Friday, October 11, 2013

चला, सोने लुटायला मॉस्को विमानतळावर!



सगळ्यात महत्वाचे म्हणजे चलन हे केवळ व्यवहार करण्याचे माध्यम आहे. ते या हातातून त्या हातात, असे स्वच्छ हवेसारखे फिरलेच पाहिजे. ते म्हणजे मालकीची वस्तू नव्हे, हे जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आधुनिक जग कमी दर्जाचे जीवन जगण्याचीच स्पर्धा खेळत बसणार, हे त्या रोखीत लोळणाऱ्या मूर्खांना आणि त्यांच्या पावलावर पाउल ठेवून जगणाऱ्या देशी मूर्खांना कळेल, ती खरी सोन्याची लुट !


भारतीय परंपरेनुसार दसऱ्याच्या दिवशी सोने लुटले जाते. त्याच्या पारंपरिक कारणांत मी जाणार नाही. मात्र सोने ज्या आर्थिक सूरक्षिततेसाठी भारतीय गेले काही शतके घेत आहेत, ती आर्थिक सूरक्षितता मिळविण्याची एक नामी संधी आली आहे! बातमी अशी आहे की मॉस्कोच्या विमानतळावर ७ ऑगस्ट २००७ पासून म्हणजे गेली सहा वर्षे १६.७५ अब्ज ब्रिटीश पौंड किंमतीच्या पण १०० युरो नोटांच्या रुपात पडून आहेत. १६.७५ अब्ज ब्रिटीश पौंड म्हणजे १,६७५ अब्ज रुपये! ते गेली सहा वर्षे पडून आहेत. त्या नोटा आपल्या आहेत, असा दावा काही गटांनी आणि माणसांनी करून पाहिला मात्र त्यांना ते आपले आहे, हे सिद्ध करता आले नाही. त्या बातमीत पुढे असे म्हटले आहे की युरोपीय देशांची २०१३ ची अर्थसंकल्पीय तुट भरून निघेल, एवढी ही प्रचंड रक्कम आहे. किंवा ती रक्कम ज्याची असेल तो जगातल्या पहिल्या ५० श्रीमंत लोकांच्या रांगेत लगेच जाऊन बसेल! या नोटा बसमध्ये ठेवल्या तर पाच बस लागतील!

तो पैसा भारतीयांचा आहे, असा दावा करता येणार नाही, हे जेवढे खरे आहे तेवढेच हेही खरे आहे की तो भारतीयाचा सुद्धा असू शकतो, असाही दावा करता येतो. आज तरी सारेच गुलदस्त्यात आहे. म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावर ते लुटण्याची एक नामी कल्पना येथे मांडली एवढेच. त्याची काही कारणे अशी:
१. ब्रिटीशांनी १५० वर्षे भारताची जी प्रचंड लुट केली त्याच लुटीतून युरोपात गेले ६० वर्षे प्रचंड संपत्ती निर्माण झाली. त्यामुळेच युरोपला असे प्रचंड चलन छापावे लागले. म्हणून त्या नोटांत भारतीय रक्त आणि घाम आहे, असा दावा केला तर त्यात चूक काय ?
२. भारतीय शेअरबाजार आणि अशा अनेक माध्यमांतून गेली काही वर्षे परकीय गुंतवणूकदार प्रचंड लुट करत आहेत. ती लुट फ्रांकफुर्ट, मॉस्कोमार्गे लंडन, न्यूयॉर्कमध्ये चालली नसेल कशावरून?
३. भारतीय माणसे रक्त आटवितात आणि सोने विकत घेतात किंवा गाड्या विकत घेतात. सोने आयातच करावे लागते तर गाड्या पेट्रोल, डिझेलवर चालतात. जे आयात करण्यासाठी प्रचंड परकीय चलन खर्च करावे लागते. या नोटा तेलाच्या व्यवहारातील आहेत, असा एक अंदाज आहे. म्हणजे तेल वापरणारा एक प्रमुख देश म्हणून भारत आहेच. म्हणजे पुन्हा आपलाच पैसा झाला की!
४. स्वीस बँकेतील पैसा भारतात आलाच पाहिजे, असे आंदोलन रामदेवबाबांनी केले होते. त्यावेळपासून आणि पूर्वीपासूनच किती भारतीय संपत्ती स्वीस बँकेत आहे, यावर आपले एकमत होऊ शकलेले नाही. तोच हा पैसा आहे, असे म्हटल्यास आपल्याला कोण रोखू शकतो?
५. भारतात १००० आणि ५०० रुपयांच्या नोटांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांचे हवाला व्यवहार चालतात. त्यातील एखाद्या हवाला व्यवहाराची पूर्तता करण्यासाठी हा पैसा युरोत रूपांतरित करण्यात आला, असे झाले नसेल कशावरून?

गंमतीचा भाग सोडा, पण अशाच रोखीच्या व्यवहारांचा अतिरेक होऊन साठीच्या दशकात अमेरिकन अर्थव्यवस्था अडचणीत सापडली होती. त्यांनतर तेथील १०० च्या वरील डॉलरच्या नोटा रद्द करण्यात आल्या आणि तेव्हापासून अमेरिकेत बँकिंग वाढले. अर्थव्यवस्थेला शिस्त आली. आता ब्रिटन अडचणीत सापडले असून २०१४ पासून कॅशलेस इकॉनॉमीच्या दिशेने जाणे ब्रिटनला भाग पडले आहे.
ज्या भारताने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा साठा केला आहे आणि जो देश शुद्ध भांडवलाची याचना करतो आहे, त्या भारतात रोखीच्या व्यवहारांना उत आला आहे. रोखीच्या नोटांनी भरलेली आणि बनावट नोटांची पोती सापडत नाही, असा एक दिवस या देशात जात नाही. तिकडे बरे चालले, असा समज होता. मात्र नोटांच्या या बंडलांनी त्या देशांच्या व्यवस्थाही बंडल आहेत, असा संदेश दिला आहे. किमान त्या मूर्खांच्या नादी न लागता आपल्या देशाचे प्रश्न वेगळे आहेत, हे जरी योजनाकर्त्यांनी मान्य केले तरी मॉस्कोच्या नोटा पावल्या असे म्हणता येईल! सगळ्यात महत्वाचे म्हणजे चलन हे केवळ व्यवहार करण्याचे माध्यम आहे. ते या हातातून त्या हातात, असे स्वच्छ हवेसारखे फिरलेच पाहिजे. ते म्हणजे मालकीची वस्तू नव्हे, हे जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आधुनिक जग कमी दर्जाचे जीवन जगण्याचीच स्पर्धा खेळत बसणार, हे त्या रोखीत लोळणाऱ्या मूर्खांना आणि त्यांच्या पावलावर पाउल ठेवून जगणाऱ्या देशी मूर्खांना कळेल, ती खरी सोन्याची लुट !


हे क्रूर सत्य तुम्ही पचवू शकता ? (या घटनेवरील काही संतप्त प्रतिक्रिया)




- नोटांच्या मालक सापडला नाही तर त्या पुतीनला देऊन टाका. ते गरीबांना वाटतील, म्हणजे त्यांना नोबेल पुरस्कार देणे आणखी शोभून दिसेल!
- मी त्यातील २० अब्ज घ्यायला तयार आहे, १०० युरोच्या नोटांच्या मोठमोठ्या सिगारेट होतील!
- अरे, हा पैसा इकडे कोठे गेला, मी तर माझ्या सोफ्याखाली शोधत होतो!
- अरे वेड्या नायजेरीयन राजपुत्रा, माझी संपत्ती मी हिथ्रो विमानतळावर पाठविण्यास सांगितले होते!
- आता उंदरांना बरेच दिवस पुरेल हे अन्न!
- मला खात्री आहे की आमचे कॉम्रेड आता त्याचे रुपांतर होडकात करतील!
- फारच वाईट.. आता आणखी काही रशियन गुंड इंग्लिश फुटबॉल टीम विकत घेतील!
- युरोपियन युनियनच्या एका वर्षाची तुट भरून काढणाऱ्या नोटा! एकाला किंवा अशा बऱ्याच जणांना फटके मारण्याची वेळ आली आहे!
- ओ हो.. त्या तर माझ्याच नोटा आहेत, बिझिनेस मिटिंग संपवून जाताना त्या मी ब्रीफकेसमध्ये टाकायच्या विसरलो. त्या आता मला परत द्याल का?
- मला पूर्ण सत्य माहीत नाही. पण मला हे माहीत आहे की अमेरिकेच्या फेडरलने फायनान्ससियल सिस्टीममध्ये जेवढा पैसा ओतला त्या तुलनेत हे काहीच नाही. रशियाने एक मुदत जाहीर करावी आणि आपल्या तिजोरीत जमा करून घ्यावे! तुम्हाला सत्य पचविता येणार नाही!


No comments:

Post a Comment