Thursday, March 25, 2010

शुध्द मराठी दाखवा , बक्षीस मिळवा !

एखादी गोष्ट दुर्मिळ झाली की ‘ ........... दाखवा आणि बक्षीस मिळवा’ असे म्हणण्याची पध्दत आहे. प्रस्थापित नियमांनुसार मराठी भाषा पाहावयाची असेल किंवा वाचावयाची असेल तर सध्या तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगल्यावरील नाव पाहा, दुकानावरील फलक पाहा, मराठीप्रेमासाठी काम करणा-या संस्था संघटनांचे फलक किंवा मुखपत्र पाहा, शाळा - महाविद्यालयांतील सूचनाफलक, वर्तमानपत्र, पुस्तके , सरकारचे निवेदन पाहा.... कुठलाही मराठी मजकूर पाहा, वाचा आणि प्रस्थापित नियमांनुसार तो शुध्द आहे का, हे तपासा. शंभर टक्के शुध्द मजकूर तुम्हाला सापडला तर सांगा.. . तो सापडण्याची शक्यता नाही. त्याचे पहिले कारण आमच्या भाषेला व्यवहारात तेवढे महत्व राहिलेले नाही. त्यामुळे ती भाषा अशुध्द लिहीली तरी फार फरक पडत नाही. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे कारण म्हणजे काय शुध्द आणि काय अशुध्द याचा इतका गोंधळ आम्ही घातला आहे की एखाद्याने ठरवले तरी तो शंभर टक्के शुध्द लिहूच शकत नाही.

एखादी गोष्ट दुर्मिळ झाली की, ते ओळखण्याची आणखी एक खूण आहे. ती म्हणजे त्याची भरपूर चर्चा करायला लोक सुरूवात करतात. त्यासंदर्भाने काही कृती करावयाची सोडून बाकी सर्व करावयाचे. मराठी संदर्भात सध्या तेच चित्र दिसते आहे. मराठीच्या नावाने एकाएवजी १०-१२ संमेलने घेतली जात आहेत. अधिवेशने होत आहेत राजकारण केले जाते आहे. राजकीय घोषणा केल्या जात आहेत . मात्र ज्या भाषेविषयी हे सर्व चालले आहे, ती भाषा त्यामुळे तसूभरही पुढे सरकत नाही, त्याचे काय करायचे ? जगातल्या आठ हजार भाषांमध्ये पंधराव्या आणि आपल्या देशातल्या चौथ्या क्रमांकाच्या मराठी भाषेविषयी प्रेम आहे, असे अनेक जण म्हणतात, मात्र तिच्यासाठी ठोस काही करण्याची वेळ आली की पुढे काही घडत नाही.

हे आज सर्व आठवण्याचे कारण उद्यापासून पुण्यात सुरू होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. साहित्य संमेलन उत्सवी असावे, याविषयी कोणाचे दुमत नाही. मात्र त्यात भाषाविकासाविषयी काहीच होउ नये, हे पटण्यासारखे नाही. नाही म्हणायला काही संमेलनांमध्ये भाषाविकासावर चर्चा झाली आहे, मात्र ती वर्तमानपत्रांच्या पानांच्या पुढे गेली नाही, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. बरे, वर्षभर त्यासंबंधीचे काही प्रयत्न साहित्य संस्थांनी केले असते, तर तेही समजून घेता आले असते. तसे जे काही प्रयत्न झाले, ते इतके तोकडे होते की मराठी भाषेचा विकास तर दूरच, पण मराठी भाषा व्यवहारातून कमी कमी होत गेली आहे.

आजची मराठी भाषा कोठे आहे याचा विचार केल्यावर पुढील गोष्टी लक्षात येतात. मराठीचा सरकारी कामकाजात आणि व्यवहारातील वापर कमी कमी होत चालला आहे. संगणकामध्ये मराठी भाषा वापरावीच लागणार आहे, मात्र त्यासाठी योग्य फॉण्ट आणि अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘मराठी भाषा’ हा विषय मराठी आणि इंग्रजी शाळांमधील एक अवघड विषय ठरतो आहे. एवढेच नव्हे तर तो विषयच नको, अशी भूमिका काही शाळा घेउ लागल्या आहेत. मराठी बोलणे, लिहिणे, वाचणे हे मराठी समाजातही कमीपणाचे मानले जाउ लागले आहे. मराठी शुध्दलेखन नियमांच्या दहशतीमुळे मराठी आनंदाने लिहिणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

मराठीवर ही वेळ का येते आहे, याची कारणे शोधताना असे लक्षात येते की मायबोलीसाठी सातत्याने काही करण्याची गरज होती, ते केले गेलेले नाही. काळानुसारचे बदल स्वीकारण्याची मानसिकता नसल्यामुळे काळाशी ती सुसंगत राहिली नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे देवनागरी स्वीकारताना मराठी भाषेतील जेवढा भाग संस्कृतसारखा वावरू शकतो, त्या भागाला (तत्सम) संस्कृतचे नियम लावले गेले आणि उरलेला भाग ‘देशी’मराठी म्हणून (तत्भव) जाहीर केला गेला. त्यामुळे मराठीची मराठीतच फाळणी झाली. याचा परिणाम आसा झाला की मराठी व्याकरण आणि शुध्दलेखन मराठी समाजावर लादण्यात आले. मराठीची उपजत आणि मूलभूत प्रवृत्ती लक्षात न घेता हे केले गेले. मराठी सर्वसामान्य समाजामध्ये शुध्दलेखनाची दहशत निर्माण करण्याचे काम नियमांनी केले.
मायबोली असणा-या माणसाला आपलीच भाषा अवघड का वाटावी ? मात्र दीर्घकाळ हा अन्याय सर्वसामान्य मराठी माणूस सहन करतो आहे.

या सर्व परिस्थितीचा परिणाम असा झाला की नियमानुसार शुध्द लिहिता येत नाही आणि अशुध्द लिहून मानहानी सहन होत नाही, म्हणून मराठी लिहिणेच अनेकांनी सोडून दिले. आमच्याच बोली भाषा अशुध्द ठरल्या. एकप्रकारे मराठी समाजाचे विघटन सुरू झाले. इंग्रजी आणि हिंदी भाषेचे आक्रमण हे नंतरचे विषय आहेत, आधी आमची भाषा आम्ही देवनागरी स्वीकारताना अवघड का केली, काळानुसार का बदलली नाही, आणि संगणकाचा वापर इतका वाढला असताना एकच फॉण्ट वापरण्याचा संकल्प का केला गेला नाही, या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

या संदर्भात मराठीवर प्रेम करणा-या संस्था प्रयत्न करत आहेत. मात्र या सर्वांना एकत्र बांधून संगणकाचा वापर वाढल्याच्या कारणाने क्रांतिकारक बदलांची तयारी ठेवावी लागणार आहे. ‘शोध मराठीचा’ या संस्थेने यासंदर्भात मांडलेला ‘नवा प्रस्ताव’ निश्चित विचार करण्यासारखा आहे. या प्रस्तावाचे एक कलम असे आहेः मोडी लिपीसारखाच देवनागरीत मराठीने ‘एक वेलांटी- एक उकार’( दीर्घ वेलांटी आणि –हस्व उकार ) या सहजसुलभ तत्वाचा स्वीकार गद्द लेखनात करावा आणि शुध्द-अशुध्दतेच्या पेचातून मराठी समाजाची सुटका करावी. अशा ज्या ज्या कल्पना मांडल्या जात आहेत, त्यावर खुलेपणाने चर्चा झाली पाहिजे. परंपरा कुरवाळणा-यांना हा प्रस्ताव आततायीपणाचा वाटतो. खरे सांगायचे तर मराठी इतकी मागे पडते आहे की, तशाच बदलांशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. असे अनेक प्रस्ताव आहेत आणि त्त्यातील काहींच्या स्वीकारतूनच सर्वसामान्य मराठी माणसाचा मनसोक्त मराठी वापरण्याचा मार्ग खुला होणार आहे.

जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्वतःहून आणि अनेकदा रेट्यापोटी आम्ही अनेक बदल स्वीकारले आहेत. ते का स्वीकारले, याचे आम्ही समर्थनही करतो आहोत. तसाच विचार भाषेसंदर्भातल्या बदलांचाही करावाच लागणार आहे. तो आपण वेळीच केला नाहीतर जगातील एक श्रेष्ठ भाषा मारून टाकल्याचे पाप आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही.


यमाजी मालकर ymalkar@gmail.com

Saturday, March 20, 2010

Maharashtra Times

जागतिक मराठी दिनी 'मराठी एडिटर' हा नवा फॉण्ट आला आहे. आता मराठी भाषेतून कोणताही संगणकीय व्यवहार सहज करता येईल, असे तो शोधणा-या शुभानन गांगल यांना वाटते. या नव्या प्रयोगाच्या निमित्ताने... - यमाजी मालकर

....

मराठी तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।। या समर्थ रामदासांच्या प्रेरणेमुळे मराठी समाजाला एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील पहिले स्वराज्य उभारले. 'समान भाषा-समान संस्कृती' हा विचार पुढे बनारस काँग्रेसनेही (१९०६) उचलून धरला. एकप्रकारे एकभाषी राज्याची ती पूर्वसूत्रीच ठरली. भाषा हे जनतेला संघटित करण्याचे प्रभावी माध्यम आहे, हे ओळखून लॉर्ड कर्झनने एकभाषा राज्याची कल्पना धुडकावली होती. भाषेचे दुबळेपण समाजाचे कसे विघटन करू शकते. याचा अनुभव आपण आज घेत आहोत. भाषेचे राजकारण केले जाते आहे. तिच्या नावाने उत्सव साजरे केले जाताहेत. मात्र, जगाच्या आठ हजार भाषांमध्ये १५ वी आणि भारतात पाचव्या क्रमांकावर असलेल्या मराठीच्या भवितव्याची चिंता करण्याची वेळ आपल्यावर आली नाही, असा एक दिवस जात नाही. तिचा व्यवहारातील वापर कमीकमी होत चालला आहे. या पेचप्रसंगावर मात करण्याचा काही मार्ग आहे काय?

मराठी भाषेचा गेली २५ वषेर् सखोल अभ्यास करणारे मुंबईचे शुभानन गांगल गेली काही वषेर् मराठी ही जगातील सर्वश्ाेष्ठ भाषा आहे, हे शास्त्रीय पद्धतीने सांगत आहेत. नव्या काळानुसार शास्त्रीय निकषांवर मराठी भाषेच्या स्वरूपात काही बदल करण्यासाठी 'शोध मराठीचा' या संस्थेमार्फत ते प्रयत्नशील आहेत. या संशोधनाचा व्यवहारात उपयोग व्हावा आणि मराठीचे हे श्ाेष्ठत्व जागतिक मराठी समुदाय आणि सर्वसामान्य मराठी माणसांपर्यंत पोहचावे. या दृष्टीने एक मोठी घटना गेल्या जागतिक मराठी दिनी (२७ फेब्रुवारी) घडली. गांगल आणि मी-असे एकत्र येऊन आम्ही मराठी जगताचा पहिला 'मराठी एडिटर' त्या दिवशी वेबवर प्रसारित केला. आज तेरा हजारांहून अधिक जण त्याचा वापर करत आहेत. हा मिळालेला प्रतिसाद त्याच्या उपयोगितेची साक्ष देतो आहे.

श्ााव्य, मौखिक, लिखित आणि संगणकीय या चारी पद्धतीतून ज्या भाषेला व्यवस्थित वावरता येईल, तीच भाषा आधुनिक युगात टिकणार आहे. हे सर्व 'मराटॅ एडिटर' साध्य करणार आहे, असे म्हटल्यावर अनेकांचा लगेच विश्वास बसणार नाही. मात्र, हे तंत्र समजून घेतल्यावर आपल्या भाषाविकासाचे सूत्र सापडल्याचा आनंद सर्वांना होईल. अशी आम्हाला खात्री वाटते.

सर्वप्रथम 'मराठी एडिटर' म्हणजे काय, हे समजून घेऊ. वेबजगतातील संवादात भाग घेणाऱ्या प्रत्येकाला 'ऑनलाईन एडिटर' मुळे फॉण्ट उपलब्ध होतो आणि त्याद्वारे जोडलेल्या सर्वांना त्याच समान फॉण्टमधून टाईप करता येते. एरवी मराठीत टाईप करण्यासाठी फॉण्ट विकत घ्यावा लागतो. 'मराठी एडिटर'वर तो मोफत मिळतो. पण त्यावरून आपण ज्यांना ज्यांना मेल करतो. त्या सर्वांना हा फॉण्ट लगेच मोफत उपलब्ध होतो. एवढेच नव्हे तर त्यांचा संगणकही मराठीत कामे करण्यासाठी सज्ज होतो. ही या 'मराठी एडिटर'ची खरी किमया आहे. दुसऱ्याकडे हा फॉण्ट नसेल म्हणून मजकुराचे चित्र करून (पीडीएफ) पाठविण्याची गरजच राहत नाही. म्हणजे मेलसोबतच तो त्याला मिळतो. वेगळ्या शब्दात सांगायचे तर इंग्रजी फॉण्टसारखाच संगणकातून वावरणारा मराठी फॉण्ट 'शोध मराठीचा' संशोधनाने आणला आहे. एका पणतीने दुसरी, दुसरीने तिसरी आणि ऑनलाईन लाखो पणत्या पेटवून मनसोक्त मराठीचा वापर करा, असे आम्ही त्याला म्हणतो. मराठीचा मनसोक्त आणि १०० टक्के शुद्ध वापर या 'एडिटरवर' आपण करू शकतो. त्यामुळे हा मराठी जगतासाठीचा पहिला 'मराठी एडिटर' ठरतो.

'मराठी एडिटर'चे आणखी वेगळेपण असे की, संगणकाचा कसाही आणि कितीही विकास झाला तरी त्यात वापरला जाणारा फॉण्ट कधीही कालबाह्य ठरणार नाही. दुसरे म्हणजे, सध्या 'नाव आणि ईमेल' या गोष्टींतून ओळख आता तयार होते आहे. या एडिटरवर त्याच ईमेलमधून मराठी वापरता येते आहे. तिसरे म्हणजे, इंग्रजी आणि मराठी की बोर्ड यात फोनेटिक सार्धम्य ठेवल्याने भाषांच्या जागतिकरणात मराठीचा प्रसार आणि विकास जोमाने होणार आहे. इंग्रजी वापराची अपरिहार्यता लक्षात घेता एक कळ दाबली की या एडिटरवर टाईप करता येते. शिवाय तेथेच की-बोर्ड लगेच पाहता येतो. थोडक्यात मराठी समाजाच्या सर्व मूलभूत संगणकीय गरजा 'मराठी एडिटर' द्वारे भागविण्यात येत आहेत.

संगणकाची आज्ञावली आणि रचना इंग्रजीत असल्याने इतर भाषांच्या वापरावर आपोआपच मर्यादा आल्या आहेत. मराठीत तर शेकडो फॉण्टमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि मराठीच्या मनसोक्त वापरावर मर्यादा आल्या. त्यामुळेच समाजाच्या आथिर्क, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि वैयक्तिक गरजा भागविण्यासाठी इंग्रजीचा आधार घेणे कमप्राप्त ठरले. जगातील पंधराव्या क्रमांकाच्या भाषेवर ही वेळ आली, ही काही भूषणावह गोष्ट नव्हे. 'मराठी एडिटर' ने हे व्यवहार मराठीतून करण्याची सोय उपलब्ध केली आहे.

याचा अर्थ संगणकात मराठीचा वापर सुलभ नाही. म्हणून मराठी मागे पडते. हे म्हणण्याची नामुष्की आता आमच्यावर येणार नाही.

मराठी माणसांनी तो का वापरावा? केवळ मराठी भाषेच्या प्रेमापोटी वापरण्याऐवजी तो कुटुंबाच्या संवादाच्या गरजा भागविण्यासाठी वापरला पाहिजे. त्यातून आपल्याला आणि मराठी भाषेलाही प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. मराठी भाषा इंग्रजीपेक्षा बऱ्याच बाबतीत सरस आहे. हे 'शोध मराठीचा' संशोधन का म्हणते, हे 'मराठी एडिटर' वर दिलेल्या 'शोध मराठीचा' संशोधन या मजकुरात आपल्याला मिळेलच. संगणकीय विकासात इंग्रजीच्या मर्यादा लक्षात येवू लागतील, तेव्हा मराठीला पर्याय उरलेला नसेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.

मराठीला आपल्या मूळ सार्मथ्यावर उभे करायचे असेल तर इतर भाषांच्या आधाराने मराठी लिहिण्याऐवजी शंभर टक्के मराठीत लिहिण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. ते 'मराठी एडिटर'ने साध्य केले आहे. मराठी समाजाला सर्वत्र चालणाऱ्या फॉण्टची गरज आहे. ती गरजही 'मराठी एडिटर'ने पूर्ण केली आहे.

फॉण्टची वैशिष्ट्ये

* तो कधीही कालबाह्य ठरणार नाही.

* मायक्रोसॉफ्टच्या Words, excel वगैरे तसेच page maker, photoshope या अॅप्लीकेशनमधून विरूप (distorted) होत नाही.

* गुगल, याहू हॉटमेलच्या पहिल्या पानावर चालतो.

तो इंटरनेटवरून डाऊनलोड करता येतो.

* तो कमीतकमी जगा व्यापतो. त्यामुळे तो सहज जातो आणि 'व्हायरस'च्या नावाखाली रिजेक्ट होत नाही.

* फोनॅटिक की बोर्डमुळे वापरणे सोपे. ९४ चाव्यांमुळे वेगात टाईप करता येते.

* प्रिंटरच्या सर्व अॅप्लिकेशनमध्ये तो व्यवस्थित चालतो.

Friday, March 19, 2010

समृध्दीच्या झाडांची सावली तर मिळू दे....

जागतिकरणात आणि नव्या काळात समाजामध्ये कशी विसंगती वाढत चालली आहे, याची शेकडो उदाहरणे सध्या पाहायला मिळत आहेत. औद्योगिकीकरण आणि नागरीकरणात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात ही विसंगती अधिकच ठळक होउ लागली आहे. खरे म्हणजे गाडीच्या दोन चाकांमध्ये समन्वय आणि काहीतरी सारखेपणा लागतोच. त्याशिवाय गाडी चालूच शकत नाही. विसंगतीसह तिने चालण्याचा प्रयत्न केला तर काय होउ शतके, याची आपण कल्पना करू शकतो. तशी कल्पना समाजातील विसंगतीसंबंधी करून पाहिल्यास समाज या बदलांमुळे कसा दाहीदिशा खेचला जातो आहे, याची कल्पना यावी.
ती बातमी प्रथमदर्शनी फार वेगळी होती, असे कोणी म्हणणार नाही. तिचे वेगळेपण मलाही अधिक विचार केल्यावरच लक्षात आले. बातमी अगदी साधी होती. आपल्या महाराष्ट्रातील ‘आयटी’ शहर पुणे आणि या पुण्याजवळ हिंजवडी नावाचे छोटे गाव. आता तेथे एमआयडीसी आहे. त्याला आता आयटी पार्क म्हणतात. महाराष्ट्राच्या अलिकडच्या काळातील प्रगतीचे चित्र रेखाटायचे असल्यास ते हिंजवडी आयटी पार्कच्या उल्लेखाशिवाय पुर्ण होत नाही. प्रत्यक्ष हिंजवडी पाहिल्यावर आपण भारतातच आहोत ना, यावर लवकर विश्वास बसत नाही. एका दशकापुर्वी ज्या एका शहरापुरत्या किंवा आपल्या देशापुरत्या मर्यादित कंपन्या होत्या, त्या आज जागतिक कंपन्या झाल्या आहेत. जागतिक कंपन्यांना ‘जागतिक दर्जाच्या’ सुविधा हव्यात, त्यामुळे हिंजवडीतील कंपन्यांना सहसा काही त्रास होउ नये अशी काळजी सरकारतर्फे घेतली जाते. उद्योगवाढीसाठी हे आवश्यकच आहे, यात काही शंका नाही. मात्र या बातमीने एरवी दुर्लक्षित राहणा-या एका महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधले गेले आहे.

बातमी अशी होती. ‘हंडाभर पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा ‘ ‘ हिंजवडीत कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नाराजी’ असा या बातमीचा मथळा होता. या बातमीतील इतर काही उल्लेख असेः ‘वाढीव लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा योजना आणि जलशुध्दीकरण प्रकल्प अपुरा पडू लागला आहे.’ ‘एमआयडीसीला पाणी बिलापोटी दरमहा एक लाख रूपये ग्रामपंचायतीला डोईजड झाले.’ ‘ अलिकडे लोकांना दिवसाआड पाणी मिळू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत’ ‘ एमआयडीसीच्या अधिका-यांनी हिंजवडी ग्रामस्थांना माफक दरात पाणी देण्याचे कबूल केले आहे.’ आता आपल्याला ही विसंगती ख-या अर्थाने लक्षात येईल.

ज्या हिंजवडी आयटी पार्कमधून कोट्यवधींच्या सॉफ्टवेअरची निर्यात होते, जेथे कोट्यवधींच्या इमारती उभ्या आहेत. जेथे हजारो तरूण काम करतात. ज्या गावाच्या जमिनीवर हे आयटी पार्क उभे आहे, त्या भूमीतील मुळ लोकांना पुरेसे पाणी मिळू शकत नाही! हे स्वीकारायला जड जाते, मात्र ती वस्तुस्थिती आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे वाहतुकीच्या अडचणी आहेत, रस्ते खराब झाले आहेत, अतिक्रमणे वाढली आहेत... अशा काही समस्या असत्या तर त्याचे मला काही फार आश्चर्य वाढले नसते. मात्र माणसाचे जीवनच ज्यावर अवलंबून आहे, अशा पाण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते, हे निश्चितच खेदजनक आहे. आधुनिक जगातल्या या विसंगतीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो.

हिंजवडी ग्रामपंचायतीकडे पाण्याचे बील भरण्यासाठी महिन्याला एक लाख रूपये नाहीत, या गोष्टीकडेही एक विसंगती म्हणूनच पाहावे लागते. कारण ज्या आयटी पार्कमध्ये दररोज कोट्यवधींचे व्यवहार होतात, त्या परिसरातील माणसे एक लाख रूपयांसाठी पाण्याची टंचाई सहन करतात, ही ती विसंगती. हिंजवडी गाव आणि हिंजवडी आयटी पार्क या एकाच परिसरात राहणा-या नागरिकांची आयुष्ये कशी एकमेकांकडे पाठ करून बसली आहेत, याविषयी आपण बोलत नाहीए, हे लक्षात घ्या. असमानतेची ती टोकं आपण बाजूलाच ठेवली आहेत. कारण ती सर्वत्रच दिसतात. आपण फक्त माणसांच्या प्राथमिक गरजांविषयीच बोलतो आहोत. त्या गरजा भागविताना नागरिकांमध्ये भेदभाव करण्याचे कारण नाही, याविषयी तरी लोकशाही समाजवादी देशात वाद असण्याचे कारण नाही, असे मला वाटते.

हिंजवडीतील विसंगती अधिक खेदजनक वाटते याचे आणखी एक महत्वाचे कारण आहे. तेथील आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर तयार केली जातात. ही सॉफ्टवेअर प्रामुख्याने माणसाचे आयुष्य सुखकर करण्यासाठी वापरली जातात. त्याला अधिकाधिक सोयीसुविधा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. जगाच्या दुस-या टोकांवर राहणा-या माणसांच्या परिसराचा, सवयींचा, समाजाचा त्यासाठी अभ्यास केला जातो. त्या टोकांवर बसलेल्या लोकांची आयुष्ये त्यामुळे सुखकर होतात. ते पैसे देतात, डॉलर देतात, एक व्यवहार पुर्ण करतात, हे सर्व जागतिक व्यापार व्यवहाराला धरूनच आहे, याविषयी आपले काही म्हणणे नाही. पण म्हणून स्थानिक लोकांच्या प्राथमिक गरजा पुर्ण करण्यातही आपण, आपले प्रशासन यशस्वी होत नाही, याला काय म्हणायचे ?

जागतिकरणात आणि आधुनिक काळात जगाच्या पाठीवर कोणासाठी कोण कोठे आणि कधी काम करतो आहे, हे कळण्याची गरज राहिलेले नाही. एका टोकाचा माल जगाच्या दुस-या टोकाला सहजपणे पोचण्याच्या वेगवान सुविधा निर्माण झाल्या आहेत. काम करणा-याचे चेहरे हरवत चालले आहेत. राज्य, देश, खंडांच्या सीमाही पुसट होत चालल्या आहेत. या सर्व बदलांचे खरे तर स्वागतच करायला हवे. मात्र हे बदल इतक्या खेदजनक विसंगतीला जन्म देत असतील तर त्याचे काय करायचे, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. या बदलांमुळे जगात जे अर्थशास्र जन्म घेत आहे, त्यात असे म्हटले जाते की जागतिकरणामुळे गरीब आणि श्रीमंत देश असा भेद आता राहिला नाही. तो जगभरातील गरीब लोक आणि श्रीमंत लोक- असा भेद निर्माण झाला आहे. हिंजवडीतील विसंगती या भेदाला दुजोरा देणारी आहे. या विसंगतीचा विस्तार करावयाचा झाल्यास ग्रामीण भागातील जीवन आणि शहरी जीवन, अर्धशिक्षित आणि उच्चशिक्षित, महानगरांमधील दोन टोके, सरकारी शाळा आणि खासगी शाळा अशी विसंगतीची ठिकाणे वाढतच चालली आहेत.

माणसांच्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी अजूनही मोठे संशोधन होण्याची गरज आहे. आपण असे म्हणूयात की त्याची दिशा बदण्याची गरज आहे. तो बदल कधी होईल माहीत नाही, मात्र किमान जेथे समृध्दीची झाडे फोफावत आहेत, तेथे त्या झाडांची सावली वाटसरूंना मिळावी, या अपेक्षांमध्ये चुकीचे काय आहे? येथे तर बायाबापड्या उन्हातान्हात पाण्यासाठी हंडा घेउन उभ्या आहेत !


यमाजी मालकर ymalkar@gmail.com

Saturday, March 13, 2010

चेंगराचेंगरीतील ‘आत्महत्या’

मुंबईतील कलिना भागात गेल्या सोमवारी पोलिस भरतीदरम्यान चेंगराचेंगरी होउन नगर जिल्ह्यातल्या रमेश गोपीनाथ आंबरे या २२ वर्षे वयाच्या तरूणाचा तो तु्डविला गेल्याने मृत्यू झाला. पोलिसांत भरतीसाठी आलेल्या रमेशने चेंगराचेंगरीत आत्महत्या केली, असे मी म्हणेन. हे विधान लगेच पटणार नाही, मात्र अधिक विचार करता आपणही माझ्याशी सहमत व्हाल. पोलिस भरतीसाठी जायचे म्हणजे रमेशने आपली प्रकृती चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला असणार. मुळातच त्याची प्रकृती सर्वसामान्यांपेक्षा चांगली असणार. नोकरी मिळविण्यासाठी मुंबईला आला म्हणजे ती मिळविण्यासाठीचे मानसिक बळही त्याने एकवटले असणार. या परिस्थितीतील तरूणाचा चेंगराचेंगरीत मृत्यू होतो, हे मनाला पटत नाही. चेंगराचेंगरी होउन तो ज्यावेळी खाली पडला त्यावेळी त्याने स्वतःला सावरण्याचे, आपली त्यातून सुटका करून घेण्याचे निकराचे प्रयत्न केले असणार. पण एक क्षण असा आला की तो हतबल झाला. त्याचे मानसिक धैर्य शारीरिक ताकदीपेक्षा कमी पडले आणि मग त्याने स्वतःला नशिबाच्या हवाली केले. मग त्याने प्रतिकार करणे, स्वतःला त्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सोडून दिले. त्यालाच मी त्याने चेंगराचेंगरीत ‘आत्महत्या’ केली , असे म्हणतो. त्याने रोजगाराचा खूप पाठलाग केला मात्र त्याला तो मिळाला नाही, त्यातून जी हतबलता त्याच्या आयुष्यात आली होती, ती संपविण्याचा एक मार्ग त्याला त्याक्षणी सापडला.

मला माहीत आहे असा नकारात्मक विचार करू नये. एका तरूणाच्या मृत्यूवरून असे काही निष्कर्ष काढू नयेत. मात्र मला हेही माहीत आहे की कधी परीक्षेच्या तणावातून, कधी बेरोजगारीतून, कधी दारिद्रयाला कंटाळून अशा आत्महत्या दररोज होताहेत आणि त्या आत्महत्यांची जेवढ्या गांभीर्याने दखल घ्यायला हवी, ती घेतली जात नाहीए. जणू आम्ही हे गृहितच धरून चाललो आहोत की एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये असे होणारच. काही प्रमाणात ते अपरिहार्य आहे हे मलाही कळते, मात्र या प्रकारच्या घटनांविषयीची असंवेदनशीलता मला समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक वाटते.

निवडणुकीच्या तोंडावरचे राजकीय धनदांडग्याचे गरीब महिलांना साडीवाटप आणि त्यावेळी झालेली चेंगराचेंगरी किंवा पवित्र स्नानासाठी झुंबड उडून झालेली चेंगराचेंगरी याही तेवढ्याच दुर्दैवी घटना आहेत. मात्र परवाची मुंबईतील चेंगराचेंगरी अधिक क्लेशजनक आहे. एकतर ही चेंगराचेंगरी मुंबई महानगरात घडली आहे. जी आमची आर्थिक राजधानी आहे. आधुनिक शहर आहे. दुसरे म्हणजे आमच्या सुरक्षा व्यवस्थेतील सर्वात महत्वाचा घटक ठरू पाहणा-या पोलिस दलाच्या भरतीदरम्यान ती घटना झाली आहे. तिसरे म्हणजे या प्रकारच्या भरतीप्रक्रिया हा आमच्या प्रशासनाचे नेहमीचे काम असताना असे घडले आहे. चौथे म्हणजे याच भरतीदरम्यान पुर्वीही अशाच घटना घडल्या आहेत, तरीही पुन्हा ही घटना घडली आहे. पाचवे म्हणजे ३,५८६ जागांसाठी एक लाख तरूण मुंबईत आले होते, ही वस्तुस्थितीही आम्हाला दुर्लक्षिता येणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान, प्रवाससुविधा, आधुनिकरण यासंबंधीचे जे दावे आम्ही आज करत आहोत, त्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे होणारा क्लेश अधिक आहे.

पुण्यात ५४० जागांसाठी २७ हजार, सांगलीत २७७ जागांसाठी १६ हजार, नगरमध्ये २५५ साठी १४ हजार आणि धुळ्यात १२२ जागांसाठी १० हजार तरूण पोलिस भरतीसाठी जमतात, ही आकडेवारी आमच्या रोजगार इंडेक्सला थप्पड मारणारी आहे. दहावी पास- नापास तरूणांना रोजगाराची किती गरज आहे आणि त्याकडे आम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही, हेही या घटनेने आम्हाला चिमटा घेवून सांगितले आहे. तरूणांची ही प्रचंड शक्ती आहे, तिचा विचार आमच्या नियोजनात किती आहे, हे यानिमित्ताने तपासण्याची गरज आहे. तरूणांची शक्ती म्हटले की आम्हाला उच्चशिक्षितांची यशोशिखरे दिसायला लागतात. त्यांच्या कौतुकांचे समारंभ होतात. त्यांची प्रज्ञा दिसते आणि ते आमच्या देशाला महासत्ता बनविणार, असे आम्ही अभिमानाने म्हणायला लागतो. त्या तरूणांच्या यशाचा अभिमान बाळगलाच पाहिजे, यात माझ्या मनात अजिबात शंका नाही. मात्र हे सर्व करताना आमचे तारतम्य हरवले आहे, हेही सांगायला पाहिजे. घरातील हुशार किंवा घरात पैसे आणणा-या भावंडाचे कौतुक करताना ज्याच्यावर परिस्थितीने अन्याय केला आहे, त्या दुस-या भावंडाविषयी, किमान त्याच्याकडे लक्ष आहे, त्याच्यावर प्रेम आहे, तो आम्हाला नकोसा झालेला नाही, ही भावना प्रामाणिकपणे त्याच्यापर्यंत पोहचलीच पाहिजे. ती पोचविण्यात आम्ही फार कमी पडत आहोत. कालच्या आणि सर्वच पोलिस भरतींमध्ये हे नाकारलेपण लाखो तरूणांच्या वाट्याला येते आहे. सरकार आणि समाजाला जणू ते नकोसे झाले आहेत. जेथे ही भावना आजूबाजूला वावरते आहे त्या व्यवस्थेमध्ये कोणत्या संवेदनशील मनाला जगावे वाटेल? मग अशी मनं जीव देण्याचा, आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. रमेश आंबरेचा मृत्यु ही अशी आत्महत्या असू शकते.

घरातलं नाकारलेपण घेउन हे तरूण प्रवास करतात. मोठ्या शहरांत राहण्याची सोय नाही, ठिकाणे नीट माहिती नाहीत, खिशात उपकारभावनेने दिलेले मोजकेच पैसे आहेत, आपल्या स्पर्धेत उभ्या असलेल्या हजारो माणसांमध्ये स्वतःला सिध्द करण्याचा तणाव आहे... असे सगळे नकार पचवून तेथे पोचलेल्या तरूणासमोर काय वाढून ठेवले आहे ? आणखी एक स्पर्धा. रांगेत दुस-याला मागे टाकून पुढे जाण्याची धडपड काही जणांनी केली आणि ही चेंगराचेंगरी झाली. आपला अर्ज प्रशासनापर्यंत पोचावा, यासाठीची अशी धडपड त्यांना का करावी वाटली? रांगेत सर्वांचे अर्ज स्वीकारले जातील, असा विश्वास प्रशासन त्यांना का देउ शकले नाही ? इतकी गर्दी नेहमीच होते, हे माहीत असून प्रशासनाला असे का वाटले नाही की भरतीसाठी आणखी अनेक ठिकाणी व्यवस्था केली जावी? सुशिक्षित बेरोजगारावर होणारा खर्च वाया जातो, असे तर कोणा साहेबांचे मत नाही ना? की त्यांचीच गरज आहे, त्यामुळे त्यांनी जगाच्या पाठीवर कुठेही, कसेही यावे, त्याच्याशी प्रशासनाचा काही संबंध नाही, असे साहेबांना वाटते? मनात कालवाकालव व्हावी, असे हे आज अनुत्तरित असलेले अनेक प्रश्न. त्यांची उत्तरे कोणत्याही लोकशाही समाजवादी देशात मिळालीच पाहिजेत. नाहीतर दुस-याला मागे टाकून पुढे जाण्याच्या चढाओढीत झालेल्या चेंगराचेंगरीतील प्रत्येक बळी ही नाकारलेपण संपविण्यासाठीची आत्महत्या ठरेल. आणि जाणा-या प्रत्येक जीवाचा त्यानंतर येणा-या समृध्दीला शाप असेल की या सर्व इमारती जीवंत जीवांकडे अक्षम्य दुर्लक्ष करून बांधलेल्या आहेत. हे आम्हाला चालणार आहे?

यमाजी मालकर / ymalkar@gmail.com