Saturday, March 13, 2010

चेंगराचेंगरीतील ‘आत्महत्या’

मुंबईतील कलिना भागात गेल्या सोमवारी पोलिस भरतीदरम्यान चेंगराचेंगरी होउन नगर जिल्ह्यातल्या रमेश गोपीनाथ आंबरे या २२ वर्षे वयाच्या तरूणाचा तो तु्डविला गेल्याने मृत्यू झाला. पोलिसांत भरतीसाठी आलेल्या रमेशने चेंगराचेंगरीत आत्महत्या केली, असे मी म्हणेन. हे विधान लगेच पटणार नाही, मात्र अधिक विचार करता आपणही माझ्याशी सहमत व्हाल. पोलिस भरतीसाठी जायचे म्हणजे रमेशने आपली प्रकृती चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला असणार. मुळातच त्याची प्रकृती सर्वसामान्यांपेक्षा चांगली असणार. नोकरी मिळविण्यासाठी मुंबईला आला म्हणजे ती मिळविण्यासाठीचे मानसिक बळही त्याने एकवटले असणार. या परिस्थितीतील तरूणाचा चेंगराचेंगरीत मृत्यू होतो, हे मनाला पटत नाही. चेंगराचेंगरी होउन तो ज्यावेळी खाली पडला त्यावेळी त्याने स्वतःला सावरण्याचे, आपली त्यातून सुटका करून घेण्याचे निकराचे प्रयत्न केले असणार. पण एक क्षण असा आला की तो हतबल झाला. त्याचे मानसिक धैर्य शारीरिक ताकदीपेक्षा कमी पडले आणि मग त्याने स्वतःला नशिबाच्या हवाली केले. मग त्याने प्रतिकार करणे, स्वतःला त्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सोडून दिले. त्यालाच मी त्याने चेंगराचेंगरीत ‘आत्महत्या’ केली , असे म्हणतो. त्याने रोजगाराचा खूप पाठलाग केला मात्र त्याला तो मिळाला नाही, त्यातून जी हतबलता त्याच्या आयुष्यात आली होती, ती संपविण्याचा एक मार्ग त्याला त्याक्षणी सापडला.

मला माहीत आहे असा नकारात्मक विचार करू नये. एका तरूणाच्या मृत्यूवरून असे काही निष्कर्ष काढू नयेत. मात्र मला हेही माहीत आहे की कधी परीक्षेच्या तणावातून, कधी बेरोजगारीतून, कधी दारिद्रयाला कंटाळून अशा आत्महत्या दररोज होताहेत आणि त्या आत्महत्यांची जेवढ्या गांभीर्याने दखल घ्यायला हवी, ती घेतली जात नाहीए. जणू आम्ही हे गृहितच धरून चाललो आहोत की एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये असे होणारच. काही प्रमाणात ते अपरिहार्य आहे हे मलाही कळते, मात्र या प्रकारच्या घटनांविषयीची असंवेदनशीलता मला समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक वाटते.

निवडणुकीच्या तोंडावरचे राजकीय धनदांडग्याचे गरीब महिलांना साडीवाटप आणि त्यावेळी झालेली चेंगराचेंगरी किंवा पवित्र स्नानासाठी झुंबड उडून झालेली चेंगराचेंगरी याही तेवढ्याच दुर्दैवी घटना आहेत. मात्र परवाची मुंबईतील चेंगराचेंगरी अधिक क्लेशजनक आहे. एकतर ही चेंगराचेंगरी मुंबई महानगरात घडली आहे. जी आमची आर्थिक राजधानी आहे. आधुनिक शहर आहे. दुसरे म्हणजे आमच्या सुरक्षा व्यवस्थेतील सर्वात महत्वाचा घटक ठरू पाहणा-या पोलिस दलाच्या भरतीदरम्यान ती घटना झाली आहे. तिसरे म्हणजे या प्रकारच्या भरतीप्रक्रिया हा आमच्या प्रशासनाचे नेहमीचे काम असताना असे घडले आहे. चौथे म्हणजे याच भरतीदरम्यान पुर्वीही अशाच घटना घडल्या आहेत, तरीही पुन्हा ही घटना घडली आहे. पाचवे म्हणजे ३,५८६ जागांसाठी एक लाख तरूण मुंबईत आले होते, ही वस्तुस्थितीही आम्हाला दुर्लक्षिता येणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान, प्रवाससुविधा, आधुनिकरण यासंबंधीचे जे दावे आम्ही आज करत आहोत, त्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे होणारा क्लेश अधिक आहे.

पुण्यात ५४० जागांसाठी २७ हजार, सांगलीत २७७ जागांसाठी १६ हजार, नगरमध्ये २५५ साठी १४ हजार आणि धुळ्यात १२२ जागांसाठी १० हजार तरूण पोलिस भरतीसाठी जमतात, ही आकडेवारी आमच्या रोजगार इंडेक्सला थप्पड मारणारी आहे. दहावी पास- नापास तरूणांना रोजगाराची किती गरज आहे आणि त्याकडे आम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही, हेही या घटनेने आम्हाला चिमटा घेवून सांगितले आहे. तरूणांची ही प्रचंड शक्ती आहे, तिचा विचार आमच्या नियोजनात किती आहे, हे यानिमित्ताने तपासण्याची गरज आहे. तरूणांची शक्ती म्हटले की आम्हाला उच्चशिक्षितांची यशोशिखरे दिसायला लागतात. त्यांच्या कौतुकांचे समारंभ होतात. त्यांची प्रज्ञा दिसते आणि ते आमच्या देशाला महासत्ता बनविणार, असे आम्ही अभिमानाने म्हणायला लागतो. त्या तरूणांच्या यशाचा अभिमान बाळगलाच पाहिजे, यात माझ्या मनात अजिबात शंका नाही. मात्र हे सर्व करताना आमचे तारतम्य हरवले आहे, हेही सांगायला पाहिजे. घरातील हुशार किंवा घरात पैसे आणणा-या भावंडाचे कौतुक करताना ज्याच्यावर परिस्थितीने अन्याय केला आहे, त्या दुस-या भावंडाविषयी, किमान त्याच्याकडे लक्ष आहे, त्याच्यावर प्रेम आहे, तो आम्हाला नकोसा झालेला नाही, ही भावना प्रामाणिकपणे त्याच्यापर्यंत पोहचलीच पाहिजे. ती पोचविण्यात आम्ही फार कमी पडत आहोत. कालच्या आणि सर्वच पोलिस भरतींमध्ये हे नाकारलेपण लाखो तरूणांच्या वाट्याला येते आहे. सरकार आणि समाजाला जणू ते नकोसे झाले आहेत. जेथे ही भावना आजूबाजूला वावरते आहे त्या व्यवस्थेमध्ये कोणत्या संवेदनशील मनाला जगावे वाटेल? मग अशी मनं जीव देण्याचा, आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. रमेश आंबरेचा मृत्यु ही अशी आत्महत्या असू शकते.

घरातलं नाकारलेपण घेउन हे तरूण प्रवास करतात. मोठ्या शहरांत राहण्याची सोय नाही, ठिकाणे नीट माहिती नाहीत, खिशात उपकारभावनेने दिलेले मोजकेच पैसे आहेत, आपल्या स्पर्धेत उभ्या असलेल्या हजारो माणसांमध्ये स्वतःला सिध्द करण्याचा तणाव आहे... असे सगळे नकार पचवून तेथे पोचलेल्या तरूणासमोर काय वाढून ठेवले आहे ? आणखी एक स्पर्धा. रांगेत दुस-याला मागे टाकून पुढे जाण्याची धडपड काही जणांनी केली आणि ही चेंगराचेंगरी झाली. आपला अर्ज प्रशासनापर्यंत पोचावा, यासाठीची अशी धडपड त्यांना का करावी वाटली? रांगेत सर्वांचे अर्ज स्वीकारले जातील, असा विश्वास प्रशासन त्यांना का देउ शकले नाही ? इतकी गर्दी नेहमीच होते, हे माहीत असून प्रशासनाला असे का वाटले नाही की भरतीसाठी आणखी अनेक ठिकाणी व्यवस्था केली जावी? सुशिक्षित बेरोजगारावर होणारा खर्च वाया जातो, असे तर कोणा साहेबांचे मत नाही ना? की त्यांचीच गरज आहे, त्यामुळे त्यांनी जगाच्या पाठीवर कुठेही, कसेही यावे, त्याच्याशी प्रशासनाचा काही संबंध नाही, असे साहेबांना वाटते? मनात कालवाकालव व्हावी, असे हे आज अनुत्तरित असलेले अनेक प्रश्न. त्यांची उत्तरे कोणत्याही लोकशाही समाजवादी देशात मिळालीच पाहिजेत. नाहीतर दुस-याला मागे टाकून पुढे जाण्याच्या चढाओढीत झालेल्या चेंगराचेंगरीतील प्रत्येक बळी ही नाकारलेपण संपविण्यासाठीची आत्महत्या ठरेल. आणि जाणा-या प्रत्येक जीवाचा त्यानंतर येणा-या समृध्दीला शाप असेल की या सर्व इमारती जीवंत जीवांकडे अक्षम्य दुर्लक्ष करून बांधलेल्या आहेत. हे आम्हाला चालणार आहे?

यमाजी मालकर / ymalkar@gmail.com