Monday, July 4, 2011

महाराष्ट्राच्या माळरानांवर वीज ‘पिकणार’ !



तेलावरून युद्ध होणार, तेलाचा ताबा मिळविण्यासाठी सर्व संघर्ष चालले आहेत, असे म्हणता म्हणता असेच एखादे संशोधन ऊर्जाक्षेत्राची दिशाच बदलून टाकेल आणि उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळयातही ऊन पडणार्‍या भारतात आणि त्यातही महाराष्ट्रातल्या उजाड माळरानांवर वीज ‘पिकायला’ लागेल !

माउंट आबू येथील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयात साधारण आठ वर्षांपूर्वी माध्यमांसंबंधीच्या एका कार्यक्रमांसाठी मला जाण्याची संधी मिळाली होती. तेथील अध्यात्मिक वातावरण, हवामान, सुंदर इमारती, बागा आणि एकंतर व्यवस्थेने भारावून जायला होते. त्यासोबत माझ्या लक्षात राहिले ते तेथील प्रचंड असे सोलर पॅनेल्स आणि त्यावर होणार पाच हजार लोकांचा स्वयंपाक. सुरवातीला विश्वास बसत नव्हता, मात्र प्रत्यक्ष सौरउर्जा किंवा सुर्याच्या शक्तीवर पेटलेल्या भट्ट्या पाहिल्यावर पर्यायच राहिला नाही. तेव्हा मनात विचार चमकून गेलेला मला आठवतो, की सौरशक्तीवर जर एवढे काही होऊ शकते तर आपल्याकडे ती किती मुबलक आहे आणि आपण ती सर्रास सगळीकडे का वापरत नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधताना लक्षात आले की सूर्यप्रकाश अजिबात कमी नाही, मात्र त्यापासून प्रत्यक्ष उर्जा निर्माण करण्याचे तंत्र अद्याप माणसाला परवडत नाही तसेच सौरऊर्जेचे तंत्रज्ञान अद्याप तेवढे विकसित झालेले नाही. परवा जाहीर झालेल्या यासंबंधीच्या माहितीची म्हणूनच मी प्रतिक्षा करत होतो. ती माहिती आपल्याला सांगितली तर आपल्यालाही आनंद होईल, अशी खात्री आहे.
पहिली माहिती आपल्या देशाविषयीची आणि त्यातही महाराष्ट्राविषयीची आहे. जगातील सर्व ऊर्जेचा स्रोत हा अंतिमतः सूर्य आहे, हे आपण सर्वजण जाणतोच. त्यामुळे थेट सूर्यप्रकाशात किती शक्ती असू शकते, याची कल्पना आपण सहजच करू शकतो. हा जो सूर्यप्रकाश आहे, तो आपल्या देशात मुबलक उपलब्ध आहे, आणि त्यातही महाराष्ट्रात तो सर्वाधिक काळ उपलब्ध असतो, अशी माहिती इंडियन इन्सिट्यूट ऑफ सायन्स, बंगरूळूने जाहीर केली आहे. महाराष्ट्रातल्या तब्बल 58 टक्के भूभागावर असा सूर्यप्रकाश जवळपास वर्षभर उपलब्ध आहे की त्यावर मोठमोठे व्यावसायिक सोलर प्लँटस टाकता येतील. महाराष्ट्रात 1,718 हेक्टर जमीन सध्या पडित आहे, जी सौरउर्जा प्रकल्पांसाठी वापरली जावू शकते. अर्थात अशीच जमीन गुजरात( 2,595 हे.), राजस्थान(2295 हे.) आणि आंध्रप्रदेश (2,056 हे.) या राज्यांतही आहे. जानेवारी 2010 मध्ये भारताने ‘राष्ट्रीय सौर मिशन’ ची सुरवात केली असून 2022 पर्यंत म्हणजे आगामी 10 वर्षांत 2000 मेगावॅट सौरशक्तीचा थेट वापर व्हावा तर 22000 मॅगावॅटचा वापर ग्रीडमार्फत व्हावा, असे उद्दीष्ट या मिशनने घेतले आहे. ही उद्दीष्टपूर्ती करताना ‘द्गडाधोंड्याचा राकट देश’ म्हणजे महाराष्ट्र फार मोलाची कामगिरी बजावणार, अशी ही आनंदाची पहिली बातमी आहे.

पुण्यात मगरपट्टा नावाची अत्याधुनिक वसाहत झाली, तेव्हाही या सौरशक्तीचा ‘चमत्कार’ पाहायला मिळाला. सध्या या वसाहतीत सौरशक्तीवर दररोज 10 लाख लिटर पाणी गरम होते! टाऊनशिपचाच विचार करायचा तर हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. पाणी गरम करण्यासाठी जगभर किती शक्ती वापरली जाते, याचा आकडा मिळणे अवघड आहे, मात्र याकामी सौरशक्ती हा उत्तम आणि पर्यावरणाला पूरक असा पर्याय समोर आला आहे. आता जगाची वाटचाल मोटारगाड्या, दिवे, इंजिनांसाठी सौरशक्ती वापरण्याच्या संशोधनाकडे सुरू आहे. त्यादिशेने चाललेले संशोधन दोन पाऊले पुढे सरकले तरी जगभर आनंद साजरा केला जातो. म्हणूनच सौरऊर्जेवर चाललेल्या गाडीच्या प्रयोगाचीही जगभर बातमी होते. पेट्रोलचे जगातील साठे किती काळ टिकेतील, असे हिशोब नव्याने केले जातात. भारतासारख्या मोटारींची बूम असलेल्या देशात पेट्रोल, डिझेल महाग झाले की इंधनासाठीचा वेगळा पर्याय जगाला सापडलाच पाहिजे, अशी चर्चा आपण करतो. दुसरी आनंदाची बातमी अशी आहे की सौरशक्तीचा प्रयोग असाच चार पाऊले पुढे गेला आहे.
उर्जाक्षेत्रात आघाडीवर असलेल्या ‘जनरल इलेक्ट्रीक’ म्हणजे ‘जीई’ या कंपनीने सौरउर्जेवर आता आपले लक्ष केंद्रित केले आहे. सौरउर्जेसाठी लागणारी जी फिल्म असते, तिची कार्यक्षमता वाढविण्यात यश आल्याने सौरऊर्जा रूपांतरीत करण्याचा खर्च कमी झाला आहे. सोलर पॅनलपासून वीजेत रुपांतर होण्याची क्षमता आता जेवढी आहे, त्यापेक्षा तब्बल तीन टक्के जास्त वीज निर्मिती करण्याची किमया या कंपनीने साध्य केली असून त्या मॉडेलचे उत्पादन अमेरिकेत 2013 साली सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘जीई’ सध्या सहा अब्ज डॉलर्सची पवनऊर्जा निर्माण करते. मात्र या यशामुळे कंपनी सौरऊर्जेची निर्मिती वाढवणार असल्याची ही बातमी आहे. अमेरिकेमध्ये सौरऊर्जेविषयीचे जे आराखडे आखले जात आहेत, त्यानुसार पुढील दशकात सौरऊर्जेचा वापर चौपट वाढणार आहे. अमेरिकेतील संशोधनाची ही वाटचाल पाहून नव्याने उद्यास येणारी महासत्ता चीनही जागी झाली असून अमेरिकेच्या पुढे एक पाऊल ठेवण्याचे त्याचे प्रयत्न सुरु आहेत. अर्थात अशा स्पर्धेशिवाय जगाला ज्या स्वच्छ उर्जेची गरज आहे, त्या सौरउर्जेचा सर्रास वापर सुरु होणार नाही. कदाचित असेही होईल, की जग ज्या अणुउर्जेला धास्तावले आहे, त्या अणुउर्जेची सद्दी येत्या दोनचार दशकात अशाच एखाद्या ‘ब्रेकथ्रू’नेच संपेल.
आनंद याचा आहे की तेलावरून युद्ध होणार, तेलाचा ताबा मिळविण्यासाठी सर्व संघर्ष चालले आहेत, असे म्हणता म्हणता असेच एखादे संशोधन ऊर्जाक्षेत्राची दिशाच बदलून टाकेल आणि उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळयातही ऊन पडणार्‍या भारतात आणि त्यातही महाराष्ट्रातल्या उजाड माळरानांवर वीज ‘पिकायला’ लागेल !

1 comment:

  1. गावोगावी बसवलेले सौरपथदिवे वर्षानुवर्षापासून बंद पडलेले पाहिले की, सरकार म्हणजे एकूणच समाज याबाबीकडे लक्ष देत नसल्याच जाववत. माळरानावरच नाही तर घराघरावर वीज पिकू शकते .

    ReplyDelete