Wednesday, May 23, 2012

पाण्याचा प्रश्न संपला, पैशांचा प्रश्न मिटला !



मानसिक सुरक्षितता प्रस्थापित केली की पाण्याच्या आणि पैशाच्या साठ्याला आळा बसतो, हे सूत्र ज्यादिवशी समाजाला कळेल त्यादिवशी पाण्याचा प्रश्न संपला, पैशांचा प्रश्न मिटला, असे म्हणण्याची संधी आपल्याला मिळेल आणि सर्वांना शांत, समृद्ध आणि प्रामाणिक आयुष्य जगता येईल. पाणी वाटपाचा असाच एक यशस्वी प्रयोग मलकापूरमध्ये सुरु आहे.





एरवी मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या पुण्याच्या काही भागात सध्या पाणी आले की नागरिकांना सर्व कामे बाजूला ठेवून पाणी भरावे लागते. कारण आता २४ तास नळाला पाणी येत नाही. पाणी भरून ठेवावे लागते. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात असे करण्याचे काही नवल नाही, मात्र पुण्यात काही जण ही परिस्थिती प्रथमच अनुभवत आहेत. त्याचे कारण असे आहे की पाणी कितीही मुबलक असले तरी लोकसंख्या वेगाने वाढत चालली आहे तसेच त्याची नासाडी करणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. म्हणूनच पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची मोहीम पुण्यामध्ये प्रथमच हाती घ्यावी लागली आहे. पुण्याचे उदाहरण यासाठी द्यायचे की जे पुण्यात होते ते नंतर महाराष्ट्रात होते, असे म्हटले जाते. पण पाण्याच्या नियोजनाबाबत उलटा प्रवास पुण्याला नुकताच करावा लागला. तो नवा मार्ग पुण्याने धरला तर आपल्या सर्वांचा पाण्याचा प्रश्न संपणार आहे आणि पैशाच्या नियोजानाचाही प्रश्न मिटणार आहे! तुम्ही म्हणाल, हे दोन प्रश्न संपल्यावर राहिलेच काय? पाण्याच्या आणि पैशाच्या प्राप्तीसाठी अख्खा देश, देशातील प्रत्येक माणूस आणि देशातील प्रतिभावान माणसे झटत असताना हे इतके सहज कसे शक्य आहे? प्रश्न बरोबर आहे, मात्र या प्रश्नाचे उत्तरही तेवढेच पक्के आहे. त्या उत्तराचीच चर्चा आज आपण करणार आहोत. तुम्हाला ते पटले नाही तर का पटले नाही, हे सांगण्याचा मोकळेपणा आपण दाखवावा, अशी विनंती आहे.
गेल्या आठवड्यात पुण्याचे नगरसेवक आणि अधिकारी सातारा जिल्ह्यातील मलकापूर या नगर परिषद असलेल्या गावी अभ्यास दौरा करून आले. आश्चर्य म्हणजे पाच वर्षांपूर्वी पाणीप्रश्नावरून परेशान असलेल्या या गावात आज २४ तास नळाला पाणी येते. ते कसे शक्य आहे, ते पाहण्यासाठी ही मंडळी गेली होती. मलकापूरच्या या प्रयोगाचे (चौकट पाहा) एकच कळीचे गुपित आहे. टंचाईच्या काळात माणूस स्वत:ला अतिशय असुरक्षित होतो आणि मिळेल तेवढे ओरबाडून घेतो. कारण ती वस्तू, सुविधा त्याला परत मिळण्याची खात्री नसते. आज महाराष्ट्रात पाण्याच्या टंचाईचे तेच झाले आहे. पाणी कमी उपलब्ध आहे, ही वस्तुस्थिती आहे, मात्र नियोजन केले तर ते सर्वांना पुरून उरू शकते. कोणत्याही गावात किंवा शहरात गेलात आणि तेथील पाणीप्रश्नाविषयी कोणाला विचारले तर त्याचे उत्तर ठरलेले असते. पाणी भरपूर आहे हो, मात्र त्याचे नियोजन नाही. त्याचे नियोजन कोण करणार, या प्रश्नाला मात्र कोणाकडेच उत्तर नसते. ते उत्तर मलकापूरने दिले आहे. पाण्याला आपण जीवन म्हणतो, कारण त्याशिवाय माणूस आणि सजीवसृष्टी जगूच शकत नाही. त्यामुळेच समान पाणीपुरवठा करण्याचे म्हणजे पाणी पुरविण्यातील भेदभाव काढून टाकण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. असे आदेश समाजातील धुरीणांनी जुमानले नाहीत, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. मात्र सार्वजनिक शहाणपण काय करू शकते, हे मलकापूरने दाखवून दिले आहे. सुरवातीला तेथील नागरिकांनाही हे तत्व मान्य नव्हते, मात्र बऱ्याच जनजागृतीनंतर ही योजना प्रत्यक्षात आली आणि मलकापूरच्या घराघरात २४ तास पाणी मिळू लागले. जीवनावश्यक पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महाराष्ट्रासाठी आज गरज आहे ती या शहाणपणाची. खरी पाणीटंचाई तेथेच आहे, जेथे पाण्याचा स्तोत्रच नाही, मात्र आज बहुतांश गावांमध्ये पाणी आहे, मात्र त्याचे नियोजन नाही. म्हणजे कृत्रिम टंचाई आहे.
आपण म्हणाल पाण्याचे ठीक आहे, मात्र येथे पैशाचा काय संबंध आहे? तो संबंध कसा आहे पाहा. आज भांडवल नाही म्हणून, पत नाही म्हणून देशातील कोट्यवधी नागरिक हलाखीचे आयुष्य जगत आहेत. वास्तविक आमच्या देशातील बँकिंग वाढले तर देशातील पैसा कमी व्याजदरात त्यांना वापरायला मिळेल. आज होते आहे ते असे: देशाची संपत्ती काही पटीत वाढूनही आमच्यातली असुरक्षितता वाढली आहे. त्यामुळे काळ्या पैशाच्या माध्यमातून पैसा ओरबाडला जातो आहे. तो इतका की बाकीच्यांच्या वाट्याला तो येतच नाही. त्यामुळे शेती, कारखाने, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याएवजी आम्ही सोन्याचांदीमध्ये गुंतवणूक करतो. पाणी भरपूर आहे, मात्र वितरण बिनसले तसेच संपत्ती भरपूर आहे मात्र ती बँक प्रणालीच्या माध्यमातून सर्वांना नवनिर्मिती करण्यासाठी उपलब्ध नाही. ती तिजोऱ्यामध्ये सडते आहे किंवा बडेजाव म्हणून शरीरावर मिरते आहे. पाण्याचे आणि पैशाचे हे सूत्र ज्यादिवशी समाजाला कळेल त्यादिवशी पाण्याचा प्रश्न संपला, पैशाचा प्रश्न मिटला, असे म्हणण्याची संधी मिळेल आणि सर्वांना शांत, समृद्ध आणि प्रामाणिक आयुष्य मिळेल. खरोखर कधी होईल असे?




२४ तास पाण्यासाठी काय केले मलकापूरने ?
-
- पाणी विकत घेण्याची मानसिक तयारी

- सर्व घरांमध्ये पाणीमीटरचा वापर, सर्व व्यवस्था स्वयंचलित (मीटरची किंमत ७,९०० रु., हा निधी लोकप्रतिनिधीच्या निधीतून मिळविला)
- ‘प्रेशर मॉनिटर’ मुळे पाण्याच्या प्रेशरचे नियंत्रण
- बेकायदा नळ कनेक्शन घेतल्यास यंत्रणेला माहिती मिळण्याची सोय.
- ‘अधिक पाणीवापर अधिक पाणी दर’ हे सूत्र सर्वांनी मान्य केले.
- २४ तास पाणी उपलब्ध असल्याने पाण्याचा वापर ३० टक्यांनी कमी झाल्याचे सिद्ध.
- मीटर पद्धतीमध्ये पाणी महाग होते, हा गैरसमज दूर. ७० टक्के गावकऱ्यांना दरमहा १०० रुपये बील.
- २४ तास पाण्यामुळे लोकसंख्या ५ वर्षांत २३४ टक्क्यांनी वाढली.

No comments:

Post a Comment