Saturday, February 27, 2010

मरणाचे स्मरण देणारे दिवस..

महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांतील घटनांवरून मला संत एकनाथांच्या चरित्रातील एक गोष्ट आठवली. त्या गोष्टीचे नाव आहे ‘ मरणाचे स्मरण असावे ’ एका गृहस्थाने एकनाथांना विचारले, ‘ महाराज, आपले जीवन किती साधे, किती निष्पाप, आमचे तसे का नाही? तुम्ही कधी रागावत नाही. भांडत नाही. किती शांत-पवित्र प्रेमळ तुम्ही! ‘ नाथ म्हणाले, ‘ माझी गोष्ट तूर्त राहू दे. तुझ्याविषयी मला एक गोष्ट कळाली आहे. तुझे आजपासून सात दिवसांनी मरण आहे.’ नाथांनी सांगितलेली गोष्ट खोटी कोण मानणार? सात दिवसांनी मरण ! फक्त १६८ च तास बाकी. अरेरे.. ! तो मनुष्य घाईने घरी गेला. निरवानिरवीच्या गोष्टी बोलू लागला. तो आजारी पडला. सहा दिवस गेले. सातव्या दिवशी नाथ त्याच्याजवळ गेले. नाथांनी विचारले, ‘कसे काय?’ तो म्हणाला, ‘जातो आता’ नाथांनी विचारले, ‘ या सहा दिवसांत किती पाप केले? पापाचे किती विचार मनात आले?’ तो म्हणाला, ‘ नाथ, पापाचा विचार करावयास वेळच मिळाला नाही. सारखे डोळ्यासमोर मरणच दिसत होते.’ नाथ म्हणाले, ‘ आमचे जीवन निष्पाप का य्सते, याचे उत्तर आता तुला मिळाले.’ मरणाचा वाघोबा सदैव समोर उभा असला म्हणजे पाप करावयास कसे सुचेल? पाप करावयासही निश्चिंतता लागते. मरण समोर दिसत असेल तर कोणत्या हिंमतीवर मनुष्य पाप करेल? ‘ गोष्ट येथे संपली.

ही गोष्ट आठवण्याचे कारण असे की आधुनिक काळात विज्ञानाने माणसास जे स्थैर्य दिले आहे, त्यामुळे माणूस मरणाचे भान विसरला आहे की काय, असे वाटायला लागले आहे. तरी बरे, विज्ञानाने इतकी प्रगती करूनही आपले मरण कोठे आणि कधी ठरले
आहे, हे माणूस आजही अजिबात सांगू शकत नाही. निसर्गाने जन्म-मृत्यूचे नियंत्रण आपल्याच हातात ठेवले आहे, ते आपल्या हातात घेण्याचे प्रयत्न माणूस करतो आहे, मात्र अद्याप तरी त्यात त्याला यश मिळालेले नाही. ते मिळण्याची शक्यताही नाही.

पुण्यात जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला. त्यात तरूणांची संख्या अधिक आहे. हा स्फोट अतिरेक्यांनी घडवून आणला, त्यांना पकडले पाहिजे, कडक शिक्षा केली पाहिजे, यात कुणाचे दुमत असण्याचे काही कारण नाही. यानिमित्ताने मला मरणाच्या स्मरणाकडेच आपले लक्ष वेधायचे आहे. स्फोटातील मृतांपैकी अंकिक धर हा मुंबईत नोकरी करणारा तरूण. मूळ कलकत्त्याचा. त्याला नोकरीत बढती मिळाली म्हणून पार्टी देण्यासाठी पुण्यात आला होता. त्याची बहिण आनंदी आणि मैत्रिण शिल्पा गोयंका त्याच्यासोबत होती. ह्या दोघीही स्फोटात मृत्यूमुखी पडल्या. दुसरा एक मृत तरूण – शंकर नथू पानसरे हा पुण्याचा रिक्षाचालक आहे. रिक्षात बसलेले प्रवासी खरेदी करण्यासाठी बेकरीत गेले होते आणि शंकर वाट पाहात थांबला होता. आणखी एक मृत आहे- इराणचा विद्यार्थी सईद काझी अब्दुल खानी. तो दोनच महिन्यांपुर्वी पुण्यात आला होता. मृतांत एक बंगळूरची तरूणी- पी. सुंदरी आहे. ती शिल्पाची मैत्रिण होती. मुंबईच्या कांदिवलीची विनिता गडानी ही या घटनेतील आणखी एक बळी. नादिया मॅक्रेन ही तरूणी तर थेट इटलीची आणि गोकूळ परिहार नेपाळी हा तरूण नेपाळचा होता. जर्मन बेकरी प्रसिध्द आहे आणि त्यामुळेच आपले यश साजरे करण्यासाठी ही मंडळी तेथे गेली होती. काही आनंदाचे क्षण वाटून घेतानाच मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला.

ही सर्व मंडळी त्या दुर्देवी दिवसाच्या एक दोन आधी जेथून निघाली असतील तेव्हा पुण्यात साजरे करावयाच्या आणि त्यानंतरच्या भविष्यातील अनेक आनंदांची आखणी त्यांनी केली असेल. ते सर्वच आनंद अतीव दुःखात रूपांतरित झाले. जगाच्या कानाकोप-यातून आलेल्या माणसांना असे एका ठिकाणी मृत्यूला सामोरे जावे लागले. असे होण्याची ही जगातील पहिलीच घटना नव्हे. दररोज अशा घटना घडत आहेत. सर्व क्षेत्रातील विकासातून माणसाने एक निश्चिंतता आणली, असे आम्ही म्हणायला लागलो होतो, तेवढयात निसर्गाने हे अस्थर्य जगभर निर्माण केले. कालपर्यंत शांत समजल्या जाणा-या पुण्यात फिरताना आता हे अस्थर्य सोबत घेउन फिरावे लागणार आहे.

माणसाने अनेक सुखसोयी निर्माण केल्या आणि आपले आयुष्यमान वाढविले. मात्र त्यातून पाप करण्यासाठीची निश्चिंतताही मिळविली. याचा अर्थ असा की जगात सध्या काही लोक काहीच काम करत नाहीत. त्यांनी संपत्तीचा प्रचंड साठा करून ठेवला आहे.त्यामुळे मानवी जीवन म्हणून त्यांनी जे करायला हवे, त्याएवजी त्यांचे लक्ष पाप करण्याकडे जाते, ज्यातून अन्याय, विनाशाची निर्मीती होते. त्यातून मानवी व्यवहार भ्रष्ट होतात. मानसिक रूग्णांची संख्या वाढत जाते. त्यालाच आम्ही दहशतवादी, नक्षलवादी, युध्दखोर, साठेबाज, गुंड- तस्कर अशी नावे देतो, आणि भलत्याच शस्त्रांनी त्यांच्याशी लढत बसतो. आजार एक आणि औषध भलतेच , असे हे होते आहे काय, हे तपासले पाहिजे.

पुण्याची बॉम्बस्फोटाची घटना घडल्यानंतर मुंबईतल्या प्रतिक्रियेसारखीच प्रतिक्रिया उमटली. लोकांनी निषेध सभा घेतल्या. मेणबत्त्या लावून मृतांना श्रध्दांजली वाहिली. लोकांनी काय दक्षता घ्यायला हवी, या स्वरूपाची आवाहने करण्यात आली . रेडिओवर सारखे सांगितले जात होते की आजूबाजूला लक्ष ठेवा. ही प्रतिक्रिया पाहिल्यावर मला नेहमीच प्रश्न पडतो की, महानगरांमध्ये आपल्या आयुष्याची गती आपण दररोज वाढवत चाललो आहोत. कोणालाच कोणाकडे पाहायला वेळ नाही, असे मान्य करतो आहोत. मग अशी एक घटना घडली म्हणून खरोखरच आम्ही ‘आजूबाजूला ’पाहणार आहोत काय? खरे सांगायचे म्हणजे आपण आपल्या ‘शेजारी,’ ‘आजूबजूला’ पाहणे केव्हाच सोडले, म्हणून तर हे प्रश्न निर्माण झाले आहेत. ते ख-या अर्थाने सोडवायचे असतील तर पाप करण्यासाठीच्या निश्चिंततेचा त्याग करावा लागेल. नकारात्मक विचार म्हणून नव्हे, पण खरोखरच मरण दररोज समोर दिसायला हवे.आपण जणू अमरत्व घेवून जन्माला आलो आहोत, या भावनेने सत्ता- संपत्तीच्या जोरावर जो मुजोरपणा वाढला आहे, त्यातून पाप करण्याचे धाडस जन्म घेते. मानवी समाजात सर्व प्रकारच्या अतिरेकात संकट नेहमीच दबा धरून बसलेले असतात, सर्व प्रकारची विसंगती ही विश्वाच्या नियमाविरूध्दच असते, असे जे म्हणतात, ते अशा वेळी खरे वाटते. जगासमोर नव्याने उभ्या ठाकलेल्या या संकटांचा तसा विचार आपण करणार आहोत काय? .