Sunday, April 22, 2012

श्रीमंत लंडनवासीय अस्वस्थ का आहेत ?

जगाला केवळ खेळाच्या माध्यमांतून मैत्रीच्या आणाभाका घेवून चालणार नाहीत. त्याला श्रीमंतीसोबतची जीवन जगतानाची खरीखुरी समृद्धीही द्यावी लागेल. ऑलिम्पिकच्या निमित्ताने लंडनच्या पोटात चाललेली कालवाकालव जगासमोर आली, हे बरेच झाले. कारण जगावर आर्थिक सत्ता गाजविणाऱ्या या शहरातील लोकही अर्थपूर्ण जीवन जगण्याचा शोधात आहेत, हेही जगासमोर आले. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर ११ वर्षांपुर्वी मी पाहिलेले ते दृश्य असे होते – भल्या सकाळी म्हणजे साधारण सहा वाजता आकाशात विमानांची रांग लागली होती आणि एकापाठोपाठ विमाने लँडिंग करत होती. एकाचवेळी क्षितीजावर किमान तीन विमाने दिसत होती आणि अगदी यांत्रिक वाटावे इतक्या वारंवारतेने ते घडत होते. (हे दृश्य आता पुण्याहून मुंबईला जाताना संध्याकाळी नवी मुबंईच्या पुढे बराच वेळ दिसते) आपण काय दररोज या प्रकारची विमान वाहतूक पाहात नाही, त्यामुळे साहजिकच आपल्याला त्याचे कुतूहल असते, त्या कुतूहलापोटी मी हिथ्रो विमानतळावरील या ट्रफिकविषयी माहिती विचारली, तेव्हा कळले की रात्री लंडनवासी नागरिकांना आवाजाचा त्रास होऊ नये, त्यांची झोप उडू नये म्हणून लंडनमध्ये सकाळनंतर विमाने उतरतील किंवा उड्डान करतील , असेच नियोजन करण्यात आले आहे. रात्री किंवा भल्या पहाटे विमाने उतरतात किंवा उड्डान करतात ती विकसनशील देशांच्या शहरांमध्ये ! ( हे असेच आहे ना, याची मला खात्री करून घ्यायची आहे) मुंबईच्या विमानतळावर पश्चिमेकडून येणारी किंवा तिकडे जाणारी बहुतांश विमाने मध्यरात्रीच असतात, ही मात्र वस्तुस्थिती आहे. या घटनेची आज आठवण होण्याचे कारण म्हणजे लंडनमध्ये सुरु असलेली ऑलिम्पिकची लगीनघाई आणि त्यामुळे लंडनवासीयांची अस्वस्थता ! ऑलिम्पिक १०० दिवसांवर आल्यामुळे लंडनमध्ये सध्या त्याचीच चर्चा सुरु असणे, हे अगदी साहजिकच आहे. मात्र ही चर्चा वेगळ्या प्रकारची आहे. ऑलिम्पिकच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करून चीनने जगाला तोंडात बोट घालायला लावले होते. चीनने जे भव्यदिव्य करून ठेवले आहे, त्याची फुटपट्टी वापरून त्यापेक्षा भव्य, त्यापेक्षा सुनियोजित ऑलिम्पिक भरवून दाखविणे हे आता पुढील संयोजकांना जणू आव्हानच ठरते आहे. पण ही भव्यतेची स्पर्ध्रा करताना प्राधान्यक्रमाचा कसा बळी दिला जातो किंवा मानवी समूह कसे असुरक्षित होत आहेत, हे लंडनमधील आजच्या अस्वस्थतेने जगासमोर आणले आहे. सुमारे ८० लाख लोकसंख्या असलेल्या या जागतिक आर्थिक केंद्रातील लोक तेथे होणाऱ्या ऑलिम्पिकमुळे खरे तर खुश असायला हवेत. एकतर युरोपचे नेतृत्व करू पाहणारे ब्रिटन आज आर्थिक संकटात सापडलेले आहे , त्यामुळे यानिमित्त होणाऱ्या आर्थिक उलाढालीचे व्यापारी वृत्तीच्या माणसांनी स्वागत करायला हवे. पण तसे झालेले नाही. लंडनवासीयांना भीती वाटते आहे की ऑलिम्पिकदरम्यान शहरात प्रचंड ट्राफिक जॅमला सामोरे जावे लागेल. याच दरम्यान दहशतवादी लंडनवर हल्ला करतील. आणि तेवढेच महत्वाचे म्हणजे एकीकडे आर्थिक संकटांची चर्चा सुरु असताना प्रचंड पैसा चुकीच्या कारणांसाठी वापरला जातो आहे. जगात आज इतके पैशीकरण् झाले आहे की पैसे मिळविण्याच्या स्पर्ध्रेत एकमेकांचा खिसा कापूनच कमाई होऊ शकते, असेच काही लोक मानायला लागले आहेत. याचा अर्थ असा की कोणाचे तरी नुकसान झाले तरी चालेल, मात्र माझा फायदाच झाला पाहिजे, असे आता पैशीकरणात बुडालेली मंडळी मानायला लागली आहे. लंडनमध्ये काय होते आहे, पाहा. टॅक्सी ड्रायव्हरना वाटते की आपल्याला पुरेसे काम मिळणार नाही, तर भुयारी रेल्वेवाल्यांना याकाळात हे धनुष्य कसे पेलावे, असा प्रश्न पडला आहे. प्रसिध्द हाईड पार्क या उद्यानात काही स्पर्धा होणार आहेत, पण तेथे जो गोंधळ माजेल त्यामुळे आमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईल, असा मुद्दा घेवून आजूबाजूचे रहिवासी न्यायालयात गेले आहेत. गुन्हेगारी वाढण्याच्या भीतीमुळे २७ जुलै ते १२ ऑगस्ट हे १५ दिवस रात्री ११ नंतर पब्ज बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे, त्यामुळेही श्रीमंत मंडळी अस्वस्थ झाली आहे. एका पाहणीनुसार सहा कोटी ब्रिटीशांपैकी १ कोटी लोकांना याकाळात ब्रिटन सोडून बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ( गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील पेठांमध्ये राहणारे नागरिक असेच मोठ्या संख्येने शहराबाहेर पडतात) गेल्या काही वर्षांत आर्थिक असंतुलनामुळे जगाला दहशतवादाने पछाडले आहे. त्याचा परिणाम म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जाणारा आणि मोठ्या समारंभामध्ये भाग घेणारा माणूस असुरक्षित झाला आहे. ऑलिम्पिकच्या दरम्यान ब्रिटनवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो काय, या प्रश्नाचे उत्तर कोणीच देऊ शकणार नाही, मात्र हल्ला होणारच नाही, असेही ठामपणे म्हणू शकत नाही. त्यामुळे थेम्स नदीत युद्धनौका आणून ठेवल्या जाणार आहेत. लंडनजवळच्या तळावर जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रे असणारी लढाऊ विमाने सज्ज ठेवली जाणार आहेत. याकाळात शहरात २३ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत आणि त्यातील १३ हजार लष्करी जवान असणार आहेत. ऑलिम्पिकसाठी होणारा प्रचंड खर्च हाही काही नागरिकांचा चिंतेचा विषय झाला आहे. या खर्चाला विरोध केला की जणू देशाच्या प्रगतीला विरोध केल्याचा आव आणला जातो, प्रत्यक्षात खेळांसाठी होणाऱ्या खर्चात किती गैरव्यवहार होऊ शकतो, याचा अनुभव राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळी भारताने घेतला आहे. या गैरव्यहारात ब्रिटनमधील एजन्सीज सहभागी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. तात्पर्य - जगाला केवळ खेळाच्या माध्यमांतून मैत्रीच्या आणाभाका घेवून चालणार नाहीत. त्याला श्रीमंतीसोबतची जीवन जगतानाची खरीखुरी समृद्धीही द्यावी लागेल. ऑलिम्पिकच्या निमित्ताने लंडनच्या पोटात चाललेली कालवाकालव जगासमोर आली, हे बरेच झाले. कारण जगावर आर्थिक सत्ता गाजविणाऱ्या या शहरातील लोकही अर्थपूर्ण जीवन जगण्याचा शोधात आहेत, हेही जगासमोर आले.