Wednesday, March 5, 2014

आता करा सुरक्षित आणि आनंदी बँकिंग!बँकिंग सेवांचा विस्तार न करणे म्हणजे काळ्या पैशांची डबकी आणखी मोठी होऊ देणे. रोखीच्या व्यवहारांद्वारे करबुडवेगिरीला प्रोत्साहन देणे. तसेच स्वाभिमानी जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या पारदर्शकतेला नकार देणे. या सर्व नकारांचे होकारांत रूपांतर करण्याचा खात्रीचा मार्ग आहे तो बँकिंग अतिशय सुरक्षित आणि आनंदी करणे. त्यासाठी आपल्या देशात विशेष प्रयत्न सुरु आहेत, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.


इंटरनेट बँकिंग आणि डेबिट कार्डने व्यवहार करण्याचा विचार मनात आला तेव्हा मी फार शंकित होतो. आपल्या खात्यातील पैसे कोणी परस्पर काढून घेतले तर, पासवर्डच आठवला नाही तर, कार्ड हरवले तर किंवा आपण एटीएममधून पैसे काढून गेलो आणि दुसऱ्या कोणी आपले खाते ऑपरेट केले तर...अशा अनेक शंका मनात येत होत्या. मात्र गेल्या पाच वर्षांत असे काहीही झाले नाही. उलट मी आता कोणत्याच रांगेत उभा राहत नाही. वीजबिल, फोनचे बिल, विमा, मुलांची फी तर इंटरनेट बँकिंगने भरतोच पण बसचे, रेल्वेचे, विमानाचे आणि हॉटेलचे बुकिंगही इंटरनेटनेच करतो. फक्त पासबुक आणि चेक भरण्यासाठी मला नाईलाजास्तव बँकेत जावे लागते.

मीच नाही, असे इंटरनेट बँकिंगचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. असे व्यवहार करणाऱ्या सर्वांच्याच मनात असे बँकिंग किती सुरक्षित आहे, अशी शंका एकेकाळी होती. त्यात भर म्हणजे हे तंत्र नवे असल्याने आपल्या समाजातील काही लबाड माणसांनी डल्ला मारला. कार्ड आणि पासवर्ड चोरून काहिंचे खाते रिकामे केले. त्याला माध्यमात मोठी प्रसिद्धी मिळाल्याने काहीकाळ घबराट झाली. पण आता हे तंत्र आत्मसात केलेल्या सर्वांना इंटरनेट बँकिंग खुपच सरावाचे झाले आहे. खरे म्हणजे आता त्यांना कोणी सांगितले की उद्यापासून बँकेत जाऊन सर्व व्यवहार करा, तर ते शक्य होणार नाही. रोख भरण्यासाठी आणि काढण्यासाठीच्या त्या रांगा, कामाच्या ताणामुळे वैतागलेले ते कर्मचारी आणि सारखे फॉर्म भरण्याची कटकट अगदी नकोशी वाटते.

ज्यांनी इंटरनेट बँकिंगचा आंनद अजून घेतला नाही आणि ज्यांना तिच्या सुरक्षिततेविषयी अजूनही शंका आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँकिंग कोडस् अँड स्टँडरडस् बोर्ड ऑफ इंडिया ही सुरक्षित आणि आनंदी बँकिंगसाठी काम करणारी संस्था आहे. तिने आतापर्यंतच्या तक्रारींचा विचार करून नवे नियम तयार केले असून ते गेल्या महिन्यापासून म्हणजे जानेवारी २०१४ पासून लागूही केले आहेत. इंटरनेट बँकिंग करणाऱ्याच्या मनात असलेल्या बहुतांश शंका दूर करण्याचा प्रयत्न या नियमांद्वारे करण्यात आला आहे. अशा व्यवहारांत फसवणूक झाल्यास सुरवातीस बँका हात झटकत होत्या, मात्र आता त्यांना तसे करता येणार नाही, हे महत्वाचे.

या बोर्डाने केलेले काही महत्वाचे नवे नियम असे १. बँक खात्यासंबंधीची गोपनीय माहिती जर बँकेकडून उघड झाल्यामुळे ग्राहकाचे नुकसान झाले असेल तर त्याची सर्व भरपाई संबन्धित बँकेला करावी लागेल. २. ग्राहकाच्या लेखी परवानगीशिवाय त्याचे खाते बँक अपग्रेड करू शकणार नाही. अपग्रेड केलेल्या खात्यात किमान शिल्लक ठेवण्यासारख्या अटी असतात आणि किमान शिल्लक नसल्याने बँक दंड करू शकते. याविषयीचे एसएमएसही बँकेला यापुढे पाठविता येणार नाहीत. ३. अनेक बँका लॉकर सुविधा देण्यासाठी विशिष्ट ठेव ठेवण्याची अट घालतात तसेच विमा खरेदी करण्याचा आग्रह धरतात. यापुढे बँकांना असे करता येणार नाही. ४. ज्येष्ठ नागरिक आणि आजारी ग्राहकांना घरपोच बँकसेवा दिली गेली पाहिजे, असेही एक कलम या नव्या नियमात आहे. मात्र त्याची बँकेला सक्ती करण्यात आलेली नाही. अर्थात नव्या बँका येत्या मार्च एप्रिलमध्ये जेव्हा येतील तेव्हा बँक क्षेत्रातील स्पर्धा एवढी वाढणार आहे की बँका स्वत:हून ही सेवा देतील, याची खात्री बाळगा. ५. बँकेकडून विशेषतः राष्ट्रीय बँकांकडून कर्ज हवे असेल तर त्या ग्राहकाचा क्रेडीट इतिहास पाहिला जातो. त्यानुसार त्याला किती कर्ज द्यायचे ते ठरते. मात्र हा इतिहास तयार करताना बँका जुन्या नोंदी संबंधित संस्थांना देतात, यापुढे मात्र त्यात बदल करून तो ताजाच असेल, याची काळजी घेतली जाणार आहे.

या सर्व बदलांचे स्वागत यासाठी केले पाहिजे की सुरक्षित आणि आनंदी बँकिंग ही आजच्या काळाची गरज आहे. ती करताना बदलाच्या सुरवातीच्या टप्प्यात भारतात तंत्रज्ञान आणि अकुशल मनुष्यबळाच्या काही मर्यादा होत्या. मात्र गेले किमान १० वर्षे हे तंत्रज्ञान अधिक निर्दोष करण्याचे प्रयत्न झाले आणि ऑनलाईन व्यवहारांची विश्वासार्हता वाढीस लागली. भारतात आज कसेबसे ४२ ते ४५ टक्के नागरिक बँकिंग करतात. ही लाजीरवाणी टक्केवारी घेऊन बँकिंगचा विस्तार आपण करू शकणार नाही. बँकिंग सेवांचा विस्तार न करणे म्हणजे काळ्या पैशांची डबकी आणखी मोठी होऊ देणे. रोखीच्या व्यवहारांद्वारे करबुडवेगिरीला प्रोत्साहन देणे. तसेच स्वाभिमानी जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या पारदर्शकतेला नकार देणे. या सर्व नकारांचे होकारांत रूपांतर करण्याचा खात्रीचा मार्ग आहे तो बँकिंग अतिशय सुरक्षित आणि आनंदी करणे. त्यासाठी आपल्या देशात विशेष प्रयत्न सुरु आहेत, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.