Friday, August 17, 2012

आंदोलनांनी भ्रमनिरास का होतो आहे ?


निवडून गेलेली आणि अधिकारपदावर बसलेली माणसे ज्या व्यवस्थेत जाऊन बसतात, ती व्यवस्था मुळातच बिघडलेली आहे. ती जोपर्यंत दुरुस्त होत नाही, तोपर्यंत देशात मोठा बदल होण्याची शक्यता नाही, हे ज्यादिवशी भारतीयांना कळेल, त्यादिवशी राजकीय बदलाऐवजी व्यवस्था बदलासाठी ती रस्त्यावर येतील.

लोकपाल विधेयक मंजूर करा, भ्रष्ट मंत्र्यांवर खटले दाखल करा, अशा मागण्यांसाठी दिल्लीत अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेली आंदोलने असतील किंवा काळ्या पैशांच्या विरोधातील रामदेवबाबा यांचे आंदोलन असेल, या आंदोलनांमधून नेमके काय साध्य होते आणि सर्वसामान्य भारतीय माणसाला नेमके हेच हवे आहे काय?, याचे उत्तर आज मिळू शकत नाही. कारण या आंदोलनांनंतरही आपल्या आयुष्यात काही सकारात्मक बदल झाला, असे त्या माणसाला वाटत नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे ही आंदोलने राजकीय स्वरूपाची आहेत. त्यात असे गृहीत धरण्यात आले आहे की पक्ष आणि माणसे बदलली की देशातील परिस्थिती बदलेल. पण माणसे बदलली म्हणून परिस्थिती बदलली, असे कधी झालेले नाही आणि पुढेही होण्याची शक्यता नाही. कारण स्पष्ट आहे, निवडून गेलेली आणि अधिकारपदावर बसलेली माणसे ज्या व्यवस्थेत जाऊन बसतात, ती व्यवस्था मुळातच बिघडलेली आहे. ती जोपर्यंत दुरुस्त होत नाही, तोपर्यंत देशात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. हे ज्यादिवशी भारतीयांना कळेल, त्यादिवशी राजकीय बदलाऐवजी व्यवस्था बदलासाठी ती रस्त्यावर येतील.
भारतीय ‘कॉमन मॅन’च्या मनात आज काय सलते आहे, याचा शोध घेता आपल्या लक्षात येईल की, त्याला काही सत्त्तेच्या खुर्चीवर बसण्याची इच्छा नाही. आपल्याला जवानांची सलामी मिळावी, असे त्याला वाटत नाही. त्याला लाल-पिवळ्या दिव्याच्या गाड्यांमध्ये बसण्याची लालसा नाही. काहीच काम न करता संपत्ती मिळावी, असेही त्याला वाटत नाही. मोठमोठ्या पुरस्कारांची त्याला अपेक्षा नाही. आपले आयुष्य ऐषआरामात गेले पाहिजे, असे त्याला एक माणूस म्हणून वाटते खरे, मात्र तसे होणे सोपे नाही, याची त्याला जाणीव आहे. एवढे सगळे माहीत असूनही त्याच्या मनामध्ये सध्याच्या व्यवस्थेविषयीची प्रचंड चीड साचली आहे. ती चीड वेगवेगळ्या कारणांनी बाहेर पडताना दिसते आहे. मग कधी ती राजकारण आणि त्यातील नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहून मोकळी होते. कधी नोकरशाहीला पिंजऱ्यात उभी करते, कधी श्रीमंतांनाच खलनायक करून टाकते. कधी माध्यमांवर खापर फोडते तर कधी स्वत:लाच दोष देवून मोकळी होते. कारण ‘कॉमन मॅन’ला दररोज जगण्याची लढाई लढायची असते. त्याला नंतर हेही लक्षात यायला लागते की ज्यांना आपण लक्ष्य करत आहोत, ते आपलेच आहेत. ती माणसे काही आभाळातून पडलेली नाहीत. एवढेच नव्हे तर सभासमारंभांना आपल्याला तीच माणसे मान्यवर म्हणून लागतात, ही विसंगतीही त्याच्या लक्षात यायला लागते. आपल्या सुखदुःखाच्या नाड्या आपण त्यांच्या हवाली केल्याचे आणि आपल्या हतबलतेला काहीच किंमत नाही, याची त्याला टोचणी लागते. या परिस्थितीत बदल व्हावा, असे नेहमीच त्याला वाटत असते आणि स्थानिक तसेच देशपातळीवर होणाऱ्या आंदोलनाने तरी तो बदल होईल, अशी त्याची आशा असते. मात्र गेल्या काही दिवसांतील घटनांनी त्याचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे. त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदलाच्या आशा मावळल्या आहेत.
पण मग भारतीय ‘कॉमन मॅन’ ला नेमके काय हवे आहे?, याचा विचार करू. म्हणजे ते मिळण्यासाठी नेमके काय करावे लागेल, याचीही दिशा स्पष्ट होण्यास मदत होईल. त्याला काय वाटत असेल, याची एक यादीच करू यात. १. मला भारतीय नागरिक म्हणून भावनिक आणि आर्थिक सुरक्षितता मिळावी. २. अन्नपाणी, आरोग्य, शिक्षण आणि निवारा या प्राथमिक गोष्टी मला माझा जगण्याचा हक्क म्हणून मिळाव्यात.(त्यासाठी माझ्यावर स्वाभिमान गहाण ठेवण्याची वेळ येवू नये.) ३. मला माझ्या धर्माचे पालन करता यावे. ४. माझ्या आणि माझ्या मुलांच्या हातांना काम म्हणजे रोजगार मिळावा. ५. देशासाठी मी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर भरतो, त्यामुळे सरकारी कार्यालये, सार्वजनिक वाहतूक अशा ठिकाणी मला मानाने वागविण्यात यावे. ६. माझ्या सार्वजनिक जीवनात जाती, धर्म, राज्य, भाषा, वर्ण, राजकीय – असा कोणताही भेद केला जाऊ नये. ७. साधनसंपत्तीच्या कमतरतेअभावी १२१ कोटींमध्ये स्पर्धा असणे हे क्रमप्राप्त आहे, याची जाणीव आहे, मात्र त्या स्पर्धेची सुरवात सर्वांसाठी सारखी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी व्यवस्था हवी. ८. जी भाषा मला समजते, त्या भाषेत व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य मला मिळावे. ९. कोणाला त्रास होणार नाही, अशा माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर राखला जावा. १०. देशाच्या आर्थिक प्रगतीत मला सहभागी करून घेतले जावे.
आपण यात आणखी काही मुद्यांची भर घालू शकता. मात्र लक्षात असे येईल की भारतीय ‘कॉमन मॅन’ला काय हवे, याची यादी फार पुढे जात नाही. असे शांत, समृद्ध आणि समाधानी आयुष्य हवे असल्यास कोणत्या प्रकारची व्यवस्था हवी, असा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा मात्र तो गोंधळतो आणि भावनिक आंदोलनेच त्याला महत्वाची वाटायला लागतात. अशा आंदोलनांनी आपला वेळोवळी भ्रमनिरास केला आहे, हेही तो विसरून जातो. मग त्याने नेमके काय करावे, असा प्रश्न उरतोच. त्याचे उत्तर त्याने आता मुळातून व्यवस्था बदलाचा आग्रह धरणाऱ्या आंदोलनांना बळ दिले पाहिजे, हेच आहे. अशी आंदोलने म्हणजे नेमके काय, याविषयीही आपण आगामी काळात जाणून घेऊ यात.