Thursday, October 3, 2013

यापेक्षा अधिक काय लागते महासत्ता होण्यासाठी ?



(अर्थपूर्ण चे ऑक्टोबर महिन्याचे मुखपृष्ठ आणि भूमिका)

भारतीय माणसाच्या वृत्तीवर हजारो वर्षे बोलले जाते आहे तसे ते आज बोलले जाते आहे आणि भविष्यातही बोलले जाणार आहे. माणसाची वृत्ती सुधारण्याचा प्रवास असा निरंतर सुरूच राहणार आहे. बदल हवा असे म्हणणाऱ्या प्रत्येकाने आता व्यवस्थेवर बोलले पाहिजे, हे मात्र फार कमी जणांच्या लक्षात येते आहे.ज्यांना भारतीय माणसांच्या वृत्तीवरच बोट ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी १० प्रश्न मी येथे मुद्दाम उपस्थित करत आहे.


‘माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयावर तरुण नेमके काय लिहितात आणि तरुणांच्या मनात आज काय दडले आहे, हे जाणून घेताना ऋजुता मिलिंद जोशी या स.प. महाविद्यालयातील विद्यार्थीनीचे मनोगत वाचण्यात आले आणि तरुणांच्या मनात या देशाविषयी किती प्रचंड प्रेम आहे आणि त्यांना हा देश सुजलाम सुफलाम करण्याची किती दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, याची झलक पाहायला मिळाली. अगदी भावनिकच विचार करायचा तर तरुणांच्या मनातील हा निखळ प्रामाणिकपणा आनंद देवून जातो. वयाने मोठी झालेली माणसे देशाची जी चिंता करत असतात, ती आणि तरुणांच्या मनातील चिंता यात एक महत्वाचा फरक आहे. तो म्हणजे मोठ्या माणसांनी काय जगायचे ते जगून झाले आहे. त्यामुळे व्यवस्थेविषयी ते बोलतात तेव्हा त्यातील बहुतेक त्यातून स्वत:ला वगळून टाकतात. त्यांचे व्यवस्थेतील ‘स्टेक’ म्हटले तर कमी कमी होत चाललेले असतात. त्यामुळे बदल झाला पाहिजे, असे ते म्हणतात तेव्हा त्यात म्हणावा तेवढा जोर नसतो. बदल झालाच पाहिजे, असे ते म्हणत नाहीत. तरुण मात्र बदल झालाच पाहिजे, असे म्हणत आहेत, कारण त्यांचा आजच्या व्यवस्थेत १०० टक्के ‘स्टेक’ आहे आणि ते हे मान्य करत आहेत, हे आज सर्वाधिक महत्वाचे आहे.

ऋतुजा हिने तिच्या निबंधात मार्क ट्वीन यांच्या एका विचाराचा दाखला दिला आहे. ‘The Destiny may rules the life of human but the reality is The God confides the human to create his own Destiny’ असे ते वाक्य आहे. पण तिने पुढे जे म्हटले आहे ते जास्त महत्वाचे आहे. ती म्हणते, ‘ जर हे भाग्य हे माणसाच्या कष्टांवर, जिद्दीवर अवलंबून असेल, तर माझ्या देशाचे भाग्यही माझ्यासारख्याच सगळ्या भारतीयांच्या हातात आहे... आपल्याच हातात आहे. या आपल्या महान राष्ट्रात पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघण्याइतकी बौद्धिक, आर्थिक आणि वैज्ञानिक संपन्नता आणणे, याच विचाराने माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले आपल्या संपन्न, सुजलाम-सुफलाम्, महासत्ता बनलेल्या, प्रगतीशील, विकसित भारताचे सोनेरी स्वप्न!’

तरुणांची इतर मनोगतेही मग मी वाचून काढली. मला जाणवले की सर्वांनाच देश सुजलाम सुफलाम करायचा आहे. इतिहासात या देशात सोन्याचा धूर निघत होता, याचीही माहिती सर्वांना आहे. आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी देश २०२० मध्ये आपला देश महासत्ता होईल, असे स्वप्न दाखविले, याचाही मोठा परिणाम तरुणांवर झालेला आहे. आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे भविष्यात देश कसा असावा, याविषयी फार कोणाचे दुमत नाही. जवळपास सर्वाना सारखेच वाटते आहे. फक्त एकच उणीव आहे. आणि ती फार महत्वाची आहे. ती म्हणजे हा देश सुजलाम सुफलाम, महासत्ता, संपन्न कसा होईल, याचा काही ठोस मार्ग कोणाकडेच नाही. ज्या मोजक्या तरुणांनी देश बदलण्याचे जे प्रस्ताव मांडले आहेत, ते एकतर भावनिक आहेत किंवा स्वप्नाळू आहेत. म्हणजे बहुतेकांनी भारतीयांना बदलण्याची भाषा वापरली आहे. त्यांना भारतीय माणूस कोठेतरी कमी पडतो आहे, असे सुचवायचे आहे. काही जण तर भारतीय माणसाच्या वृत्तीवरच तुटून पडले आहेत. भारतीय माणसाच्या वृत्तीवर हजारो वर्षे बोलले जाते आहे तसे ते आज बोलले जाते आहे आणि भविष्यातही बोलले जाणार आहे. माणसाची वृत्ती सुधारण्याचा प्रवास असा निरंतर सुरूच राहणार आहे. बदल हवा असे म्हणणाऱ्या प्रत्येकाने आता व्यवस्थेवर बोलले पाहिजे, हे मात्र फार कमी जणांच्या लक्षात येते आहे.

ज्यांना भारतीय माणसांच्या वृत्तीवरच बोट ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी १० प्रश्न मी येथे मुद्दाम उपस्थित करत आहे. मला वाटते त्या प्रश्नांची उत्तरे शोधली तर आज देशात आर्थिक साक्षरता आणि अर्थक्रांतीचे पाच प्रस्ताव किती महत्वाचे आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज पडणार नाही. १. ज्या देशात २२ हजार टन सोने पडून आहे, त्या देशाने इतर देशांकडे भांडवलाची भिक मागावी, हे आपणास योग्य वाटते का? २. संपत्ती आणि इतर आर्थिक निकष लावले तर आजच हा देश महासत्ता आहे, मग आपल्या व्यवस्थेतील विसंगती शोधून त्या दुरुस्त करणे, हा खरा मार्ग नव्हे काय ? ३ पुरेशी साधने आणि पायाभूतसुविधांच्या अभावी आमच्यात वितुष्ट निर्माण होते आहे, हे आपण समजून घेणार आहोत काय ? ४. आपल्याच देशातील समूह बदनाम करतांना आपण आपल्यालाच बदनाम करतो आहोत, हे आपल्या लक्षात आले आहे का ? ५. देशाच्या अर्थरचेनेत काळ्या पैशांचे प्रमाण आज पांढऱ्या पैशांपेक्षा अधिक झाल्याने सर्व समाजाची कोंडी झाली आहे, ती आपण समजून घेणार आहोत काय? ६. आपल्या देशातील आगामी निवडणूक भावनिक आव्हानांवर न होता ठोस मुद्द्यांवर व्हावी, असे आपल्याला वाटते का? ७. आपल्या व्यवस्थेत पैशीकरणामुळे प्रचंड लाचारी आणि मुजोरी वाढली आहे. मानवी प्रतिष्ठेची मानहानी करणाऱ्या या दोन्हींविरुद्ध आपण लढणार आहोत काय? ८. या महाकाय देशातील १२३ कोटी भारतीयांना त्यांचे समजाला घातक नसलेले वैविध्य अबाधित ठेवून जगायचे असेल तर भेदभावमुक्त, पारदर्शी, समन्यायी व्यवस्थेशिवाय पर्याय नाही, हे आपल्याला पटते काय? ९. आपल्याला आपले सार्वजनिक आयुष्य सुधारण्यासाठी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना सक्षम करावे लागेल, याविषयी काही दुमत आहे काय? १०. जगातील १९३ देशांतील किती देशांवर निसर्गाने भारतासारखी कृपा केली आहे? सर्व निर्मितीचे मूळ असलेला सूर्यप्रकाश, काही अपवाद सोडता उत्तम पाऊस, तीनही बाजूने समुद्र, हिमालयासारख्या प्रचंड पर्वतरांगा, जगातील सातव्या क्रमांकाची जमीन, जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असताना गेली चाळीस वर्षे अन्नधान्यात संपूर्ण स्वयंपूर्णता, दुधउत्पादनात जगात पहिला, परदेशी नोकऱ्या आणि उद्योग व्यवसाय करून जगातून सर्वाधिक परकीय चलन आणणारे तरुण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जगातील सर्वाधिक तरुण असलेला म्हणजे सतत स्वप्न पाहणारा देश आणि शांत, प्रामाणिक आयुष्य जगण्यावर प्रेम करणारा आणि हे विश्वचि माझे घर असे म्हणणारा सर्वसामान्य भारतीय माणूस...यापेक्षा अधिक काय लागते महासत्ता होण्यासाठी ?

आपल्या मनातील बदलाची दिशा – पहा www.arthakranti.org

No comments:

Post a Comment