Thursday, August 11, 2011

बराक ओबामा आतला आवाज ऐकतील ?


आज 80 वर्षांनी त्याच मंदीच्या थांब्यावर जग थांबले आहे. फरक इतकाच की आता अमेरिकनांनो वायफळ खर्च कमी करा आणि अर्थतज्ञांनो, आता तिसर्‍या जगाची क्रयशक्ती कशी वाढेल, अशी आकडेमोड करा, असे ओबामांनी त्यांचे कान पिळून सांगण्याची आणि स्वतःचा आतला आवाज ऐकण्याची वेळ आली आहे.


बराक ओबामा यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा मी त्यांच्या ‘ड्रिम्स फ्रॉम माय फादर’ या चरित्राचा मराठीत अनुवाद करत होतो. अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर यांनी त्यापूर्वी किमान दोन वर्षे आधी हे पुस्तक मराठीत आणायचे ठरविले होते. त्यावेळी बराक ओबामा हे भारतात माहीतही नव्हते आणि ते निवडून येतील, असे कोणी सांगितले असते, तर त्यावर कोणी विश्वासही ठेवला नसता. बराक ओबामांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी झालेली निवड अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. ते अमेरिकेचे पहिले आफ्रिकन कृष्णवर्णीय अध्यक्ष ठरले. त्यांनी आपले चरित्र लिहून काढले ते त्यापूर्वीच्या एका पराभवातून सावरण्यासाठी! वडिल मूळ केनियन आणि मुस्लिम, आई गौरवर्णीय ख्रिश्चन, दुसरे वडिल इंडोनेशियन. सख्ख्ये वडिल अमेरिकेत शिक्षण घेतलेले असले तरी केनिया कर्मभूमी मानणारे आणि तेथे दुसरे लग्न केल्यामुळे नातेवाईकांचा प्रचंड गोतावळा. त्यातच देशाच्या आणि कुटुंबियांच्या दारिद्रयामुळे सतत ताणतणावात जगणारे कुटुंब. त्यात आईवडिलांचे लग्न आईच्या नातेवाईकांनी मनापासून स्वीकारलेले नाही. विसाव्या शतकात जगाच्या पाठीवर कोठेही निम्नमध्यमवर्गात घडू शकेल, असे सर्व बराक ओबामांच्या घरात घडून गेले आहे. शिवाय वडिलांची आयुष्यात एकदाच अल्पभेट झालेली. असे भावविश्च असलेला माणूस अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून येवू शकतो, ही गोष्ट जास्त ऐतिहासिक आहे, असे मला ‘ड्रिम्स फ्रॉम माय फादर’ वाचताना वाटून गेले.

आज आर्थिक संकटातून अमेरिकेला वाचवायचे म्हणजे जगाला वाचवायचे, अशा एका वळणावर जग उभे असताना बराक ओबामा जगाचे नेतृत्व करत आहेत, हा मनाला दिलासा वाटतो, त्याचे कारण बराक ओबामांचे हे पूर्वायुष्य. मूळ केनिया, प्राथमिक शिक्षण इंडोनेशियात, नागरिकत्व अमेरिकन आणि आफ्रिकन कृष्णवर्णीय म्हणून जगताना वा्ट्याला आलेली अवहेलना. जगाच्या तीन खंडातील सुखदुःख माहीत असलेला माणूस जगासमोरच्या अशा अक्राळविक्राळ प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहील, अशी आशा वाटायला लागते. आपल्या चरित्रातून आणि ‘ऑडॅसिटी ऑफ होप’ या लेखसंग्रहात मला जे ओबामा दिसले ते काही ओळींमध्ये गुंफण्याचा प्रयत्न मी त्यावेळी केला होता. आज जेव्हा गेल्या तीन-चार शतकातले इझम, शासनव्यवस्था आणि जगाच्या व्यवहारांचे विश्लेषण करणारे थोर पुरूष आणि अर्थतज्ञ कोलमडून पडले असताना बराक ओबामांचा आशावाद जवळचा वाटायला लागतो. विशेषतः ओबामांनी जेव्हा ‘मी कोणा एकाचा नाही, मी सर्वांचा आहे’, अशा शब्दात जगातील दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे वाटून गेले होते, की असाच माणूस सर्वसत्ताधारी बनला पाहिजे, तोच जगाचे भले करू शकेल. प्रत्यक्षात जगात काय होणार आहे, याची मात्र अजून वाट पाहावी लागणार आहे.

अशा होत्या त्यातील काही ओळीः

‘मी कोणा एकाचा नाही, तर मी सर्वांचा आहे, असे कोणीतरी म्हणावे आणि एका समन्यायी नव्या जगाचे स्वप्न साकार व्हावे, असे ज्यांना ज्यांना वाटते....
आपल्या वर्तमानातील गुंता सोडविण्यासाठी आणि आव्हाने पेलण्यासाठी... आपल्यालाच एकत्र यावे लागेल.... आणि जे शक्य आहे, यावर ज्यांचा विश्वास आहे... बदलासाठी राजकारण किती सहाय्यकारी ठरते, म्हणून लोकशाहीच्या सामर्थ्यावर आणि सर्वसामान्य माणसांच्या मनोबलावर ज्यांचा विश्वास आहे... बहुविधता आणि सर्वसमावेशकता हेच नव्या जगाचे बलस्थान आहे, आणि विषमता हद्द्पार करण्यासाठीच्या छोट्या-मोठ्या लढ्यांत आज जे जे सक्रिय आहेत... इतिहासाचे ओझे जबाबदारी म्हणून स्वीकारताना वर्तमानात झेपावण्याचा आणि आपल्या विस्तारित परिवाराचं उज्ज्वल भवितव्य पाहण्याचा संकल्प ज्यांनी ज्यांनी केला आहे... अशा सर्व वैश्विक नागरिकांना सांगणार्‍या आणि अजूनही संकुचित अस्मितांवर विषारी फुंकर घालणार्‍यांना, ‘आपले प्राक्तन समान आहे’, हे बजावणार्‍या.... समानसंधी आणि समानता यामुळे आपलं स्वातंत्र्य धोक्यात येत नाही. उलट आपल्या सरकारची लोकमान्यता आणि यशस्वी अर्थव्यवस्थचं मूळ गमक म्हणजे ही मूल्यच होत. चला नव्या जगाच्या उभारणीचे आपणही शूरशिपाई होऊ यात’.

बराक ओबामा यांनी ‘ऑडॅसिटी ऑफ होप’ मध्ये जे विचार व्यक्त केले होते, त्यानंतरच्या या भावना आहेत.
थेट बराक ओबामा यांच्या शब्दात यातील काही विचार वाचल्यानंतर तर जगाच्या वाटचालीविषयी आपण अधिकच आशावादी होतो. त्या ओळी अशा आहेतः 1. सरकारी आणि खासगी कंपन्यांमधील खाबूगिरी आणि ऐहिकपणामुळे येणारा हव्यास ही आजच्या समाजापुढची सर्वात मोठी आव्हाने आहेत. 2. जागतिकीकरण अनिर्बंधपणे सुरु ठेवणं यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळून पडेल, हे नक्की. 3. गरीब राष्ट्रांतील दारिद्रय निर्मूलन हे आपण नुसतं दान करुन संपणार नाही, तो आपल्या दहशतवादाच्या संघर्षाचाच एक भाग म्हणून असायला हवं. 4. आमच्या राष्ट्रीय उत्पन्नाइतकंच आमची जीवनमूल्य आणि श्रद्धाही महत्वाची आहे, असे मी मानतो. ( जगातल्या सर्वसत्ताधीश मानल्या जाणार्‍या माणसाला असे वाटते, ही किती आनंदाची गोष्ट आहे!)

1929 साली जगामध्ये जी मोठी मंदी आली होती, तिचा उल्लेख करून बराक ओबामा यांनी अर्थरचना आणि जागतिक समूहाविषयी असे विचार व्यक्त केले आहेत. ‘आर्थिक मंदीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे अमेरिकन कामगारांची खर्च करण्याची शक्ती म्हणजे क्रयशक्ती वाढविणे हा आहे, असे त्यावेळी अध्यक्ष रुझवेल्ट यांनी म्हटले होते. आज 80 वर्षांनी त्याच मंदीच्या थांब्यावर जग थांबले आहे. फरक इतकाच की आता अमेरिकनांनो वायफळ खर्च कमी करा आणि अर्थतज्ञांनो, आता तिसर्‍या जगाची क्रयशक्ती कशी वाढेल, अशी आकडेमोड करा, असे ओबामांनी त्यांचे कान पिळून सांगण्याची आणि स्वतःचा आतला आवाज ऐकण्याची वेळ आली आहे.