Friday, April 2, 2010

गाव का झिजते आहे ?

जागतिकीकरणाच्या गेल्या दोन दशकांत भारत आणि इंडिया अशी आपल्या देशाची फाळणी झाली, याविषयी आता कोणाचे दुमत राहिलेले नाही.या फाळणीविषयी चिंता व्यक्त केली जात नाही, असा एकही दिवस जात नाही. देशातील संपत्तीत या दोन दशकांत किती वाढ झाली, असाच विचार केला तर आपला देश खूप श्रीमंत झाला आहे, मात्र त्या संपत्तीच्या वितरणाचा विचार केला तर ही फाळणी किती भयंकर आहे, हे लक्षात येते. शहरातले चित्र कळायला तुलनेने सोपे आहे, मात्र ग्रामीण भागात नेमके काय घडते आहे, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळेच ‘गांव झिजते आहे’ हे अंबाजोगाईत राहणा-या डॉ. द्वारकादास लोहिया यांचे पुस्तक मला महत्वाचे वाटले. (प्रकाशक- सतिश आणि छाया काकडे, आशिव, ता. औसा, जि.लातूर) जागतिकीकरणात ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नेमके काय होते आहे आणि काय व्हायला हवे, हे समजून घ्यायचे असेल तर त्या परिसरात राहून आपली निरीक्षणे नोंदवणारांची संख्या वाढली पाहिजे.

डॉ. द्वारकादास लोहिया आणि त्यांच्या पत्नी डॉ.शैला लोहिया हे दाम्पत्य ‘मानवलोक’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून गेली २७ वर्षे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई भागात काम करतात.या अनुभवाची जोड या निरीक्षणांना मिळाली असल्याने या पुस्तकाचे मोल अधिक आहे.गावांची स्थिती विशेषतः अर्थव्यवस्था कशी खंगत चालली आहे, हे तर डॉ. लोहियांनी विशद केले आहेच, पण हे थांबविण्यासाठी काय करण्याची गरज आहे, हेही मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी तसेच तुलनेने श्रीमंत राज्यात पुण्यामुंबईबाहेर काय परिस्थिती आहे, हे जाणून घेणा-यांनी हे पुस्तक वाचले पाहिजे.

महात्मा गांधी खेड्याकडे चला असे का म्हणत होते आणि ग्रामस्वराज्याच्या त्यांच्या कल्पनांमध्ये काही बदल करून पण आज त्याच कशा महत्वाच्या आहेत, हे कळायला या पुस्तकामुळे मदत होते. जागतिकीकरणाच्या आणि वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात या कल्पना प्रत्यक्षात किती उतरतील, हे प्रश्नचिन्ह या दशकातही कायम राहील, मात्र हे बदलले पाहिजे, असे मानणारे धुरीण सत्तेवर आल्यावर त्यांना याच कल्पनांचा विस्तार करावा लागणार आहे, हे निश्चित.

‘गाव झिजत आहे’ या पुस्तकातील काही कल्पना अशा आहेतः सरकारी कर्मचारी गावातच राहण्यासाठी त्यांना गावात स्वस्त घरे देण्याची व्यवस्था करावी. महिलांच्या बचत गटाचा विस्तार होउन त्यातून त्यांच्याच पतसंस्थांची निर्मिती झाली पाहिजे. शेती हा व्यवसाय किंवा उद्योग आहे, हे लक्षात घेवून त्याला त्याच्या मालाची किंमत ठरविण्याचा आधिकार असला पाहिजे. जल, जंगल आणि जमीन यावर समस्त गावक-यांची मालकी असली पाहिजे. गावातला पैसा गावातच राहिला पाहिजे, यासाठी गावातले व्यवहार वाढले पाहिजेत. याचा अर्थ ग्रामीण जीवनाची पुनर्रचना करण्याची गरज डॉ. लोहिया व्यक्त करत आहेत.

पुस्तकात २१ प्रकरणे आहेत. त्यांची नावे जरी पाहिली तरी आपल्याला त्या विषयांच्या महत्वाची कल्पना येते. उदा. गावातला नोकर गावात, गुळाचे गु-हाळ तसे साखरेचे साखराळ, एक कुटुंब- एक उत्पन्नाचे साधन, बोअरचे पाणी पिण्यासाठी- पावसाचे पाणी शेतीसाठी, तर आत्महत्या थांबतील, यंत्रे आली- जनावरे कमी झाली,गावचा धर्म –शेजार धर्म , नारी के सहयोग बिना हर गाव सुना है.. ,गावकुसातील संसाधनांची चोरी, महागाई निर्देशांक आणि उत्पन्न वाढ.

गाव का झिजत आहेत, याचे खूप चांगले विश्लेषण या पुस्तकात आले आहे. त्यातल्या काही नव्या गोष्टी अशाः ‘महागाई निर्देशांक आणि उत्पन्न वाढ’ या प्रकरणात नोकरदाराची पगारवाढ आणि शेतीमालाची थेट तुलना करून ही तफावत लक्षात आणून दिली आहे. यात एका ठिकाणी म्हटले आहे, ‘ कच्चा माल तयार करणारा आणि पक्का माल तयार करणारा यांच्या उत्पन्नातील तफावत मला दिसते आहे. ही तफावतदेखील शेतक-याच्या आत्महत्यांना कारणीभूत होते आहे.म्हणून शेतक-यांच्या उन्नतीसाठी आणि समृध्दीसाठी महागाईचा निर्देशांक काढण्याची पध्दत बदलावी लागेल.’ दुसरी एक गोष्ट अशी आहेः ‘ साखर विक्रीची पध्दत बदलली पाहिजे. ती पध्दत पिठाच्या गिरणीसारखी असावी.पिठाच्या गिरणीत ग्राहक ज्वारी किंवा गहू घेवून जातो.गिरणीमालक त्याचे दळण दळून पीठ तयार करून देतो. त्याला दळणाचे पैसे दिले जातात. साखरेचा कारखाना ही पिठाची गिरणी समजावी. साखरेच्या उता-याप्रमाणे त्याने घातलेल्या उसाच्या मोबदल्यात त्याला साखर मिळावी.’

डॉ. लोहिया जे म्हणतात ते लगेच पटते आणि मग आपण विचार करतो खरोखरच असे बदल आता आपल्या देशात होतील? जागतिकीकरणाने ‘अपमार्केट’कडे जाणारी मानसिकता घडवली आहे. ती मानसिकता सांगते, शहरात चला. ती सांगते आता ‘उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती, हेच तत्व बरोबर आहे. मुलांचे चांगले शिक्षण शहरांतच होते, शेजारधर्माने नव्हे तर स्पर्धेने प्रश्न सुटतात. हाताने होणा-या कामांपेक्षा यंत्रांनी होणारी कामे चांगली होतात. गावातल्या प्रश्नांपेक्षा महानगरांतले प्रश्न महत्वाचे आहेत कारण ते सोडविल्यामुळे पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होतात. सरकारीपेक्षा खासगीकरण चांगले. सगळ्यांचे लक्ष असे ‘अपमार्केट’ कडे आहे. ‘अपमार्केट’ कडे पाठ फिरवून हे परिवर्तन घडविण्याची इच्छाशक्ती आपल्या समाजात दिसते आहे काय?

मग लक्षात येते की आजच्या मानसिकतेत या कल्पनांचा विचार करायला तयार होईल अशी परिस्थिती आज दिसत नाही. जागतिकीकरणाने गतिमान अस्थैर्याचा जो शाप आम्हाला दिला आहे, त्यामुळे आमचे विचारच गोठून गेले आहेत. आता आम्ही एकतर्फीच विचार करू शकतो. सर्वसमावेशक विचारांची शक्तीच आम्ही गमावली आहे. आम्ही आमच्या ‘अजेंड्या’वर इतकं प्रेम करायला लागलो आहोत की त्यामुळे दुस-यांचे गळे कापताना आमचे हात अडखळत नाहीत. उलट त्या गळेकापू स्पर्धेचे आम्ही समर्थन करतो. या परिस्थितीत डॉ. लोहिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे पाहिले तर मनात निराशा दाटून येते.पण त्या प्रश्नांकडे पाठ फिरवूनही आम्ही आनंदाने जगू शकत नाही. त्यामुळेच वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येत नाही. ती परिस्थिती समोर आणण्याचे काम डॉ. लोहिया यांनी चोख बजावले आहे. आता ‘भारता’सहच ‘इंडिया’ला पुढे जायचे आहे, असे ज्यांना ज्यांना वाटते , त्यांनी ही विसंगती दूर करण्यासाठी झटायचे आहे.