Tuesday, May 31, 2011

नव्या वळणावरील मिलाप

पुण्याकडून मराठवाड्यात प्रवेश करताना आता नव्या पुलावरून कायगावात यावे लागते. किमान 50 वर्षांचा जुना पूल कमकुवत होऊन बंद पड्ला. मराठवाडा महाराष्ट्रात बिनशर्त सामील झाल्यापासूनचा काळ त्या पुलाने पाहिला. हा रस्ता आता आणि बराच उशिरा चौपदरी झाला असून याच रस्त्याने पूर्वी पुण्याला जायचे तर 5 ते सहा तास लागत. मराठवाड्यातील जनतेला एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळाले, त्याचे परिणाम पुढे इतके दीर्घकाळ सहन करावे लागतील, अशी कल्पना कोणी केली नसेल. आता काही चालकवीर चारऐवजी तीन साडेतीन तासात पुणे गाठतात हा भाग वेगळा.
स्वामी रामानंद् तीर्थ, गोविंदभाईंनी मराठवाडा महाराष्ट्रात सामील करण्याची तर मागणी केलीच पण मुंबईसह महाराष्ट्र होण्याच्या मागणीला बळ दिले, याचा अर्थ भाषा आणि संस्कृती या अर्थाने मराठी समाज एकत्र नांदताना मुंबईला सोबत घेतल्याशिवाय आपल्याला नव्या जगात जाता येणार नाही, हेच जणू त्यांनी हेरले होते. पश्चिमेकडे जाणार्‍या या मार्गांनी आता किती बस, किती मालगाड्या आणि किती खासगी वाहने जातात त्याची गणती नाही. ( टोलवाले करतात म्हणा!) कायगावचा पूल नव्हता तेव्हा मोटारी तराफींवर ठेवून गोदावरी पार करावी लागत होती, म्हणतात. ‘पश्चिमेचे रस्ते’ मराठवाड्यासाठी असे रोखलेले होते तर ! त्या पुलाखाली आता 12 महिने पाणी दिसते, कारण तीथपासून 40 किलोमीटरवर पैठणला मराठवाडयातले सर्वात मोठे जायकवाडी धरण आहे. शंकरराव चव्हाण यांनी ही साईट कशी चुकीची निवडली, त्याविषयी बरेच काही बोलले जाते, हा आता इतिहास झाला. अर्थात त्यामुळेच औरंगाबाद्सारख्या 12 लाखाच्या वस्तीला खात्रीचे पाणी मिळते आहे. नसता हे शहर कशाच्या भरवश्यावर वाढते ! मलिक अंबरने एकेकाळी नहरे अंबरीद्वारे या शहराला पाणी पुरविण्याची एक अफलातून पद्धत शोधून काढली होती, पण आता ती कशी पुरी पडणार? तिचा अभ्यास सतत सुरुच आहे आणि ठेवावाच लागेल कारण असेच काही या मातीतले मॉडेल मराठवाड्याचा सर्वात कळीचा - पाण्याचा प्रश्न सोडविण्यास भविष्यात उपयोगी ठरणार आहे.
औरंगाबादच्या दक्षिणेला द्क्षिण काशी म्हणजे पैठण. या पालथ्या नगरीत सातवाहन घराण्याच्या काळातील समृद्धी दडलेली आहे. संत एकनाथांना भेटण्यासाठी हजारो वारकरी गोदाकाठी आजही एकत्र येतात. त्याच्या उत्तरेला गंगापूर आणि वैजापूर ही दुष्काळी भूमी. मात्र आता नांदूर मधमेश्वराचे पाणी काही भागात खेळू लागले आहे. पलिकडे कन्नडच्या गौताळा अभयारण्य आणि मराठवाड्याचे चाळीसगावकड्चे टोक म्हणजे ऑट्रम घाट. घाटाच्या वरच्या बाजूला पितळखोर्‍याची लेणी आणि खाली चाळीसगावचे जंगल. तेथे भास्कराचार्यांचे वास्तव्य होते, असे म्हणतात. किनवटनंतर मराठवाड्यातील गौताळा हे एकमेव जंगल, मात्र ते आज संकटात आहे. आणखी वर आलात की वेरूळ आणि अजिंठा लेणी. औरंगाबाद्च्या दिशेने दौलताबाद किंवा देवगिरी किल्ला. अनेक राजवटी यादवांच्या या भूमीच्या प्रेमात पडल्या. पश्चिमेचा वारा मनसोक्त पिणारा हा भाग जर्जरी बक्षांसारख्या सुफी संतांनाही आवडून गेला. शारंगदेव आणि गोपालनायकाचा आवाज याच डोंगरदर्‍यांनी ऐकला आणि हिंदुस्थानी संगीताची साधना येथूनच सुरू झाली. पाकिजासारख्या रोमँटिक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी खुलताबादशिवाय दुसरे लोकेशन असूच शकत नाही. खुलताबाद गेस्ट हाऊससारखे गेस्ट हाऊस नाही, असे आता आतापर्यंत म्हटले जायचे. हा भाग एवढा रम्य आहे की आताही शहराबाहेर जायचे म्हटल्यावर येथेच हुरडा पार्टया रंगतात. पैठणरोडच्या बरोबरीने याच भागात फार्महाऊससाठी जागा खरेदी केल्या जाताहेत. वेरूळला अगदी गावातून गेलात तर औरंगजेबची कबर खुलताबादेत पाहायला मिळते. पेरू, सीताफळ किंवा अंजीर खाल्ल्याशिवाय या रस्त्याने प्रवास करण्यास बंदी आहे !
वेरूळ आणि अजिंठा लेणी आयुष्यात एकदा तरी पाहिल्याच पाहिजेत. म्हणजे आपण आधुनिक काळात किती पराक्रम गाजवित आहोत, हा भ्रम दूर व्हायला मदत होते. विशेषतः कैलास लेणीमध्ये आधी कळस मग पाया असे काम कलाकारांनी केले , असे गाईड सांगतो तेव्हा नतमस्तक होण्याशिवाय आपल्या हाती काही राहातच नाही. पलिकडे घृष्णेश्वराचे दर्शन घेताना मंदीरावरील कलाकुसर पाहून पुन्हा नतमस्तक. नतमस्तक झालेच पाहिजे, अशी कितीतरी ठिकाणे मराठवाड्यात आहेत, मात्र काळ बद्लला, सत्ताकेंद्रे बदलली आणि एकेकाळी पैठणच्या पैठणीमुळे आणि व्यापार उदीमामुळे जगाला माहीत झालेल्या या भूमीची गेले आठ शतके मात्र पिछेहाट झाली.
दौलताबाद रोडने औरंगाबादकडे येताना रस्ता वळण घेतो तसे देवगिरी किल्याचे सर्व बाजूंनी दर्शन होत राहाते. आपण पाहू तिकडे राजेशाही खुणा अंगावर पांघरणारे खंडहर दिसायला लागतात. आधुनिक काळात उत्पादन, रोजगार हेच परवलीचे शब्द झाले आहेत. औरंगाबादला औद्योगिक शहराचा दर्जा मिळवून देणारी वाळूज – पंढरपूर एमआयडीसी दौलताबाद आणि पुणे रस्त्याच्या मधोमध बसली आहे. मात्र या अफाट प्रदेशाच्या मानाने ती अपुरी असल्याने तिला ओलांडून हजारो तरूणतरूणींनी आता पश्चिमेला म्हणजे पुणे आणि मुंबईला जवळ केले आहे. रफिक झकेरिया यांनी चिकलठाणा एमआयडीसी वसविली होती, मात्र सवलती संपल्या म्हणून तेथे आता रिअल इस्टेटचे मजले चढत आहेत. जालना रोडला शहरापासून 10 किलोमीटरवर शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत झाली, मात्र तिचे ‘पाणी’ पश्चिमेकडूनच अडविण्यात आले आहे.
अजिंठा वेरूळने औरंगाबादला जागतिक नकाशावर नेऊन बसवले. शहरात असलेल्या चार दशकांच्या पंचतारांकित हॉटेल आणि विमानतळ ही त्याचीच देण आहे. आता मात्र ही या भागाची गरज झाली असून औरंगाबादच्या आकाशात विमाने वारंवार दिसू लागली आहेत. आधी विकास आंदोलन आणि नंतर रेल्वे रूंदीकरण आंदोलन. मराठवाड्याला लढल्याशिवाय काही मिळालेच नाही. रूंदीकरणाच्या मार्गावर आता तासातासाला गाड्या धावतात आणि मराठवाड्याला देशाशी जोडण्याचे प्रयत्न करतात. हैदराबादच्या निजामाने औरंगाबाद मुक्कामी उपराजधानी करून आपले मराठवाड्याकडे लक्ष असल्याचे त्यावेळी भासविले खरे, पण त्यावेळच्या कटू आठवणी आजही सांगितल्या जातात, इतक्या त्या कटू आहेत. एखाद्या भागाचे सांधे जुळण्यासाठी एवढा मोठा काळ लागतो तर !

आज मध्यभारतातील एक माध्यमसमूह महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेल्या औरंगाबादनगरीत प्रवेश करतो आहे. मराठी भाषा, संस्कृतीचे माहेरघर असलेल्या या भूमीत त्याचे स्वागत यासाठी केले पाहिजे की 121 कोटी लोकसंख्या असलेल्या या वैविध्याने नटलेल्या देशात जागतिकरणाच्या रखरखाटातही भाषा संस्कृतीचा मिलाप अपरिहार्यच आहे. औरंगाबादने शतकानुशतके मराठी, हिंदी(दखनी) आणि उर्दू या भाषा आणि या भाषांच्या खांद्यावरील संस्कृती खेळविल्या आहेत. या त्रिवेणी संस्कृतीचे विस्तारीकरण ‘दिव्य मराठी’ च्या आगमनाने होते आहे. आधुनिक जग जसे सर्वांना सामावून घेत घेत पुढे जाते आहे, तसेच ही ऐतिहासिक भूमी या नव्या प्रवाहांचा स्वीकार करत गतवैभवाच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.