Saturday, May 5, 2012

अख्खा देश दळतो, (लबाड) जग पीठ खाते.....!

आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी माणसे काम करताहेत. आपले घरदार उभे राहण्यासाठी माणसे राबताहेत. आपला भविष्यकाळ सुरक्षित करून घेण्यासाठी माणसे नियमित बचत करताहेत. म्हणजे या देशामध्ये नवनिर्मिती होते आहे, नवे ग्राहक तयार होत आहेत आणि पोटाला चिमटा घेवून माणसे आपली पतही सांभाळत आहेत. अर्थशास्त्राच्या गणितात बसेल असेच हे सर्व काही आहे. मग बिघडले कोठे आहे? एवढे सगळे सुरळीत चालले असताना भारतीय समाज चिंतेत का आहे?, त्याला भविष्याची चिंता का सतावते आहे?, त्याला हतबल झाल्यासारखे का वाटते आहे? आपण ज्या बसमध्ये बसलो आहोत, ती आपल्याला ईप्सित स्थळापर्यंत पोचवेल की नाही, असे आताच का वाटायला लागले आहे? भारतीय समाजासमोर असे प्रश्न कधीच आले नाहीत, असे नाही, मात्र एकविसाव्या शतकातील पहिले दशक उलटल्यानंतरची या प्रश्नांची दाहकता पुर्वीपेक्षा कितीतरी अधिक आहे. म्हणूनच काहीतरी बदलले पाहिजे, यासाठीचा रेटा कधी नव्हे इतका तो आज वाढला आहे. खरे म्हणजे गेल्या २० वर्षांत आमचे दरडोई उत्पन्न वाढले. पायाभूत सुविधांमध्येही बरीच सुधारणा झाली. जीवनाचे कोणतेही क्षेत्र घ्या, त्याचा कधी नव्हे इतका विस्तार झाला. संधी वाढल्या. आमच्यातल्या अनेकांच्या हातात चांगला पैसा खेळायला लागला आहे. विकासाच्या कोणत्याही आधुनिक निकषांवर हा काळ तपासून पाहिला तर आम्ही कोठून कोठे आलो आहोत! जीवनातील आनंदाचा उपभोग कसा घ्यावा, असा प्रश्न आम्हाला पडत होता तेव्हा आम्ही ज्या पाश्चिमात्य समाजाकडे पाहत होतो, त्या समाजाची हुबेहुब नक्कल करण्यासही आम्ही अजिबात कमी पडलेलो नाही. तरीही काहीतरी बिघडले आहे, एवढे नक्की. वीस वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था जगाशी जोडल्यावर हे सर्व असे उद्भवेल, याची कल्पना धुरीणांना किती होती, हे माहीत नाही, मात्र या महाकाय देशातील नवनिर्मितीचा पैसा शोषून घेण्यासाठी त्याचा वापर होईल, याचा अंदाज त्यांनाही नसावा. परकीय भांडवलावर देशाला असे नाचावे लागेल, याचीही कदाचित कोणालाच कल्पना नसावी. आज आमच्या देशातील उलाढाल, उत्पादन, निर्यात नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असताना आमच्या देशात हक्काचे भांडवल तयार होत नाही. आमच्या देशातील आर्थिक संस्थांना देशी भांडवल परवडेनासे झाले आहे. म्हणून तर आमच्या देशातला काळा पैसा ज्या स्वीस बँकांमध्ये जातो, असे म्हटले जाते, त्या बँकांकडून कर्ज घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आहे. जग उद्योग – व्यवसायासाठी ६ टक्के किंवा त्यापेक्षा कमीच व्याजदरात भांडवल पुरवत असताना भारतीय नागरिक १५ टक्के आणि कधी कधी तर त्यापेक्षाही जास्त व्याजदराने भांडवल उभे करत आहेत. म्हणूनच ९ टक्के व्याजदराने भांडवल मिळते म्हटल्यावर स्वित्झर्लंडमधील बँकांत भारतीय संस्थांची रांग लागली आहे. जागतिकीकरणानंतर ज्या खुल्या स्पर्धेचा उदो उदो करण्यात आला होता , ती खुली स्पर्धा आज कोठे आहे? आज स्पर्धा तर भांडवलाची झाली आहे. ज्याच्याकडे भांडवल तो जेता, असा संदेश या दशकाने देवून टाकला आहे. आता तर हे भांडवलच भारतीयांचे शोषण करायला लागले आहे. भारतीयांचा अपमान करायला लागले आहे. गेल्या काही दिवसातील घटना अशा सांगतात की आम्ही स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत , असे अभिमानाने म्हणत असलो तरी भांडवलाने म्हणजे पैशाने आम्हाला गुलाम बनविले आहे. आमच्या घामाचा पैसा वेगवेगळ्या मार्गांनी देशाबाहेर चालला आहे. परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करता यावी, यासाठी पार्टीसिपटरी (पी-नोट्स) नोट्स चा चोरमार्ग असो, ‘मॉरिशस रुट’ च्या मार्गांनी होणारी करबुडवेगिरी असो नाहीतर स्वीस बँकांचा नंबरी खात्यांमध्ये गेलेला भारतीय पैसा असो... देशाबाहेर पैसा नेण्याचे हजार मार्ग तयार झाले आहेत. सर्वसामान्य भारतीय माणसाला पत्ता लागणार नाही , असे जणू भुयार खोदले गेले आहे आणि त्यातून भारतीय पैसा बाहेर धाडला जातो आहे. जाचक कररचनेमुळे म्हणा किंवा स्वार्थाच्या अतिरेकी वृत्तीमुळे म्हणा पण काल देशभक्त म्हणविणारे काही भारतीयही या पिंजऱ्यात ओढले जात आहेत. ज्या सुजलाम सुफलाम देशाच्या आणाभाका आपण घेतल्या त्याच देशाच्या पाठीत आपण खंजीर खुपसतो आहोत, याचे त्यांना काहीच कसे वाटेनासे झाले आहे? बरे, आमच्या देशात भांडवलच नसते तर समजण्यासारखे होते, मात्र ते आज असून नसल्यासारखे झाले आहे. जग ज्या सोन्याच्या किंमतीवर डोलते आहे, त्यातील किमान ११ टक्के सोने (२० हजार टन) आज आमच्याकडे पडून आहे. आमची एकूण उलाढाल आता जगात चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे. १२१ कोटी लोकसंख्येमुळे आमच्या अन्नपाण्याच्या वापराची दाखल जगाला घ्यावीच लागते आहे. आमच्या देशातील तरुणांनी जगभर आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. पण या सर्व कर्तुत्वातून जो पैसा तयार होतो आहे, तो आम्ही आमचे भांडवल म्हणून वापरू शकत नाही. कारण आमचा आमच्याच व्यवस्थेवर विश्वास नाही, भांडवल निर्माण करण्यासाठी जी एक गरज आहे, ती आमची बँकिंग प्रणाली अद्यापही सर्वसमावेशक नाही. आम्ही प्रामाणिकपणे जगू शकतो यावर आज आमचाच विश्वास राहिलेला नाही. त्याचमुळे आम्ही एकीकडे धर्म, संस्कृती आणि विचारसरण्यांचे झेंडे लावत फिरत असतानाच क्षणोक्षणी नागड्या व्यवहारांचे समर्थन करतो आहोत. आमच्यात फूट पडली आहे आणि तिचा फायदा जग घेते आहे. देश एका दुष्टचक्रात अडकला आहे. त्यातून सुटका करून घ्यायची असेल तर अखेर एका ऑपरेशनची म्हणजेच अर्थक्रांतीचीच गरज आहे.