Wednesday, August 24, 2011

हे आहेत भ्रष्ट आचाराचे जागतिक बळी !

अक्कलहुशारी हेच भांडवल मानणारी माणसे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा पैसा आपल्याच ताटात ओढून घेण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेचा कडेलोट झाल्यामुळे आजचे जग अडचणीत आले आहे. हे अडचणीत येणे केवळ कागदी पैशांपुरते असते तर दुर्लक्ष करता आले असते, मात्र कमी वेळात भरपूर पैसा कमावून राहिलेल्या वेळात काय करायचे, हे कळत नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या आरोग्याचा बळी द्यायला सुरवात केली आहे.‘धनलोभामुळे यंत्रांच्या मागे लागणे, हे महापाप आहे. मनुष्याला कठोर श्रम वा निरस कामापासून वाचवायला हवे. अशा मानवप्रेमातून निर्माण झालेले यंत्रच कल्याणकारी असेल – जसे, सिंगरचे शिलाई यंत्र. मनुष्याच्या अवयवांना कामाअभावी जडत्व आणणारी, त्यांना निरूपयोगी बनविणारी यंत्रे नकोत. लाखो लोकांवर कामाअभावी उपाशी फिरण्याची वेळ आणणार्‍या यंत्रवेडाला सर्वोदयाचा विरोध आहे’.

महात्मा गांधी, ‘हिंद स्वराज्य’ (1909)
तब्बल 102 वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या ‘हिंद स्वराज्य’ या ऐतिहासिक पुस्तिकेची आज आठवण होण्याचे कारण आहे अलिकडेच प्रसिद्ध झालेली एक बातमी. काही माध्यमांनी या बातमीला ठळक प्रसिद्धी दिली तर काहींनी ‘यात काय विशेष’ म्हणून दुर्लक्ष केले. सभ्यता, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जीवनशैली म्हणून जगात आज जो गोंधळ माजला आहे, त्याचा खुलासा महात्मा गांधींनी 102 वर्षांपूर्वी करून ठेवला आहे. त्या खुलाशाला पुष्टी देणारी ही बातमी आहे. आधुनिक जगाने या बातमीची दखल घेतलीच पाहिजे, आणि आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे, अशी ही बातमी आहे.

ब्रिटनमधील प्रसिद्ध ‘लॅन्सेट’ या मेडिकल जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. माणसाने दिवसातील फक्त 15 मिनिटे शारीरिक श्रम केले तरी तो हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरपासून दूर राहू शकतो, असे या वैद्यकीय अभ्यासात म्हटले आहे. शारीरिक श्रम न करणार्‍यांना जो अकाली मृत्यूचा धोका असतो, तो श्रम करणार्‍यांना 14 टक्क्यांनी कमी असतो, असेही हा अभ्यास सांगतो. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आठवड्याला 150 मिनिटे शारीरिक श्रम केले पाहिजेत, असे आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटना मानत होती, मात्र तेवढ्या श्रमाचीही गरज नाही, असे हा अभ्यास सांगतो. यासोबत आणखी एक धक्कादायक अभ्यास प्रसिद्ध झाला असून त्याच्यानुसार टीव्ही आणि संगणकासमोर दीर्घकाळ बसणे किती घातक आहे, हे समोर आले आहे. त्यात म्हटले आहे, दररोज सहा तास टीव्ही पाहण्याची सवय पाच वर्षे आयुष्य कमी करते. टीव्ही पाहण्यामुळे आरोग्याची जी हानी होते, ती धुम्रपान करण्याइतकीच गंभीर आहे. थोडक्यात शारीरिक श्रम केले नाहीत तर आरोग्याची किती हानी होवू शकते, हे या अभ्यासांनी पुन्हा एकदा समोर आणले आहे. आश्चर्य म्हणजे ब्रिटन, तैवान आणि ऑस्ट्रेलिया अशा तीन टोकांच्या देशातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

जगात काही विशिष्ट विषयात संशोधन चालू असते, याचा अर्थ त्या विषयाची चर्चा, गरज, उत्सुकता जगात निर्माण झालेली असते. आधुनिक जीवनशैलीत आरोग्य हा असाच महत्वाचा विषय झाला आहे. माणसाने जीवनाचा वेग इतका वाढविला आहे की त्या वेगाशी स्पर्धा करताना नैसर्गिक जगण्याचा विसर पडतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ वेग वाढविला असता तर एकवेळ समजण्यासारखे होते, मात्र तेवढ्यावरच माणूस थांबलेला नाही, त्याने या वेगाने न पळणारे जगण्यास लायक नाहीत, असा नवा नियम करून टाकला आहे. शिवाय पैसा कमावण्यासाठी या वेगाचा वापर इतका वाढला आहे की निसर्गाने घालून दिलेली चौकट धुडकावण्याची त्याची तयारी आहे. याचा थेट परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो आहे. आरोग्य सुधारण्यासाठी आधुनिक औषधांचा वापर करू, मात्र पैसा कमावण्याच्या स्पर्धेत मागे राहता कामा नये, अशी माणसाची धारणा झाली आहे. यालाच गांधीजी पाश्चिमात्य सभ्यता म्हणत होते आणि ब्रिटन पाहताच त्यांच्या हा गोंधळ चांगला लक्षात आला होता. म्हणूनच पाश्चिमात्य सभ्यतेचा त्यांनी त्याचवेळी ( 1909) कठोर शब्दात समाचार घेतला आहे.

आता आपले लक्ष मला आजच्या कळीच्या प्रश्नाकडे वळवायचे आहे. लोकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे आणि त्यांना अर्थपूर्ण जीवन जगता आले पाहिजे, यासाठीच आज सर्व धडपड चालू आहे. आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील ‘भ्रष्ट आचार’ कमी झाला तर ते जीवन अधिकाधिक लोकांना जगता येईल. मात्र आज बहुजनांच्या वाट्याला ते येत नाही, हे आपण वर्षानुवर्षे पाहत आहोत. याचा अर्थ असा होतो की सत्तासंपत्तीसाठी जी जगव्यापी वेगवान स्पर्धा आपण आदर्श मानायला लागलो आहोत, तीत निश्चितपणे अनेक दोष आहेत. केवळ सेवाक्षेत्रात पैसा खेळवून अमेरिकेने जगाला कसे अडचणीत आणले, ही तर या व्यवस्थेची ताजी ‘देणगी’ आहे. सेवाक्षेत्र याचा अर्थ ‘व्हाईट कॉलर’ रोजगार. जेथे थेट निर्मिती होत नाही, केवळ निर्मितीचे व्यवस्थापन चालते किंवा वेगवान आकडेमोड करुन अधिकाधिक पैसा आपल्या ताटात ओढून घेतला जातो. त्याचा परिणाम असा होतो, की पैसा अक्क्ल हुशारीचा मात्र आपण तो किती घाम गाळून कमाविला, याचे फसवे तत्वज्ञानच उभे केले जाते. ज्या तत्वज्ञानात शरीरकष्टाला कमी मानले जाते आणि कमी मोबदला दिला जातो. अक्कलहुशारी हेच भांडवल मानणारी माणसे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा हा पैसा आपल्याच ताटात ओढून घेण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेचा कडेलोट झाल्यामुळे आजचे जग अडचणीत आले आहे. हे अडचणीत येणे केवळ कागदी पैशांपुरते असते तर दुर्लक्ष करता आले असते, मात्र कमी वेळात भरपूर पैसा कमावून राहिलेल्या वेळात काय करायचे, हे कळत नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या आरोग्याचा बळी द्यायला सुरवात केली आहे. गांधीजी म्हणतात तसे जगातील काही माणसे अतिशय कठोर श्रम करत आहेत तर काही निरस कामामुळे कंटाळले आहेत. आधुनिक जगाने याचसाठी आपली वाटचाल सुरु केली होती काय, या प्रश्नाचे उत्तर निर्विवाद ‘नाही’ असे असताना जग मागे वळून पाहायला तयार नाही !

Monday, August 15, 2011

‘कलियुगातील वैकुंठा’ वरचे आनंदी जगतिरुपती बालाजी देवस्थानासंबंधीच्या पुराणकथांपेक्षा मला तेथील नैसर्गिक सौंदर्य, आनंदी वातावरण आणि प्रशासनाने दिलेली सुरक्षितता महत्वाची वाटली. लाखो लोक एका ठिकाणी एकत्र येतात तर तेथे अनेकांची थोडी गैरसोय होणार, हे ओघाने आलेच पण एरवी इतर कोठे इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आले असते, तर अराजकच माजले असते. मग तिरुपती शहरापासून अवघ्या 27 किलोमीटरवर जणू वेगळे जगच आपल्याला का पाहायला मिळते?

श्री वेंकटेश्वर चरित्र महात्म्य या धार्मिक पुस्तिकेत एक कथा आहे. भद्र नावाच्या ब्राम्हणास सहा बायका होत्या. त्यामुळे मोठा गोतावळा, पण हे कुटुंब फारच गरीबीत दिवस काढत होते. अन्नपाण्याची व्यवस्था करता करता ब्राम्हण थकून गेला आणि आजारी पडला. एका बायकोने त्याला सांगितले की वेंकटाचलाच्या म्हणजे बालाजीच्या पापनाशन तीर्थात आंघोळ करून पवित्र ब्राम्हणास भूदान केल्यास सर्व पापे तर नष्ट होतातच पण सर्व प्रकारची संपत्तीही मिळते. ब्राम्हणाने सल्ला ऐकला आणि एका श्रीमंत माणसाकडून जमीन मिळवून बालाजी दर्शनास गेला. तीर्थात स्नान केले. पूजा केली आणि जमीन दानही केले. हे सर्व करून तो घरी परतला तर काय आश्चर्य! त्याला झोपडीच्या जागी एक मोठे घर दिसले. त्याच्या सहाही बायका सुवर्णालंकारांनी नटल्या होत्या. त्याच्या मुलांनी नवे, महागडे कपडे घातले होते. आणि शेवटी म्हटले आहे, की हे सर्व पाहून सर्व कुटुंब एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांना प्रेमाने मिठी मारली !

ही कथा आज आठवण्याचे कारण ज्या तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आज दररोज लाखो भक्त जातात, त्यांच्याही मनात आपल्याला समृद्धीत जीवन जगता यावे, अशी आशा असते. त्यामुळे असलेल्या संपत्तीत वाढ व्हावी, अशी प्रार्थना श्रीमंत भक्त तर दारिद्रयातून बाहेर काढण्याची प्रार्थना गरीब भक्त करतात. प्रत्यक्षात काय होते, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि अनुभवाचा विषय आहे. मात्र एक गोष्ट खरी की कलियुगातील वैकुंठ म्हणून या संस्थानाची ख्याती झाली आहे.

आजच्या जगात सर्वाधिक चर्चा असलेल्या काळ्या आणि पांढर्‍या पैशाचा पूर या संस्थानात दररोज वाहतो आहे. त्याचे कारणही आपल्याला माहीत आहे. पुराणातील कथांनुसार या परिसराची उभारणीच मुळी कुबेराने दिलेल्या कर्जातून झाली आहे. श्रीनिवासांनी पद्मावतींशी विवाह करताना घेतलेले हे कर्ज भक्त वर्षानुवर्षे तेथील हुंडीत धन टाकून फेडत आहेत कारण आपल्या या देवाने जनहितासाठी लग्न केले, अशी कथा आहे. धन हुंडीत टाकले की आपल्याला त्याच्या कितीतरी पट धन मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. जगातील हे एक श्रीमंत देवस्थान आहे, हे आपण जाणतोच. मात्र ‘त्या’ ब्राम्हणापासून आजच्या लाखो भक्तांचा ओढा का कायम आहे, या प्रश्नाचे उत्तर मला तिरूमला पाहिल्यावर मिळाले. तिरुपती बालाजी देवस्थानासंबंधीच्या पुराणकथांपेक्षा मला तेथील नैसर्गिक सौंदर्य, आनंदी वातावरण आणि प्रशासनाने दिलेली सुरक्षितता महत्वाची वाटली. लाखो लोक एका ठिकाणी एकत्र येतात तर तेथे अनेकांची थोडी गैरसोय होणार, हे ओघाने आलेच पण एरवी इतर कोठे इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आले असते, तर अराजकच माजले असते. मग तिरुपती शहरापासून अवघ्या 27 किलोमीटरवर जणू वेगळे जगच आपल्याला का पाहायला मिळते?

मी असे पाहिले की तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी जातानाचा पवित्र भाव तर भक्तांच्या मनामध्ये आहेच, पण त्याच्या जोडीला समृद्धीचा अनुभवही तेवढाच महत्वाचा ठरतो आहे. जगात सध्या कलियुग चालू आहे, असे म्हणतात ( त्याचा अनुभव आपण घेतच आहोत) मात्र तिरूपती पर्वतावर या देवस्थानाच्या परिसरात आपल्याला कलियुगापेक्षा वेगळे काही पाहायला मिळते. ते केवळ पवित्र स्थान म्हणून निर्माण झालेले नाही, ते प्रयत्नपूर्वक तयार करण्यात आले आहे. असे म्हणता येईल की भक्तांमधील त्यावेळच्या भक्तिभावांमुळे आणि मुबलक संपत्तीमुळे ते शक्य झाले आहे.

तिरूपती शहरातून दर पाच-दहा मिनिटांनी सवलतीच्या दरात पर्वतावर जाणार्‍या शेकडो बस, सुंदर घाटरस्ता, जाण्यायेण्यासाठी असलेले स्वतंत्र मार्ग, प्रत्येक वळणावर वाहतूक नियंत्रण करणारी माणसे, देवस्थानाच्या परिसरात 100, 50 रूपयात होणारी निवास व्यवस्था, तेथील थंड आणि गरम पाण्याची मुबलकता, पर्वतावरील प्रमुख स्थळे पाहण्यासाठी करण्यात आले्ल्या मोफत बसफेर्‍या, रांगेतील सर्वांना दर्शन मिळण्याची खात्री, रांगेत असताना भक्तांना त्रास होणार नाही, याची घेतलेली काळजी, प्रसाद म्हणून भोजनाची केलेली निशुल्क व्यवस्था, स्वच्छता राहावी म्हणून ठिकठिकाणी बांधलेले स्वच्छतागृह, स्वच्छतेची काळजी घेणारे शेकडो सेवक, सर्वांचाच व्यवसाय होतो म्हणून अडवणूक किंवा लूट करण्याची गरजच नाही, अशा या समृद्धीच्या सर्व खुणा. दर्शनापासून निवास, भोजन, प्रवास या प्राथमिक गरजांची टंचाईच काढून टाकल्यामुळे आपण रांगेत उभे राहिले की आपल्याला कोणत्याही भेदभावाविना ते मिळेल, याची शाश्वती असल्यानंतर माणसे एकमेकांशी किती चांगले वागू शकतात, याचा अनुभव तेथे घेता येतो.

‘अर्थक्रांती’ (www.arthakranti.org) मध्ये यासंबंधीचे फार छान उदाहरण दिले जाते. आपल्या घरी आठवड्यातून एकदाच पाणी येणार, असे आपल्याला माहीत असेल तर आपण घरातील शक्य तेवढी भांडी भरून ठेवतो. या असुरक्षितेतून दहा-बारा दिवसांचे पाणी भरून ठेवले जाते. पण आपल्याला सांगण्यात आले की उद्यापासून दररोज पाणी येणार आहे, तर इतके सारे पाणी कोणी भरून ठेवील? कदापी नाही. आपल्या देशामध्ये याच असुरक्षिततेमुळे धनसंचय वाढला आहे. जोपर्यंत माणसाच्या आयुष्यात सुरक्षितता निर्माण होत नाही, तोपर्यंत धनसंचयाची ही भूक भागणार नाही. गरीब ब्राम्हणाचे कुटुंब श्रीमंत झाल्यावर प्रेमाने एकमेकांना मिठ्या मारतात, त्याचे कारण समृद्धीचा आनंद आहे. आपण त्या आनंदाच्या शोधात आहोत.

Friday, August 12, 2011

एक फुलस्टॉप !


ECONOMIC FREEDOM
WE DARE TO DREAM
चलो दिल्ली १५ अगस्त २०१२भारत हा अतिशय समृद्ध देश होता आणि आहे, यावर ज्याचा ठाम विश्वास आहे,
देशाच्या उज्ज्वल परंपरांचा अविष्कार आजच्या दैनंदिन जीवनात जो शोधतो आहे,
कला-संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी हात पसरण्याची वेळ का, हा प्रश्न ज्याला सतावतो आहे,
प्रत्येक भारतीयाला मानवी प्रतिष्टेचे जीवन जगता आले पाहिजे, असे ज्याला वाटते,
भारतीय नागरिकाला कोणत्याही भेदभावाविना संधी मिळावी, असे ज्याचे म्हणणे आहे,

भारत ‘समृद्ध मानवी आयुष्य जगण्याची’ महासत्ता होण्याचे स्वप्न जो पाहातो आहे,
ज्याला शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा देशासमोरील सर्वात चिंतेचा विषय वाटतो आहे,
ज्याची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली आहे, मात्र तेथील वास्तवाने जो अस्वस्थ आहे,
वर्तमानातले वास्तव पाहून ज्याला आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता सतावते आहे,

प्रत्येकाला प्रामाणिकपणे जगता आले पाहिजे, असे ज्याला मनापासून वाटते,
‘जगा आणि जगू द्या’ या न्यायतत्वावर ज्याचा विश्वास आहे,
आज भरल्या ताटावर बसलेल्या ज्याचा घास सारखा अडतो आहे,
नवे काही घडू शकते आणि आपणही ते घडवू शकतो, असे ज्याला मनापासून वाटते,

गर्भातच होणारी आपलीच हत्या जिला मूकपणे पाहावी लागते,
कळी उमलतानाच तिचा भाव करणारे जग जी सहन करते आहे,
महागाई फार झाली, ‘दुसर्‍या इंजिना’शिवाय पर्याय नाही, म्हणून जी बाहेर पडली आहे,
जिच्या हातात महिनाअखेर काही गिन्न्या, काही नोटा पडतात,
आणि बद्ल्यात घरातल्या अमूल्य, अतूल्य नात्याची जी परतफेड करते आहे,
जिला वाटते, हे खरे नाही, हे बदललेच पाहिजे,
पण जिच्यावर व्यवस्थेने लादली आहे, करकरीत व्यवहाराची लक्ष्मणरेषा,

केवळ माणसांची अदलाबद्ल करून देश बदलणार नाही, हे ज्याने ओळखले आहे,
स्वतःच्या हक्काचे काही घेताना लावलेले ‘मदती’चे लोबल ज्याला जाचते आहे,
समाज बदलाचे प्रयत्न ‘काहीच बदलत नाही’, म्हणून ज्याने अर्ध्यावर सोडून दिले आहेत,
मात्र जग बदलू शकते, यासाठीच्या मूलभूत बदलांवर ज्याचा विश्वास आहे,

चांगल्या शिक्षणासाठी सरकारी निधी कमी पडतो, हे कोडे ज्याला सुटत नाही,
चांगल्या आरोग्य सुविधा हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, असे ज्याला वाटते,
हक्काचे घर होण्यासाठी आयुष्यच गहाण ठेवणे चांगले नाही, असे ज्याचे ठाम मत आहे,
आपल्या जगण्यावर काळा पैसाच राज्य करतो आहे, हे ज्याने ओळखले आहे,

निवडणुका हे भ्रष्टाचाराचे मूळ आहे, त्यामुळे पद्धत बदलीच पाहिजे, असे ज्याला वाटते,
एक चांगली राज्यव्यवस्था म्हणून लोकशाही शासनपद्धतीवर ज्याचा विश्वास आहे,
चांगल्या राज्यघटनेचा अंमल करण्यात देश कमी पडतो आहे, असे ज्याला वाटते,
नागरिकशास्राच्या पुस्तकातील लोकांचे कल्याण जो दररोज शोधतो आहे,

प्रत्येकाची पत वाढणे, हाच आर्थिक प्रगतीचा खरा मार्ग आहे, हे ज्याला पटले आहे,
देशातील सध्याच्या करपद्धतीत आमूलाग्र बदल झाला पाहिजे, असे ज्याला वाटते,
आणि करपद्धतीच्या गुंतागुंतीमुळे ज्याला व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे,
रोखीने होणार्‍या व्यवहारांमुळे काळा पैसा वाढ्त चालला आहे, असे ज्याला पटले आहे, 100, 500, 1000 या मोठ्या नोटा रद्द झाल्या पाहिजेत, हे अर्थशास्र ज्याला कळते, बँकमनी वाढला तरच देशात पारदर्शी व्यवहार वाढतील, असे ज्यांना वाटते,

वाडीवस्त्या, गावे, शहरांतील रस्त्यांचा निकृष्ठ दर्जा हा ज्याच्या चिंतेचा विषय आहे,
आपल्या जवळचा, प्रेमाचा माणूस ज्याने अशा रस्त्यांवर गमावला आहे,
दर 15- 20 किलोमीटरवर टोल देताना ज्याने प्रत्येकवेळी शिवी हासडली आहे,
काळीपिवळीतील गोळामोळा झालेली माणसे ज्याने उघड्या डोळयांनी पाहिली आहेत,
दररोजच्या प्रवासासाठी सार्वजनिक व्यवस्थेचाच वापर केला पाहिजे, असे ज्याला वाटते,

टाळताच येत नाही म्हणून ज्याने मन मारून लाचही दिली आहे,
आणि मन मारुनच ज्याला व्यवस्थेने लाच घ्यायलाही लावली आहे,
आपण हे, हे आणि हे चुकीचे काम केले, या विचाराने ज्याचे डोके सून्न झाले आहे,
तरीही ज्याला आपल्या आयुष्यात ‘फिनिक्स उडी’ घ्यायची आहे,

हे आपल्यातले वाद नसून परिस्थितीने टाकलेले जाळे आहेत, हे ज्याने ओळखले आहे,
चित्र पूर्ण होतानाच ते विस्कटल्याचे दुःख ज्याच्या मनात घर करून बसले आहे,
मात्र, ज्याने स्वप्न पाहण्याचे अद्यापही सोड्लेले नाही,
जीवघेण्या स्पर्धेतले बळी ज्याने निमूटपणे पाहिले आहेत,
आज तो जात्यात तर आपण सुपात, हा फरक ज्याला कळला आहे,

चंदीमंदीच्या कृत्रिम आणि नैसर्गिक चक्रात जो भरडला गेला आहे,
सरकारच्या एका बिनडोक फटकार्‍याने ज्याचे आयुष्य उसवले आहे,
बँकेच्या एका नकाराने ज्याची स्वप्न धुळीस मिळाली आहेत,
भांडवलाच्या बिळावर बसलेल्या मालकाच्या मुजोरीने ज्याला बेजार केले आहे,
पुन्हा उठून जगण्याची संधी ज्याला सतत नाकारण्यात आली आहे,
प्रश्नांच्या गर्तेत काही प्रश्नांना उत्तरेच सापडत नाही, असे ज्याला वाटते,
जखमांवर लावण्यात येणार्‍या मलमपट्ट्यांवर ज्याचा विश्वास नाही,

ज्याला आता मूळ प्रश्नांना भिडण्याचे धाडस करायचे आहे,
ज्याला आता आपले आयुष्य नव्याने जगायचे आहे,
एकेकाला गाठून व्यवस्थेने मिंधे केल्याची सल ज्याच्या मनात आहे,
म्हणून ज्याला आता 121 कोटी भारतीयांशी नाते जोडायचे आहे,

आणि शब्दात मावणार नाही, असे आयुष्य जगत असलेल्या
121 कोटी भारतीयांसाठी, सर्वांसाठी हे निमंत्रण.....,

सध्याच्या एवढ्या सगळ्या नकारांमध्ये....
‘आहे... उत्तर आहे....’,
असे ज्या ‘अर्थक्रांती’चे वर्णन करण्यात येते.....,
त्या ‘अर्थक्रांती’ ची हाक दिल्लीत पोहचविण्यासाठी,
‘आर्थिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ सरकारला सुपूर्द करण्यासाठी,

आपल्या सर्वांना 15 ऑगस्ट 2012 रोजी दिल्लीत भेटायचे आहे.(‘अर्थपूर्ण’ ऑग्स्ट 2011 चे संपादकीय )

Thursday, August 11, 2011

बराक ओबामा आतला आवाज ऐकतील ?


आज 80 वर्षांनी त्याच मंदीच्या थांब्यावर जग थांबले आहे. फरक इतकाच की आता अमेरिकनांनो वायफळ खर्च कमी करा आणि अर्थतज्ञांनो, आता तिसर्‍या जगाची क्रयशक्ती कशी वाढेल, अशी आकडेमोड करा, असे ओबामांनी त्यांचे कान पिळून सांगण्याची आणि स्वतःचा आतला आवाज ऐकण्याची वेळ आली आहे.


बराक ओबामा यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा मी त्यांच्या ‘ड्रिम्स फ्रॉम माय फादर’ या चरित्राचा मराठीत अनुवाद करत होतो. अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर यांनी त्यापूर्वी किमान दोन वर्षे आधी हे पुस्तक मराठीत आणायचे ठरविले होते. त्यावेळी बराक ओबामा हे भारतात माहीतही नव्हते आणि ते निवडून येतील, असे कोणी सांगितले असते, तर त्यावर कोणी विश्वासही ठेवला नसता. बराक ओबामांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी झालेली निवड अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. ते अमेरिकेचे पहिले आफ्रिकन कृष्णवर्णीय अध्यक्ष ठरले. त्यांनी आपले चरित्र लिहून काढले ते त्यापूर्वीच्या एका पराभवातून सावरण्यासाठी! वडिल मूळ केनियन आणि मुस्लिम, आई गौरवर्णीय ख्रिश्चन, दुसरे वडिल इंडोनेशियन. सख्ख्ये वडिल अमेरिकेत शिक्षण घेतलेले असले तरी केनिया कर्मभूमी मानणारे आणि तेथे दुसरे लग्न केल्यामुळे नातेवाईकांचा प्रचंड गोतावळा. त्यातच देशाच्या आणि कुटुंबियांच्या दारिद्रयामुळे सतत ताणतणावात जगणारे कुटुंब. त्यात आईवडिलांचे लग्न आईच्या नातेवाईकांनी मनापासून स्वीकारलेले नाही. विसाव्या शतकात जगाच्या पाठीवर कोठेही निम्नमध्यमवर्गात घडू शकेल, असे सर्व बराक ओबामांच्या घरात घडून गेले आहे. शिवाय वडिलांची आयुष्यात एकदाच अल्पभेट झालेली. असे भावविश्च असलेला माणूस अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून येवू शकतो, ही गोष्ट जास्त ऐतिहासिक आहे, असे मला ‘ड्रिम्स फ्रॉम माय फादर’ वाचताना वाटून गेले.

आज आर्थिक संकटातून अमेरिकेला वाचवायचे म्हणजे जगाला वाचवायचे, अशा एका वळणावर जग उभे असताना बराक ओबामा जगाचे नेतृत्व करत आहेत, हा मनाला दिलासा वाटतो, त्याचे कारण बराक ओबामांचे हे पूर्वायुष्य. मूळ केनिया, प्राथमिक शिक्षण इंडोनेशियात, नागरिकत्व अमेरिकन आणि आफ्रिकन कृष्णवर्णीय म्हणून जगताना वा्ट्याला आलेली अवहेलना. जगाच्या तीन खंडातील सुखदुःख माहीत असलेला माणूस जगासमोरच्या अशा अक्राळविक्राळ प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहील, अशी आशा वाटायला लागते. आपल्या चरित्रातून आणि ‘ऑडॅसिटी ऑफ होप’ या लेखसंग्रहात मला जे ओबामा दिसले ते काही ओळींमध्ये गुंफण्याचा प्रयत्न मी त्यावेळी केला होता. आज जेव्हा गेल्या तीन-चार शतकातले इझम, शासनव्यवस्था आणि जगाच्या व्यवहारांचे विश्लेषण करणारे थोर पुरूष आणि अर्थतज्ञ कोलमडून पडले असताना बराक ओबामांचा आशावाद जवळचा वाटायला लागतो. विशेषतः ओबामांनी जेव्हा ‘मी कोणा एकाचा नाही, मी सर्वांचा आहे’, अशा शब्दात जगातील दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे वाटून गेले होते, की असाच माणूस सर्वसत्ताधारी बनला पाहिजे, तोच जगाचे भले करू शकेल. प्रत्यक्षात जगात काय होणार आहे, याची मात्र अजून वाट पाहावी लागणार आहे.

अशा होत्या त्यातील काही ओळीः

‘मी कोणा एकाचा नाही, तर मी सर्वांचा आहे, असे कोणीतरी म्हणावे आणि एका समन्यायी नव्या जगाचे स्वप्न साकार व्हावे, असे ज्यांना ज्यांना वाटते....
आपल्या वर्तमानातील गुंता सोडविण्यासाठी आणि आव्हाने पेलण्यासाठी... आपल्यालाच एकत्र यावे लागेल.... आणि जे शक्य आहे, यावर ज्यांचा विश्वास आहे... बदलासाठी राजकारण किती सहाय्यकारी ठरते, म्हणून लोकशाहीच्या सामर्थ्यावर आणि सर्वसामान्य माणसांच्या मनोबलावर ज्यांचा विश्वास आहे... बहुविधता आणि सर्वसमावेशकता हेच नव्या जगाचे बलस्थान आहे, आणि विषमता हद्द्पार करण्यासाठीच्या छोट्या-मोठ्या लढ्यांत आज जे जे सक्रिय आहेत... इतिहासाचे ओझे जबाबदारी म्हणून स्वीकारताना वर्तमानात झेपावण्याचा आणि आपल्या विस्तारित परिवाराचं उज्ज्वल भवितव्य पाहण्याचा संकल्प ज्यांनी ज्यांनी केला आहे... अशा सर्व वैश्विक नागरिकांना सांगणार्‍या आणि अजूनही संकुचित अस्मितांवर विषारी फुंकर घालणार्‍यांना, ‘आपले प्राक्तन समान आहे’, हे बजावणार्‍या.... समानसंधी आणि समानता यामुळे आपलं स्वातंत्र्य धोक्यात येत नाही. उलट आपल्या सरकारची लोकमान्यता आणि यशस्वी अर्थव्यवस्थचं मूळ गमक म्हणजे ही मूल्यच होत. चला नव्या जगाच्या उभारणीचे आपणही शूरशिपाई होऊ यात’.

बराक ओबामा यांनी ‘ऑडॅसिटी ऑफ होप’ मध्ये जे विचार व्यक्त केले होते, त्यानंतरच्या या भावना आहेत.
थेट बराक ओबामा यांच्या शब्दात यातील काही विचार वाचल्यानंतर तर जगाच्या वाटचालीविषयी आपण अधिकच आशावादी होतो. त्या ओळी अशा आहेतः 1. सरकारी आणि खासगी कंपन्यांमधील खाबूगिरी आणि ऐहिकपणामुळे येणारा हव्यास ही आजच्या समाजापुढची सर्वात मोठी आव्हाने आहेत. 2. जागतिकीकरण अनिर्बंधपणे सुरु ठेवणं यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळून पडेल, हे नक्की. 3. गरीब राष्ट्रांतील दारिद्रय निर्मूलन हे आपण नुसतं दान करुन संपणार नाही, तो आपल्या दहशतवादाच्या संघर्षाचाच एक भाग म्हणून असायला हवं. 4. आमच्या राष्ट्रीय उत्पन्नाइतकंच आमची जीवनमूल्य आणि श्रद्धाही महत्वाची आहे, असे मी मानतो. ( जगातल्या सर्वसत्ताधीश मानल्या जाणार्‍या माणसाला असे वाटते, ही किती आनंदाची गोष्ट आहे!)

1929 साली जगामध्ये जी मोठी मंदी आली होती, तिचा उल्लेख करून बराक ओबामा यांनी अर्थरचना आणि जागतिक समूहाविषयी असे विचार व्यक्त केले आहेत. ‘आर्थिक मंदीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे अमेरिकन कामगारांची खर्च करण्याची शक्ती म्हणजे क्रयशक्ती वाढविणे हा आहे, असे त्यावेळी अध्यक्ष रुझवेल्ट यांनी म्हटले होते. आज 80 वर्षांनी त्याच मंदीच्या थांब्यावर जग थांबले आहे. फरक इतकाच की आता अमेरिकनांनो वायफळ खर्च कमी करा आणि अर्थतज्ञांनो, आता तिसर्‍या जगाची क्रयशक्ती कशी वाढेल, अशी आकडेमोड करा, असे ओबामांनी त्यांचे कान पिळून सांगण्याची आणि स्वतःचा आतला आवाज ऐकण्याची वेळ आली आहे.