Thursday, March 13, 2014

किती दिवस तोंड लपविणार ?






आपल्याकडे तज्ञांना अंहगंड, पराभूत मनोवृत्ती आणि पाश्चिमात्य विचारांनी इतके पछाडले आहे की देशाचे प्रश्न सोडविण्याचा इतर काही आणि देशातच जन्म झालेला मार्ग असू शकतो, हेच त्यांना मान्य होत नाही. पण मान्य न करता सांगता कोणाला? तुम्ही जर तज्ञ आहात तर आजच्या देशाच्या विदारक परिस्थीतीला तुम्हीच जबाबदार आहात, असे कोणी म्हंटले तर त्यात चुकीचे काय, या प्रश्नाला त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही. तरीही त्यातील बहुतांश अतिशय निर्लज्जपणे केवळ प्रश्नांची तीच ती मांडणी करत राष्ट्रीय समारंभ, परिषदा ‘गाजवत’ आहेत. खरे म्हणजे त्याचेही कारण आता लपून राहिलेले नाही. तज्ञ आयुष्यभर पोटार्थी राहिले की यापेक्षा वेगळे काही होण्याची अपेक्षाही करता येत नाही. येथे एकच प्रश्न सतावतो तो म्हणजे पोटार्थी मानसिकतेतून ते कधी बाहेर पडणार आहेत? की त्यांना तो पुरुषार्थ माहीतच नाही?



आर्थिक साक्षरता आणि अर्थक्रांती म्हणजे शुद्ध भांडवलाच्या म्हणजे प्रामाणिक आयुष्याच्या दिशेने जाण्यासाठी सुरु झालेल्या अर्थपूर्ण मासिकाच्या प्रवासाला दोन महिन्यांपूर्वी तीन वर्षे पूर्ण झाली. अर्थपूर्ण मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला तेव्हा त्याची जी भूमिका लिहिली गेली, तिचा मथळा होता, ‘आहे.. उत्तर आहे’. उत्तराची मांडणी इतक्या ठामपणे करताना मनात काही शंका होत्या. पहिली शंका होती की ५० ते ७० टक्के काळी व्यवस्था असताना शुद्ध भांडवलाचा आग्रह कितपत स्वीकारला जाईल?, दुसरी शंका होती करपद्धती सोपी असली पाहिजे, असे आपण म्हणतो खरे पण आपण काही त्यातले तज्ञ नाही., तिसरी शंका होती की बँकिंग वाढले पाहिजे, हे तर या क्षेत्रातील सर्वांनाच कळते, मग आपण वेगळे काय सांगतो आहोत?, चौथी शंका होती की हा एवढा मोठा विषय आहे की त्याला राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय चालना मिळणार नाही, मग तो पुढे कसा जाणार?, पाचवी शंका होती की सर्वांना प्रामाणिक, शांत आणि समृद्ध जीवन जगता यावे, हा आशावाद स्वप्नाळू तर नाही ना? आणि आणखी एक शंका अशी होती की समाजातील अन्यायाविरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्ष, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था काम करत असताना आपण वेगळा काही मार्ग सांगितला तर तो कसा स्वीकारला जाईल?

आज आनंद याचा वाटतो की गेल्या तीन वर्षांत दिशा जराशीही बदलावी लागली नाही. उलट आपण ज्या दिशेने चाललो आहोत, तोच मार्ग योग्य आहे, याची खात्री झाली. म्हणूनच ‘आहे... उत्तर आहे’ या मथळ्याचे पुस्तकच २६ जानेवारी २०१४ ला प्रसिद्ध झाले. २०१३ च्या अखेरीस अर्थक्रांती देशपातळीवर पोचल्यावर त्यावर उलटसुलट चर्चा सुरु झाली. इंग्रजी दैनिकात गेल्या दोन महिन्यात किमान ५०-६० लेख प्रसिद्ध झाले. दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवर चर्चा झडल्या. ‘एबीपी माझा’ या वाहिनीवर सलग तीन रविवारी म्हणजे तीन तास अर्थक्रांतीचे प्रसारण झाले. ज्यांच्या पुढाकाराने ही चर्चा सुरु झाली, ते नरेंद्र मोदी, रामदेवबाबा, नितीन गडकरी आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्या मनात सध्या काय चालले आहे, हे मात्र कळायला मार्ग नाही. भाजपच्या नव्या अर्थधोरणात सर्वांनाच कर द्यावा लागेल, असा भाजपच्या विरोधात राजकीय प्रचार होईल आणि त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल, म्हणून त्यांनी अर्धविराम घेतल्याची घेतल्याची माहिती आहे. या देशात मुलभूत बदल करणे किती जिकीरीचे आहे, याची एक चुणूक यानिमित्ताने पाहायला मिळाली.

अर्थात अर्थक्रांतीचे मॉडेल इतके पक्के आहे की त्याला आपण पूर्णपणे नाकारतो, असे म्हणण्याची कोणाची हिमंत होत नाही, हेही गेल्या तीन महिन्यात पुन्हा लक्षात आले. एवढेच नवे तर जे अर्थतज्ञ काही बोलण्यास तयार नव्हते, त्यातील काही जणांनी अर्थक्रांतीमध्ये चुका काढण्यासाठी तिचा अभ्यास सुरु केला आहे. आपल्याकडे तज्ञांना अंहगंड, पराभूत मनोवृत्ती आणि पाश्चिमात्य विचारांनी इतके पछाडले आहे की देशाचे प्रश्न सोडविण्याचा इतर काही आणि देशातच जन्म झालेला मार्ग असू शकतो, हेच त्यांना मान्य होत नाही. पण मान्य न करता सांगता कोणाला? तुम्ही जर तज्ञ आहात तर आजच्या देशाच्या विदारक परिस्थीतीला तुम्हीच जबाबदार आहात, असे कोणी म्हंटले तर त्यात चुकीचे काय, या प्रश्नाला त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही. तरीही त्यातील बहुतांश अतिशय निर्लज्जपणे केवळ प्रश्नांची तीच ती मांडणी करत राष्ट्रीय समारंभ, परिषदा ‘गाजवत’ आहेत. खरे म्हणजे त्याचेही कारण आता लपून राहिलेले नाही. तज्ञ आयुष्यभर पोटार्थी राहिले की यापेक्षा वेगळे काही होण्याची अपेक्षाही करता येत नाही. येथे एकच प्रश्न सतावतो तो म्हणजे पोटार्थी मानसिकतेतून ते कधी बाहेर पडणार आहेत? की त्यांना तो पुरुषार्थ माहीतच नाही?

जी गोष्ट तज्ञांची तीच उच्चभ्रू समाजातील बहुतेकांची. समाजसेवा आणि कोणावर तरी उपकार करण्याच्या भावनेने त्यांना जणू पछाडले आहे. ज्या मार्गांनी पैसा कमावला तो शांत बसू देत नाही आणि शांत झोप लागत नाही, मग एकमेकांवर स्तुतिसुमने उधळण्याचे समारंभ आयोजित केले जातात आणि आपण किती पराक्रम करत आहोत, हे माध्यमांना हाताशी धरून समाजाला दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. त्यांना हे लक्षात येत नाही की त्यांचे हेतू मतलबी असल्याने समाजाने त्यांच्याकडे केव्हाच दुर्लक्ष केले आहे. एकीकडे समाजाचे दुर्लक्ष आणि दुसरीकडे व्यवस्थेचे इकडचे पान तिकडे हलत नाही, अशी परिस्थिती, या कचाट्यात ही मंडळी सापडली आहे. खरे म्हणजे काळ्या अर्थव्यवस्थेवर आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेऊन खूप पैसा कमावणे, याला काही पुरुषार्थाची गरज लागत नाही. त्यासाठी चलाखी म्हणजे मॅन्युप्युलेशनचे डोके असले की पुरेसे ठरते. व्यवस्थेने मॅन्युप्युलेशनची गरज लादली, हे समजण्यासारखे आहे, मात्र आयुष्यभर त्या डबक्याची सवय करून घेणे, हे निषेधार्ह आहे. देश आणि भारतीय समाजासमोर अर्थक्रांतीच्या माध्यमातून उत्तराची एक दिशा समोर असताना या वर्गाने (काही सन्माननीय अपवाद वगळता) जो थंडपणा दाखविला आहे, तो पळपुटेपणाचा कळस आहे.

राजकीय पक्ष, तज्ञ आणि उच्चभ्रू समाज जर असे तोंड लपवून जगत असेल तर येथील सर्वसामान्य माणूस आणि मध्यमवर्गानेच ते साहस दाखविले पाहिजे. आनंदाची बाब म्हणजे हे दोन समूह फार वेगाने अर्थक्रांतीच्या माध्यमातून समृद्ध भारत आणि जीवनाचे स्वप्न पाहू लागले आहेत. सोशल मीडियामध्ये अर्थक्रांतीचे प्रस्ताव आणि अर्थक्रांतीनंतरच्या भारताचे चित्र वेगाने फिरु लागले आहे. तरुण त्यासाठी स्वयंस्फूर्तीने आपला वेळ आणि पैसा खर्च करत आहेत. गेल्या दोन महिन्यात अर्थक्रांतीवरील व्याख्याने वाढली आहेत. अर्थपूर्णच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. अर्थक्रांतीच्या वेबसाईटवर देशभरातून हिट्स पडत आहेत. अर्थक्रांतीचे अॅपही वेगाने वेब जगतात फिरू लागले आहे. अर्थक्रांतीचे हे अपरिहार्य ऑपरेशन समजून घेण्यासाठी प्रत्येक सुजन नागरिक प्रयत्नशील आहे. देशाच्या आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडविण्यासाठी या मॉडेलशिवाय पर्याय नाही, हे सर्वच विचारी नागरिकांना पटू लागले आहे. देशासमोरील आजचे गंभीर प्रश्न सोडविण्याचा मनसुबा जाहीर करणारी मंडळी या मॉडेलसंबंधी मूग गिळून बसली तर ही विचारी माणसे पुढील काळात शांत बसणार नाहीत, असे वातावरण तयार होऊ लागले आहे.

तीन वर्षांपूर्वी ज्या काही शंकांनी मनात घर केले होते, त्याही गेल्या तीन महिन्यातील ऐतिहासिक म्हणता येतील अशा घडामोडींमुळे दूर झाल्या आहेत. आर्थिक साक्षरता आणि अर्थक्रांतीविषयीच्या अशा कोणत्याही शंका आपल्याही मनात राहू नये, यासाठीच्या प्रयत्नांना म्हणूनच यापुढे गती मिळणार आहे.

(अर्थपूर्ण मासिकात प्रसिद्ध झालेली भूमिका - मार्च २०१४ )

No comments:

Post a Comment