Thursday, April 15, 2010

वेग हा जुलमी गडे !

गेल्या दोन तीन दशकांत जग जितक्या वेगाने बदलले, तितके ते पुर्वीच्या शंभर वर्षांत बदलले नाही, असे म्हणण्याची पध्दत आहे. खरे म्हणजे जग म्हणजे जगातला माणूस काळानुसार बदलतच येथपर्यंत पोहचला आहे. एक मात्र खरे की जगाचा वेग या दोन तीन दशकात प्रचंड वाढला आहे. पुर्वीही जगाला वेग होताच मात्र तो असा माणसाच्या नसानसांत भिनला नव्हता. या वाढत्या वेगाचे परिणाम शहरात दिसतात तसेच ते ग्रामीण भागातही दिसायला लागले आहेत.
वाढत्या वेगाचे परिणाम प्रवासात अधिक दिसतात. लोकलने प्रवास करणारे मुंबईकर त्याचा दररोजच अनुभव घेत आहेत. मात्र माझ्यासारख्या मुंबईबाहेरच्या माणसाला याचे फार कुतुहल वाटते. उदा. लोकलमधील सुरवातीच्या डब्यांमध्ये बसायचे की शेवटच्या, हे ठरते ते लोकलमधून उतरल्यावर कोठे जायचे आहे, त्यावर. म्हणजे दादरा चढायला लागू नये, किंवा पायी चालण्यात वेळ जावू नये, हा विचार लोकलमध्ये बसतानाचा करायचा, हे अनेकांच्या आता अंगवळणी पडलं आहे. नाहीतर बाहेरून आलेला माणूस आपल्याला गाडीत प्रवेश मिळाला, यातच समाधान मानतो. परवा मुंबईत जे पाहिलं, ते स्टेशनांवरचं नेहमीचं दृश्य आहे, त्याचंही मला कुतुहल वाटलं. दोन मिनिटे आधी निघणारी गाडी आली म्हणून उभ्या गाडीतील माणसं पटापटा त्या आधी जाणा-या गाडीत जावून बसली ! या दोन मिनिटांना पुर्वी आपल्या आयुष्यात हे स्थान नव्हते.
ग्रामीण भागातीलही मानसिकता वेगामुळे कशी बदलत चालली आहे, याची शेकडो उदाहरणे आता पाहायला मिळत आहेत. तेथील स्थानकांवरही असे प्रसंग दिसत आहेत.गावांत ‘काळ्यापिवळ्या’ जीपने सर्रास प्रवासी वाहतूक चालते. तेथे आपली गाडी आधी भरावी यासाठी तिचे इंजिन चालू ठेवले जाते. परवा तर पुण्याच्या स्वारगेट स्थानकावर हे दृश्य मी पाहिले. बस कोल्हापूरकडे जाणार होती आणि त्या दिशेने जाणा-या चार तरी बस उभ्या होत्या. प्रवासी मात्र एकाच गाडीत बसत होते, ज्या गाडीचे इंजिन चालकाने चालू करून ठेवले होते ! ‘चलतीका नाम गाडी’. जी गाडी लगेच निघणार तीच गाडी सर्वांना हवी होती.
आता बस पाहिली जाते ती ‘ मेगा हायवे’वरून जाणारी. जी बस हायवे सोडून खाली उतरते, ती कोणालाच नको आहे. त्यामुळे ही ‘ मेगा हायवे’ ही अक्षरे गाड्यांच्या पाट्यांवर ठळक अक्षरात विराजमान झाली आहेत. तब्बल ३०० किलोमीटर अंतर असलेल्या गावांमध्ये काम संपवून परत घरी मुक्कामी येणा-यांची संख्या वाढत चालली आहे. पुर्वी वर्दळीच्या मार्गांवर चार- पाच किलोमीटरवर धाब्यांसमोर गाड्या उभ्या दिसायच्या. आता नुसतेच धाबे दिसतात. तेथे थांबणा-या प्रवाशांची संख्या रोडावली आहे. त्याचेही कारण वाढता वेग हेच आहे. वेग वाढण्यासाठीच रस्ते चांगले झाले आणि त्याचा पुरेपूर वापर प्रत्येकाला करायचा आहे. मेगा हायवेला अडथळा होउ नये म्हणून गाव आले की प्रचंड उड्डाणपुल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हायवेवरील त्या गावाची ओळखच पुसली जाणार आहे. मात्र जीवनाच्या वाढत्या वेगात ते अपरिहार्य ठरले आहे.
या वेगाचा आणखी एक फार खोल परिणाम ग्रामीण भागात होतो आहे. महामार्गावरील गावे वाढत चालली आहेत. मूळ गाव जर महामार्गापासून आत असेल तर महामार्गाच्या कडेने वस्ती वाढत चालली आहे. महामार्गाच्या ‘वाटेने’ सोयीसुविधा येतात आणि ‘आत’ असलेल्या गावात त्या पोहचायला वेळ लागतो, त्यामुळे हायवेच्या आजूबाजूच्या जागा भरत चालल्या आहेत.
या वाढत्या वेगात वंगण ओतले ते मोबाईलने. मी निघालो, मी निम्म्या रस्त्यावर पोहचलो, आता गाडीतून उतरलो, आता रिक्षा मिळाली, आणि हे काय .. मी आपल्या घराच्या दारातच आहे, अशी जणू येण्याजाण्याची कॉमेंट्री करण्याची सुविधाच या यंत्राने दिली आहे. पत्रव्यवहाराची जागाही मोबाईलने घेतली. येण्याजाण्याची कॉमेंट्री केली जाते तेथे सुखदुःखाच्या गोष्टींसाठी आता प्रत्यक्ष भेटण्याची वाट कोण कशाला पाहील ?
संवाद साधण्यासाठी, निरोप देण्यासाठी जो कालावधी लागत होता, तोच संपुष्टात आला आहे. हे चांगले की वाईट हे ठरविण्याला किंवा त्याची चर्चा करायलाही आता मानवी समूहांना वेळ नाही. कारण या बदलांमध्ये आणि वेगात प्रत्येकजण ओढला जातो आहे.
कधीकधी वाटते, वेग म्हणजे जणू जागा पटकावण्याची स्पर्धा आहे. ज्याने वेग वाढविला त्याने जागा पटकावली. अर्थात हे तत्व तर पुर्वीपासूनच आहे. मात्र गेल्या अर्धशतकात जागा पटकावण्याचा हा वेग प्रचंड वाढला आहे. मुंबईच्या लोकलमध्ये जसे ज्यांना जागा मिळत नाही , त्यातले काहीजण दोन बाकांच्या मध्ये जाउन उभे राहतात., म्हणजे कोणी सहप्रवासी आधी उठला तर ती जागा आपल्याला मिळावी.आणि उभे राहण्याची ही जागाही वेगानेच मिळवावी लागते.
जगातले खरे बदल हे विज्ञान, यंत्र आणि तंत्रातले बदल आहेत. ते आधी होतात आणि माणूस त्यानुसार बदलतो, असे म्हटले जाते. आणि जे खरेच आहे, याचा अनुभव आपण दररोज घेत आहोत. पण या बदलांनी माणूस इतका वेगवान करून टाकला आहे की तो वेग हेच जणू जगणे आहे, असा एक भ्रम तयार होतो आहे. या वेगाने आणखी एक ‘देणगी’आपल्याला दिली आहे, ती म्हणजे गतिमान अस्थैर्याची. म्हणजे खूप काही घडते आहे आणि त्या घडण्याचे अस्तित्व किती काळासाठी आहे, हे कोणालाच सांगता येत नाही. स्थैर्यासाठी सुरू झालेला प्रवास संपल्यासारखा वाटतो, पण घडीभरच. लगेच दूरचे क्षितीज दिसायला लागते, माणसे त्यादिशेने झेपावतात, आणि मग प्रवासाचे टप्पे मोजायला सुरवात करणा-यालाही शांत बसवत नाही. त्यालाही त्या स्पर्धेत भाग घ्यावाच लागतो. वाढत्या वेगाने हे जे गतिमान अस्थैर्य दिले आहे, त्याच्याविषयी जगातील माणसांनी कधीतरी एकमेकांशी बोलले पाहिजे. हितगुज केले पाहिजे.. पण हा ‘कधीतरी’ नावाचा काळ वर्तमानात कधी येणार आहे, हे कोण सांगू शकणार आहे ?

यमाजी मालकर ymalkar@gmail.com