Thursday, August 9, 2012

कशी वाढणार भारतीयांची क्रयशक्ती ?

अडुसष्टव्या नॅशनल सॅम्पल सर्व्हे अॉर्गनायझेशनच्या (एनएसएसओ) प्राथमिक अहवालानुसार ग्रामीण भागातील १० टक्के जनता दिवसाला केवळ १७ रुपयांवर आपली गुजराण करते आहे! नवे ग्राहक तयार झाल्याशिवाय औद्योगिक उत्पादनांची मागणी वाढणार नाही, हे आज सर्वांनाच मान्य आहे. बहुतांश भारतीयांची क्रयशक्ती वाढल्याशिवाय अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची शक्यता नाही. आणि क्रयशक्ती वाढवायची असेल तर संपत्ती वाटपाच्या काही मुलभूत बदलांना सामोरे जाण्याची तयारी करावी लागेल.

देशात महागाई वाढत चालली असताना ग्रामीण भागातील क्रयशक्ती कशी वाढणार, या चिंतेत सरकार, उद्योजक आणि अर्थतज्ञ असताना नवी चिंता करावी, अशी आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. ६८ व्या नॅशनल सॅम्पल सर्व्हे अॉर्गनायझेशनच्या (एनएसएसओ) प्राथमिक अहवालानुसार ग्रामीण भागातील १० टक्के जनता दिवसाला केवळ १७ रुपयांवर आपली गुजराण करते आहे! नवे ग्राहक तयार झाल्याशिवाय औद्योगिक उत्पादनांची मागणी वाढणार नाही, हे आज सर्वांनाच मान्य आहे. मात्र नवे ग्राहक तयार कसे होणार, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. देशातील वाढती संपत्ती झिरपत झिरपत गरिबांपर्यंत पोचेल आणि वस्तूंची मागणी वाढतच राहील, हे गृहीतकच त्यामुळे खोटे ठरते आहे. या अहवालातून जी आकडेवारी समोर आली आहे, ती सरकारला आणि विचार करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला नव्याने विचार करायला लावणारी आहे.
देशातील गरीब श्रीमंत दरी सातत्याने रुंदावत चालली आहे, असे म्हटले जाते आणि ते खरेच आहे, हे या अहवालातील आकडेवारीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ही आकडेवारी असे सांगते की शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वात खालचे गरीब आणि या दोन्ही भागातील सर्वात श्रीमंत नागरिक यांच्यातील दरी आता एवढी वाढली आहे की ते एकाच देशातील नागरिक आहेत, हे त्यांना चिमटा घेवून पटवून द्यावे लागेल. उदा. ग्रामीण भागातील तळाच्या १० टक्के जनतेचा महिन्याचा खर्च गेल्या दोन वर्षांत केवळ ११.५ टक्क्यांनी वाढला आहे तर सर्वात वरच्या १० टक्के जनतेचा तोच खर्च ३० टक्क्यांनी वाढला आहे. हा भेद केवळ शहर ग्रामीण एवढाच मर्यादित नसून शहरातही ही दुफळी याच प्रमाणात पाहायला मिळते आहे. याच काळात शहरी तळातल्या १० टक्के जनतेचा महिन्याचा खर्च १७.२ टक्क्यांनी वाढला आहे तर वरच्या १० टक्के शहरी जनतेचा खर्च तब्बल ३०.५ टक्क्यांनी वाढला आहे. ग्रामीण भारतातील तळातील गरीब किती विपन्न अवस्थेत राहत आहेत, यावर या आकडेवारीने पुन्हा प्रकाश पडला आहे. तळातील १० टक्के गरीब जगण्यासाठी दररोज सरासरी फक्त १६.८ रुपये खर्च (महिन्याला ५४० रुपये) करू शकतात तर ग्रामीण भागातील निम्मी जनता दिवसाला सरासरी ३५ रुपयांपेक्षाही कमी (महिन्याला १००० रुपये) खर्च करू शकतात. याचा अर्थ अन्न, शिक्षण, आरोग्य, दैनंदिन वस्तू आणि करमणूक या मुलभूत गरजा भागविण्यासाठी या नागरिकांकडे एवढेच पैसे असतात. अशा कोट्यवधी नागरिकांच्या आयुष्यात जेव्हा काही अघटित घटना घडत असतील, तेंव्हा त्यांचे आयुष्य किती पिळून निघत असेल, याची कल्पना करवत नाही.
किमान सहा टक्के विकासदर असलेल्या, जगात चौथ्या क्रमांकाची उलाढाल असलेल्या आणि गेल्या दोनतीन दशकात संपत्तीत प्रचंड वाढ झालेल्या भारतात नेमके काय चालले आहे, हे सांगणारी ही आकडेवारी भारत महासत्ता होणार, याविषयी आशावादी असलेल्या प्रत्येक नागरिकाने समजून घेतली पाहिजे. उघड्या डोळ्याने आज लोकव्यवहार पाहिले तर या परिस्थितीची कोणाही विचारी माणसाला प्रचीती येते. मात्र त्याला थेट आकडेवारीचा दुजोरा मिळाला की त्यावर शिक्कामोर्तब होते, म्हणून या आकडेवारीला महत्व आहे. या अहवालातील इतर प्रमुख आकडेवारी अशी: १. शहरी भारतातील तळाचे १० टक्के दिवसाला २३.४ रुपये खर्च करतात, तर अतिश्रीमंत वरचे १० टक्के २५५.१ रुपये खर्च करतात. २. ग्रामीण भारतातील ९० टक्के लोक दिवसाला सरासरी ६८.४७ रुपये किंवा त्यापेक्षा कमी खर्च करू शकतात. ३. शहरात गुजराण करण्यासाठी ९० टक्के लोक दिवसाला सरासरी १४२.७० रुपयांपेक्षाही कमी खर्च करू शकतात. ४. ग्रामीण शहरी अशी तुलना करावयाची तर ग्रामीण भारतातील श्रीमंत आणि शहरी श्रीमंत यांचीही तुलना होऊ शकत नाही. ग्रामीण भागातील श्रीमंतांपेक्षा शहरी भागातील श्रीमंत महिन्याला २२१ टक्के जास्त खर्च करतात. ५. महिन्याच्या खर्चाचा विचार करावयाचा झाल्यास ग्रामीण भारत सरासरी १२८१.४५ रुपये खर्च करतो तर शहरी भारत महिन्याला सरासरी २४०१.६८ रुपये खर्च करतो.
देशात वाहनविक्रीला ओहोटी का लागली, औद्योगिक उत्पादन का घसरले, निर्यातीत घट का झाली आणि भारताची व्यापारतूट का वाढली, याला आज जेवढे महत्व दिले जाते, त्यापेक्षा बहुतांश भारतीयांची क्रयशक्ती का घसरली, हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण ती वाढल्याशिवाय आधीच्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळू शकत नाही. आणि क्रयशक्ती वाढवायची असेल तर संपत्ती वाटपाच्या काही मुलभूत बदलांना सामोरे जावे लागेल. त्याविषयी बोलायचे म्हटले तर अनेक जाणकार मौन धारण करून बसतात. मग हा मुलभूत बदल होणार कसा, हाच खरा कळीचा प्रश्न आहे.(पाहा www.arthakranti.org)