Thursday, May 3, 2012

कौशिक बसू यांची मते वादग्रस्त का ठरली?

मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी भारताच्या आर्थिक सुधारणांविषयी अमेरिकेत व्यक्त केलेली मते वादग्रस्त का ठरली? अशा वादांमध्ये खरोखरच काही जनहित असते की तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेण्याचा व्यवहार ? सारे जगच इतके व्यवहारी बनले तर विश्वास कोणावर ठेवायचा ?
भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू हे गेल्या आठवड्यात खरेतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या बैठकांसाठी अमेरिकेला गेले होते, मात्र कार्नेजी इंडोवमेंड फॉर इंटरनॅशनल पिस नावाच्या वॉशिंग्टन येथील थिंकटँकसमोर व्याख्यानासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले आणि त्यांनी ते मान्य केले. भविष्यात होऊ घातलेल्या आर्थिक महासत्त्तेच्या सल्लगाराच्या मनात नेमके काय विचार आहेत, हे या थिंकटँकला जाणून घ्यायचे असावे. भारतातील सध्याच्या आर्थिक परिस्थतीविषयी ते व्याख्यानात बोलले आणि भारतात त्यावरून वादंग माजले. आगामी २०१४ पर्यंत भारतात मोठ्या आथिक सुधारणा होण्याची शक्यता नाही. २०१४ ला लोकसभा निवडणुका होतील आणि त्यातून एका पक्षाच्या हाती सत्ता येईल (बसूंच्या तोंडात साखर पडो) आणि मग आर्थिक सुधारणांची लाटच भारतात येईल, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले. २०१५ नंतर भारताच्या आर्थिक विकासाला कोणी रोखू शकणार नाही, असेही बसू यांनी या थिंकटँकला सांगून टाकले. भारतात सध्या उघडकीस येणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे, आघाडी सरकारच्या मर्यादा आणि पायाभूत सुविधा पुरविण्यात भारताला आलेले अपयश, यामुळे भारतातील आर्थिक विकासाची गती कमी झाल्याचे मत बसू यांनी व्यक्त केले. श्री. बसू यांच्या विधानांवरून वाद व्हावा, असे खरेतर काहीच घडलेले नाही. कारण आघाडी सरकारमुळे अनेक निर्णय सरकार घेवू शकत नाही, ही तर वस्तुस्थितीच आहे. ती त्यांनी अमेरिकेत जाऊन सांगितली एवढेच. त्याचा परिणाम असा होऊ शकतो की अमेरिकेतील जे गुंतवणूकदार डॉलरच्या थैल्या घेवून ‘पैसे पिकविणाऱ्या’ देशांच्या शोधात आहेत, त्या यादीत भारताचे नाव खाली जाऊ शकते. म्हणजे पैसा गुंतविण्यासाठी भारत सध्या योग्य नाही, असा संदेश बसू यांनी नकळत दिल्यासारखे झाले. इकडे भारत सरकारही नाराज झाले कारण परकीय गुंतवणुकीचा वेग आटला तर आमची अर्थव्यवस्था कशी पळणार, ही चिंता सरकारला सतावते आहे. घरातल्या अडचणी झाकून ठेवून परकीयांनी या देशात पैसा असाच गुंतवत राहावा, असा सरकारचा जो प्रयत्न आहे, त्यावर बसू यांनी जणू पाणीच टाकले. (खरे म्हणजे हल्ली कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेतील गडबड जगापासून लपून राहू शकते, यावर कोण विश्वास ठेवील?) देशाचा आर्थिक विकास थांबला आहे, सरकार आर्थिक सुधारणा करण्यात कमी पडते आहे, असा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला बसू यांच्या विधानांमुळे उकळ्या फुटल्या तर भारतीय अर्थव्यवस्था जगाला पूर्णपणे खुली केली नाही म्हणूनच २००८ च्या मंदीतून आणि आजच्या आर्थिक पेचप्रसंगातून भारत वाचला आहे, असे कम्युनिस्ट नेत्यांचे म्हणणे असल्यामुळे त्यांनाही बसू यांची विधाने सरकारवर तोफ डागण्यास उपयोगी पडली. उदारीकरण म्हणून जे बदल करण्यात येत आहेत, ते ‘शायनिंग’ नसून ‘सफरिंग’ आहेत, असे कम्युनिस्टांचे म्हणणे आहे. सरकारमधला माणूसच असे बोलतो म्हटल्यावर वाद होणे हे अपरिहार्य आहे. त्यामुळेच बसू यांना आपल्याला नेमके काय म्हणायचे होते, याचा खुलासा लगेचच करावा लागला. लंडन स्कूल ऑंफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलेले आणि अमेरिकेच्या कार्नील विद्यापीठात प्राध्यापकी केलेले बसू अडीच वर्षे या पदावर आहेत. नव्या सल्लागाराच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली असताना आणि कार्नेजी थिंकटँकला भारतात लवकरच शाखा सुरु करावयाची असतानाच हा वाद झाला, हा योगायोग समजायचा की कट, हे ठरविणे अवघड असले तरी एक पाल मनात चुकचुकते, ती म्हणजे थिंकटँक म्हणून काम करणारी माणसे नेमके कोणासाठी काम करत असतात ? ती खरोखरच जगाचे, त्या त्या देशाचे, त्या देशातील जनतेचे हित पाहात असतात की एखाद्या गटाचे? ही शंका येण्याचे कारण म्हणजे सर्व तज्ञ, हुशार आणि मोठ्या पदावरील माणसांनी जगाच्या नाहीतरी त्या त्या देशाचे हित पाहिले असते तरी आज जगात असुरक्षितता निर्माण झाली नसती. जगातील साडेसहाशे कोटी माणसांनी व्यवस्थेवर विश्वास ठेवला असता. आज तसे होताना दिसत नाही. खरा मुद्दा असा आहे की हितसंबंध या टोकाला गेले आहेत की जगात आज कोणत्याच गोष्टीविषयी एकमत होऊ शकत नाही. न्यूयॉर्कपासून बांगलादेशाच्या गल्लीपर्यंतची अशी हजारो उदाहारणे देता येतील. सर्वांचे हित समोर ठेवून निर्णय घेतला असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा बहुतांश वेळेस गटातटाचे हित समोर ठेवूनच तो निर्णय घेतला गेला आहे, असे अंतिमत: उघडकीस येते. ज्यांना धुरीण म्हटले जाते, तीच माणसे छोटे छोटे हितसंबंध सांभाळताना दिसतात तसेच त्यांची भूक भागतच नाही, हे लक्षात येते तेव्हा सर्वसामान्य जनता अस्वस्थ होते आणि माना मुरगाळून व्यवहार सांभायाचा असतो, अशी भाषा बोलायला लागते. त्यातून एका न संपणाऱ्या विसंगतीला आणि राक्षसी स्वार्थाला जन्म दिला जातो. मग बसू काय म्हणतात आणि ओबामा काय म्हणतात, हे फार महत्वाचे ठरत नाही. तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायची असते, हेच तत्व सर्वमान्य होऊ लागते. आपल्या मानवी जगाचे आज तसेच काही झाले आहे. नाहीतर इतक्या हुशार माणसांनी एकत्र येवून वाद घालण्याऐवजी जगाचे हित महत्वाचे मानले असते.