Wednesday, August 24, 2011

हे आहेत भ्रष्ट आचाराचे जागतिक बळी !

अक्कलहुशारी हेच भांडवल मानणारी माणसे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा पैसा आपल्याच ताटात ओढून घेण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेचा कडेलोट झाल्यामुळे आजचे जग अडचणीत आले आहे. हे अडचणीत येणे केवळ कागदी पैशांपुरते असते तर दुर्लक्ष करता आले असते, मात्र कमी वेळात भरपूर पैसा कमावून राहिलेल्या वेळात काय करायचे, हे कळत नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या आरोग्याचा बळी द्यायला सुरवात केली आहे.‘धनलोभामुळे यंत्रांच्या मागे लागणे, हे महापाप आहे. मनुष्याला कठोर श्रम वा निरस कामापासून वाचवायला हवे. अशा मानवप्रेमातून निर्माण झालेले यंत्रच कल्याणकारी असेल – जसे, सिंगरचे शिलाई यंत्र. मनुष्याच्या अवयवांना कामाअभावी जडत्व आणणारी, त्यांना निरूपयोगी बनविणारी यंत्रे नकोत. लाखो लोकांवर कामाअभावी उपाशी फिरण्याची वेळ आणणार्‍या यंत्रवेडाला सर्वोदयाचा विरोध आहे’.

महात्मा गांधी, ‘हिंद स्वराज्य’ (1909)
तब्बल 102 वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या ‘हिंद स्वराज्य’ या ऐतिहासिक पुस्तिकेची आज आठवण होण्याचे कारण आहे अलिकडेच प्रसिद्ध झालेली एक बातमी. काही माध्यमांनी या बातमीला ठळक प्रसिद्धी दिली तर काहींनी ‘यात काय विशेष’ म्हणून दुर्लक्ष केले. सभ्यता, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जीवनशैली म्हणून जगात आज जो गोंधळ माजला आहे, त्याचा खुलासा महात्मा गांधींनी 102 वर्षांपूर्वी करून ठेवला आहे. त्या खुलाशाला पुष्टी देणारी ही बातमी आहे. आधुनिक जगाने या बातमीची दखल घेतलीच पाहिजे, आणि आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे, अशी ही बातमी आहे.

ब्रिटनमधील प्रसिद्ध ‘लॅन्सेट’ या मेडिकल जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. माणसाने दिवसातील फक्त 15 मिनिटे शारीरिक श्रम केले तरी तो हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरपासून दूर राहू शकतो, असे या वैद्यकीय अभ्यासात म्हटले आहे. शारीरिक श्रम न करणार्‍यांना जो अकाली मृत्यूचा धोका असतो, तो श्रम करणार्‍यांना 14 टक्क्यांनी कमी असतो, असेही हा अभ्यास सांगतो. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आठवड्याला 150 मिनिटे शारीरिक श्रम केले पाहिजेत, असे आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटना मानत होती, मात्र तेवढ्या श्रमाचीही गरज नाही, असे हा अभ्यास सांगतो. यासोबत आणखी एक धक्कादायक अभ्यास प्रसिद्ध झाला असून त्याच्यानुसार टीव्ही आणि संगणकासमोर दीर्घकाळ बसणे किती घातक आहे, हे समोर आले आहे. त्यात म्हटले आहे, दररोज सहा तास टीव्ही पाहण्याची सवय पाच वर्षे आयुष्य कमी करते. टीव्ही पाहण्यामुळे आरोग्याची जी हानी होते, ती धुम्रपान करण्याइतकीच गंभीर आहे. थोडक्यात शारीरिक श्रम केले नाहीत तर आरोग्याची किती हानी होवू शकते, हे या अभ्यासांनी पुन्हा एकदा समोर आणले आहे. आश्चर्य म्हणजे ब्रिटन, तैवान आणि ऑस्ट्रेलिया अशा तीन टोकांच्या देशातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

जगात काही विशिष्ट विषयात संशोधन चालू असते, याचा अर्थ त्या विषयाची चर्चा, गरज, उत्सुकता जगात निर्माण झालेली असते. आधुनिक जीवनशैलीत आरोग्य हा असाच महत्वाचा विषय झाला आहे. माणसाने जीवनाचा वेग इतका वाढविला आहे की त्या वेगाशी स्पर्धा करताना नैसर्गिक जगण्याचा विसर पडतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ वेग वाढविला असता तर एकवेळ समजण्यासारखे होते, मात्र तेवढ्यावरच माणूस थांबलेला नाही, त्याने या वेगाने न पळणारे जगण्यास लायक नाहीत, असा नवा नियम करून टाकला आहे. शिवाय पैसा कमावण्यासाठी या वेगाचा वापर इतका वाढला आहे की निसर्गाने घालून दिलेली चौकट धुडकावण्याची त्याची तयारी आहे. याचा थेट परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो आहे. आरोग्य सुधारण्यासाठी आधुनिक औषधांचा वापर करू, मात्र पैसा कमावण्याच्या स्पर्धेत मागे राहता कामा नये, अशी माणसाची धारणा झाली आहे. यालाच गांधीजी पाश्चिमात्य सभ्यता म्हणत होते आणि ब्रिटन पाहताच त्यांच्या हा गोंधळ चांगला लक्षात आला होता. म्हणूनच पाश्चिमात्य सभ्यतेचा त्यांनी त्याचवेळी ( 1909) कठोर शब्दात समाचार घेतला आहे.

आता आपले लक्ष मला आजच्या कळीच्या प्रश्नाकडे वळवायचे आहे. लोकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे आणि त्यांना अर्थपूर्ण जीवन जगता आले पाहिजे, यासाठीच आज सर्व धडपड चालू आहे. आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील ‘भ्रष्ट आचार’ कमी झाला तर ते जीवन अधिकाधिक लोकांना जगता येईल. मात्र आज बहुजनांच्या वाट्याला ते येत नाही, हे आपण वर्षानुवर्षे पाहत आहोत. याचा अर्थ असा होतो की सत्तासंपत्तीसाठी जी जगव्यापी वेगवान स्पर्धा आपण आदर्श मानायला लागलो आहोत, तीत निश्चितपणे अनेक दोष आहेत. केवळ सेवाक्षेत्रात पैसा खेळवून अमेरिकेने जगाला कसे अडचणीत आणले, ही तर या व्यवस्थेची ताजी ‘देणगी’ आहे. सेवाक्षेत्र याचा अर्थ ‘व्हाईट कॉलर’ रोजगार. जेथे थेट निर्मिती होत नाही, केवळ निर्मितीचे व्यवस्थापन चालते किंवा वेगवान आकडेमोड करुन अधिकाधिक पैसा आपल्या ताटात ओढून घेतला जातो. त्याचा परिणाम असा होतो, की पैसा अक्क्ल हुशारीचा मात्र आपण तो किती घाम गाळून कमाविला, याचे फसवे तत्वज्ञानच उभे केले जाते. ज्या तत्वज्ञानात शरीरकष्टाला कमी मानले जाते आणि कमी मोबदला दिला जातो. अक्कलहुशारी हेच भांडवल मानणारी माणसे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा हा पैसा आपल्याच ताटात ओढून घेण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेचा कडेलोट झाल्यामुळे आजचे जग अडचणीत आले आहे. हे अडचणीत येणे केवळ कागदी पैशांपुरते असते तर दुर्लक्ष करता आले असते, मात्र कमी वेळात भरपूर पैसा कमावून राहिलेल्या वेळात काय करायचे, हे कळत नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या आरोग्याचा बळी द्यायला सुरवात केली आहे. गांधीजी म्हणतात तसे जगातील काही माणसे अतिशय कठोर श्रम करत आहेत तर काही निरस कामामुळे कंटाळले आहेत. आधुनिक जगाने याचसाठी आपली वाटचाल सुरु केली होती काय, या प्रश्नाचे उत्तर निर्विवाद ‘नाही’ असे असताना जग मागे वळून पाहायला तयार नाही !