Thursday, March 25, 2010

शुध्द मराठी दाखवा , बक्षीस मिळवा !

एखादी गोष्ट दुर्मिळ झाली की ‘ ........... दाखवा आणि बक्षीस मिळवा’ असे म्हणण्याची पध्दत आहे. प्रस्थापित नियमांनुसार मराठी भाषा पाहावयाची असेल किंवा वाचावयाची असेल तर सध्या तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगल्यावरील नाव पाहा, दुकानावरील फलक पाहा, मराठीप्रेमासाठी काम करणा-या संस्था संघटनांचे फलक किंवा मुखपत्र पाहा, शाळा - महाविद्यालयांतील सूचनाफलक, वर्तमानपत्र, पुस्तके , सरकारचे निवेदन पाहा.... कुठलाही मराठी मजकूर पाहा, वाचा आणि प्रस्थापित नियमांनुसार तो शुध्द आहे का, हे तपासा. शंभर टक्के शुध्द मजकूर तुम्हाला सापडला तर सांगा.. . तो सापडण्याची शक्यता नाही. त्याचे पहिले कारण आमच्या भाषेला व्यवहारात तेवढे महत्व राहिलेले नाही. त्यामुळे ती भाषा अशुध्द लिहीली तरी फार फरक पडत नाही. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे कारण म्हणजे काय शुध्द आणि काय अशुध्द याचा इतका गोंधळ आम्ही घातला आहे की एखाद्याने ठरवले तरी तो शंभर टक्के शुध्द लिहूच शकत नाही.

एखादी गोष्ट दुर्मिळ झाली की, ते ओळखण्याची आणखी एक खूण आहे. ती म्हणजे त्याची भरपूर चर्चा करायला लोक सुरूवात करतात. त्यासंदर्भाने काही कृती करावयाची सोडून बाकी सर्व करावयाचे. मराठी संदर्भात सध्या तेच चित्र दिसते आहे. मराठीच्या नावाने एकाएवजी १०-१२ संमेलने घेतली जात आहेत. अधिवेशने होत आहेत राजकारण केले जाते आहे. राजकीय घोषणा केल्या जात आहेत . मात्र ज्या भाषेविषयी हे सर्व चालले आहे, ती भाषा त्यामुळे तसूभरही पुढे सरकत नाही, त्याचे काय करायचे ? जगातल्या आठ हजार भाषांमध्ये पंधराव्या आणि आपल्या देशातल्या चौथ्या क्रमांकाच्या मराठी भाषेविषयी प्रेम आहे, असे अनेक जण म्हणतात, मात्र तिच्यासाठी ठोस काही करण्याची वेळ आली की पुढे काही घडत नाही.

हे आज सर्व आठवण्याचे कारण उद्यापासून पुण्यात सुरू होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. साहित्य संमेलन उत्सवी असावे, याविषयी कोणाचे दुमत नाही. मात्र त्यात भाषाविकासाविषयी काहीच होउ नये, हे पटण्यासारखे नाही. नाही म्हणायला काही संमेलनांमध्ये भाषाविकासावर चर्चा झाली आहे, मात्र ती वर्तमानपत्रांच्या पानांच्या पुढे गेली नाही, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. बरे, वर्षभर त्यासंबंधीचे काही प्रयत्न साहित्य संस्थांनी केले असते, तर तेही समजून घेता आले असते. तसे जे काही प्रयत्न झाले, ते इतके तोकडे होते की मराठी भाषेचा विकास तर दूरच, पण मराठी भाषा व्यवहारातून कमी कमी होत गेली आहे.

आजची मराठी भाषा कोठे आहे याचा विचार केल्यावर पुढील गोष्टी लक्षात येतात. मराठीचा सरकारी कामकाजात आणि व्यवहारातील वापर कमी कमी होत चालला आहे. संगणकामध्ये मराठी भाषा वापरावीच लागणार आहे, मात्र त्यासाठी योग्य फॉण्ट आणि अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘मराठी भाषा’ हा विषय मराठी आणि इंग्रजी शाळांमधील एक अवघड विषय ठरतो आहे. एवढेच नव्हे तर तो विषयच नको, अशी भूमिका काही शाळा घेउ लागल्या आहेत. मराठी बोलणे, लिहिणे, वाचणे हे मराठी समाजातही कमीपणाचे मानले जाउ लागले आहे. मराठी शुध्दलेखन नियमांच्या दहशतीमुळे मराठी आनंदाने लिहिणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

मराठीवर ही वेळ का येते आहे, याची कारणे शोधताना असे लक्षात येते की मायबोलीसाठी सातत्याने काही करण्याची गरज होती, ते केले गेलेले नाही. काळानुसारचे बदल स्वीकारण्याची मानसिकता नसल्यामुळे काळाशी ती सुसंगत राहिली नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे देवनागरी स्वीकारताना मराठी भाषेतील जेवढा भाग संस्कृतसारखा वावरू शकतो, त्या भागाला (तत्सम) संस्कृतचे नियम लावले गेले आणि उरलेला भाग ‘देशी’मराठी म्हणून (तत्भव) जाहीर केला गेला. त्यामुळे मराठीची मराठीतच फाळणी झाली. याचा परिणाम आसा झाला की मराठी व्याकरण आणि शुध्दलेखन मराठी समाजावर लादण्यात आले. मराठीची उपजत आणि मूलभूत प्रवृत्ती लक्षात न घेता हे केले गेले. मराठी सर्वसामान्य समाजामध्ये शुध्दलेखनाची दहशत निर्माण करण्याचे काम नियमांनी केले.
मायबोली असणा-या माणसाला आपलीच भाषा अवघड का वाटावी ? मात्र दीर्घकाळ हा अन्याय सर्वसामान्य मराठी माणूस सहन करतो आहे.

या सर्व परिस्थितीचा परिणाम असा झाला की नियमानुसार शुध्द लिहिता येत नाही आणि अशुध्द लिहून मानहानी सहन होत नाही, म्हणून मराठी लिहिणेच अनेकांनी सोडून दिले. आमच्याच बोली भाषा अशुध्द ठरल्या. एकप्रकारे मराठी समाजाचे विघटन सुरू झाले. इंग्रजी आणि हिंदी भाषेचे आक्रमण हे नंतरचे विषय आहेत, आधी आमची भाषा आम्ही देवनागरी स्वीकारताना अवघड का केली, काळानुसार का बदलली नाही, आणि संगणकाचा वापर इतका वाढला असताना एकच फॉण्ट वापरण्याचा संकल्प का केला गेला नाही, या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

या संदर्भात मराठीवर प्रेम करणा-या संस्था प्रयत्न करत आहेत. मात्र या सर्वांना एकत्र बांधून संगणकाचा वापर वाढल्याच्या कारणाने क्रांतिकारक बदलांची तयारी ठेवावी लागणार आहे. ‘शोध मराठीचा’ या संस्थेने यासंदर्भात मांडलेला ‘नवा प्रस्ताव’ निश्चित विचार करण्यासारखा आहे. या प्रस्तावाचे एक कलम असे आहेः मोडी लिपीसारखाच देवनागरीत मराठीने ‘एक वेलांटी- एक उकार’( दीर्घ वेलांटी आणि –हस्व उकार ) या सहजसुलभ तत्वाचा स्वीकार गद्द लेखनात करावा आणि शुध्द-अशुध्दतेच्या पेचातून मराठी समाजाची सुटका करावी. अशा ज्या ज्या कल्पना मांडल्या जात आहेत, त्यावर खुलेपणाने चर्चा झाली पाहिजे. परंपरा कुरवाळणा-यांना हा प्रस्ताव आततायीपणाचा वाटतो. खरे सांगायचे तर मराठी इतकी मागे पडते आहे की, तशाच बदलांशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. असे अनेक प्रस्ताव आहेत आणि त्त्यातील काहींच्या स्वीकारतूनच सर्वसामान्य मराठी माणसाचा मनसोक्त मराठी वापरण्याचा मार्ग खुला होणार आहे.

जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्वतःहून आणि अनेकदा रेट्यापोटी आम्ही अनेक बदल स्वीकारले आहेत. ते का स्वीकारले, याचे आम्ही समर्थनही करतो आहोत. तसाच विचार भाषेसंदर्भातल्या बदलांचाही करावाच लागणार आहे. तो आपण वेळीच केला नाहीतर जगातील एक श्रेष्ठ भाषा मारून टाकल्याचे पाप आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही.


यमाजी मालकर ymalkar@gmail.com