Sunday, January 2, 2011

हा तर ऐतखाऊंचा बोलबाला !

‘मी आता साठीचा झालो आहे. जिना चढणे मला शक्य नाही. गुडघे दुखतात. तसे आमच्या पक्षात बहुतेक नेत्यांचे गुडघे दुखतात. कारण आमचा निम्मा वेळ बैठका घेण्यातच जातो’ पुण्यात एक पुरस्कार स्वीकारताना भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी अलिकडेच केलेले हे वक्तव्य.
‘जान की बाजी’ या चित्रपटासाठी करार केल्यानंतरही तारखा न देऊन निर्मात्यांचे नुकसान करणार्‍या संजय दत्त याच्या कोट्यवधीच्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस बजावण्यात आली. हा करार दोन कोटी रूपयांचा होता !
पाकिस्तानी नागरिक असलेला गायक अदनान सामी याने मुंबईत कोट्यवधी रूपये किंमतीचे आठ फ्लॅट खरेदी केले, तो भारतीय नागरिक नसल्याने हे व्यवहार बेकायदा असल्याची नोटीस अमलबजावणी विभागाने बजावली असून हे फ्लॅट जप्त करण्यात येत आहेत.
वर्धा येथील अधीक्षक कृषी कार्यालयात दुपारी बारा वाजता कर्मचारी उपस्थित नाहीत, त्यामुळे शेतकर्‍यांची कामे अडून पडली आहेत. वर्षाच्या अखेरीस आपल्या रजा संपविण्याचा सपाटा कर्मचार्‍यांनी लावल्याने कार्यालयामध्ये काम ठप्प झाले आहे.
31 डिसेंबर साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील बहुतांश पर्यटनस्थळे हाऊसफुल झाली. अनेक पर्यटन केंद्रावर पर्यटकांनी महिनाभर आधी बुकींग केले आहे.
सरकारमधील मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकारी अत्यावश्यक व इतर वस्तूंचे दर खाली येण्याची भाकिते करत असताना पुढील वर्षात भाववाढीचा दबाव कायमच राहणार असल्याचा अंदाज उद्योजक महासंघ ‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री’ने ( असोचेम) केला आहे. या महासंघाने आपल्या अहवालात म्हटले आहे, अन्नधान्याच्या भावांमध्ये होणार्‍या सततच्या वाढीमुळे जनता आणि सरकार 2011 वर्षातही त्रस्त राहणार आहे. मार्च 2011 अखेरपर्यंत महागाई कमी होईल, असे सरकार आणि संबंधित यंत्रणा सांगत होत्या, मात्र कांदा लसूण, टोमॅटो यासारख्या भाज्यांचे भाव अचानक वाढल्यामुळे हे अंदाज चूकणार आहेत. 24 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ‘फूड इन्फ्लेशन’ ( अन्नधान्यांच्या घाऊक भावांवर आधारित निर्देशांक ) दोन आकडी म्हणजे तब्बल 12.13 टक्क्यांवर पोहचला आहे.
या सहा बातम्यांमध्ये तुम्हाला काही साम्य आढळते का ? तुम्ही म्हणाल राजकीय नेत्यांची गुडघेदुखी, संजय दत्तची लबाडी, अदनान सामीची कोट्यवधींची संपत्ती, एका सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांची अनुपस्थिती, वर्षअखेरीस पर्यटनस्थळी होणारी गर्दी आणि वाढती महागाई याचा काय संबंध आहे ? वरवर हा संबंध खरोखरच लक्षात येत नाही. मात्र थोड्या बारकाईने विचार केल्यावर लक्षात येते की या घटनांचा फार जवळचा संबंध आहे. पैसा कोणत्या क्षेत्रात खुळखुळतोय याची चूणूक आपल्या या घटनांत पाहायला मिळते. आपल्या देशात अमेरिकादी विकसित देशांसारखाच ऐतखाऊ सेवाक्षेत्राचा वाढत चाललेला पैशाचा दबदबा. सेवाक्षेत्र याचा अर्थ सेवा पुरविणारी सगळी क्षेत्र. ज्यामध्ये नवनिर्मिती तशी काहीच नसते. यातील बहुतेक व्यवहारांमध्ये एकतर द्लाली केली जाते किंवा वस्तूंचे व्यवस्थापन केले जाते. अमेरिकेसारख्या देशात गेल्या काही दशकांत या क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आणि जेथे प्रत्यक्ष निर्मिती होते, अशा शेतीमध्ये फक्त 4 टक्के लोक राहिले! औदयोगिक उत्पादनातही तुलनेने कमी प्रगती झाली. प्रगती झाली ती बँक, विमा, पर्यटन, हॉटेल, वाहतूक, चित्रपट निर्मिती, आयटी आणि अशा अनेक क्षेत्रात. याचा इतका अतिरेक झाला की अमेरिकेची अर्थव्यवस्थाच अडचणीत आली. याचे कारण प्रत्येकाचे लक्ष दुसर्‍याचा खिसा कापण्याकडेच लागले. आपली सेवा दुसर्‍यांनी विकत घ्यावी, एवढाच उद्योग वाढत राहिला. प्रत्यक्ष निर्मिती केली जाते आणि जेथे शरीरकष्टाची कामे करावी लागतात, अशा शेती आणि औद्योगिक उत्पादनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. ऐतखाऊ प्रजा वाढत राहिली. आपल्या देशातही सध्या सेवाक्षेत्र जोमाने वाढते आहे आणि त्यामुळे आपण विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहोत, अशी हाकाटी पिटविण्यात येते आहे. एकप्रकारे ऐतखाऊ माणसांची फौज वाढविण्याचा रस्ता आपण धरलेला आहे.
सेवाक्षेत्राचा विकास अमेरिकेला अनेक वर्षे परवड्ला कारण अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न तेवढा गंभीर नव्हता. युद्धखोरीच्या माध्यमातून त्यांनी जगाला भरपूर लुटले होते. जमीन प्रचंड होती. आणि अनेक शोधांचे पेटंट त्यांच्याकडे होते, ज्यामुळे काहीही न करता केवळ पेटंटपोटी जगाची अडवणूक करून डॉलर छापले जात होते. त्याचाही अतिरेक झाला आणि स्वदेशी वस्तू वापरा, देशी उद्योगांना प्रोत्साहन देण्याची भूमिका अमेरिकेला मंदीनंतर घ्यावीच लागली. 100 टक्के जागतिकीकरण अमेरिकेला परवडणारे नाही, असे म्हणण्याची वेळ अध्यक्ष बराक ओबामांवर आली. भारताची लोकसंख्या 120 कोटी म्हणजे अमेरिकेच्या तिप्पट आहे. जमीन त्यांच्यापेक्षा कितीतरी कमी आहे. त्यामुळे येथील माणसांच्या हाताला काम हवे आहे. प्रत्यक्षात ते देण्याऐवजी सेवाक्षेत्राची जी भलावण चालली आहे, ती भारताच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.
पहिल्या बातमीत मुंडे साहेबांचे गुडघे पक्षांच्या दीर्घकाळ चालणार्‍या बैठकांमुळे दुखतात, असे म्हटले आहे. याचा अर्थ असा की आपल्या देशातील राजकीय पक्षांकडे कार्यक्रम राहिलेले नाहीत, त्यामुळे त्याच त्याच विषयांचा काथ्याकूट करत बसतात आणि डोंगर पोखरून उंदीर काढतात! जनतेवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. कारण काही कष्ट पडतील, जनतेसमोर उदाहरण ठरेल असे प्रत्यक्ष काही कोणालाच करायचे नाही. दुसर्‍या बातमीत संजय दत्तने करार करूनही काम केलेले नाही, याचा अर्थ त्याला इतकी कामे झाली आहेत आणि त्याबद्द्ल त्याला कोटयवधी रूपये मिळत आहेत की पैसा कोठे ठेवायचा असा प्रश्न त्याला पडला आहे. तिसर्‍या घटनेत अदनान सामीसारखा पाकिस्तानी कलाकार आमच्या देशात येवून कोट्यवधी रूपयांचे फ्लॅट विकत घेऊ शकतो. एवढी सगळी माया तो गाण्याच्या जोरावर मिळवू शकतो, कारण सेवाक्षेत्रात त्याला दलाल चांगले मिळाले. चौथ्या आणि पाचव्या घटनेत सरकारी नोकरी म्हणजे पुन्हा सेवा क्षेत्र. प्रत्यक्ष उत्पादन नाही मात्र खर्च भरपूर. सरकारी अर्थसंकल्पीय तूट वाढ्तच जावी इतके ! शिवाय पैसा खिशात खुळखुळायला लागला की आपल्या समाजाचा काही संबंध नसलेल्या 31 डिसेंबरसाठी पर्यटनस्थळे फुल! म्हणजे पुन्हा सेवाक्षेत्राचा जोर.
सहावी बातमी यासाठी थोडी जास्त दिली कारण महागाईच्या कारणाविषयी देशातले तज्ञ काय बोलतात, हे आपल्या लक्षात यावे. 120 कोटी जनतेला पोसायचे म्हणजे शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढविली पाहिजे, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. यापुढे टीव्ही, रेडिओ, फ्रीज, मोटारी, मोबाईल फोन अजिबात महाग होणार नाहीत कारण कारखान्यांमध्ये त्यांचे राक्षसी पद्धतीने उत्पादन सुरू आहे. ते आपण विकत घ्यावे म्हणून वेगवेगळी आमिषे दाखविली जात आहेत. महाग होणार ती शेती उत्पादने. कारण ती निर्माण करण्यासाठी बटन दाबता येत नाही. निसर्गाची साथ, शरीरकष्ट आणि व्यवस्थापन अशा बर्‍याच गोष्टी जूळून याव्या लागतात. पण त्याच्या विकासासाठी आपण पुरेसा पैसा खर्च केला नाही. पैसा अशा ठिकाणी खर्च झाला, जेथे लगेच दलाली मिळते. जेथे एकमेकांचा खिसे कापणारा समाज वाढतो. असा ऐतखाऊ समाज वाढत जाणे आपल्या देशाला अजिबात परवडणारे नाही. ‘खिसे कापणार्‍यांची’ संख्या तर त्यामुळे वाढेलच पण केवळ गुडघेदुखीच नव्हे तर दुर्बल शरीर आणि बकाल मनोवृत्तीची माणसे तयार होतील आणि नवनिर्मिती करणार्‍यांना नागविणारी एक विकृत संस्कृती जन्म घेईल.

- यमाजी मालकर, ymalkar@gmail.com