Sunday, December 18, 2011

आमच्या देशातील पळपुटे अब्जाधीश


सध्याचा पेच हे देशासमोरील एक आव्हान आहे, त्याचा मुकाबला रोजगार आणि उत्पादन वाढवून होऊ शकतो. आपले नफ्याचे प्रमाण थोडे कमी झाले तरी चालेल मात्र भारतीयांची या कसोटीच्या काळात आम्ही साथ सोडणार नाही, असा एकमुखी आवाज अब्जाधीशांच्या तोंडातून यायला हवा होता. मात्र ज्या मातृभूमीने त्यांच्या संपत्तीचे ढीग मोठे केले, त्या भारतातल्या परिस्थितीविषयी टोकाची विधाने करून 121 कोटी जनतेच्या जगण्याचा ते अपमान तर करत आहेतच पण स्वतःचा पळपुटेपणाही सिद्ध करत आहेत.

सध्या जगाच्या आर्थिक क्षेत्रात आणि त्यामुळेच समाजात नकारात्मकता ठासून भरलेली आहे. गडबड आहे ती पैशांच्या व्यवहारांत आणि जीवंत माणसे त्या कागदाच्या कपच्यांच्या कोंडीत सापडली आहेत. ही चेंगराचेंगरी कोठून सुरू झाली, याचा कोणालाच पत्ता नाही, मात्र गर्दीत असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येकाला त्याची झळ बसते आहे. सामान्य माणसे जितकी परेशान आहेत तितकेच कोट्यधीशही आणि आश्चर्य म्हणजे अब्जाधीशही. हे असे अघटित का होते आहे, हे समजून घेतले पाहिजे.

अकरा वर्षांपूर्वी मला युरोप पाहण्याची संधी मिळाली तेव्हा तेथील सार्वजनिक सेवांच्या नीटनीटक्या व्यवस्थेने मी आश्चर्यचकित झालो होतो. जर्मनीत एका रेल्वे स्टेशनवर एक लिफ्ट दिसली तेव्हा मी चौकशी केली की येथे लिफ्ट कशासाठी? मिळालेल्या उत्तराने मी त्या व्यवस्थेच्या प्रेमात पडलो. ते उत्तर असे होतेः या स्टेशनवर धडधाकट माणसांसोबत म्हातारी, अपंग-अंध, आजारी माणसेही येतात. ते धडधाकटांशी स्पर्धा करू शकत नाहीत. खास त्यांच्यासाठी ही व्यवस्था केली आहे. फलाटावरून गाडीत बसताना त्यांना त्रास होउ नये म्हणून त्यांच्यासाठीच्या जागा डब्याच्या दाराजवळच आरक्षित करण्यात आल्या आहेत! हे उत्तर त्या जर्मन माणसाने मला दिले तेव्हा साहजिकच डोळ्यासमोर भारतातील कोणत्याही बसस्थानक, रेल्वे स्टेशन किंवा अगदी विमानतळावरील दृश्य नजरेसमोर तराळून गेले. त्या दृश्यात अपंग, अंध, वयोवृद्ध आणि महिल्या धडधाकटांच्या रेटारेटीत आपले स्थान शोधताना मला दिसले आणि जर्मनीच्या त्या स्टेशनासारखा विचार आपण कधी करणार, असा एक प्रश्न मनात येवून गेला. (आपला देश इतका निर्दय नाही, मात्र त्यावेळी मनात ही भावना आली, हे खरेच) सार्वजनिक जीवनात भेदभावाविना माणसाची प्रतिष्ठा जपण्याचे युरोपियनांचे प्रयत्न चांगलेच आहेत, मात्र त्यांचे ते आयुष्य शंभर टक्के खरे नाही, हेही नंतर अनेक प्रसंगांत पाहायला मिळाले.

तोच युरोप आज स्वयंनिर्मित आर्थिक संकटांनी घेरला गेला आहे. चंगळवादाच्या अतिरेकाचा फटका त्यांना तर बसला पण सर्व जगालाच त्यांनी त्यात ओढून घेतले. एखादा वणवा पेटावा आणि कोणालाच काही सुचू नये, अशी आजच्या जगाची अवस्था झाली आहे. खरे तर काय गडबड झाली आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. जगातील काही माणसे गडगंज श्रीमंत झाली आहेत आणि जगातील बहुतांश सरकारे दरिद्रयी झाली आहेत. जगातला आजचा पेच आहे तो एवढाच. जगातल्या हुशार आणि भांडवल खेचणार्‍या माणसांनी आपल्या ताटावर इतके वाढून घेतले आहे की बाकीच्यांना पोट भरण्याचीही संधी ठेवलेली नाही. ज्यांचे पोट तुडुंब भरले आहे, त्यांना आता मुक्त वातावरणात मौजमजा करायची आहे, मात्र सरकारे संकटात सापडल्यामुळे ती करता येत नाहीए. त्यामुळे जगात या माणसांची चीडचीड चालली आहे.

जगाची प्रमुख बाजारपेठ झालेला भारत या चेंगराचेंगरीत सापडणे, हे जागतिकरणामुळे अपरिहार्यच आहे. त्यामुळे भारतातही ही नकारात्मता पोचली आहे. अर्थव्यवहाराचे आकडे माणसांचे आयुष्य काळवंडून टाकत आहेत. त्यांना भविष्यातील असुरक्षिततेची भीती दाखवीत आहेत. आपल्या मुलाबाळांचे कसे होईल, याची दररोज चिंता करायला लाबत आहेत. सामान्य माणसाला हे व्यवहार लक्षात येत नाहीत, म्हणून त्यांची चिंता समजण्यासारखी आहे, मात्र परवाच्या बातमीने सर्बांनाच सखेद आश्चर्याचा धक्का दिला आहे.

आपल्या देशातील काही उद्योगपतींनी एका तालासुरात भारतातल्या सध्याच्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करून आपल्या उद्योगांचा विस्तार युरोप अमेरिकेत करण्याचे तसेच राहायलासुद्धा तेथेच जाण्याचे मनसुबे जाहीर केले आहेत. (लंडनमध्ये अनेकांनी घरेही घेवून ठेवली आहेत.) भारतातील सरकारी व्यवस्था सध्याच्या पेचप्रसंगावर मात करण्यासाठी त्यांच्या परीने झटत असताना आम्हाला पायघड्या घातल्या नाहीत, तर आम्ही परदेशात गुंतवणूक करू, असा इशारा या उद्योगपतींनी सरकारला दिला आहे.

एक गोष्ट निश्वित आहे की गोर्‍या कातडीच्या माणसांना आमच्यापेक्षा जास्त कळते, म्हणून त्यांच्या जगण्याची नक्कल करण्यातच धन्यता मानून आम्ही आमची आयुष्य नासवून घेतली आहेत. प्रगती कशी करायची आणि ती आकड्यातच कशी मोजायची, हा मंत्र त्यांनी आम्हाला दिला तसेच सार्वजनिक आयुष्यात चांगले कसे जगता येईल, याचे धडे त्यांनीच आम्हाला दिले, हे खरेच आहे. मात्र आज त्यांनाही हा पेच कसा सोडवावा, हे सुचत नाहीए, हे जगजाहीर आहे. असे असताना या देशातच फार मोठा बिघाड झाल्याचा कांगावा केला जातो आहे, हे निश्वितच निषेधार्ह आहे. वास्तविक आज जी परिस्थिती उद्भवली आहे, त्याला सामान्य माणूस आणि सरकारातल्या चारदोन माणसांपेक्षा सरकारवर धनसत्तेचे नियंत्रण करणारी धनाढ्य माणसेच जबाबदार आहेत. सध्याचा पेच हे देशासमोरील एक आव्हान आहे, त्याचा मुकाबला रोजगार आणि उत्पादन वाढवून होऊ शकतो. आपले नफ्याचे प्रमाण थोडे कमी झाले तरी चालेल मात्र भारतीयांची या कसोटीच्या काळात आम्ही साथ सोडणार नाही, असा एकमुखी आवाज त्यांच्या तोंडातून यायला हवा होता. मात्र ज्या मातृभूमीने त्यांच्या संपत्तीचे ढीग मोठे केले, त्या भारतातल्या परिस्थितीविषयी टोकाची विधाने करून 121 कोटी जनतेच्या जगण्याचा ते अपमान तर करत आहेतच पण स्वतःचा पळपुटेपणाही सिद्ध करत आहेत.

रेट कार्पेटन मिळाल्याने अब्जाधीश काय करत आहेत?

- लंडन आणि लॉस एंजलिस येथे 10 लाख डॉलरपेक्षा महागडया घरांची खरेदी

- भारताबाहेरील व्यवसायवृद्धीतून आपल्या उद्योगाला 50 टक्के उत्पन्न मिळविण्याची तयारी

- वैयक्तिक सुरक्षितता आणि प्रायव्हसीची खात्री असलेल्या लंडन आणि सिंगापूर येथे कार्यालयांची स्थापना

- गैरव्यवहारांचे आरोप असलेल्या मालक आणि अधिकार्‍यांना विशेष वागणुकीसाठी सरकारवर दबाव