Saturday, April 20, 2013

सोने खरेदी - बुडत्या बोटीत बसा आणि शिरापुरी खा !सुवर्णभूमी भारताला शुद्ध भांडवलाची एवढी चणचण का भासावी ? ज्या देशात बचतीचा दर ३० टक्क्यापेक्षा अधिक आहे, त्या देशात कंपन्यांना भांडवलउभारणीसाठी कुतरओढ का करावी लागावी ?, त्या देशात सार्वजनिक सेवासुविधांचा दुष्काळ का पडावा? या आणि अशा अनेक प्रश्नांचे एक उत्तर असे आहे की आपण बुडत्या बोटीत (संकटात असलेली अर्थव्यवस्था) बसलो आहोत, याचे भान येण्याऐवजी त्या बोटीत आपल्याला शिरापुरी (सोने खरेदीसारखे तात्कालिक लाभ) खायला मिळते, यातच आम्ही खुश आहोत !


आपल्या देशवासियांसमोर सध्या एकच प्रश्न महत्वाचा आहे आणि तो म्हणजे सोन्याच्या किंमती आणखी कमी होणार की वाढणार ? कमी होणार असल्यास किती आणि सोन्याची खरेदी कधी करायची ? जणू जगबुडी जवळ आली, अशा वेगाने गेले दोन वर्षे सोने महाग होत गेले. याचा साधा सरळ अर्थ असा की सरकार आणि चलनावरील जनतेचा विश्वास कमी होत गेला आणि सोने खरेदी वाढत गेली. जग जेव्हा जेव्हा अस्थिर झाले तेव्हा तेव्हा सोन्याचे भाव वाढले आहेत. सर्वांना हवा असणारा हा धातू मंगलप्रसंगी वापरला जात असला तरी त्याची चढी किमंत ही अशी जगाच्या वाईटावर टपलेली आहे. जग स्थिर असले की सोन्याचे भाव कमी होतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. अर्थात हा अगदीच ठोकताळा आहे.
आता सोने उतरले म्हणजे जगाची आर्थिक शिस्त सुधारली किंवा आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली, असे आपण म्हणू शकतो. कारण अमेरिकेतील शेअर बाजार वाढला तेव्हापासून सोन्याची चमक फिकी पडू लागली होती. ती इतकी फिकी पडेल, असा अंदाज मात्र कोणीच केला नव्हता. एखाददुसऱ्या वित्तीय संस्थेने भाव पडतील असा अंदाज व्यक्त केला होता, मात्र हल्ली अशा अंदाजांना आता तसा काही अर्थ राहिलेला नाही. कारण जगाने नागरिकशास्त्र आणि अनेक शास्त्र जशी पुस्तकांत गुंडाळून ठेवली आहेत, तसेच अर्थशास्त्रही पुस्तकात गुंडाळून ठेवले आहे. आपल्या गुंतवणुकीचे पुढे काय होणार, यासाठी अर्थशास्त्राचा एकेकाळी आधार घेतला जात होता, मात्र गुंतवणूक आणि सट्टेबाजी यातला फरक अतिलोभी जगाने काढून टाकला असून सर्वांना सट्टा खेळण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे भाव कमी होत आहेत म्हणून ज्यांना सोने खरेदी करावयाचे आहे, त्यांनी आपण सट्टा खेळत आहोत, याची जाणीव ठेवली पाहिजे.
खरे तर भारतीयांना तसा काही फार फरक पडू नये. कारण ते सोने घेणार दागिन्यांसाठी. त्यातील फारच कमी लोक ते गुंतवणूक म्हणून घेतात आणि गुंतवणूक म्हणून जे घेतात, त्यांची ते विकण्याची सहसा हिंमत होत नाही. म्हणूनच जगातील ११ ते १३ टक्के सोने असलेला हा देश जगात एक गरीब देश म्हणून ओळखला जातो. आमच्या देशातील नागरिक घाम गाळतात, त्याचे रुपये करतात आणि ५५ रुपयाला एक डॉलर असे परकीय चलन विकत घेऊन त्याचे सोने विकत घेतात. म्हणूनच देशाच्या आयातीत अत्यावश्यक तेलानंतर छानशौकी सोन्याचा नंबर लागतो! ज्या देशाची निर्यात आयतीपेक्षा अधिक त्याचे आर्थिक आरोग्य चांगले, असे मानले जाते. मात्र आमच्या वाट्याला ते भाग्य कधी येत नाही. आम्ही परेशान आहोत की आमच्या देशाची तूट कमी कशी होईल ? ती कमी होत नाही म्हणून निर्यातीला सवलती दिल्या जातात आणि देशाच्या तिजोरीत डॉलरचा साठा कसा वाढेल, याची चिंता सरकारला करावी लागते. कारण तो पुरेसा नसेल तर जागतिक आर्थिक संस्था आमचे रेटिंग कमी करतात आणि डॉलरचा ओघ कमी होतो. या दुष्टचक्राला आपण खतपाणी घालतो आहोत, हे सोने खरेदी करताना आपल्या गावीही नसते. अर्थात आपल्या आर्थिक विवंचना दूर न झालेल्यांनी देशाच्या प्रश्नांची काळजी का करावी, हाही मुद्दा आहेच म्हणा.
तरीही एक गोष्ट लक्षात घ्यावीच लागणार आहे. सुवर्णभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देशात हल्ली वर्षाला दोन टनापेक्षा अधिक सोने उत्पादन होत नाही. (आम्ही गेल्या तीन दिवसांत १५ टन सोने खरेदी केले) खरेतर पूर्वीही कधी होत नव्हते. म्हणूनच पूर्वीही वस्तूंच्या बदल्यात सोन्याची आयात केली जात होती. त्यासाठी डॉलर मोजण्याची तेव्हा गरज नव्हती. आता म्हणजे गेल्या काही वर्षात भारत दरवर्षी ८०० ते ९०० टन सोने आयात करतो. आतापर्यंतचे सोने मोजले तर आपल्याकडे १८ ते २० हजार टन सोन्याचा म्हणजे जगात सर्वाधिक साठा आहे, असे ‘गोल्ड वर्ल्ड कौन्सिल’ सांगते. ते खरेच आहे. गेल्या आठ दिवसांपासून भारतात सुरु असलेली सोने खरेदी पाहिल्यावरही त्याचे प्रमाण लक्षात येते. दुकानातील साखर, रॉकेल संपावे तसे सराफांकडील सोने संपले होते ! सायप्रस आणि युरोपातील देश आपले आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी सोन्याचे साठे विकण्याचा विचार करत आहेत. पण सुवर्णभूमी भारताच्या दृष्टीने त्या बातम्याही निष्प्रभ ठरल्या आणि सोने हळूहळू पुन्हा चढू लागले.
मुद्दा असा आहे की इतके प्रचंड सोने बाळगणाऱ्या भारताची आर्थिक स्थिती आज नाजूक का झाली आहे?, त्याच्या अर्थमंत्र्यांना बाहेरील देशांमध्ये दौरे करून भांडवलाची भिक का मागावी लागते आहे?, सुवर्णभूमी भारताला शुद्ध भांडवलाची एवढी चणचण का भासावी ? ज्या देशात बचतीचा दर ३० टक्क्यापेक्षा अधिक आहे, त्या देशात कंपन्यांना भांडवलउभारणीसाठी कुतरओढ का करावी लागावी ?, त्या देशात सार्वजनिक सेवासुविधांचा दुष्काळ का पडावा? या आणि अशा अनेक प्रश्नांचे एक उत्तर असे आहे की आपण बुडत्या बोटीत (संकटात असलेली अर्थव्यवस्था) बसलो आहोत, याचे भान येण्याऐवजी त्या बोटीत आपल्याला शिरापुरी (सोने खरेदीसारखे तात्कालिक लाभ) खायला मिळते, यातच आम्ही खुश आहोत !
सोन्याची शिरापुरी
- देशात १८ हजार टनापेक्षा अधिक सोने साठा (जगातील ११ टक्के, किंमत अंदाजे ५० लाख कोटी रुपये)
- भारतीय भांडवली बाजाराच्या ७१ टक्के, तर एकूण जीडीपीच्या ६६ टक्के (ऑगस्ट २०११)
- बचतीची टक्केवारी ३० म्हणजे चांगली, मात्र त्यातील १० टक्के निरोपयोगी सोन्यात
- भाव उतरल्यावर तीन दिवसांत भारतीयांनी नेहमीपेक्षा दुप्पट म्हणजे १५ टन सोने खरेदी केले.
- सोन्याचे भाव २२ टक्के पडल्याने भारतीयांचे झालेले नुकसान १४ लाख कोटी रुपये.