Tuesday, February 15, 2011

तुझे – माझे जमेना, त्याचे मूळ कारण

आपल्या देशातील आजच्या महानगरांमधील रस्त्यांवरील दृश्य खूप काही सांगून जाणारे आहे. त्या रस्त्यांचे निरीक्षण केल्यावर लक्षात येते की त्यांच्यावर दिसणारी गर्दी प्रचंड वाढली आहे. या गर्दीत काय काय दिसते पाहा. गेल्या 20 वर्षांत भारतात वाढत चाललेल्या महागड्या मोटारी या रस्त्यांवर धावताहेत, तसेच साध्या चार चाकी गाड्यांची संख्याही वाढली आहे. स्कूटर, मोटारसायकली वाढल्या आहेत आणि रिक्षाही वाढल्या आहेत. याच रस्त्यांवर हातगाड्या उभ्या असलेल्या दिसतात आणि कधीकधी बैलगाड्या पण दिसतात. पायी चालणारी माणसे स्वतःला सांभाळत रस्ता आपलाही आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात. शाळेतील लहान मुले आणि वयस्कर माणसे जीव मुठीत धरून हाच रस्ता ओलांडताना दिसतात. रस्ता तोच्‍ आहे, मात्र आता क्षणाक्षणाला बदलता भारत त्यावर दिसतो आहे. या बदलाचे वैशिष्ट्य असे आहे की या प्रत्येक समूहाची माणसे संख्येने जवळपास सारखीच आहेत. म्हणजे चार चाकी जेवढे आहेत तेवढेच दुचाकीचालक. तेवढेच रिक्षावाले. तेवढेच बसने प्रवास करणारे आणि तेवढेच पादचारी. रस्ता पूर्वीही तोच होता आणि आताही. मोठा फरक असा पडला की आता सर्व समूहाची माणसे रस्त्यावर वाढली आहे. त्यामुळे रस्ता कोणत्याच समूहाला पुरेनासा झाला आहे, आणि प्रत्येकाची दुसर्‍या समूहाविषयी तक्रार आहे. खरे तर रस्ता वापरण्याचा अधिकार जेवढा महागडी गाडी वापरण्याला आहे, तेवढाच तो पायी चालणार्‍यालाही आहे. मात्र दोघेही एकमेकांवर चिडताना दिसताहेत. स्वतःचा वेग वाढवून आपल्याला कशी महत्वाची कामे आहेत आणि त्यासाठी आपण ही महागडी गाडी घेतली आहे, असे गाडीत बसणार्‍याला वाटते, तर रस्ता सर्वांचा आहे, त्यामुळे गाडीवाल्याचा वेग कमी झाला म्हणून काय बिघडले, असे पायी चालणार्‍याला वाटते. विशेष म्हणजे आपण ज्या समूहात असतो, त्या समूहाची बाजू घेऊन आपण दुसर्‍या समूहाला कसे कळत नाही, हे हीरीरीने सिद्ध करत आहोत. या गोंधळाचे कारण आपण कधी समजून घेतले आहे काय?
याचे एक महत्वाचे कारण असे आहे की 120 कोटी लोकसंख्येच्या या देशामध्ये किमान 120 प्रकारचे किंवा त्यापेक्षा अधिक समूह तयार झाले आहेत. म्हणजे प्रत्येक समूहात किमान एक कोटी लोक आहेत, असे गृहीत धरूयात. या प्रत्येकाचे हितसंबंध इतके वेगवेगळे आहेत की एका समूहाचे हित ते दुसर्‍या समूहाचे अहित असे सातत्याने होताना दिसते आहे. त्यामुळे कोणत्याच सार्वजनिक किंवा न्यायालयीन निर्णयाविषयी समाजात सहमती होत नाही, अशी एक विचित्र परिस्थिती समाजात निर्माण झाली आहे. जातधर्म एकवेळ बाजूला ठेवू मात्र आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत इतकी दरी निर्माण होते आहे की आम्ही एकमेकांना समजून घेऊच शकत नाही. त्यामुळे आम्ही ज्या समूहात नसतो, त्या समूहाला बदनाम करण्याचा सोपा मार्ग आम्ही पत्करतो. मग तो दुसरा समूह आळशी असतो, कधी लबाड असतो, कधी कामचुकार असतो. आपल्या रागलोभाची, तणावाची कारणे वेगळीच असतात, पण आम्ही ती दुसर्‍या समूहावर थोपवून मोकळे होतो. मूळ प्रश्न असा असतो की रस्ता वापरणार्‍यांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे आता पुर्वीच्या वेगाने पळता येत नाही, हे अनेकांना (विशेषतःअत्याधुनिक साधने वापरणार्‍यांना )सहन होत नाही. दुसरीकडे सगळ्यांच्याच आयुष्याचा वेग वाढल्यामुळे प्रत्येकाला आधी पुढे जायचे आहे, त्यामुळे रस्त्यात( जीवनात) सातत्याने तणाव निर्माण होत आहेत. थोडक्यात आपल्या सहजीवनात एकमेकांचा नको इतका त्रास व्हायला लागलेला आहे. म्हणजे मध्यमवर्गाला खालचा वर्ग कामचुकार वाटतो. खालच्या वर्गाला उच्चमध्यमवर्ग शोषक वाटतो. जनतेला सर्वच राजकीय नेते भ्रष्ट वाटतात. जनतेला सर्वच सरकारी कर्मचारी कामचुकार वाटतात. आम्ही प्रत्येक समूहाला बदनाम करुन त्यातच प्रश्नांची उत्तरे शोधायला लागतो. ‘कामवाली बाई सारख्या दांड्या मारते’, ‘रिक्षावाला फसवितो’, ‘झोपडवासीय घाण करतात’, ‘दुचाकीस्वार मध्येच कडमडतात’, ‘आयटीवाले माजलेत’, ‘राजकारणाने सगळी घाण केली’ अशी फसवी भाषा आपण बोलायला लागतो. खरे तर त्या प्रत्येक समूहात आपलीच माणसे असतात. मात्र राग व्यक्त करण्यासाठीची तात्पुरती व्यवस्था आपण अशी करून मोकळे होतो.
खरी गोष्ट अशी आहे की या देशाला आता पांढर्‍या पैशाच्या अभावातून बाहेर येण्याची आणि चांगल्या प्रशासनाची गरज आहे. हा कळीचा मुद्दा आपल्याला अजूनही महत्वाचा वाटत नाही. या दोन्हीच्या अभावामुळे एक दुष्टचक्र देशात तयार झाले आहे. हे दुष्टचक्र असे सांगायला सुरवात करते की संपूर्ण भारतीय समाज प्रामाणिक नाही. जणू सगळ्या लबाड, अप्रामाणिक, कामचूकार, भ्रष्ट माणसांना निसर्गाने भारतात जन्माला घातले आहे! आपणच आपल्यावर असे सर्व नकारात्मक शिक्के मारुन घेतो आहोत.
गेल्या चार- पाच दशकातील वेगवान बद्लांकडे डोळसपणे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की देशाची लोकसंख्या वाढली तशी पायाभूत सुविधांची गरज वाढली. शहरे वाढली तसे शहरांतील सेवांवरील ताण वाढला. पैशाचे महत्व वाढले तसे त्याच्या व्यवस्थापनाची गरज वाढली. समूह आणि व्यक्तिनिरक्षेप व्यवस्थेची आपल्या देशाला गरज आहे. नेमके त्याकडेच पुरेसे लक्ष दिले गेले नाही. म्हणूनच सर्वांसाठी नागरिकत्वाचा पुरावा ठरणारे ‘आधार’ कार्ड करण्याची कल्पना प्रत्यक्षात येण्याची आपण अजूनही प्रतिक्षा करतो आहोत. भारतीय नागरिक म्हणून कोणतीच सुरक्षितता सामान्य नागरिकाला आपण अद्याप आपण देवू शकलेलो नाही. तात्पर्य आम्ही ‘रस्त्याने’ पायी चाललो, की रिक्षाने चाललो, की महागड्या गाडीने चाललो, की मोटारसायकलने चाललो, की बैलगाडीने (म्हणजे आम्ही कोणत्या समूहात आहोत) हे महत्वाचे नसून सर्वांना चांगला रस्ता (चांगले जीवन) वापरता येणे, हे महत्वाचे आहे. आणि त्यापेक्षाही महत्वाचे आहे, जीवनप्रवासात एकमेकांची अडचण होता कामा नये. त्यासाठी आम्ही एकमेकांची भूमिका मान्य करणे, त्या त्या भूमिकेचा आदर करणे, देशाला सर्वच सेवांची गरज आहे, त्यामुळे त्या सर्व सेवांना महत्व देणे, त्या सेवा पुरविणार्‍या समूहाच्या जगण्याचा संकोच होत नाही ना, याची काळजी घेणे शक्य करणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे. माझीच भूमिका महत्वाची, माझाच समूह तेवढा प्रामाणिक, माझ्याचमुळे देशाची प्रगती होते आहे ही विविध समूहांमध्ये वाढीस लागलेली भावना आपल्या देशाच्या अजिबात हिताची नाही.
- यमाजी मालकर / ymalkar@gmail.com