Sunday, October 20, 2013

सोने तारी, सोने मारी, सोने नाना विकारी!
‘कॅड’ इतका महत्वाचा आहे की आपल्या देशात किती परकीय गुंतवणूक यावी, भारताची आर्थिक तब्येत कशी आहे, शेअर बाजार चढणार की पडणार, आपल्या उद्योग व्यवसाय आणि शेतीसाठी पतपुरवठा मिळणार की नाही, हे आणि बरेच काही तोच ठरवितो. त्या कॅडला सोन्याने एकदम ‘विकारी’ करून टाकले आहे. त्याची तब्येत सुधारत नाही, तोपर्यंत भारताची आर्थिक घडी बसू शकत नाही.
अन्न माणसाला जगवते, मात्र ते किती खावे हे कळले नाही, तर तेच माणसाला मारते आणि त्यातूनच अनेक विकार होतात, असे सांगणारी ‘अन्न तारी, अन्न मारी, अन्न नाना विकारी’ अशी एक म्हण आहे. तिचा प्रत्यय आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात घेतच असतो. तसाच अनुभव आपला भारत देश सध्या घेतो आहे. सोन्याची किरकोळ निर्मिती करणारा हा देश एकेकाळी आणि आजही सुवर्णभूमी (सुमारे २० हजार टन सोने बाळगणारा) होता आणि आहे, हे म्हणण्याचा अभिमान बाळगायचा की त्याचे देशावर आणि पर्यायाने आपल्यावर होणाऱ्या परिणामांची लाज बाळगायची, हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. आकडेवारी असे सांगते की सोन्याने अनेक गुंतवणूकदारांना तारले असले तरी देशाला त्याने सपाटून मारले आहे आणि कोट्यवधी भारतीयांच्या आयुष्यात ज्या नकारघंटा वाजत आहेत, त्यातून सोन्याने या देशाला विकारी म्हणजे आजारी करून टाकले आहे.

जगाची अर्थव्यवस्था सुधारली की जनता तिच्यावर विश्वास टाकून गुंतवणुकीचे इतर मार्ग निवडते आणि त्यातून पतसंवर्धन किंवा क्रेडीट एक्स्पान्शन होते. जगात उद्योगांची भरभराट होते, रोजगार संधी वाढतात आणि जगणे सुकर होते. मात्र ती संकटात सापडली की जनता सोन्याची खरेदी सुरु करते. सोन्याचे वैयक्तिक साठे वाढत जातात आणि जो पैसा निर्मितीच्या कामी खर्च झाला पाहिजे, तो घराघरांच्या कोनाड्यात पडून राहतो. भविष्यात काही संकट आले तर सोने मोडण्याची पद्धत अशी भारतात शतकानुशतके सुरु आहे. याचा दुसरा अर्थ भारतीय जनतेने पूर्वीचे राजे आणि आजची सरकारे आणि बँका यावर कधीच विश्वास टाकलेला नाही तर! आयुष्यात काही गरज लागली तर सरकारी व्यवस्था, बँका आपल्याला मदत करतील, असे आजही सर्वसामान्य माणसाला वाटत नाही. गुंतवणुकीचा खात्रीचा मार्ग म्हणून तो सोन्याकडेच वळतो, ही आपल्या आजच्या व्यवस्थेची केवढी शोकांतिका आहे! वाईट याचे वाटते की सोने खरेदीची ही सामूहिक कृती आपण ज्या जहाजात बसलो आहोत, त्यालाच बुडवते आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात आले तरी तो आज हतबल आहे.

सोने नावाच्या उपयोग म्हणून कुचकामी धातूने आपल्या देशाच्या संसारात केवढा गोंधळ घातला आहे, हे समजून तर घेऊ. सोने महाग व्हावे यासाठी गेल्या २० महिन्यात सरकारने चार वेळा आयातशुल्कात वाढ (मार्च १२ ला चार टक्के असलेला कर आज १५ टक्के झाला) केली तरीही सोन्याची मागणी कमी झालेली नाही. किंमत वाढल्यावर सोन्याचे आकर्षण कमी होईल, हे गृहीतक खरे ठरले नाही. रुपयातील चढउतार लक्षात घेता अर्थव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत झाला आणि पुन्हा सोन्याची मागणी वाढली. ‘वर्ड गोल्ड कौन्सिल’ च्या माहितीनुसार यावर्षी एप्रिल ते जून या महिन्यात ग्राहकांनी ३१० टन म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ७१ टक्के अधिक, बार आणि नाण्याच्या रुपात ११६ टक्के तर दागिन्यांच्या रुपात ५१ टक्के खरेदी केली! गेल्या सहा महिन्यात सोन्याच्या गुंतवणुकीने १५ ते २० टक्के परतावा दिला आहे. ज्यांनी २६ हजाराला एक तोळा या दराने सोने घेतले होते, त्यांना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ३१ ते ३२ हजार रुपये भाव मिळाला. रुपया तेव्हा प्रतिडॉलर ६९ रुपयांवर घसरला होता. शहरी भारतीय आपली १० ते १५ टक्के गुंतवणूक तर ग्रामीण भागातील श्रीमंत ५० टक्के गुंतवणूक सोन्यात करतात, असे सोन्याच्या किंमतीचा अभ्यास करणाऱ्या संस्था सांगतात. आयात शुल्क वाढल्याने सोन्याच्या स्मगलिंगला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. अशा चोरट्या मार्गाने येणाऱ्या सोन्याचा हिशोब कसा करणार?

आयात निर्यात व्यापार, उत्पादन, सेवा आणि गुंतवणूक यांची तब्येत कशी आहे, याचा निकष म्हणजे भारताच्या चालू खात्यावरील तुटीचा आकडा. त्यालाच कॅड म्हणतात. एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपीच्या तुलनेत ही तुट आता ४.९ टक्क्यांवर पोचली आहे, हे गंभीर मानले जाते. गेल्या आर्थिक (२०१२-१३) वर्षात ही तुट ८८.२ अब्ज डॉलर (५४६८ अब्ज रुपये) झाली होती. यात सोन्याचा वाटा किती प्रचंड आहे, पहा. त्यातले ६० अब्ज डॉलर म्हणजे ३७२० अब्ज रुपये फक्त सोन्यासाठी मोजावे लागले. यावर्षी एप्रिल ते जुलै या तीन महिन्यात सोन्याची आयात ७.४ अब्ज डॉलरवर (४५८ अब्ज रुपये) पोचली, ज्यामुळे सरकारने आयातशुल्क वाढविण्याचा धडाका लावला. कारण इतके प्रचंड सोने आयात झाले नसते तर तुट १४.५ अब्ज डॉलर (८९९ अब्ज रुपये) इतकी खाली आली असती आणि जीडीपीतील तुटीचे प्रमाण एकदम ३.२ टक्क्यांवर गेले असते, जे फारसे चिंताजनक मानले जात नाही. अलिकडे तुट कमी झाल्याचे जाहीर झाले आहे, मात्र सोन्याच्या गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा देणारा गुंतवणूकीचा मार्ग दिल्याशिवाय हे समाधान टिकणार नाही.

हा ‘कॅड’ इतका महत्वाचा आहे की आपल्या देशात किती परकीय गुंतवणूक यावी, भारताची आर्थिक तब्येत कशी आहे, शेअर बाजार चढणार की पडणार, आपल्या उद्योग व्यवसाय आणि शेतीसाठी पतपुरवठा मिळणार की नाही, हे आणि बरेच काही तोच ठरवितो. त्या ‘कॅड’ला सोन्याने एकदम ‘विकारी’ करून टाकले आहे. त्याची तब्येत सुधारत नाही, तोपर्यंत भारताची आर्थिक घडी बसू शकत नाही.

(तात्पर्य – वैयक्तिक सुरक्षिततेसाठी सोने विकत घेत राहा. शक्य असेल तर तसे करणे टाळा आणि हे ज्यातून उद्भवले आहे, त्या काळ्या पैशाला मूठमाती देण्यासाठी सर्व क्षेत्रातील नेत्यांना, धर्मसंस्थांना आणि अर्थतज्ञाना आर्थिक प्रश्न विचारायला सुरवात करा.)


भारतासाठी सोने विकारी बनले कारण.....
- गेली काही वर्षे सोने सर्वाधिक आयात करणारा देश.
- भारतात २० हजारांपेक्षा अधिक टन सोने म्हणजे १ ट्रिलीयन डॉलर इतक्या किंमतीचे. (जगात एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था केवळ १२ असून त्यात भारताच्या समावेश व्हायला २००७ उजडावे लागले. यावरून १ ट्रिलीयन म्हणजे किती याची कल्पना यावी. एक ट्रिलीयन म्हणजे एकावर १२ शून्य.) याचा दुसरा अर्थ भारतासारख्या तगड्या पैलवानाला रोखणारा एक राक्षस आपणच तयार केला आहे.
- सोन्याच्या रूपाने संपत्ती पडून राहते, म्हणजे श्रमाच्या पैशांचे रुपांतर धातूत होते, जो नुसता पडून राहतो. त्यातून पुरेसा रोजगार आणि शुद्ध भांडवल तयार होत नाही, ज्यातून देशाची म्हणजे आपलीच कोंडी होते.