Friday, March 19, 2010

समृध्दीच्या झाडांची सावली तर मिळू दे....

जागतिकरणात आणि नव्या काळात समाजामध्ये कशी विसंगती वाढत चालली आहे, याची शेकडो उदाहरणे सध्या पाहायला मिळत आहेत. औद्योगिकीकरण आणि नागरीकरणात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात ही विसंगती अधिकच ठळक होउ लागली आहे. खरे म्हणजे गाडीच्या दोन चाकांमध्ये समन्वय आणि काहीतरी सारखेपणा लागतोच. त्याशिवाय गाडी चालूच शकत नाही. विसंगतीसह तिने चालण्याचा प्रयत्न केला तर काय होउ शतके, याची आपण कल्पना करू शकतो. तशी कल्पना समाजातील विसंगतीसंबंधी करून पाहिल्यास समाज या बदलांमुळे कसा दाहीदिशा खेचला जातो आहे, याची कल्पना यावी.
ती बातमी प्रथमदर्शनी फार वेगळी होती, असे कोणी म्हणणार नाही. तिचे वेगळेपण मलाही अधिक विचार केल्यावरच लक्षात आले. बातमी अगदी साधी होती. आपल्या महाराष्ट्रातील ‘आयटी’ शहर पुणे आणि या पुण्याजवळ हिंजवडी नावाचे छोटे गाव. आता तेथे एमआयडीसी आहे. त्याला आता आयटी पार्क म्हणतात. महाराष्ट्राच्या अलिकडच्या काळातील प्रगतीचे चित्र रेखाटायचे असल्यास ते हिंजवडी आयटी पार्कच्या उल्लेखाशिवाय पुर्ण होत नाही. प्रत्यक्ष हिंजवडी पाहिल्यावर आपण भारतातच आहोत ना, यावर लवकर विश्वास बसत नाही. एका दशकापुर्वी ज्या एका शहरापुरत्या किंवा आपल्या देशापुरत्या मर्यादित कंपन्या होत्या, त्या आज जागतिक कंपन्या झाल्या आहेत. जागतिक कंपन्यांना ‘जागतिक दर्जाच्या’ सुविधा हव्यात, त्यामुळे हिंजवडीतील कंपन्यांना सहसा काही त्रास होउ नये अशी काळजी सरकारतर्फे घेतली जाते. उद्योगवाढीसाठी हे आवश्यकच आहे, यात काही शंका नाही. मात्र या बातमीने एरवी दुर्लक्षित राहणा-या एका महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधले गेले आहे.

बातमी अशी होती. ‘हंडाभर पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा ‘ ‘ हिंजवडीत कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नाराजी’ असा या बातमीचा मथळा होता. या बातमीतील इतर काही उल्लेख असेः ‘वाढीव लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा योजना आणि जलशुध्दीकरण प्रकल्प अपुरा पडू लागला आहे.’ ‘एमआयडीसीला पाणी बिलापोटी दरमहा एक लाख रूपये ग्रामपंचायतीला डोईजड झाले.’ ‘ अलिकडे लोकांना दिवसाआड पाणी मिळू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत’ ‘ एमआयडीसीच्या अधिका-यांनी हिंजवडी ग्रामस्थांना माफक दरात पाणी देण्याचे कबूल केले आहे.’ आता आपल्याला ही विसंगती ख-या अर्थाने लक्षात येईल.

ज्या हिंजवडी आयटी पार्कमधून कोट्यवधींच्या सॉफ्टवेअरची निर्यात होते, जेथे कोट्यवधींच्या इमारती उभ्या आहेत. जेथे हजारो तरूण काम करतात. ज्या गावाच्या जमिनीवर हे आयटी पार्क उभे आहे, त्या भूमीतील मुळ लोकांना पुरेसे पाणी मिळू शकत नाही! हे स्वीकारायला जड जाते, मात्र ती वस्तुस्थिती आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे वाहतुकीच्या अडचणी आहेत, रस्ते खराब झाले आहेत, अतिक्रमणे वाढली आहेत... अशा काही समस्या असत्या तर त्याचे मला काही फार आश्चर्य वाढले नसते. मात्र माणसाचे जीवनच ज्यावर अवलंबून आहे, अशा पाण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते, हे निश्चितच खेदजनक आहे. आधुनिक जगातल्या या विसंगतीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो.

हिंजवडी ग्रामपंचायतीकडे पाण्याचे बील भरण्यासाठी महिन्याला एक लाख रूपये नाहीत, या गोष्टीकडेही एक विसंगती म्हणूनच पाहावे लागते. कारण ज्या आयटी पार्कमध्ये दररोज कोट्यवधींचे व्यवहार होतात, त्या परिसरातील माणसे एक लाख रूपयांसाठी पाण्याची टंचाई सहन करतात, ही ती विसंगती. हिंजवडी गाव आणि हिंजवडी आयटी पार्क या एकाच परिसरात राहणा-या नागरिकांची आयुष्ये कशी एकमेकांकडे पाठ करून बसली आहेत, याविषयी आपण बोलत नाहीए, हे लक्षात घ्या. असमानतेची ती टोकं आपण बाजूलाच ठेवली आहेत. कारण ती सर्वत्रच दिसतात. आपण फक्त माणसांच्या प्राथमिक गरजांविषयीच बोलतो आहोत. त्या गरजा भागविताना नागरिकांमध्ये भेदभाव करण्याचे कारण नाही, याविषयी तरी लोकशाही समाजवादी देशात वाद असण्याचे कारण नाही, असे मला वाटते.

हिंजवडीतील विसंगती अधिक खेदजनक वाटते याचे आणखी एक महत्वाचे कारण आहे. तेथील आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर तयार केली जातात. ही सॉफ्टवेअर प्रामुख्याने माणसाचे आयुष्य सुखकर करण्यासाठी वापरली जातात. त्याला अधिकाधिक सोयीसुविधा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. जगाच्या दुस-या टोकांवर राहणा-या माणसांच्या परिसराचा, सवयींचा, समाजाचा त्यासाठी अभ्यास केला जातो. त्या टोकांवर बसलेल्या लोकांची आयुष्ये त्यामुळे सुखकर होतात. ते पैसे देतात, डॉलर देतात, एक व्यवहार पुर्ण करतात, हे सर्व जागतिक व्यापार व्यवहाराला धरूनच आहे, याविषयी आपले काही म्हणणे नाही. पण म्हणून स्थानिक लोकांच्या प्राथमिक गरजा पुर्ण करण्यातही आपण, आपले प्रशासन यशस्वी होत नाही, याला काय म्हणायचे ?

जागतिकरणात आणि आधुनिक काळात जगाच्या पाठीवर कोणासाठी कोण कोठे आणि कधी काम करतो आहे, हे कळण्याची गरज राहिलेले नाही. एका टोकाचा माल जगाच्या दुस-या टोकाला सहजपणे पोचण्याच्या वेगवान सुविधा निर्माण झाल्या आहेत. काम करणा-याचे चेहरे हरवत चालले आहेत. राज्य, देश, खंडांच्या सीमाही पुसट होत चालल्या आहेत. या सर्व बदलांचे खरे तर स्वागतच करायला हवे. मात्र हे बदल इतक्या खेदजनक विसंगतीला जन्म देत असतील तर त्याचे काय करायचे, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. या बदलांमुळे जगात जे अर्थशास्र जन्म घेत आहे, त्यात असे म्हटले जाते की जागतिकरणामुळे गरीब आणि श्रीमंत देश असा भेद आता राहिला नाही. तो जगभरातील गरीब लोक आणि श्रीमंत लोक- असा भेद निर्माण झाला आहे. हिंजवडीतील विसंगती या भेदाला दुजोरा देणारी आहे. या विसंगतीचा विस्तार करावयाचा झाल्यास ग्रामीण भागातील जीवन आणि शहरी जीवन, अर्धशिक्षित आणि उच्चशिक्षित, महानगरांमधील दोन टोके, सरकारी शाळा आणि खासगी शाळा अशी विसंगतीची ठिकाणे वाढतच चालली आहेत.

माणसांच्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी अजूनही मोठे संशोधन होण्याची गरज आहे. आपण असे म्हणूयात की त्याची दिशा बदण्याची गरज आहे. तो बदल कधी होईल माहीत नाही, मात्र किमान जेथे समृध्दीची झाडे फोफावत आहेत, तेथे त्या झाडांची सावली वाटसरूंना मिळावी, या अपेक्षांमध्ये चुकीचे काय आहे? येथे तर बायाबापड्या उन्हातान्हात पाण्यासाठी हंडा घेउन उभ्या आहेत !


यमाजी मालकर ymalkar@gmail.com