाठी ठेवली आहे. जगातल्या ज्यांना ज्यांना म्हणून माणूसपणाच्या सुखदुःखात जगायचे आहे, त्यांना बाबांनी केलेले ते आवाहन आहे. माणसाच्या आयुष्यातला अर्थच शोषून घेणारा रस्ता हाच जणू जगण्याचा हमरस्ताच असल्याचे बिंबवले जाते आहे, ही सक्ती एकटादुकटा ‘सेंद्रीय’ माणूस नाकारू शकत नाही. त्यासाठी समूहाचे बळ हवे. या समूहाचा आकार वाढ्ला पाहिजे आणि त्याची शक्तीही वाढली पाहिजे. एक लाट आली आणि ‘हायब्रीड’ जगण्यालाच मानवी जीवन म्हणण्याची सक्ती तिने केली. पोटापाण्याच्या प्रश्नात अडकलेली माणसं लाटेत वाहून गेली. आता ‘सेंद्रीय’ जीवन जगण्याची लाट निर्माण करण्याची वेळ आली आहे.

‘हिंदू’ कादंबरीतला नायक म्हणतो, ‘ एवढया अब्ज अब्ज खर्व खर्व निखर्व वर्षांच्या अवकाशात आपलं आयुष्य दिसतसुद्धा नाही, अदृश्य जीवाणूसारखं. तरी आपण कशाकरता ह्या एवढ्याशा आयुष्यात अमानुष गोष्टी करत असतो?’ याचं भान आलं की अर्थपूर्ण जगण्याची वेगळी व्याख्या करावी लागत नाही.

Tuesday, September 7, 2010

अर्थपूर्ण जीवनाचा अनर्थाशी संग !

जीवनाचा वेग वाढत चालला आहे, त्यामुळे धावपळ वाढली आहे. वेग वाढला कारण ज्याने तो वाढविला तो स्पर्धेत पुढे पळताना दिसतो आहे आणि जो पुढे पळतो आहे त्याला इतरांपेक्षा अधिक आर्थिक लाभ होतो आहे. आर्थिक प्राप्ती वाढलीच पाहिजे कारण जगण्यासाठीच्या बहुतांश गरजा त्यातून भागतात. त्या भागविण्यासाठी किती पैसा लागतो, या प्रश्नाचे निश्चित उत्तर देता येत नाही. खरे म्हणजे देता आले पाहिजे पण प्रत्येकाच्या गरजांची इतकी भिन्नता आपण मान्य केली आहे की अब्जाधीशही आपल्याकडे पुरेसा पैसा आहे, हे मान्य करत नाही. त्याला कोणीतरी त्यापेक्षा श्रीमंत माणूस दिसायला लागला की पैसे कमावण्याच्या स्पर्धेत तो नव्याने भाग घ्यायला लागतो. आज अब्जाधीशाची ‘भूक’ जेथे भागत नाही, तेथे खालच्या उत्पन्नगटातील समूहाची ‘भूक’ भागण्याचा संबंध कोठे येतो ?
भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत या संदर्भाने एक फार चांगले वाक्य आहे. ते आधुनिक समाजाच्या भूकेला चपखल लागू पडते. ते असे आहेः ‘ गेल्या पाच हजार वर्षांत कोणती महानगरं टिकली आहेत ? महानगरं उद्ध्वस्त व्हायला कुर्‍हाडी न् रथ कशाला लागतात ? ऐतखाऊ नागरी समाज आधीच स्वतःच्या आतल्या हिंसेच्या भुसभुशीत पायावर उभा असतो. शिवाय कच्चा माल येणं थांबलं, पाणी बंद झालं, पेट्रोल,गॅस संपले, व्यापार कोसळला, निसर्गाचा कोप, नदीनं पात्र बदललं, की हे फुग्यासारखे फुटतात. फाऽट, फाऽट...’ स्वतःला खाणारा असा एक नागरी समाज आपल्या आजूबाजूला सतत तयार होतो आहे की काय, असा प्रश्न वर्तमानात प्रत्येक क्षणी पडायला लागला आहे. न भागणारी ‘भूक’ अशी सर्वव्यापी व्हायला लागली आहे.
आधी पोटापाण्याच्या प्रश्नांसाठी झटणारी माणसं ते प्रश्न थोडे बाजूला पडले की जीवनात स्थैर्य शोधायला लागतात. स्थैर्य मिळालं की जीवनाचा अर्थ शोधायला लागतात. जीवनाचा अर्थ म्हणजे नेमके काय, हे मात्र स्पष्ट करणं अवघड आहे. त्याची व्याख्या करता येत नाही, कारण जीवनाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो. पेच असा आहे की प्रत्येकाचा जीवनाचा अर्थ वेगळा असला तरी तो केवळ वैयक्तिक प्रयत्नांनी साध्य होत नाही. त्याला स्वतःसोबतच परिसराची, समूहाची आणि निसर्गाची साथ मिळावी लागते. आधुनिक समाज स्वतःला सोडून पुढील तीनही घटकांना विसरला आहे, असे सध्याच्या सार्वजनिक जीवनाकडे आणि संभ्रमित माणसांच्या टोळ्यांकडे पाहिल्यावर म्हणावे लागते.
आधुनिक म्हणविणार्‍या सध्याच्या नागरी समाजाने आपले आयुष्य किती वेदनामय करून घेतले आहे , हे गेल्या आठवड्यातील एका दिवसाचे वर्तमानपत्र वाचल्यावर अधिक अधोरेखित झाले. या घटनांची नोंद ही एका दिवसाची असली तरी हे वर्तमान आपण दररोजच वाचतो, हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल.म्हणजे ‘आज’ चा ‘काल’ दररोजच होत असतो. त्या दिवसाच्या वर्तमानात पाकिस्तानच्या पुरस्थितीतील भुकेल्यांची कहाणी होती. एकीकडे कोटयवधी रूपयांची करचुकवेगिरी उघडकीस आली होती तर दुसरीकडे करांच्या ओझ्याने वाकलेल्या नागरिकांना प्राप्तिकरात नव्या बदलांचे आमिष केंद्र सरकारने दाखविले होते. जीवनाच्या स्पर्धेत पुढे जाऊ इच्छिणार्‍या पाच न्यायाधीशांनी परीक्षेत कॉपी केली होती आणि त्यामुळे त्यांच्यावर सेवेतून निलंबित होण्याची वेळ आली होती. शहरात प्रचंड रोगराई वाढल्यामुळे रूग्णालये कमी पडताहेत, अशी वेळ या समुहावर आली होती. दोन शहरे जोडण्यासाठीच्या महामार्गांवर लुटमारीच्या घटना वाढल्याची नोंद त्याच दिवशी होती. याच नागरी समाजात कसेबसे जीवन कंठणार्‍या अपंग उद्योजकांना आपल्या मालावर व्हॅट कर नको म्हणून मागणी करण्याची वेळ आली होती. त्याच प्रकारचा नागरी समाज चीन देशामध्ये जगतो, तेथे एका महामार्गावरील वाहतुककोंडी म्हणे महिनाभराने सुटणार होती. जगाच्या दुसर्‍या टोकाला त्याच प्रकारच्या कोंडीने नागरीक दररोज परेशान झाल्याची बातमी त्याच पानांवर होती. एका महापालिकेने आपल्या हद्दीबाहेरून येणार्‍या रूग्णांसाठी जादा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे एका गावातील रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी कामावर येत नसल्याने तेथील शिपाईच ते चालवत होता ! आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका नगरात सुट्या पैशांची चणचण निर्माण झाल्याचे वृत्त होते. तेथील बँकेला म्हणे पोलिसांचे संरक्षण मिळत नसल्याने सुटी नाणी आणायची भीती वाटत होती. मला वाटते वानगीदाखल एवढया घटना पुरेशा आहेत. ‘जगाचा आरसा’ असे आपण माध्यमांना म्हणतो. कालच्या जगाची म्हणजे पर्यायाने आजच्या जगाच्या आरशात नागरी समाज असा असुरक्षित, भांबावलेला, तणावग्रस्त असा दिसतो आहे.
दररोजच्या या नोंदीमध्ये काय दिसते पाहा... अंतिमतः जीवनाचा अर्थ शोधायला निघालेला हा समूह आपल्या परिसरातील अभावग्रस्त परिस्थितीने परेशान झाला आहे. ज्यांच्या जीवनातील भौतिक अभाव संपला आहे, ती माणसेही पुढ्च्या काही प्रलोभनांसाठी वखवखली आहेत. जेथे आपण वेग वाढविला आहे, असे वाटायला लागले होते, तेथे असुरक्षितेने ग्रासले आहे. वाढलेल्या रोगराईतून आपली सुटका नाही, या चिंतेने त्याचा ताबा घेतला आहे. आपल्यातील दुर्बलांना जगण्याचे साधन दिले पाहिजे, याविषयी दुमत नसलेल्या या समाजात त्यासाठी अधिक काही करण्याची वेळ येते तेव्हा मात्र एकमतासाठी झटावे लागते. याच आधुनिक समाजावर हद्दीतले आणि हद्दीबाहेरचे रूग्ण असा भेद करण्याची नामुष्की आली आहे. त्या नगरापासून जवळच असलेल्या गावात तर रूग्णांवर आपला जीव रूग्णालयातील शिपायाच्या हवाली करण्याची वेळ आली आहे. सुट्या पैशांची चणचण निर्माण होण्याच्या घटनेने तर आधुनिक समाजाच्या अंगावरील राहिलीसुरली वस्रही काढून टाकली आहेत. आमच्या आधुनिक समाजाचा दररोजचा दिवस असा उगवतो आणि असाच मावळतो, मग यात जीवनाचा अर्थ आपण कसा शोधणार आहोत ?
या सर्व वर्तमानाचा मी एक अर्थ घेतला तो म्हणजे माणूस ज्या रस्त्याच्या शोधात निघाला होता, तो हा रस्ता खचितच नव्हे. काहीतरी गडबड आहे, एवढे नक्की. ही जी गडबड आहे, तिचा विचार आपण या ‘अर्थपूर्ण’ मध्ये करणार आहोत. केवळ गडबडीची चर्चा करून थांबणार नाही, तर जगाचे व्यवहार शक्य तितक्या प्रामाणिक, संवेदनशीलतने झाले पाहिजेत आणि माणूसपणाची प्रतिष्ठा कोणत्याही ‘इझम’ मध्ये जपलीच पाहिजे , असे ठामपणे वाटणार्‍या सर्वांच्या मनात नेमके काय दडून बसले आहे, हे शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे.
संपादक म्हणून काम करताना एका सज्जन माणसाने मला एक प्रश्न विचारला होता. ‘जगात घडणार्‍या वाईटच घटना जणू माध्यमे एकत्र करतात, असे अनेकदा वाटते. खरे तर जीवन सुसहय व्हावे यासाठी प्रयत्नशील असणारी कितीतरी माणसे आपल्या आजूबाजूला आहेत. ती एकांडे शिलेदार म्हणून काम करत आहेत. त्यांची मात्र माध्यमे ठळक दखल घेत नाहीत. त्यांचे काम समाजासमोर आणत नाहीत, असे का ? ‘ मी त्या क्षणाला काही उत्तर देऊ शकलो नाही. मात्र माझ्या मनातून त्या वाचकाचा प्रश्न जातच नव्हता. पण मी लगेचच अशी माणसे शोधायला सुरवात केली. अशी खूप माणसे आपल्या आजूबाजूला आहेत, हे लगेच लक्षात आले. माध्यमांमध्ये व्यावसायिकतेला महत्व देण्याच्या नावाखाली काय होते आहे, हे दिसतच होते. मात्र त्यात आपण काय करू शकतो, हे लक्षात येत नव्हते. एक दिवस ते लक्षात आले. मी ‘उकल’ नावाचे सदर लिहायला सुरवात केली. आपले दररोजचे जीवन अर्थपूर्ण करणार्‍या माणसांना समाजासमोर आणण्याची संधी मी घेतली आणि त्या सज्जन माणसाच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
आपण सर्वच जण अर्थपूर्ण जीवनाच्या शोधात आहोत. वैयक्तिक जीवन आणि त्या पाठोपाठ सार्वजनिक जीवन अर्थपूर्ण करण्याची आज गरज आहे. ही गरज पूर्ण कशी करता येईल, तसा प्रयत्न करणारी कोणती माणसं आहेत, जगातल्या कोणत्या व्यवस्थांनी जीवन अर्थपूर्ण करण्याच्या वाटा शोधल्या आहेत, त्यांच्या कोणत्या पावलांवर पाऊल टाकले तर जीवन अर्थपूर्ण होण्यास मदत होईल, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ‘अर्थपूर्ण’ हा प्रवास आहे.

Thursday, September 2, 2010

हे खरे की ते खरे ?

एका दैनिकाची नव्याने सुरू झालेली पुरवणी अशात वाचनात आली. पुरवणीचा विषय पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर असला तरी या पुरवणीत विशिष्ट भागातील बांधकामविषयक घडामोडींवरच भर देण्यात आला होता. पुणे, पिंपरी-चिंचवडचा कसा वेगाने विकास होतो आहे, हे वर्णन सध्या वेगवेगळया पद्धतीने केले जाते आहे आणि वेगाने होणारी बांधकामे यालाच विकास असे नाव दिले जाते आहे, याचे सखेद आश्चर्य वाटते. ही संपादकीय मजकूराची पुरवणी होती, हे नमूद केले पाहिजे. केवळ जाहिराती मिळण्यासाठी हल्ली स्वतंत्र पुरवण्या काढल्या जातात, त्याप्रकारची ही पुरवणी नव्हती. या पुरवणीतील मुख्य म्हणजे पहिल्या पानावरील लेख वाचून धक्का बसला. संपादकीय मजकुराची निवड या पद्धतीने होउ लागली तर वाचकांनी त्यावर विश्वास का ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित होतो.
या लेखातील काही उल्लेख कसे शिताफीने करण्यात आले होते, हे लक्षात येण्यासाठी काही उदाहरणे दिली पाहिजेत. ‘...... या भागात राहायला येणार्‍यांची संख्या कमालीची वाढली आहे.’, ‘ या सर्व सेवासुविधांमुळे ...... हे नवीन आकर्षक ठिकाण झालेले असून नव्याने पुण्यात येणार्‍यांकडून या भागाला प्राधान्य दिले जात आहे.’, ‘ पाणी, रस्ते आणि वीज याचा तुटवडा आता राहिलेला नाही. रस्ते चकाचक झाले असून आता पाण्याचाही तोटा नाही.’ ‘ हा रस्ता चौपदरी केल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे.’ ‘विशेष म्हणजे.... महापालिका पायाभूत सुविधा पुरविण्यात आघाडीवर आहे.’, ‘ सेवासुविधांच्याबाबतीत कोठेही कमतरता नसल्याने नवे पुणेकर होणार्‍या लोकांकडून या भागात राहायला येणार्‍यांची संख्या वाढली आहे.’, ‘ हा परिसर आता अलिशान इमारतींनी सजला आहे.’, ‘ गेल्या काही वर्षांत .... या भागाचा कायापालट झालेला दिसतो.’
ही वाक्ये उदाहरणादाखल दिली आहेत. त्यातील काही विधाने बातमीदार असलेल्या लेखकाची आहेत तर काही बांधकाम व्यावसायिकांची आहेत. पण मजकूराची सरमिसळ अशी करण्यात आली आहे की ती नेमकी कोणाची आहे, हे परि्च्छेदाच्या अखेरपर्यंत गेल्याशिवाय लक्षातच येत नाही. पुणे, पिंपरी-चिंचवड्च्या ज्या नव्या भागांचा उल्लेख लेखात करण्यात आला आहे, त्या भागातील अलिशान इमारती आणि सेवासुविधांची छायाचित्रे त्यात वापरलेली आहेत. विशेष म्हणजे या पुरवणीत प्रामुख्याने लेखात नमूद केलेल्या भागातीलच जाहिराती आहेत. त्याही बांधकाम व्यावसायिकांच्या आहेत. त्याचा पुढचा भाग अधिक आक्षेपार्ह आहे. तो म्हणजे ज्या बांधकाम व्यावसायिकांच्या जाहिराती आहेत, त्याच चार जणांच्या मतांना लेखात स्थान देण्यात आले आहे. जाहिरातींसाठीची पुरवणी म्हणूनच ती प्रसिद्ध झाली असती तर हे सर्व एकवेळ समजण्यासारखे होते, मात्र संपादकीय मजकूराची पुरवणी असताना मजकूराचा आणि जाहिरातींचा असा थेट संबंध जोडण्यात आला आहे ! शिवाय जाहिरातीच्या आकारानुसार बांधकाम व्यावसायिकांच्या प्रतिक्रियांना प्राधान्य देण्यात आले आहे !
असा मजकूर पाहिल्यावर काही प्रश्न मनात येतात, ते असेः वस्तुस्थिती वाचकांपर्यत पोचविण्याच्या कर्तव्यामध्ये या प्रकारच्या मजकूराने कसूर केली नाही का ?, इतर वेळी सेवासुविधांच्याच्या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात येते मग त्यात कमतरता राहिलेली नाही, असे विधान दुटप्पीपणाचे नाही काय ?, संपादकीय मजकूराचा आणि जाहिरातींचा असा थेट संबंध जोडणे ही वाचकांची फसवणूक नाही काय ?
छापील शब्दांवर लोकांचा आजही विश्वास आहे, असे म्हटले जाते, आणि ते खरेही आहे. पण या पद्धतीची फसवणुक होत राहिली तर तो वेगाने कमी होत जाईल. ज्याने आपले आर्थिक हितसंबंध जपले त्याच्या नावाचा जयजयकार हे राजकारणात आपण नेहमी पाहतो. आता हा मिंधेपणा माध्यमांमध्ये दिसायला लागला आहे. आपल्या मालाची, सेवेची जाहिरात करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यामुळे त्याविषयी आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्यासाठी फक्त जाहिरातींना वाहिलेल्या पुरवण्या काढल्या जातात. या पुरवणीतला मजकूर जाहिरातदारांना पूरक असतो. माध्यमांची ही गरज आता सर्वांनीच मान्य केली आहे. मात्र या प्रकारच्या संपादकीय पुरवण्यांमध्ये अशी सरमिसळ करणे, ही वाचकांची घोर फसवणूकच आहे.
नागरिकांचा संभ्रम दूर करण्याचे काम माध्यमांनी केले पाहिजे, मात्र अशा मजकुराद्वारे तो संभ्रम वाढविला जातो आहे. माध्यमांचा कारभार व्यवसाय म्हणून चालला आहे, याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही, मात्र ज्यावेळी वाचक, श्रोता आणि दर्शक याच्या फसवणुकीत माध्यमेच सहभागी व्हायला लागली तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा ?
यमाजी बाळाजी मालकर / ymalkar@gmail.com