Sunday, October 16, 2011

घाम गाळा, रक्त आटवा आणि सट्टा खेळा!


अमेरिकेत हल्ली विनोदाने असे म्हटले जाते की अर्थशास्राचा आणि समाजाचा संबंध आहे, हे मान्य करणारे गेल्या 25 वर्षांतील एखादे संशोधन शोधायचेच झाले तर एटीएम मशीनचेच देता येईल. नाहीतर तथाकथित अर्थतज्ञांनी त्यांची सर्व बुद्धी लोकांनी घाम गाळून, रक्त आटवून कमावलेला पैसा सट्टाबाजारात वापरला जाईल, यासाठीच खर्च केली आहे. बरे झाले त्याविषयीचा उद्रेक अमेरिकेच्या रस्त्यांवरच सुरू झाला. हा उद्रेक थांबवायचा असेल तर जगात संपत्ती वाटपात आमूलाग्र बदलाशिवाय पर्याय नाही.

जगाची विभागणी आता गरीब आणि श्रीमंत देश, पूर्व आणि पश्चिमेकडील देश किंवा अविकसित किंवा विकसित देश अशी नसून, ती श्रीमंत आणि गरीब देशातील श्रीमंत आणि आणि श्रीमंत आणि गरीब देशातील गरीब लोक या दोनच गटात झाली आहे, हे किती खरे आहे, हे अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ या आंदोलनामुळे अधिक स्पष्ट झाले आहे. 21 सप्टेबरपासून अमेरिकेतल्या किमान 200 शहरांत सुरू झालेले हे आंदोलन किती दिवस चालेल्, हे आंदोलनकर्त्यांनीही स्पष्ट केलेले नाही. मात्र भांडवलशाहीची राजधानी असलेल्या अमेरिकेत या प्रकारचे आंदोलन होवू शकते, हे पाहून सारे जग खडबडून जागे झाले पाहिजे. इजिप्तमध्ये सत्तांतर आणि लोकशाहीसाठी झालेले किंवा भारतात भ्रष्टाचाराच्या विरोधात झालेल्या आंदोलनाशी या आंदोलनाची तुलना करायची की नाही, हे काळच ठरविल. पण ज्या अमेरिकेने जगावर आर्थिक सत्ता गाजविली, त्याच अमेरिकेत 2008 च्या मंदीनंतर अन्नछत्र चालवावी लागली आणि भांडवलशाहीत सर्वकाही आलबेल नाही, याची आठवण जगाला करून दिली आहे.

अमेरिकेतील 2010 ची आकडेवारी असे सांगते की तेथील वरच्या 20 टक्के अतिश्रीमंतांकडे 49.4 टक्के राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा आहे, तर तेथील दारिद्रयरेषेखाली राहणार्‍या 15 टक्के गरीबांकडे फक्त 3.4 टक्के वाटा आहे. गेल्या काही दशकांमध्ये जगातच विषमता प्रचंड वाढली असून अमेरिकेतही ती वेगाने वाढत् असून त्यात गरीब आणि मध्यमवर्गाची कोंडी होते आहे. वाढती चलनवाढ आणि सरकार सामाजिक सुरक्षिततेवरील खर्च कमी करत असल्यामुळे ही शर्यत या वर्गाला दररोज पिळून काढते आहे. त्याचाच परिपाक म्हणजे ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ हे आंदोलन.

‘वॉल स्ट्रीट’वर शेअर बाजार आणि प्रचंड आर्थिक व्यवहार चालतात, हे आपण जाणतो. हे सर्वच व्यवहार म्हणजे सट्टेबाजी असते, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल, मात्र त्यात सट्टेबाजीचा भरणा अधिक असतो, हे अगदी खरे आहे. याचा अर्थ असा की काही लोक प्रत्यक्ष काम काहीच करत नाहीत. फक्त पैशांशी खेळत बसतात. बाजार खालीवर करून नफा कमवतात. जगाच्या आर्थिक व्यवहारांना सट्टयाचे रूप द्यायचे आणि नफ्याची फळे सतत तोडत राहायची, एवढाच उद्योग. त्याचे अमेरिकेत आणि जगभर परिणाम होतात, कारण आपण ज्या आर्थिक संस्था आणि बँकांवर विश्वास ठेवतो, त्या संस्था या सट्ट्यांमध्ये भाग घेतात. त्याचा परिणाम म्हणूनच अमेरिकेत बँका दिवाळखोरीत निघाल्या आणि त्याचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम होऊन 80 लाख लोकांना त्यांचा काहीही दोष नसताना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. कोट्यवधी नागरिकांच्या जीवनाशी खेळ करणारी ही सट्टेबाजी थांबवा, अशी या आंदोलकांची मागणी आहे. या आर्थिक संस्थांनी केलेल्या उतमातामुळे त्या कोसळल्या असताना त्यांना सरकारने मदत केली. त्यामुळे सरकारकडील सामाजिक सुरक्षिततेसाठीचा निधी आटला आणि बेरोजगार आणि गरीबांचे जीवन खड्तर झाले, असेही त्यांचे म्हणणे आहे.

शेअर बाजार, कमोडिटी मार्केट, हेज फंड असे जे मोजक्या लोकांचे आर्थिक कमाईचे मार्ग आहेत, ते जणू आपण खाणींतून पैसा निर्माण करतो, अशा पद्धतीने त्याकडे पाहात आहेत. मात्र आता या सट्टेबाजीचा आणि आपला जवळचा संबंध आहे, हे अमेरिकेतल्या अधिकाधिक लोकांना लक्षात येवू लागले आहे. संगणक आणि इंटरनेटसारख्या आधुनिक सुविधांनी जग जवळ आणण्याचे आणि पारदर्शकता वाढविण्याच्या कामी मोठा हातभार लावला असला तरी तांत्रिक क्लृप्त्या करून अब्जावधी पैसा खोर्‍याने ओढणेही त्यामुळेच शक्य झाले आहे, जे जगाला पुन्हा पुन्हा आर्थिक संकटात ढ्कलणार आहे, याचे भान ठेवावेच लागणार आहे. अशा प्रकारच्या क्लृप्त्या करून 2010 मध्ये काही हेज फंड मॅनेजरांनी एका तासाभरात 20 कोटी डॉलर( 960 कोटी रूपये) ची कमाई केली होती, अशी प्रत्यक्षात घडलेली उदाहरणे ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ चे आंदोलक सांगत आहेत.

जगातील सराकारांवर ही अर्थसत्ता कशी काम करायला लागली आहे, याची शेकडो उदाहरणे भारतासारख्या समाजवादी म्हणविल्या जाणार्‍या देशात आपण दररोज पाहात आहोत. मात्र अमेरिकेत पैशाच्या प्रभावाचा किती कडेलोट झाला आहे, हे पाहायला मिळते आहे. 1995 मध्ये तेथील 400 सर्वात श्रीमंत घराणी 30 टक्के प्राप्तिकर भरत होती. त्यांनी सरकारवर प्रभाव पाडून गेल्या 15 वर्षांत ही टक्केवारी 16 इतकी खाली आणली. त्यामुळे अमेरिकन सरकारने अतिश्रीमंतांवरील कर वाढवावा, असे जाहीर निवेदन वॉरेन बफेट यांना करावे लागले. श्रीमंतांवरील कर कमी करून समाजाला बेरोजगारी, वॉल स्ट्रीटवरील सट्टेबाजी आणि कर्जबाजारी सरकार असे परिणाम भोगावे लागले. (काल प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार अमेरिकन सरकारची 2011 ची तूट 1.3 ट्रीलीयन डॉलर इतकी प्रचंड झाली आहे.) सट्टेबाजीत पैसा कमावणार्‍यांना 15 टक्के आणि कष्ट करून कमावणार्‍यांना 35 टक्के असा उलटा न्याय सध्या अमेरिकेत सुरू आहे. हे महत्वाचे यासाठी आहे की त्याचे परिणाम जग भोगते आहे.

अमेरिकेत हल्ली विनोदाने असे म्हटले जाते की अर्थशास्राचा आणि समाजाचा संबंध आहे, हे मान्य करणारे गेल्या 25 वर्षांतील एखादे संशोधन शोधायचेच झाले तर एटीएम मशीनचेच देता येईल. नाहीतर तथाकथित अर्थतज्ञांनी त्यांची सर्व बुद्धी लोकांनी घाम गाळून कमावलेला पैसा सट्टाबाजारात वापरला जाईल, यासाठीच खर्च केली आहे. बरे झाले त्याविषयीचा उद्रेक अमेरिकेच्या रस्त्यांवरच सुरू झाला. हा उद्रेक थांबवायचा असेल तर जगात संपत्ती वाटपात आमूलाग्र बदलाशिवाय पर्याय नाही.

1 comment:

  1. योग्य माहिती करिता आभारी...

    ReplyDelete