Wednesday, January 12, 2011

सावधान, ऐका पुढील दशकाच्या हाका...

सावधान! तुमच्याकडे सतत कोणीतरी लक्ष ठेवून आहे. तुमच्या मनात कोणते विचार चालू आहेत, तेही तो लक्ष ठेवणारा ‘माणूस’ जाणतो आहे. एवढेच नाही तर तुमच्या शरीरात या क्षणाला कोणत्या हालचाली चालू आहेत, त्याही नोंदल्या जात आहेत. तुम्ही पुढच्या क्षणाला काय करणार आहात, याचाही अंदाज त्याला येतो आहे.... खरोखरच असे झाले तर? मला विचाराल तर जीवन एखाद्या तुरूंगासारखे होईल. मोकळेपणाने जगणे अशक्य होईल. जगण्यातला जीवंतपणाच आपण हरवून बसू. कोणी आपल्यावर लक्ष ठेवून आहे, असा आपल्याला भास जरी झाला तरी आपण अस्वस्थ होतो. मग खरोखरच आपल्यामागे असे कोणी आपल्या सावलीसारखे फिरायला लागले तर?

आजच घाबरण्याचे कारण नाही, मात्र या कल्पनेची दखल आपल्याला भविष्यात घ्यावीच लागणार आहे. एकविसाव्या शतकातील पहिले दशक संपले असताना जगाच्या नागरिकांसमोर जागतिकीकरणाच्या अधीरपणात नेमके काय वाढून ठेवले आहे, याचे सध्याच्या तंत्रज्ञानाच्या आधारे जे अंदाज केले जात आहेत, त्यात माणसांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवणारे तंत्रज्ञान लवकर म्हणजे या दशकात विकसित होणार असल्याचे म्हटले आहे. विज्ञानाने तंत्रज्ञानाला जन्म दिला आणि तंत्रज्ञान बदलले तसा माणूस बदलला, हे जगाने आतापर्यंत पाहिले आहे. एकप्रकारे तांत्रिक बदलांना माणूस शरण गेलेलाच आपण पाहिला आहे. या पार्श्वभूमीवर या दशकात माणसाला पुन्हा शरणागती पत्करण्याची वेळ येईल की काय? आपण कसे ठरविणार, हे तर काळच ठरविणार आहे.

आपल्या भारत देशात अजूनही कोट्यवधी लोकांनी आपले आयुष्य तंत्रज्ञानाने व्यापून टाकलेले नाही. अर्थात ज्यांना ज्यांना संधी मिळाली त्यांनी त्याचा व्यक्तीगत आणि सार्वजनिक विकासासाठी स्वीकार केला आहे. याचे बोलके उदाहरण म्हणजे मोबाईल फोन. आपल्या देशात आजच 50 ते 55 कोटी लोक मोबाईलधारक झाले आहेत. या वेगाने कोणतेही तंत्रज्ञान लोकांनी स्वीकारल्याचे उदाहरण जगात सापडणार नाही. या यंत्राने आपल्या सर्वांनाच कसे वेड लावले आहे आणि आपण सर्वच जण कसे अचानक ‘बीझी’ आणि प्रत्येक घडण्याविषयी किती अधीर झालो आहोत, हे आपण अनुभवतो आहोत. जी गोष्ट मोबाईलची तीच कॉम्प्युटरची. कॉम्प्युटर मोबाईलच्या वेगाने वाढले नसले तरी तंत्रज्ञानाने मोबाईललच आता कॉम्प्युटर करून टाकले आहे. परवा बँकेत गेलो तर एका तरूणीने माझ्या मोबाईल फोनमध्ये एक सॉफ्टवेअर फीट करुन दिले आणि यापुढे बँकेची कामे घरी बसून करण्याची सूचना केली! आज हे विचित्र वाटत असले तरी येत्या दोन चार वर्षांत ही आमबात होईल. आपण याला तंत्रज्ञान वापरण्याची सक्ती म्हणू शकतो. पण त्या सक्तीला नाकारण्याचे बळ काही अपवाद वगळता आपल्यात राहिलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. माणसाचे आयुष्य या वेगाने कोठे जावू शकते, याची धक्कादायक उदाहरणे समोर येत आहेत, म्हणून ही चर्चा आज आवश्यक ठरते.

आपल्यापेक्षा अमेरिकेत मोबाईल आणि कॉम्प्युटरची घनता कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य या दोन यंत्रांनी पूर्णपणे व्यापून टाकले आहे. ते किती व्यापले आहे, याची काही धक्कादायक उदाहरणे अधूनमधून समोर येतात. पण आता या यंत्रांपासून सुटका करण्यासाठी नवे तंत्रज्ञानच विकसित करावे लागेल, असे कधी वाटले नव्हते. अशात प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांनी मात्र तंत्रज्ञानाच्या विकासाची धडकी भरण्याची वेळ आली आहे. अमेरिकेत आणि आता भारतातही काही लोक कॉम्प्युटरला इतके चिटकून बसतात की त्यांना वेळकाळाचे भानच राहात नाही. ते भान देण्याचे काम आता या यंत्रांनीच द्यावे, अशी वेळ आता आली आहे. एका तंत्रात इंटरनेट दिवसात दोन वेळा आपोआप बंद होईल आणि समोरच्या माणसाला थोड्या हालचालींची गरज आहे, हे लक्षात आणून दिले जाईल. अमेरिकन समाज उपभोगवादी समाज म्हणून ओळखला जातो. त्याला आपण क्रेडीट कार्डचा किती अतिरेकी वापर करतो, हे लक्षात येत नाही. तेही आता क्रेडीट कार्डच लक्षात आणून देईल. गाडी चालविताना अनेकांचा वेगावर ताबा राहात नाही, अशावेळी गाडीतील प्रेरक संगीत आपोआप बंद पडेल किंवा दिवसभरात फोन करण्याचा अतिरेक झाला तर फोन थोडावेळ आपोआप बंद पडेल किंवा काही नंबर लॉक होतील. माणसांच्या भावनांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी यंत्राला स्वीकारावी लागेल, याचे वर्णन एकाने आई, पोलिस आणि गुरूजींचे काम आता यंत्र करतील, असे म्हटले आहे! ऐकायलाही कसे विचित्र वाटते ना? पण अशा विचित्र वाटणार्‍या नव्या गोष्टी माणसाने स्वीकारायला सुरवात केली आहे. कल्पना करून पाहा, एकेकाळी रस्त्याने फोनवर बोलणारी माणसे पाहिली की किती विचित्र वाटले असते. पण हा विचित्रपणा आता आपण स्वीकारला आहे.

अमेरिकेत असे बद्ल होत असताना चीनमध्ये म्हणे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून यंत्रमानवच काम करत आहेत आणि या हॉटेलच्या गिर्‍हाईकांना ते आवडते आहे. याच तंत्रज्ञानाचा पुढचा टप्पा म्हणजे माणसाच्या शरीरात आणि मनात चालणार्‍या आंदोलनांचा अंदाज यंत्रे घेऊ शकणार आहेत. या सर्व तंत्रज्ञानाचा वापर माणसाच्या प्रगतीसाठी केला जाईल, असाध्य अशा गोष्टी माणसे सहजपणे करू शकतील, असा एक मतप्रवाह नेहमीच राहिला आहे आणि त्यात वावगे काही नाही. प्रश्न एवढाच आहे की जगाला आज अशा संशोधनाची खरोखरच किती गरज आहे?

विज्ञानाचा वापर विध्वंसासाठी न करता विधायकतेसाठी करण्याचे आवाहन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सायन्स कॉंग्रेसचे उद्गाटन करताना परवाच चेन्नईत शास्रज्ञांना केले. भारतासारख्या अनेक विकसनशील देशांचे प्राध्यान्यक्रम वेगळे असले पाहिजेत, हे आपल्या पंतप्रधानांना चांगले माहीत आहे, असा याचा अर्थ. मात्र ज्या वेगाने जागतिकीकरणाचे आणि विशेषतः अमेरिकीकरणाचे आक्रमण आपल्यावर होते आहे, ते पाहिल्यावर ‘आज अमेरिकेत ते उद्या भारतात’, असेच होण्याची दाट शक्यता आहे. भीती अशी वाटते की प्रत्येक माणूस वेगळा आहे, असे आम्ही म्हणतो, हे वेगळेपणच नष्ट करायला तंत्रज्ञान सरसावते आहे. देव करो आणि माणसाला या अधीरतेपासून दूर राहण्याची सुबुद्धी होवो!

- यमाजी मालकर / ymalkar@gmail.com