Tuesday, February 22, 2011

ऐक्याच्या आणाभाका आता पुरेशा नाहीत

ते चार प्रसंग 15 दिवसात घडले म्हणून मला त्यातील विसंगती अधिकच लक्षात आली. आपल्या देशातील सद्यस्थितीचे दर्शन झाले. ही परिस्थिती बदलली पाहिजे, नव्हे त्यासाठी या क्षणापासून प्रयत्न सुरू केले पाहिजेत, अशी प्रेरणा या प्रसंगांनी दिली. प्रसंग प्रतिकात्मक असल्यामुळे गावांची, संस्थासंघटना आणि व्यक्तींची नावे महत्वाची नाहीत. महत्वाचे आहे, ते आपल्या देशातील परिस्थिती अशी आहे, याचे भान. मला माहीत आहे की या घटना आपल्यापैकी बहुतेकांच्या समोर दररोज घडत आहेत. त्यामुळे त्या घटना दुर्मिळ आहेत, असे मी म्हणणार नाही. मात्र एका पंधरवाड्यात त्यांचा अनुभव घेणे, हे जसे क्लेशकारक आहे तसेच ते डोळयांवरील झापडे दूर करणारे आहे.

पहिला प्रसंग आहे, उत्तर महाराष्ट्रातील एक तालुका आणि जिल्हा जोडणार्‍या रस्त्यावरील. त्या मार्गावर बस कमी असल्यामुळे काळीपिवळी जीपगाड्या चालतात. एक बस गेली म्हणून मी त्यादिवशी काळीपिवळीचा प्रवासी झालो. ही गाडी साधारण 20 मिनिटात भरली त्यावेळी तीत 14 प्रवासी बसले होते. बसल्या क्षणापासून माणसे कोंबण्याच्या जीपचालकाच्या दररोजच्या पद्धतीविषयी प्रवासी बोलत होते. ‘भाऊ, तुला बसायला तरी जागा ठेव,’ असेही एक मावशी म्हणाली. पण चालक हे सर्व शांतपणे ऐकत होता. जणू जीपमध्ये बसल्यावर प्रवाश्यांनी हेच शब्द वेगवेगळ्या पद्धतीने बोलायचे आणि ते चालकाने ऐकून घ्यायचे, हा त्या व्यवहाराचाच एक भाग आहे. आणि तो खरोखरच तसा आहे. गाडी रस्यावर आल्यावरही बराच वेळ हाच विषय चालला होता. आपल्याला नीट बसताही येत नाही, असे म्हणून माणसे एकमेकांशी वाद घालत होती. आणि तेही सर्वांच्या सवयीचे झाले होते. त्यातच तो रस्ता इतका वाईट होता की त्यावर गाडी चालविण्यासाठी चालकाला दुप्पट मोबदला दिला पाहिजे, असे मला वाटून गेले. मला धक्का याचा बसला की 20 वर्षांपूर्वी याच रस्त्यावरून असाच प्रवास केला होता. त्यावेळी मला जीपसाठी अर्धा तास थांबावे लागले होते. आता जीप लवकर मिळाली होती, एवढाच 20 वर्षात फरक पडला होता. माणसे रस्त्याविषयी, गाडीविषयी, चालकाच्या चालविण्याविषयी 20 वर्षांपूर्वी तक्रार करत होती, तशीच ती आजही करत होती. मात्र त्यांच्यासमोर प्रवासाची तीच व्यवस्था स्वीकारण्याशिवाय आजही पर्याय नव्हता! त्यांच्यात व्यवस्थेविरूद्ध भांडण्याचे बळ नव्हते म्हणून ती एकमेकांशीच भांडत होती.

दुसरा प्रसंग आहे, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधला. माझे काम होते काही तासांचे. भेटणारी माणसे उशिरा आल्यामुळे मला बराचवेळ तेथे थांबावे लागले. जगात अन्नसुरक्षा हा मुद्दा भविष्यात किती महत्वाची ठरणार आहे आणि लोकसंख्या जास्त असलेल्या भारतासमोर त्यामुळे कशा समस्या उभ्या राहू शकतात, चीनमध्ये काही भागामध्ये दुष्काळ पडल्यामुळे यावर्षी अन्नधान्याची महागाई कशी वाढणार आहे, हे प्रवासात वाचून मी त्या हॉटेलात प्रवेश केला होता. तेथे एका समारंभाची मेजवानी सुरू होती. कुटुंबकबिल्यासह माणसे अन्नावर ताव मारत होती. तेथे 250 रूपयांना चहा मिळतो आणि 800 रूपयांना भाजी मिळते, या गोष्टी आता जुन्या झाल्या. येथपर्यंत सर्व ठीक होते. मात्र ज्या प्रमाणात अन्न ताटात टाकले जात होते, ते मात्र भयंकर होते. क्लेशकारक होते. त्याची पैशातील किंमत त्या लोकांनी मोजलीच होती, मात्र त्यासाठीचे श्रम कोणीतरी दुसरीच माणसे करत आहेत, असे दृश्य माझ्या डोळ्यासमोर आले. आणि अन्नाची नासाडी तर पाहवत नव्हती. ही नासाडी पाहण्याची ही माझी काही पहिली वेळ नव्हती. मात्र अन्नसुरक्षिततेच्या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेता मला ते फार मोठे पापच वाटले. सर्वात महत्वाचे म्हणजे हे दृश्यही वर्षानुवर्षे असेच आहे, हे अतिशय क्लेशकारक होते.

तिसरा प्रसंग आहे, एका चर्चासत्राचा. सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांचे ते चर्चासत्र होते. विषय होता भविष्यात सामाजिक चळवळींसमोर कोणती आव्हाने आहेत. त्यावर सर्व वक्त्यांनी आपापली बाजू मांडली. जगभर लोकशाही सक्रिय होते आहे आणि पर्यावरणाचे प्रश्न महत्वाचे ठरणार आहेत, असे एक तज्ञ म्हणाला. सध्याची परिस्थिती किती वाईट आहे, अशी मांडणी दुसर्‍या तज्ञाने केली. एकाने आतापर्यंत झालेल्या बदलांचा आढावा घेतला आणि समाज परिवर्तनाचा वेग वाढण्याची गरज व्यक्त केली. मला वाईट याचे वाटले की ज्या पैशाने सगळ्या गरीबांची नाकेबंदी केली आहे, त्याविषयी खुलेपणाने कोणी बोलत नव्हता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असलेली लोकशाही आपल्याला हवी आहे, याचा सातत्याने उल्लेख केला जात होता, मात्र त्यासाठी काय करायला हवे, याची स्पष्टता नव्हती. नेमके काय केले तर ही परिस्थिती बदलेल, याविषयी कोणी बोलत नव्हता. पैशाच्या व्यवहारांविषयी आणि त्याविषयीच्या जागरूकतेविषयी बोलणे सामाजिक क्षेत्रात जणू चोरी आहे, असे मानले जात होते, 2011 साली तेच घडते आहे, हेही क्लेशकारक आहे.

चौथा प्रसंग आहे, जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटाला 13 फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित श्रद्धांजली सभेचा. पुण्याच्या शांततेला या दहशतवादी हल्ल्यामुळे कसा धक्का बसला, नागरिकांनी कसे जागरूक राहिले पाहिजे, आपण भारतीय कसे सर्व एक आहोत आणि परकीय शक्ती आपल्यात फूट पाडण्याचा कसा प्रयत्न करतात, या घटनेचा कसा बद्ला घेतला पाहिजे, असे बरेच काही या सभेत वक्ते बोलत होते. मात्र ज्या काळया पैशाच्या राक्षसाने हे सर्व घडवून आणले आहे, याविषयी कोणी बोलायला तयार नव्हता. आपण सर्व एक आहोत, तर देशातील 60 जिल्हयात नक्षलवाद का वाढतो आहे, ग्रामीण भागात अजूनही पायाभूत सुविधा का वाढत नाहीत, सोशिक शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ का येते आहे, संपत्तीची जी प्रचंड लूट चालू आहे, आणि त्यामुळे कोट्यवधी भारतीयांचे आयुष्य मातीमोल होते आहे, असुरक्षितता प्रचंड वाढत चालली आहे, आणि जातीय कारणांसह ही कारणेही दहशतवादाला फूस लावण्यास तेवढीच जबाबदार आहेत, याविषयी कोणी काही बोलत नव्हता. एखादी वाईट घटना घडली की भावनिक आव्हाने केली की माणसे एकत्र येतात मात्र त्यांना खर्‍या बदलांच्या दिशेने जावू दिले जात नाही, हे भारतात सातत्याने घडते आहे, हे क्लेशकारक आहे.

भारतात सध्या जे चालले आहे, ते सर्वच या चार प्रसंगातून दिसणार नाही. मात्र समाजातील वेगवेगळ्या थरातील माणसे कसा विचार करत आहेत, याचे प्रतिबिंब या प्रसंगांमुळे निश्चितच पाहायला मिळते. वरवरच्या उपायांनी ही क्लेशकारक परिस्थिती बदलणार नाही. आमच्या लोकशाहीत माणसाची माणूस म्हणून प्रतिष्ठा राखली जात नाही, तोपर्यंत ऐक्याच्या आणाभाकांचा उपयोग होणार नाही. मूळ दोष व्यवस्थेत आहे, तो दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत आपण एकमेकांना शत्रू समजायला लागलो आहोत, हे जास्त घातक आहे.


- यमाजी मालकर / ymalkar@gmail.com

No comments:

Post a Comment